অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्क्टिक प्रदेश

आर्क्टिक प्रदेश

आर्क्टिक प्रदेश : पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्याकडील प्रदेश. ध्रुवतारा ज्या पुंजात आहे त्याला पाश्चात्त्य खगोलशास्त्रात ‘छोटे अस्वल’ या अर्थाचे नाव आहे. ग्रीक भाषेत आर्कटॉस म्हणजे अस्वल; त्यावरून उत्तर ध्रुवाभोवतीच्या प्रदेशाला ‘आर्क्टिक’ हे नाव पडले. काही लोक उत्तर ध्रुववृत्त, ६६० ३०' उ. अक्षवृत्त, ही या प्रदेशाची मर्यादा मानतात. परंतु हवामान व जीवन या दृष्टींनी उत्तरेकडील तरुरेषा ही यापेक्षा अधिक समर्पक मर्यादा आहे. तिच्या आत ग्रीनलंड, स्पिट्स्‌बर्गेन व इतर ध्रुवीय बेटे, अलास्का, कॅनडा व सायबीरियाचा उत्तर भाग, लॅब्रॅडॉरचा किनारा आणि आईसलँड, नॉर्व, स्वीडन, फिनलंड व यूरोपीय रशिया यांचे उत्तर भाग हे प्रदेश येतात. यूरोपच्या उत्तर प्रदेशाचा अंतर्भाव काही लोकांच्या मते उपआर्क्टिकमध्ये होतो. ही तरुरेषा सामान्यतः उन्हाळ्यातील १०० सें. समतापरेषेला धरून आहे.

आर्क्टिकच्या दक्षिणेस जेथे वर्षातून चार महिने तपमान १०० से. पेक्षा जास्त नसते, अशा प्रदेशाला उपआर्क्टिक म्हणतात. आर्थिक व लष्करी दृष्ट्या हा भाग आर्क्टिक प्रदेशाचाच होय असे पुष्कळ भूगोलशास्त्रज्ञ मानतात. आर्क्टिक प्रदेशाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणजे उन्हाळा व हिवाळा यांच्या तपमानातील फार मोठा फरक, उंच प्रदेश सतत बर्फाच्छादित असणे आणि सखल भागात गवत, लव्हाळे, बुटकी झुडपे आणि कायम गोठलेली जमीन ही होत. या जमिनीचा वरचा थर उन्हाळ्यात वितळतो, तेव्हा ती काळी आणि दलदलीची दिसते. आर्क्टिक भूप्रदेशाचा ६०% भाग कायम हिमाच्छादनाच्या बाहेर आहे. विसाव्या शतकात व विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर आर्क्टिक व उपआर्क्टिक प्रदेशांचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढत आहे आणि वातावरणाच्या जागतिक अभ्यासाच्या दृष्टीने या प्रदेशाला विशेष महत्त्व येऊ लागले आहे.

१९५७-५८ मधील आंतरराष्ट्रीय भूभौतिक पर्वाचा एक प्रमुख उपक्रम आर्क्टिक संशोधन हा होता. त्या काळात ३०० प्रायोगिक केंद्रांनी या प्रदेशाविषयीची महत्त्वाची माहिती मिळविली. १९५८ मध्ये नॉटिलस व स्केट या अमेरिकन पाणबुड्यांनी बर्फाखालून प्रवास करून उत्तर ध्रुव गाठून पलीकडे बाहेर येण्यात यश मिळविले. त्यानंतरही आंतरराष्ट्रीय सहकार्यांने या प्रदेशाचा अभ्यास चालू आहे. आर्क्टिक संशोधनाचा व विकासाचा सर्वात सधन कार्यक्रम रशियाचा आहे. आपापले सीमाप्रदेश व मार्ग यांच्या संरक्षणासाठी कॅनडा, अमेरिका व रशिया यांनी या प्रदेशात लष्करी तळ व प्रचंड रडारयंत्रणा उभारली आहे. त्यासाठी तेथील जमीन, वनस्पती व प्राणी यांचा शास्त्रज्ञांना विशेष बारकाईने अभ्यास करावा लागला आहे.

भूवर्णन

आर्क्टिक प्रदेशात कॅनेडियन, बाल्टिक, अंगारा व कोलीमा ढालप्रदेश समाविष्ट असून अंशत: त्यांवर व आजूबाजूला दीर्घकालपर्यंत गाळ साठत आलेला आहे. येथील पर्वत पुराजीव, मध्यजीव व नूतनजीव काळात तयार झाले. पुराजीव ते चतुर्थक कालखंडातील खडक रशियात व सायबीरियात आढळतात. तृतीयक युगातील अग्निजन्य हालचालींमुळे पॅसिफिकभोवतीचे पर्वत तयार झाले. कॅमचॅटका, अल्यूशन बेटे, अलास्का, आइसलँड येथील ज्वालामुखी व ग्रीनलंड आणि यान मायेन बेटांवरील उष्णोदकाचे झरे त्या हालचालींचे निदर्शक आहेत. आर्क्टिक प्रदेशातील पर्वतांची उंची २,००० ते ५,००० मी. पर्यंत आढळते. सु. ७,५०,००० वर्षांपूर्वी येथील हवामान बदलून प्लेइस्टोसीन हिमप्रदेश बनले. हिमानीक्रियेमुळे कॅनेडियन, यूरोपीय व रशियन आर्क्टिक प्रदेश हिमाच्छादित झाले. ईशान्य सायबीरिया मात्र बचावला. बर्फ वितळल्यावर यू आकाराच्या दऱ्या, फियोर्ड वगैरे भूमिस्वरूपे दिसून आली.

 

जलवहन विस्कळित होऊन असंख्य सरोवरे तयार झाली. प्लेइस्टोसीन बर्फ वितळल्यावर जमीन खचलेलीच राहिली. ती नंतर उत्थान पावली व त्यामुळे काही भागांत १०० ते ५०० मी. उंचीवर उत्थित पुळणी व सामुद्री निक्षेप दिसून येतात. ढालप्रदेशांच्या पलीकडे गाळखडकांवर विस्तृत मैदाने तयार झालेली आहेत. त्यांवरून वाहणाऱ्या नद्यांनी (विशेषत: सायबीरियात) पुष्कळ जाडीचे जलोढनिक्षेप टाकलेले आहेत. येथे जमीन तयार होण्याची क्रिया फार सावकाश होते. येथील जमीन नित्य गोठलेली असते. उन्हाळ्यात वरचा थोडासा थर वितळतो. अमेरिकेत कायम गोठलेली जमीन २५० ते ५०० मी. खोल असते. सायबीरियात ७५० मी. खोलीपर्यंतही ती आढळते. काही ठिकाणी जमिनीखाली बर्फाचे थर गाडलेले आढळतात. हे भूहिम वितळले तर तेथे खड्डे पडून ते पाण्याने भरून येऊन डबकी व सरोवरे बनतात. त्याचप्रमाणे गोठलेल्या जमिनीतून पाणी वाहून जाणे शक्य नसल्यामुळेही पृष्ठावर सरोवर बनतात. आर्क्टिकचा फक्त ४०% भागच कायम हिमाच्छादित असतो. ग्रीनलंडचा ८५% भाग हिमाच्छादित आहे. बर्फाचा तळ काही ठिकाणी समुद्रसपाटीपेक्षाही खोल आहे. यावरून ग्रीनलंड हा मूळचा एक द्वीपसमूह असावा असे काही लोकांचे मत आहे. ग्रीनलंडमधील हिमनद्या समुद्रापर्यंत वाहात येतात व त्यांतून मोठमोठे हिमगिरी समुद्रात पडतात. कॅनडातील हिमनद्या समुद्रापर्यंत क्वचित येतात. एल्झमीअर बेटाच्या उत्तरेस तरंगत्या बर्फाचे मोठमोठे खंड आहेत. यातूनच आर्क्टिकची बर्फबेटे तयार झाली आहेत. रशियाच्या उत्तरेस बराच प्रदेश बर्फमुक्त आहे. ग्रीनलंडचा अंतर्भाग सोडून आर्क्टिकमधील इतर सर्व भागातील हिमनद्या उत्तरेकडे हटत चालल्या आहेत.

हवामान

हिमाच्छादित प्रदेशात कोणत्याही महिन्याचे सरासरी तपमान ०० से. पेक्षा अधिक नसते. वर्षातून निदान एक महिना सरासरी तपमान ०० से. ते १०० से.  पर्यंत असेल, तर ते टंड्रा प्रकारचे हवामान होय. अटलांटिक व पॅसिफिकभोवती हिवाळा फार कडक नसतो आणि हिमवृष्टी पुष्कळ होते. अंतर्गत प्रदेशात हिमवृष्टी कमी असते व हिवाळा फार कडक असतो. आर्क्टिकपेक्षा उपआर्क्टिकमध्ये खंडांतर्गत भागात हिवाळ्याचे तपमान कमी असते. उत्तर गोलार्धातील सर्वांत कमी नोंदलेले सरासरी तपमान ईशान्य सायबीरियातील ऑयम्याकन भागात व्हर्कोयान्स्क येथे -५०० से. आहे. प्रत्यक्ष ते -७०० सें. पर्यंतही गेलेले आहे. हडसन उपसागराच्या उत्तरेस, अल्यूशन बेटे, नैर्ऋत्यकिनारी ग्रीनलंड, आइसलँड व युरोपीय आर्क्टिक येथे हिवाळ्यात वादळी हवा, भरपूर वृष्टी व -६० से. पर्यंत तपमान असते. आर्क्टिक प्रदेशात हिवाळ्याच्या मानाने उन्हाळ्यात तपमानातील चढउतार कमी असतो. दक्षिण सीमेवर १०० से. पर्यंत तपमान जाते. अंतर्भागात हवा शांत, सूर्यप्रकाश टिकाऊ व तपमान २६० ते २७० सें. पर्यंत असे थोडा थोडा वेळ असते. त्यापाठोपाठ बहुधा गडगडाटी वादळ होते.

 

जास्त वृष्टीच्या प्रदेशात दृश्यता कमी होते. आर्क्टिकच्या बऱ्याच भागात हिमाच्या किंवा पावसाच्या रूपाने १५-२५ सेंमी. पर्यंत वृष्टी होते. आर्क्टिक प्रदेशातील हवामान निरीक्षणावरून यूरोपमध्ये हवामानाचे, विशेषत: वादळांचे अंदाज करता येतात. हिवाळ्यात पुष्कळदा ‘ध्रुवप्रकाश’ हा सृष्टिचमत्कार दिसतो. तसेच मृगजळही अनेकदा फसविते. येथील विशिष्ट वातावरणामुळे आवाज खूप दूरवर जातो. विसाव्या शतकात ध्रुवीय हवामानात लक्षात येण्याइतका बदल झालेला आहे. हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत. आइसलँड, नैर्ऋत्य ग्रीनलंड, स्वालबार येथील सागरी बर्फाचा विस्तार कमी झालेला आहे. हिमखंडांची जाडी कमी झालेली आहे. पक्षी, प्राणी व मासे अधिक उत्तरेला आढळून येऊ लागलेले आहेत. लोकांचे आर्थिक जीवन बदलू लागले आहे. ग्रीनलंडमध्ये सीलपेक्षा आता इतर माशांवर जीवन अधिक अवलंबून आहे. ७०० अक्षवृत्तापलीकडे ‘अटलांटिक कॉड’ मासे अधिक संख्येने दिसू लागलेले आहेत. सीलप्रमाणे कॉडपासून जळण व वस्त्र मिळत नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार व रोखीचे व्यवहार यांस महत्त्व येत चालले आहे. ग्रीनलंडच्या दक्षिण भागात तर मेंढपाळी सुरू झाली आहे.

खनिजे

येथील खाणी अलीकडच्या काळातील आहेत. १९२० नंतरची नैर्ऋत्य ग्रीनलंडमधील इव्हिगुट येथील क्रियोलाइटची खाण ही पहिली यशस्वी खाण होय. डिस्को उपसागराजवळ व स्वालबारमध्ये कोळसा मिळतो. पूर्व ग्रीनलंडमध्ये मेस्टेस्विर्ग येथे शिसे व जस्त यांची खाण आहे. नैर्ऋत्य ग्रीनलंडमध्ये यूरेनियमसाठी मोठा शोध झाला. ग्रेट बेअर सरोवराजवळ रेडियम व यूरेनियम यांच्या खाणी निघाल्या. ग्रेट स्लेव्ह सरोवराजवळ यलो नाइफ येथे सोने, हडसन उपसागरावरील रँकिन आखाताजवळ निकेल, यूकॉनमध्ये मेयो येथे शिसे व जस्त सापडले. इतरत्रही सोने सापडत होतेच. आर्क्टिककडील उतारावर विशेषेकरून तेल सापडले आहे. अंगावा उपसागराजवळ लोखंड आहे. पहिल्या महायुद्धानंतर रशियात कोला द्वीपकल्पात पेचोरा व येनिसे खोर्‍यांत खाणींची वाढ झाली. पूर्व सायबीरियात सोने व हिरे, आर्क्टिक किनाऱ्यावर मीठ, बऱ्याच भागात तेल व नद्यांच्या खोर्‍यांत कोळसा सापडतो. आर्क्टिक प्रदेशातून अमेरिका व यूरेशिया यांमधील सागरी व हवाई मार्ग जवळचे पडत असल्यामुळे हल्ली तेथे नौकानयन व हवाई वाहतूक यांत पुष्कळच प्रगती झाली आहे.

 

बर्फफोड्या बोटी, सागरी पाहणी, हवामानाचा चांगला अभ्यास, विमानांची मदत, अचूक नकाशे यांमुळे तेथे वाहतूक वाढली आहे. आर्क्टिकमधील खनिजे, तेथे प्राणिज अन्न भरपूर मिळण्याची  शक्यता व तेथून जाणारे जवळचे मार्ग यांमुळे या प्रदेशाला आर्थिक व लष्करी महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे आर्क्टिक प्रदेशावर सत्ता कोणाची हा महत्त्वाचा प्रश्न उत्पन्न झाला. प्रथम कोणी शोध केला किंवा वस्ती केली यापेक्षा आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्यावरील राष्ट्रांनी आपापल्या पूर्वपश्चिम सीमेवरील रेखावृतांमधील ध्रुवापर्यंतचा आर्क्टिक प्रदेश तो आपला असे मानण्यास सुरुवात केली. यातून बेटे व खंडाचा किनारा यांमधील पाणी, बेटांबेटांमधील पाणी, बेटे नसलेला आर्क्टिक महासागराचा भाग, तरंगते हिमखंड व हिमबेटे यांखालील पाणी, संबंधित प्रदेशावरील आकाशाचा भाग यांच्यावरील स्वामित्वाच्या समस्या उत्पन्न झालेल्या आहेत. समुद्रतळावरील संपत्तीच्या उपयोगासाठी किनाऱ्यापासून ३२० किमी. पर्यंतच्या समुद्रबूडजमिनीवरील स्वामित्वाचे तत्त्व १९५८च्या जिनिव्हा परिषदेने मान्य केले आहे;मात्र त्यामुळे किनाऱ्यापासूनच्या सागरी सीमेवर परिणाम होता कामा नये. हिमखंड व हिमबेटे ध्रुवाभोवती घड्याळकाटेविरुद्ध दिशेने फिरत असल्यामुळे दुसऱ्याच्या सीमेत वाहात जाणे शक्य असते. स्वामित्वाच्या प्रश्नाचा अद्याप निश्चित निर्णय झालेला नसला, तरी हवामान निरीक्षण, हवाई वाहतूक इ. गोष्टींसाठी सध्या मोठमोठे प्रदेश उपलब्ध आहेत. अणुसंचलित पाणबुड्यांमुळे आधुनिक शस्त्रास्त्रे व व्यापारी माल यांची बर्फाखालून वाहतूक करणे शक्य झाले आहे. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे लष्करी प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. अमेरिकेने कॅनडाच्या मदतीने आर्क्टिक प्रदेशात मोठी रडारयंत्रणा उभारली आहे. नाटोकरारातील राष्ट्रे व वॉर्साकरारराष्ट्रे यांमधील ताणलेल्या संबंधामुळे आर्क्टिक प्रदेशातून जाणाऱ्या मार्गांचे संरक्षण हाही महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. (चित्रपत्र ६२).

 

संदर्भ : 1. Baird, Patrick D. The Polar World, London, 1946.
लेखक :ज. ब. कुमठेकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/6/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate