অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आफ्रिका - हवामान, जलनिस्सारण

आफ्रिका - हवामान, जलनिस्सारण

जलनिःसारण :

आफ्रिकेच्या उंच व सखल दोन्ही भागांत बशीसारखे खोलगट भाग तयार झालेले आहेत. समुद्राच्या बाजूला डोंगर उतार सामान्यतः एकदम तीव्र होतात आणि त्यात सापेक्षतः लहान परंतु वेगवान प्रवाहांनी खोल दऱ्या कोरलेल्या आढळतात. अंतर्भागाच्या बाजूला उतार सौम्य असतात. याला अपवाद म्हणजे अ‍ॅटलास पर्वत, ड्रेकन्सबर्ग पर्वत व इथिओपियाचा डोंगराळ प्रदेश हे होत. पठारप्रदेशाच्या उत्थापनामुळे पूर्वी पुष्कळशी अंतर्गत सरोवरे व समुद्र निर्माण झाले होते. ते आता नाहीसे तरी झाले आहेत किंवा लहान झाले आहेत. पठाराची कड मागेमागे रेटीत गेलेल्या प्रवाहांनी त्यांचा निचरा केला आहे. नायजर आणि काँगो या नद्या अपर नायजर व मध्य काँगो यांच्या द्रोणीतील सरोवरांचे पाणी वाहून नेतात; या नद्या जलोढांच्या विस्तीर्ण प्रदेशातून वळणे घेत घेत जातात आणि मग पठाराच्या कडेवरून खाली कोसळून समुद्राकडे जातात. तरीसुद्धा या खंडाचा सु. ३३% भाग अंतर्गत जलनिःसारणाचा आहे; त्याला समुद्राकडे वाट नाही. यात सहारा व लिबियाच्या वाळवंटांचा बराच भाग, चॅड सरोवरद्रोणी, कालाहारी वाळवंटाचा काही भाग व खचदऱ्या यांचा समावेश होतो.

किनारी प्रदेशातील लहान व हंगामी प्रवाह सोडले, तर या खंडात फक्त नऊ मोठ्या नदीसंहती आहेत. त्यांपैकी चॅड सरोवराची संहती समुद्रापर्यंत जाऊ शकत नाही. मोठ्या नद्यासुद्धा पुरेसा अवधी न मिळाल्यामुळे आपापले मार्ग पुरेसे खोल खोदू शकलेल्या नाहीत. पठाराच्या कठीण खडकांच्या कडेवरून खाली अरुंद, मैदानी किनारी प्रदेशात येताना त्यांच्या मार्गात द्रुतवाह, प्रपात व धबधबे  तयार झालेले आहेत.

काँगो या नदीचे जलनिःसारण क्षेत्र सर्वांत मोठे ३६,९०,७०० चौ. किमी. असून ते सर्वस्वी उष्णकटिबंधात आहे. तिची लांबी ४,३७१ किमी. आहे. ती विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंकडील प्रदेशातून जात असल्यामुळे तिच्या खोऱ्याच्या बहुतेक भागात विषुववृत्तीय बारमाही पाऊस भरपूर पडतो. यामुळे या खोऱ्यातील सर्व प्रमुख नद्या बारमाही आहेत. द्रुतवाह व धबधबे यांविरहितच्या भागात त्या जवळजवळ वर्षभर नौकासुलभ असतात. मध्य काँगोचे बहुतेक सर्व खोरे ३०० मी. पेक्षा अधिक उंचीवर आहे व त्याचा सौम्य उतार आग्नेयीकडून वायव्येकडे आहे. हिच्याभोवती दक्षिणेस कटांगा-अंगोला पठार, पूर्वेस पूर्व आफ्रिकेच्या खचदर्‍यांच्या काठावरील उंच प्रदेश व उत्तरेस काँगो व नायजर-शारी यांधील जलविभाजक असे उंच प्रदेश आहेत. या गाळप्रदेशातून अनेक प्रवाह वेडेवाकडे वाहात जातात व तेथे अनेक सरोवरे व दलदली आहेत. खोऱ्याच्या या भागाचा संपूर्ण निचरा अजूनपर्यंत कधीही झालेला नाही. क्रिस्टल पर्वतातून ३२ द्रुतवाहांतून व प्रपातमालिकेतून बाहेर पडण्यापूर्वीच तिला तिच्या सर्व उपनद्या मिळतात. या प्रपातद्रुतवाहमालिकेला लिव्हिंग्स्टन फॉल्स म्हणतात. येथील स्टॅन्लीपूलपासून लगेच खाली फक्त सु. ३५० किमी. त नदी सु. २२५ मी. खाली जाते. याच्यावरील भागात स्टॅन्ली फॉल्स ते स्टॅन्लीपूल यांदरम्यान १,६०० किमी. हून अधिक लांब भागात ती सु. २५० मी. खाली येते. काँगोचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार झालेला नसून खाडी आहे.

नाईलचे जलवाहनक्षेत्र सु. २८,७५,००० चौ. किमी. असून तिची लांबी सु. ६,६९० किमी. आहे. ही जगातील सर्वांत लांब नदी असून ती अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी वगैरे मोठमोठ्या नद्यांच्या तोडीची समजली जाते. एका मरुभूमीतून जात असूनही तिचे पाणी कायम राहाते, याचे कारण तिला पाण्याचा बराचसा पुरवठा पूर्व आफ्रिकेच्या पठारावरील व्हिक्टोरिया सरोवर या विषुववृत्तीय पाण्याच्या प्रचंड साठ्यातून होतो. तिची मोठी उपनदी नील नाईल ही इथिओपियाच्या उन्हाळी मोसमी पावसाचे पाणी आणते. मुख्यतः यामुळेच नाईलच्या खोऱ्याच्या खालच्या टप्प्यात पाण्याचा एकूण पुरवठा खूपच कमीजास्त होत असतो. खार्टूम व आस्वान यांदरम्यानच्या सहा द्रतवाहांमुळे या नदीवरील स्वैरनौकानयनास पायबंद बसलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्येपासून या नदीवर बांधलेली धरणे व घातलेले बंधारे यांमुळेही तिच्यावरील नौकासंचारास मर्यादा पडलेली आहे. नाईलच्या मुखाजवळ मोठा, सुपीक त्रिभुज प्रदेश बनलेला आहे.

नायजर ही नदी अटलांटिकपासून फक्त सु. ३२५ किमी. वर फूटा जालन पठारावर उगम पावते, परंतु गिनीच्या आखाताला मिळेपर्यंत तिच्या प्रवाहाची लांबी सु. ३,१८५ किमी. भरते. लोअर नायजर ही पूर्वी एक स्वतंत्र नदी होती; परंतु तिने पठाराची मागे मागे झीज करून मध्यखोऱ्याचे पाणी वाहून आणले आहे. हे मध्यखोरे पूर्वी एक अंतर्देशीय सरोवर होते. अजूनही टिंबक्टूच्या वरील भागातील पावसाळ्यात ते पुराने सहज भरून जाते. नायजरची मुख्य उपनदी बेन्वे हीसुद्धा चॅड सरोवराच्या प्रदेशात उत्तर नायजेरिया व कॅमेरूनचे डोंगर यांना जोडणाऱ्या पठारातून अशीच मागे मागे झीज करीत चालली आहे.

झँबीझी ही ३,५४१ किमी. लांब असून तिचे जलनिःसारणक्षेत्र सु. १३,३०,००० चौ. किमी. आहे. तिच्या वरच्या टप्प्यात ती १,२२० मी. उंचीवरील झँबिया व र्‍होडेशिया येथील विस्तृत व उथळ गाळद्रोणीचा निचरा करते. या भागातील तिच्या उपनद्या अधूनमधून वाहणाऱ्या आहेत, कारण येथील पाऊस अगदी हंगामी स्वरूपाचा असून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. तिच्या मधल्या टप्प्यात धबधबे व द्रुतवाह आहेत. त्या सर्वांत विशेष चित्तवेधक दृश्य व्हिक्टोरिया धबधब्याचे आहे. हा सु. १०८ मी. उंच असून त्याच्या खालच्या विभंगरेषांच्या अनुरोधाने तयार झालेल्या अरुंद नागमोडी मार्गांने नदी पुढे जाते. त्यापुढील भागात करिबा धरणामुळे विस्तीर्ण सरोवर तयार झालेले आहे. हिंदी महासागराजवळ या नदीची रुंदी ८ किमी. किंवा अधिकही होते.

ऑरेंज ही नदी २,०९२ किमी. लांब असून तिचे जलवाहनक्षेत्र ४,४१,३०० चौ. किमी. आहे. तिची वाल ही एकच उपनदी आहे. आफ्रिकेच्या दक्षिण भागातील काही उंच प्रदेशाचे जलवाहन ऑरेंजमुळे पश्चिमेस अटलांटिककडे होते. परंतु बाष्पीभवनामुळे तिचे पाणी इतके कमी होते, की ते आधुनिक पाणीपुरवठा योजनांस अगदी कमी पडते आणी अवर्षणाच्या काळात तर ती कोरडीसुद्धा पडते. पावसाचे बरेच पाणी नदीपर्यंत पोचतच नाही. ते उथळ खोलगट भागात साचून राहते व त्याचे बाष्पीभवन होऊन तेथे क्षारांचे थर तयार झालेले आढळतात.

लिंपोपो ही नदी व्हेल्ड पठाराला वळसा घालून ऑरेंज व झँबीझी या दरम्यानच्या प्रदेशातील पाणी वाहून नेते व मोझँबीकमध्ये हिंदी माहसागराला मिळते. लिंपोपो म्हणजे सुसर. या नदीत पुष्कल सुसरीं असल्यामुळे तिला हे नाव मिळाले आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल व व्होल्टा यांचे जलवाहनक्षेत्र वरील नद्यांच्या मानाने लहान आहे. उत्तर आफ्रिकेतील मोठमोठ्या मरूप्रदेशांत अनेक खोलगट भाग आहेत. त्यांना समुद्राकडे वाट नाही. चॅड सरोवर उथळ असून त्याचा विस्तार प्रतिवर्षी कमीजास्त होत असतो. त्याला मिळणारी शारी नदी अत्यंत अनियमित वाहणारी आहे. ईशान्येकडील बोडेले खोलगट प्रदेशात चॅडमधील जादा पाणी कधीकधी वाहत जाते. ट्युनिशियाच्या गॅबेस आखातापासून खोलगट प्रदेशांची एक मालिकाच एल् जाऊफपर्यंत गेलेली आहे. त्यांतील कित्येक प्रदेश समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. सहारात जे काही थोडे प्रवाह वाहतात, ते वाळवंटातच लुप्त होतात.

उत्तर किनाऱ्यावर मोरोक्कोमधील मौलूया, अल्जीरियातील चेलिफ व ट्युनिशियामधील मेजेर्दा या नद्या अ‍ॅटलास पर्वतात उगम पावून भूमध्य समुद्रास मिळतात.

हवामान : ३७० उ. ते ३५० द. विस्तारामुळे आफ्रिकेचे हवामान मुख्यतः उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय आहे. भूमध्य सागरीभागांतील पठारावरील उंच प्रदेशात व दक्षिणेस आणि नैर्ऋत्येस केप प्रांतात ते समशीतोष्णकटिबंधीय आहे. पश्चिम किनाऱ्याजवळून जाणाऱ्या थंड प्रवाहांमुळे तेथील हवा थोडीशी कमी उष्ण होते. पूर्व किनाऱ्याजवळून जाणाऱ्या उष्ण प्रवाहांचा परिणाम अधिक होतो व उष्ण आणि दमट हवा बरीच आतपर्यंत येते. वार्षिक पावसाचे प्रमाण व वाटणी बरीच बदलत्या स्वरूपाची आहे. विषुववृत्तीय सखल प्रदेशात ऋतूंचा बदल जाणवत नाही; इतरत्र तो स्पष्ट जाणवतो. बऱ्याच भागांत मध्यान्हीचा सूर्य डोक्यावरून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गेला, म्हणजे त्या पाठोपाठ अभिसरण पर्जन्य पडतो.

रूआंडाच्या पश्चिमेकडील काँगो खोऱ्याचा भाग, बुरूंडी, मध्य आफ्रिका संघराज्य, गिनी किनाऱ्याचा दक्षिण नायजेरियापर्यंतचा भाग, आयव्हरी कोस्ट व घाना यांचा काही भाग येथे विषुववृत्तीय हवामान आढळते. येथे सतत ओला उन्हाळा हाच ऋतू असतो. अभिसरण पर्जन्य बारमहा व सपाटून पडतो. स्पष्ट असा कोरडा ऋतूच नसतो. विषुववृत्ताजवळ मार्च व सप्टेंबर हे दोन अतिपावसाचे महिने असतात. तेथून दूरदूर जावे तसतसे उन्हाळ्याच्या व अतिपावसाच्या काळांतील अंतर कमी होत जाते व मग उत्तरेकडे जुलै व दक्षिणेकडे जानेवारी हे उन्हाळ्याच्या मध्याचे महिने अतिपावसाचे महिने असतात. काँगोच्या खोऱ्यात सरासरी पर्जन्यमान १५० ते १७५ सेंमी. असते. परंतु पश्चिमेकडील काही भागात ते ३७५ ते ५०० सेंमी. पर्यंतही जाते. कॅमेरूनमधील पर्वतउतारांवर फार पाऊस पडतो. नेहमीच्या अभिसरण पर्जन्याला मे ते ऑक्टोबरपर्यंत अंतर्भागात जाणाऱ्या मोसमी वार्‍यांमुळे येणाऱ्या पावसाची जोड मिळाली, म्हणजे तेथे पाऊस सतत चालू असतो; कोरडा ऋतू कधी येतच नाही. दूआला येथे ३९६ सेंमी. तर पोर्ट हारकोर्ट येथे २४९ सेंमी. पाऊस पडतो. जेथे मोसमी वार्‍यांचा प्रभाव अधिक आहे, तेथे पावसाळा सु. ७ महिने टिकतो व नंतर ५ महिने कोरडे जातात. त्यावेळी ईशान्येकडून कोरडे हरमॅटन वारे वाहतात. काँगोच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी तपमान २७० से. असते. त्यात वर्षभरात फारसा फरक पडत नाही. दैनिक तपमानकक्ष मात्र ७० ते ११० से. असते.

विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशाभोवती सु.१४० उ. व १६० द. पर्यंत उष्णकटिबंधीय हवामानाचा गवताळ प्रदेश आहे; त्याला सॅव्हाना म्हणतात. विषुववृत्तावरील केन्या, युगांडा वगैरे प्रदेश उंच पठारावर असल्यामुळे त्यांचे हवामान विषुववृत्तीय नसून उष्णकटिबंधीय असते. येथे ऋतूंचा फरक स्पष्टपणे जाणवतो. उन्हाळा कडक असतो व हिवाळ्यात थंडी नसली तरी तपमान सुं. ११० से. ने उतरते. पाऊस उन्हाळ्यात येतो व त्याचे प्रमाण ७५ सेंमी. ते १५० सेंमी. पर्यंत असते. युगांडा ते पश्चिम आफ्रिकेपर्यंतच्या प्रदेशात उन्हाळ्याचे सरासरी तपमान ३२० से. पर्यंत जाते व हिवाळ्यात ते १५० ते २०० से. पर्यंत उतरते. उदा., कानो-एप्रिल ३१० से., जाने. २२० से.; नैरोबी-मार्च व ऑक्टोवर १८० से., जुलै १५० से.; दक्षिण गोलार्धात असे हवामान र्‍होडेशिया, झँबिया, मालावी व अंगोला येथे आढळते. हा बहुतेक भाग ९०० मी. पेक्षा उंच आहे. झँबीझीचे खोरेच फक्त कमी उंचीचे आहे. तेथे तपमान ३८० से. पर्यंत जाते. उंच भागात तपमान २७० से. पर्यंत असते. पावसाचे प्रमाण ७५ सेंमी. ते १२५ सेंमी. इतके असते.

या हवामानाच्या वाळवंटाकडील कोरड्या भागात उत्तर सूदान, केन्याचा उत्तरेकडील प्रदेश, युगांडाचा कारामोजा भाग, पूर्व आफ्रिकेचा न्यीका पट्टा, टांगानिकाचा दक्षिण भाग, उत्तर कालाहारी ते दक्षिण अंगोला हे प्रदेश येतात. तेथे तपमान वर्षभर जास्तच असते आणि पाऊस कमी असतो. उदा., केझ-मे ४२० से., दैनिककक्षा १७० से., पाऊस ७५ सेंमी.; न्यामे-मे ४१० से., दैनिककक्षा १७० से., पाऊस ५८ सेंमी.; डोडोमा-नोव्हें. ३१० से., दैनिककक्षा १३० से., पाऊस ५५ सेंमी.; मॉन-ऑक्टो. ३५० से., दैनिककक्षा १७० से., पाऊस ४३ सेंमी. वार्षिक सरासरी तपमानकक्षा मात्र ५० से. ते ११० से. इतकीच असते. हिवाळ्यात थंडी अशी नसतेच. हा प्रदेश म्हणजे उष्णकटिबंधीय हवामान व मरुप्रदेशीय हवामान यांमधील संक्रमण प्रदेशच होय.

मरुप्रदेशीय हवामान हे उत्तरेकडे सहारा वाळवंटात व दक्षिणेकडे कालाहारी वाळवंट आणि नैर्ऋत्य आफ्रिका येथे आढळते. सहारा वाळवंट हे अटलांटिकपासून तांबड्या समुद्रापर्यंत पसरलेले असून त्याचा बहुतेक भाग अगदी ओसाड आहे. पृष्ठभाग वाळू, शिलाखंड, धूळ व लहानमोठे डोंगर यांनी भरलेला असून, बहुतेक काळ हवेचे वरून खाली येणारे प्रवाह चालू असतात; थोड्याशा वाऱ्यानेही धूळ उडते व आकाश धूसर होते. गिरिपिंडाखेरीज इतरत्र वर्षेच्या वर्षे बिनपावसाची जातात. पावसाचा अभाव आणि मोठी तपमानकक्षा ही या हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. उन्हाळ्यात तपमान ४३० सें. च्याही वर जाते. हवा कोरडी असल्यामुळे जमीन भराभर निवते व रात्री थंडी असते. हिवाळ्यात दिवसा तपमान सु. १६० से. असते आणि रात्री पाणी गोठण्याइतकी कडक थंडी पडते. मधूनमधून स्थानिक स्वरूपाची धुळीची जोरदार वादळे होतात. त्यांस सिमूम, सिरोक्को, खामसिन इ. स्थानिक नावे आहेत. कालाहारी वाळवंट ऑरेंज नदीपासून झँबीझीपर्यंत पसरलेले असून तेथे दक्षिणेकडे सु. २५ सेंमी. व उत्तरेकडे सु. ६०-६२ सेंमी. पर्यंत उन्हाळी पाऊस पडतो. हा भाग सहारासारखा अगदी वनस्पतिविरहित नाही. काही ना काही उपयुक्त वनस्पती सर्वत्र उगवते. उन्हाळ्याचे तपमान ३२० से. पर्यंत असते ते क्वचित ४१० से.पर्यंत जाते. हिवाळ्यात दिवसाचे तपमान २१० से. पर्यंत व रात्रीचे बर्फ पडण्याइतके असते. १,००० मी. वरील प्रदेशात कडक थंडी व जोरदार बर्फ पडते. नमीब, नैर्ऋत्य आफ्रिकेच्या पठाराचा दक्षिण भाग, नमाकालँड, दक्षिण आफ्रिकेच्या कारूचा कोरडा भाग व ऑरेंज खोऱ्याचा खालचा भाग यांचाही समावेश या प्रकारात होतो. येथे पाऊस १२ ते ४० सेंमी. पडतो व त्यापैकी निम्मा हिवाळ्यात पडतो. नमीब हा किनारी, ओसाड, अरुंद व वाळवंटी प्रदेश थंड व जवळजवळ पर्जन्यहीन आहे. तो अंगोलापासून केपपर्यंत पसरलेला आहे. मोसॅमीडीस येथे फक्त ८ सेंमी. पाऊस पडतो. बेंग्वेला समुद्रप्रवाहामुळे किनारी प्रदेशाची हवा थंड होते. अंतर्भागातील उंच प्रदेशाची हवा त्या मानाने उबदार राहते. दक्षिण आफ्रिकेच्या पठाराकडून येणारे उष्ण बर्ग वारे पुष्कळदा तपमान वाढवितात.

भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील मोरोक्को, अल्जीरिया व ट्युनिशिया येथे आणि केप प्रांताच्या नैर्ऋत्य भागात भूमध्यसागरी हवामान आढळते. हे प्रदेश डोंगराळ असून उंची व वाताभिमुखता यांप्रमाणे वादळी स्वरूपाचा सु. ३७ सेंमी. ते ७५ सेंमी. पाऊस हिवाळ्यात पडतो. उन्हाळात दीर्घ व कोरडा असतो. उत्तरेकडील प्रदेशात किनारपट्टी, ९०० ते १,२०० मी. उंचीचे पठार व अ‍ॅटलास पर्वताचे अरण्यमय उतार यांचाही समावेश होतो. पर्वतमय भागात उन्हाळा व हिवाळा दोन्ही वेळा भरपूर पाऊस पडतो. अटलांटिक किनाऱ्यावर थंड कानेरी प्रवाहाचा परिणाम होऊन उन्हाळा सौम्य होतो, हवा आर्द्र असते व तपमानकक्षा कमी असते. येथून पूर्वेकडे उन्हाळी तपमान वाढत जाते. मॉगॅदोर येथे २०० से. तर अल्जीअर्स व ट्यूनिस येथे ३३० से. तपमान असते. तपमानकक्षा वाढत जाते. हिवाळ्यातील न्यूनभारांबरोबर पश्चिमी वारे व ढग येतात. अल्जीअर्स येथे जानेवारीचे सरासरी तपमान १३० से. असते. किनाऱ्यावर बर्फ क्वचितच पडते; परंतु अ‍ॅटलास पर्वताच्या रांगांवर, तेथील शॉट्सच्या पठारावर व कोरड्या स्टेप भागात ते पुष्कळदा आढळते.

केप प्रांतातील भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश उत्तरेकडील प्रदेशाच्या मानाने लहान आहे. परंतु तेथे पाऊस व तपमान यांचे फरक अधिक मोठे आहेत. किनाऱ्यापासून थोडेसेच आत गेले, तरी उन्हाळ्यातील हवामान बेचैन करण्याइतके असते. वेलिंग्टन येथे जानेवारीचे सरासरी तपमान ३१० से. असते. किनारी भागात ते २१०ते २३० से. पर्यंत असते. हिवाळ्यात वायव्येकडून व उन्हाळ्यात आग्नेयीकडून जोरदार वारे वाहतात. केपटाऊन येथे ६०-६५ सेंमी. पाऊस पडतो, परंतु डोंगराळ भागात तो १५०-१७५ सेंमी. पर्यंत जातो. उत्तरेकडे व अंतर्भागाकडे पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी होते. कारूच्या बाजूला निमओसाड प्रदेशाच्या हवामानात रूपांतर होते. पावसाचे प्रमाण ३० सेंमी. ते १० सेंमी. पर्यंत कमी होते.

मोझँबीकच्या आग्नेयीकडील मैदानी प्रदेश व त्याच्या दक्षिणेची दक्षिण आफ्रिकेची चिंचोळी किनारपट्टी येथे आर्द्र, उपोष्णकटिबंधीय हवामान असते. येथे पाऊस मुख्यतः उन्हाळ्यात ७५ सेंमी. ते १२५ सेंमी. पर्यंत पडतो. उन्हाळ्याचे जानेवारीतील तपमान २५० से. ते ३०० से. असते. जुलैत ते २२० से. ते २४० सें. असते. या वेळी हवा अतिशय सुखकारक असते. दरबान येथे जानेवारी २७० से., जुलै २२० से. व पाऊस सु. ११२ सेंमी. असतो.

मोझँबीकमधील पावसाळा नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असून तो उत्तरेकडील आशियाई मान्सूनचाच विस्तार होय. हिवाळ्यातील व्यापारी वारे तेथे सहसा पाऊस आणीत नाहीत. मोझँबीक व नाताळ यांच्या किनाऱ्यावर उष्ण मोझँबीक प्रवाहाचा परिणाम होऊन तेथील तपमान थोडेसे वाढते.

दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख शेती प्रदेश व विट्वॉटर्झरँड हा खनिजयुक्त प्रदेश ९०० ते १,८०० मी. उंच असून त्याला हाय व्हेल्ड म्हणतात. तेथे सौम्य, पठारी  हवामान असते. स्वच्छ आकाश, कमी  पाऊस व दररोजच्या हवेत मोठा बदल हे या हवामानाचे विशेष होत. उन्हाळा उबदार असतो व पाऊस त्याचवेळी पडतो. यावेळी हवा शीतल असते. तपमान सु. २६० ते ३०० से. पर्यंत असते व हिंदी महासागरावरून आलेल्या वार्‍यांबरोबर आलेल्या आर्द्रतेमुळे अभिसरणपर्जन्य सु. ५० सेंमी. ते १०० सेंमी. पर्यंत पडतो (जोहॅनिसबर्ग ७५ सेंमी., किंबर्ली ९० सेंमी.). तो पश्चिमेकडे कमी कमी होत जातो. हिवाळ्यातील हवा दिवसा सुखकर व रात्री मात्र थंड असते. यावेळी दक्षिणेकडून थंड हवेचे लोट येतात व त्यांमुळे कधी कधी डोंगरावर पाऊस व बर्फही पडतो. दऱ्याखोर्‍यांत दाट धुके दिसते व तपमानाची विपरीतताही काही भागांत अनुभवास येते. पूर्वेच्या प्रमुख पठारान्त कड्यांवर काही काही ठिकाणी आर्द्र, थंड व दाट धुके असलेले पर्वतीय हवामान असते.

रूवेनझोरी, केन्या, किलिमांजारो, एल्गन इ. उंच पर्वतांच्या उतारांवर आणि इथिओपियाच्या विस्तीर्ण पठारावर, १,८०० मी. पेक्षा अधिक उंचीवर पर्वतीय हवामान असते. उंची आणि विगोपन यांना अनुसरून हवामानात महत्त्वाचे स्थानिक फरक पडतात. पर्वतांची उंची ४,५०० मी. पेक्षा अधिक आहे. पठार मात्र सु. २,५०० मी. उंच आहे. १,८०० ते २,५०० मी. उंचीपर्यंत हवामान सुखकारक असते. इथिओपियातील पाऊस जून ते सप्टेंबरपर्यंत पडतो. तो मोसमी प्रकारचा असतो (अदिस अबाबा १२५ सेंमी.). दक्षिण गोलार्धात बोट्स्वानाच्या उंच प्रदेशात या प्रकारचे हवामान आहे. अधिक उंचीवरील डोंगर उतारांवर थंड, आर्द्र, धुक्याने युक्त हवामान असते. या सु. २,४०० मी. उंचीवरील ठिकाणी हिवाळ्यात जुलैचे सरासरी कमाल तपमान -४० से. व वार्षिक पाऊस ५५ सेंमी. असतो.

आफ्रिकेतील गोऱ्या लोकांच्या कायम वसाहतीच्या शक्यतेबाबत हवामान हा एक मोठा निर्णायक घटक आहे. गिनीच्या आखाताच्या किनारपट्टीवरील उष्ण, दमट व सापेक्षतः अनारोग्यकारक हवामानपरिस्थितीमुळे तो प्रदेश बराच काळपर्यंत ‘गोऱ्या माणसाचे स्मशान’ म्हणून ओळखला जात होता. याउलट पूर्व व दक्षिण आफ्रिकेच्या पठारी प्रदेशाचे, तेथील १,५०० मी. उंचीवरील अंतर्भागातील निरोगी हवामानामुळे यूरोपीयांस मोठेच आकर्षण वाटले. र्‍होडेशिया व दक्षिण आफ्रिका येथे त्यांच्या कायम वसाहती झाल्या. गोर्‍यांशिवाय इतरांना तेथे कायम वसाहती करू देण्यास बंदी घालण्याच्या त्यांच्या धोरणामुळे व मोझँबीक आणि अंगोला येथील पोर्तुगीज सत्ताधार्‍यांच्या त्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणामुळे आफ्रिकेतील वंशभेद व वर्णभेदविषयक प्रश्नाला उग्र स्वरूप प्राप्त झाले आहे.

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate