অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आराकान योमा

दक्षिणेकडील चिंचोळी पर्वतरांग

ब्रह्मदेशाच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागापैकी दक्षिणेकडील चिंचोळी पर्वतरांग. ही दक्षिणोत्तर गेलेली असून सामान्यतः बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला समांतर आहे. तिचे काही फाटे समुद्रापर्यंत गेलेले आहेत. आराकान योमाची सरासरी उंची १,८०० मी. पर्यंत असून मौंट व्हिक्टोरिया या सर्वोच्च शिखराची उंची ३,०६३ मी. आहे. आराकान योमाच्या उत्तरेस आराकान टेकड्या, चिन टेकड्या, लुशाई, पातकई इ. डोंगराळ भाग आहे. तोही काही लोक आराकन योमाचाच भाग समजतात. पूर्वेस इरावतीचे खोरे असून दक्षिणेस केप नेग्राईस पलीकडे मार्ताबानचे आखात व अंदमान समुद्र आहे. पश्चिमेस ब्रह्मदेशाचा चिंचोळा आराकान विभाग व त्या पलीकडे बंगालचा उपसागर आहे. आराकान योमा उंच उंच डोंगर व त्यांमधील खोल दऱ्या यांनी भरलेला आहे.

आराकान योमाचा गाभा

आराकान योमाचा गाभा स्फटिकयुक्त खडकांचा असून त्याच्या दोन्ही बाजू मुख्यतः तृतीय युगीन, दाट वलीकरण झालेल्या, कठीण गाळखडकांच्या बनलेल्या आहेत. हिमालयाचे उत्थान झाले त्या वेळेस याचेही उत्थान झाले असावे. यात काही ज्यूरासिक क्रिटेशस खडकही आढळतात. क्रिटेशस काळातील सर्पेंटाईन खडक येथील खडकात घुसल्यामुळे पूर्वेकडील बाजूस विभंग झालेले दिसतात. येथे क्रोमाइट व इतर खनिजे आहेत, परंतु ती खणून काढली जात नाहीत. मिन्बू व हेंझाडा विभागातील पायथ्याच्या टेकड्यांच्या भागात थोडा लिग्नाइट कोळसा सापडतो.

आराकान योमामुळे एका बाजूस ब्रह्मदेश व दुसऱ्या बाजूस भारत आणि बांगला देश यांमध्ये दळणवळणाच्या दृष्टीने मोठाच अडथळा उत्पन्न झालेला आहे. येथील नद्या दक्षिणोत्तर वाहतात. त्यांपैकी कलदन, लेमरो, मयू व नाफ या प्रमुख होत. त्या शेवटी एकदम वळण घेऊनबंगालच्या उपसागरास मिळतात. त्यांच्या उगमप्रवाहांनी डोंगराळ भागातून काढलेल्या वाटा आधुनिक दळणवळणास उपयोगी नाहीत. दक्षिणेकडे आनपासून अन्गपेपर्यंत व तौन्गूपासून पडाउंगपर्यंत जाणारे रस्ते या पर्वताला जेथे ओलांडून जातात, तेथेच फक्त यातील दोन उपयुक्त खिंडी आहेत. या दुर्गमतेमुळे आराकान किनार्‍यावर अक्याबखेरीज एकही महत्त्वाचे बंदर उदयास आलेले नाही.

मान्सून वाऱ्यांच्या मार्गातही अडथळा

मान्सून वाऱ्यांच्या मार्गातही आराकान योमा हा मोठाच अडथळा आहे. त्यामुळे त्याच्या पश्चिम उतारावर नैर्ऋत्य मान्सूनचा २०० ते ५०० सेमी. पर्यंत पाऊस पडतो. पूर्व उतारावर मात्र पर्जन्यछायेमुळे ५० ते १०० सेंमी., क्वचित थोडा अधिकही पाऊस पडतो. पश्चिमेकडे ९०० मी. उंचीपर्यंत उष्णकटिबंधीय वर्षावने आढळतात. तेथील वृक्षांचे लाकूड टणक असल्यामुळे ते फारसे उपयोगी पडत नाही. ९०० मी. पेक्षा जास्त उंचीवर सदाहरित ओकवृक्षांची अरण्ये आहेत. क्वचित पाईन, फर, मॅपल हे वृक्ष आढळतात. अधिक उंच गेल्यास ऱ्होडोडेंड्रॉनची बने दिसतात. काही मोकळ्या जागी काटेरी झुडपे व थोडे गवत आढळते. ९०० मी. पेक्षा जास्त उंचीवर दहिवर व क्वचित बर्फही पडते. १०० सेंमी. पेक्षा अधिक पावसाच्या पूर्वेकडील भागात मोल्यवान सागवानाचे लाकूड मिळते. पिंकॅडोच्या लाकडाचा उपयोग लोहमार्गाच्या स्लीपर्ससाठी होतो. इमारती लाकडाच्या उत्पादनावर व तोडीवर आता शासकीय नियंत्रण आहे. या डोंगराळ भागात हत्ती, वाघ, अस्वल, गेंडा, हरिण, माकडे हे प्राणी आढळतात. येथे राहणार्‍या लोकांच्या फिरत्या शेतीमुळे जंगलाचे फार नुकसान झाले आहे. आधीच्या वृक्षांऐवजी बांबूची लागवड झालेली दिसते. जोरदार पावसामुळे अशा ठिकाणी अरण्यमृदेचेही नुकसान होऊन खडक उघडे पडलेले आहेत.

या भागात मुख्यतः चिन हे आदिवासी लोक राहतात. ते मूळ ब्रह्मी लोकांपेक्षा वेगळे असून त्यांच्या अनेक भाषा आहेत. ते दूरदूर, लहान लहान वस्त्या करून राहतात.

लेखक : ज. ब. कुमठेकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/12/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate