অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आशिया

आशिया क्षेत्रफळ आणि लोकसंख्या

क्षेत्रफळाने व लोकसंख्येने जगातील पहिल्या क्रमांकाचे खंड. आशिया खंडाने पृथ्वीच्या एक अकरांश तसेच एकूण भूभागाच्या एक तृतीयांश व आफ्रिकेच्या दीडपट क्षेत्र व्यापले आहे. आशियाचे क्षेत्रफळ बेटांसह ४,४६,००,८५० चौ. किमी. व लोकसंख्या एकून पृथ्वीच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश, सु. १९८·८ कोटी (१९६९) आहे. विषुववृत्ताच्या एक अंश उत्तरेस आशियाचा मलेशिया भाग येतो, तेथपासून रशियाच्या केप चेल्यूस्किनपर्यंत (७८० उ.) आशियाचा दक्षिणोत्तर सलग भूभागाचा पसारा असून पूर्वपश्चिम पसारा २६० पू. ते १७०० प. इतका आहे.

आशियाचा मध्यभाग महासागरांपासून सु. ३,२०० किमी. हून अधिक दूर आहे. ग्रीकांनी सूर्य उगवणाऱ्या बाजूचा म्हणून ‘आसू’ नांव दिले तेच खंडाला रूढ झाले असून त्यात जगातील सर्वात उंच शिखर (एव्हरेस्ट), सर्वात खोल भूभाग (मृतसमुद्र), सर्वात जास्त तपमानाचे स्थान (जेकबाबाद), सर्वात कमी तपमानाचे स्थान (व्हर्कोयान्स्क), सर्वात जास्त पावसाचे समजले जाणारे ठिकाण (चेरापुंजी), सर्वात कमी पर्जन्यमानाचा वाळवंटी प्रदेश, जास्तीत जास्त दाट लोकवस्तीचा भाग (इंडोनेशिया, चीन, भारत), अगदी विरळ लोकवस्तीचा भाग (वाळवंटे, सायबीरिया) आढळून येतात. विविध लोक, वनस्पती व खनिज पदार्थ यांनी खंड समृद्ध असून जगातील मानवाची उत्पत्ती तसेच अनेक धर्माचे मूलस्थान आशियातच मिळते. आशिया खंडाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर असून दक्षिणेस हिंदी महासागर आहे.

पश्चिमेकडील अरबी समुद्र, तांबडा समुद्र व सुएझ कालवा यांनी आशिया आफ्रिकेपासून विभक्त झाला आहे. कॉकेशस पर्वतरांग, कॅस्पियन समुद्र, उरल नदी आणि उरल पर्वत ही यूरोप आणि आशिया यांमधील सीमा मानली जाते. पुष्कळदा यूरोप व आशिया मिळून एकच यूरेशिया खंड मानले जाते. भूमध्य, इजीअन, मार्मारा आणि काळा समुद्र हे नैर्ऋत्य आशिया व यूरोप यांना विभागतात. पूर्वेकडे बेरिंग सामुद्रधुनीने आशिया व अमेरिका वेगळे झाले आहेत. आशिया खंडाच्या पूर्वेस कॅमचॅटका द्वीपकल्प, कूरील बेटे, सकालीन बेट, जपान, रिऊक्यू, कोरिया, फिलिपीन्स आणि इंडोनेशिया यांमुळे पॅसिफिकचे ओखोट्स्क, जपान, पूर्व चीन, दक्षिण चीन व इंडोनेशिया समुद्र बंदिस्त झाल्याप्रमाणे आहेत.

 

या खंडात भारत, श्रीलंका (सिलोन), पाकिस्तान, बांगला देश, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, सिक्कीम, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीर राज्ये, कॉटार, बहरीन, ओमान, दक्षिण येमेन, येमेन, जॉर्डन, सिरिया, इझ्राएल, लेबानन, तुर्कस्तान, रशियाचा आशियांतर्गत भाग, मंगोलिया, चीन, तैवान, उत्तर व दक्षिण कोरिया, जपान, नाऊरू, फिलीपीन्स, उत्तर व दक्षिण व्हिएटनाम, लाओस, ख्मेर (कंबोडिया), थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रूनाइ, इंडोनेशिया व मालदीव हे देश असून, ब्रिटिश सत्तेखालील हाँगकाँग, पोर्तुगीज सत्तेखालील माकाऊ व तिमोर बेटांचा भाग आणि अरबस्तानातील काही अशासकीय प्रदेश यांचाही त्यात समावेश होतो. ईजिप्तचा सिनाई भाग आशियातच मोडतो; तसे काहींच्या मते सायप्रस बेटही आशियातच येते.

भूवर्णन

आशिया खंडाची घडण अतिशय जटिल स्वरूपाची समजली जाते. आशिया व आफ्रिका खंडे पूर्वी जोडलेली होती. तुर्कस्तान ते जपानपर्यंत गेलेल्या अनेक पर्वतरांगांच्या ठिकाणी पुराजीव व मध्यजीव कालखंडांत टेथिस हा मोठा समुद्र होता. टेथिसच्या उत्तरेस अंगाराभूमी हा प्रतिकारी खडकाचा भूभाग होता तर दक्षिणेकडे गोंडवनभूमी हाही तसाच प्रदेश होता. टेथिसच्या भूद्रोणीमध्ये गाळाचे थर साठले आणि गिरिजनक हालचालींमुळे मध्यजीव कालखंडाच्या अखेरीस व विशेषत: नूतनजीव कालखंडात त्या भागावर दाब पडून तेथे वलीपर्वतांच्या अनेक मालांचा जटिल भूभाग तयार झाला. आफ्रिका व आशिया विभागले जाऊन अंगारा व गोंडवनभूमी एकत्र जोडल्या गेल्या.

अरबस्तान, दक्षिण आफ्रिका व दख्खनचे पठार ह्या भागांना मात्र धक्का लागला नाही; त्यांवर नंतरच्या काळातील थर साचले तरी मूळ गाभा कायम राहिला. तुर्कस्तानपासून पूर्वेकडे गेलेल्या पर्वतरांगांच्या दरम्यान विस्तीर्ण पठारे निर्माण झालेली आहेत. तुर्कस्तानच्या उत्तरेस पाँटस व दक्षिणेस टॉरस पर्वत असून त्यांच्यामध्ये ॲनातोलियाचे पठार आहे. पाँटस व टॉरस हे आर्मेनिया पर्वतमंडलात एकत्र येतात. तेथून पुढे उत्तरेकडून एल्बर्झ, खुरासान व दक्षिणेकडून झॅग्रॉस, मकरान पर्वतरांगा जातात. या दोन्हींच्या दरम्यान इराण-अफगाणिस्तानचे पठार आहे.

अफगाणिस्तानच्या पूर्वेस जगाचे छप्पर म्हटले जाणारे पामीरचे पठार आहे. हे वस्तुत: एक पर्वतमंडलच आहे. याच्या सर्व दिशांस अजस्र पर्वतरांगा दूरवर पसरल्या आहेत; नैर्ऋत्येस हिंदुकुश, त्याच्या दक्षिणेस सुलेमान, आग्नेयीस हिमालय व त्याच्या उत्तरेस काराकोरम, पूर्वेस कुनलुन व आस्तिन ता, ईशान्येस तिएनशान आणि वायव्येस ट्रान्सआलाई व हिस्सार या पर्वतरांगा आहेत. कुनलुन व हिमालय यांच्या दरम्यान तिबेटचे विस्तीर्ण पर्वतांतर्गत पठार आहे. तसेच कुनलुन व तिएनशान यांच्या दरम्यान ताक्ला माकान हे वाळवंटी पठार आहे. तिएनशानच्या ईशान्येस अल्ताई, सायान, याब्लोनाय, स्टॅनोव्हॉय, व्हर्कोयान्स्क, चेर्स्की, कोलीमा आणि अनादीर या पर्वतशाखा जवळजवळ बेरिंग समुद्रापर्यंत गेल्या आहेत. हिमालयाची रांग आग्नेयीकडे इंडोनेशियापर्यंत पसरली आहे; ईशान्य भारतातील गारो, खासी, जैंतिया वगैरे टेकड्या, तसेच उत्तर ब्रह्मदेशातील, अंदमाननिकोबारमधील व इंडोनेशियातील पर्वत हे हिमालयाचेच विस्तार होत.

कुनलुनचे फाटे चीनमध्ये गेले आहेत; चीनमध्ये त्याला चिनलिंग (त्सिनलिंग) नाव आहे. आस्तिन ताच्या चीनमधील फाट्यास नानशान व मंगोलियातील फाट्यास शिंगान पर्वत म्हणतात. चीनमध्ये यूनान, सेचवान आणि मंगोलियात गोबी वाळवंट हे पठारी प्रदेश वरील पर्वतरांगांनी व्यापले आहेत.

पर्वतनिर्मितीचे चार प्रमुख कालखंड आशियात होऊन गेलेले आहेत. दोन कँब्रियनपूर्व ढालप्रदेश येथे स्पष्ट दिसतात. उत्तरेकडे अंगाराभूमी आणि कारा व चुक्‌ची समुद्रात निमज्जन पावलेला भाग यांच्या मानाने दक्षिणेकडील अरेबिया व द्वीपकल्पीय भारत यांना समाविष्ट करणाऱ्या गोंडवनभूमिप्रदेशावर गिरीजनक हालचालींचा परिणाम कमी झालेला दिसतो. त्या काळात हे भूप्रदेश खूपच विस्तीर्ण होते; आणि त्या दोहोंमध्ये टेथिस नावाचा समुद्र होता. दक्षिण चीनमध्ये व चिहली आखाताभोवतीही असा एक स्थिर प्रदेश होता. कँब्रियनपूर्व काळात आशियात कोणत्या गिरिजनक हालचाली झाल्या त्याची माहिती फारशी उपलब्ध नाही; तथापि दक्षिण भारतात अशी हालचाल होऊन गेली असावी.

कँब्रियन ते डेव्होनियन काळात आलेल्या कॅलिडोनियन हालचालींचा पुरावा सायान व अल्ताई पर्वतात दिसून येतो; मात्र त्यांचा बराच भाग नंतरच्या व्हर्कोयान्स्क रांगेच्या बलीकरणामुळे झाकला गेलेला आहे. औटर मंगोलिया, इंडोचायना व हिमाचलप्रदेशातही ही हालचाल मोठ्या प्रदेशावर झाली असावी. कारा व चुक्‌ची समुद्रकेंद्रांभोवतीही सेव्हर्नाया झीमल्या व न्यू सायबीरियन बेटे येथे तिचे परिणाम दिसून येतात. कार्‌बॉनिफेरस ते ट्रायासिक काळात झालेली अल्ताइड गिरिजनक हालचाल अधिक विस्तृत प्रमाणावर होती. नॉव्हाया झीमल्याच्या पश्चिमेस कारा समुद्राभोवती पुन्हा वलीकरण झाले. आणि त्याचा परिणाम उरल पर्वतातही दिसून येतो.

पश्चिम सायबीरियन मैदानावर नंतर साचलेल्या गाळथरांखाली यावेळच्या वळ्या असाव्यात आणि कझाकच्या उंच प्रदेशातील रचनाही या वळ्यांचाच विस्तार असावा. त्यांचाच संबंध पुढे अंगाराभूमीच्या नैर्ऋत्यभागातील अल्ताईस तार्बगाताई व झुंगेरियातील अला-तौ इ. वलीपर्वतश्रेणींशी दिसतो. मध्यआशियाचा बराच भाग यावेळी तयार झाला. पश्चिमेस फरगाना, तारीम व पूर्वेस ऑर्डास हे भाग स्थिर होते; ते पुढे खचून तेथे द्रोणीप्रदेश तयार झाले व त्यांभोवती वलीपर्वतांच्या रांगा वर उचलल्या गेल्या. पूर्वपश्चिम गेलेले आस्तिन ता, नानलिंग व चिनलिंग पर्वत अल्ताइड हालचालींच्या अनुरोधानेच निर्माण झाले आणि हिमालयाचा काही भाग, ब्रह्मदेशाचा शान पठारप्रदेश व थायलंड, मलाया, पश्चिम बोर्निओ येथील पर्वतही त्याच प्रकारचे आहेत. चीनमधील स्थिरप्रदेशाभोवतीच्या फॉर्मोसा, जपान आणि कोरिया येथेही अल्ताइड वलीकरणच असावे. तथापि अतिपूर्वेकडील प्रदेशात ज्युरासिक-क्रिटेशस काळातील गिरिजनक हालचाली अधिक महत्त्वाच्या आहेत.

या प्रदेशात मध्यभागात वलीकरणापेक्षा गटविभंग, ज्वालामुखीक्रिया आणि ग्रॅनाइटीकरण हे विशेषत्वाने दिसून येतात. अंगाराभूमी व चुक्‌ची स्थिरकेंद्र यांच्या दरम्यानचे ट्रायासिक-ज्युरासिक गाळाचे जाड थर वलीकरण पावून व्हर्कोयान्स्क व चेर्स्की रांगा निर्माण झाल्या. याचा परिणाम रशियातील सीखोटे आलिन, दक्षिण कोरिया व दक्षिण होन्शू येथपर्यंत जाणवला; तसेच पूर्वचीन आणि ऑर्डास केंद्रांच्या दरम्यान शान्सी कोळसाक्षेत्राच्या वळ्या निर्माण झाल्या. पर्वतनिर्मितीच्या अखेरच्या अवस्थेत आधीच्या सर्व पर्वतश्रेणींच्या दक्षिणेस व पूर्वेस, अरेबिया व भारत यांच्या गिरिपिंडांस लागून पर्वतांची एक भली मोठी मालिकाच निर्माण झाली. अशा रीतीने टेथिस समुद्र नाहीसा होऊन तेथे निर्माण झालेल्या पर्वतश्रेणींनी उत्तरेचे व दक्षिणेचे ढालप्रदेश जोडले गेले. तुर्कस्तानात सुरू झालेल्या रांगा आर्मेनियाच्या गिरीमंडलात एकत्र येतात आणि आग्नेयीस पुन्हा दूर दूर जातात. कॅस्पियनच्या पलीकडे कोपेतदा म्हणून आलेला कॉकेशस या श्रेणींना ईशान्य इराणमध्ये मिळतो. उत्तरेकडे गेलेल्या कीर्थर आणि सुलेमान रांगा व पामीरचे गिरिमंडल यांवरून अफगाणिस्तान व बलुचिस्तान येथील पर्वतांवरील भारतीय ढालप्रदेशाचा परिणाम दिसून येतो.

भारताच्या उत्तरेच्या हिमालयाच्या रांगा ईशान्येस एकदम दक्षिणेकडे वळून उत्तर ब्रह्मदेशात जातात आणि तेथून पुढे अंदमान-निकोबार बेटांतून इंडोनेशियाच्या सुमात्रामधील व इतर वक्राकार पर्वतरांगांपर्यंत त्या आढळतात. इंडोनेशियातील चापाकृती रांगा फॉर्मोसा व जपानमधून जाऊन कॅमचॅटकात पुन्हा मुख्य भूमीवर येतात. आशियातील अल्पाइन हिमालयीन पट्ट्यात विसाव्या शतकात तीव्र स्वरूपाचे भूकंप झाले आहेत. इंडोनेशियाच्या द्वीपमालिकेत अतिपूर्वेत दिसून येणारी जागृत ज्वालामुखीक्रिया व जमिनीला वारंवार बसणारे हादरे यांवरून या भागातील गिरिजनक कालखंड अद्याप संपलेला नाही असे दिसते.

आशियाच्या भूमीचा उंचसखलपणा विविधस्वरूपी असून उंच व सखल भागातील फरक फार मोठा आहे. अरेबिया व भारत यांची प्राचीन विशाल पठारे सावकाश उत्तरेकडे उतरत उतरत अनुक्रमे टायग्रिस-युफ्रेटीस व सिंधू-गंगा यांच्या आर्वाचीन काळातील जलोढ मैदानात मिळून जातात. या मैदानांचा भूप्रदेश त्रिभुज प्रदेशांच्या रूपाने एकसारखा वाढतच आहे. या मैदानांच्या पलीकडील बाजूस भूशास्त्रदृष्ट्या अगदी अलीकडे निर्माण झालेल्या अतिप्रचंड, उत्तुंग व विस्तीर्ण पर्वतश्रेणी एकदम खड्या उभ्या आहेत. त्यांच्याही पलीकडे जगाच्या छपरावरील उंच पठारे, गटपर्वत आणि द्रोणीप्रदेश आहेत. त्यांच्या उत्तरेला आशियाचा हा उंच प्रदेश संपून पूर्व सायबीरियापासून अटलांटिकपर्यंत गेलेला सखल मैदानांचा आणि बुटक्या पठारांचा रुंद प्रदेश लागतो. पूर्वेकडे या उंच प्रदेशाचे फाटे पॅसिफिकपर्यंत गेलेले असून फाट्यांफाट्यांमध्ये नद्यांनी गाळाची, सपाट पूरमैदाने तयार केलेली आहेत. ही पूरमैदाने अतिशय दाट लोकवस्तीने गजबजलेली आहेत.

आशियाच्या विभागश: वर्णनाने वरील सर्वसामान्य स्वरूप अधिक स्पष्ट होईल : गंगा-सिंधूचे मैदान आणि द्वीपकल्पीय भारत : कार्‌बॉनिफेरसच्या अखेरीअखेरीस व क्रिटेशसच्या सुरुवातीस विभंगवेष्टीत द्रोणी खचून त्यात पाण्याबरोबर आलेले निक्षेप साठणे हे भारताच्या सांरचनिक उत्क्रांतीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. दगडी कोळशाचे जाड थर असलेल्या या गोंडवन खडकांचा सर्वात महत्त्वाचा प्रदेश दामोदर खोऱ्यात आहे. जबलपूरजवळचा सागरी पर्मोकार्‌बॉनिफेरस चुनखडक सोडला तर मध्यजीव तृतीयक काळात द्वीपकल्पाच्या फक्त कडेच्या भागातच सागरी क्रियेचा परिणाम दिसून येतो. द्वीपकल्पाच्या वायव्य भागात उत्तर क्रिटेशस व पूर्व अदिनूतन काळात दख्खनच्या लाव्ह्याचा उद्रेक होऊन सु. ५,००,००० चौ.मी. किमी. क्षेत्रावर बेसाल्टचे सपाट थर पसरलेले दिसतात. पश्चिमघाट ही दख्खन पठाराची पश्चिम कड अरबी समुद्रापेक्षा १,२०० ते १,५०० मी. उंच आहे. पूर्वेकडे सावकाश उतरत उतरत या पठाराचे तमिळनाडूमध्ये रुंद मैदानात रूपांतर होते.

पूर्वेकडे सु. ९०० मी. उंचीच्या काही टेकड्या आहेत; परंतु मैदाने व रुंद नदीखोरी हीच तेथील प्रमुख भूमिस्वरूपे आहेत. दख्खन पठाराच्या ईशान्येस छोटा नागपूरचे पठार असून गंगेपलीकडील शिलाँगचे पठार हे द्वीपकल्पीय गटाचाच पृथक्‌स्थित भाग समजले जाते. दख्खन पठाराच्या उत्तरेस तापी व नर्मदा या नद्या आणि सातपुडा व विंध्य या पर्वतरांगा हा महत्त्वाचा विभाजक प्रदेश असून त्यांच्या उत्तरेला माळव्याचे लाव्ह्याचे विंध्य पठार व वायव्येस अरवली पर्वत आहे. नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने गेलेल्या अरवलीची उंची गंगेच्या मैदानाकडे कमी कमी होत जाते. खुद्द दिल्लीत त्याची एक कटकशाखा आली आहे. अरवली हा अत्यंत प्राचीन पर्वतांपैकी एक असून त्याच्या ठिकाणी पूर्वी असलेल्या भूद्रोणीचे प्रथम उत्थापन व वलीकरण सु, ६० ते ७० कोटी वर्षांपूर्वी अल्गाँकियन काळात झाले.

पूर्वी तो कुमाऊँ हिमालयापासून दक्षिणेस द्वीपकल्पीय पठारांच्या कडेपर्यंत पसरला होता. त्या प्राचीन काळी अरवलीची कित्येक शिखरे हिमरेषेपेक्षा उंच असून तेथून मोठमोठ्या हिमनद्या वाहत होत्या व त्यांतून कित्येक मोठमोठ्या नद्यांना पाणी मिळत होते. पुढे क्षरण विदारणादिकांमुळे अरवली प्राय:स्थलीरूप पावला. उत्तर मध्यजीव काळात त्याचे सु. १० कोटी वर्षांपूर्वी पुन्हा उत्थान झाले व उदेपूरजवळ सु. १,२०० मी. आणि दिल्ली व अहमदाबादजवळ सु. ३०० मी. उंची त्याला प्राप्त झाली. दुसऱ्या उत्थानानंतरच्या क्षरणचक्रात त्याचे क्वार्टझाइट खडक उंच कटकांच्या रूपाने उभे राहिले आणि छिंद या स्थानिक नावाने ओळखली जाणारी खोरी मऊ फायलाइटमधून कोरून निघाली. सांरचनिक दृष्ट्या अरवली आणि अपालॅचियन यांत साधर्म्य आहे.

द्वीपकल्पाच्या पूर्वकिनाऱ्यावर कन्याकुमारीपासून महानदीच्या त्रिभुजप्रदेशापर्यंत कावेरी, कृष्णा व गोदावरी या प्रमुख नद्यांनी बनविलेली गाळमैदाने व त्रिभुजप्रदेश आहेत. दक्षिण भारतात टेकड्या झिजून मागे सरकल्यासारख्या झाल्यामुळे तयार झालेली गिरितलमैदाने आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील कोकणच्या भागात लाव्हामैदाने आढळतात. पूर्वी तयार झालेली आणि नंतर उचलली गेलेली मैदाने निलगिरी व शिलाँग टेकड्या येथे आढळतात. दोन्ही किनार्‍यांवर उन्मज्जनाने तयार झालेली, खारकच्छ व पश्चजल यांनी युक्त मैदाने आहेत. कोकणाच्या उत्तरेस गुजरातचे गाळमैदान आहे.

कॅम्ब्रियन काळाच्या सुरुवातीपासून भारतीय द्वीपकल्पप्रदेश हा एक अत्यंत स्थिर प्रदेश म्हणून वैशिष्ट्य पावलेला आहे. विभंग, भूमीच्या मोठ्या हालचाली आणि लाव्हाचे लोट यांनी त्याच्या पृष्ठाचे स्वरूप जटिल करून टाकलेले आहे. अलीकडे आणि पूर्वीही त्यावर अनेकदा भूकंप झालेले आहेत. या प्रदेशाच्या ऊर्मिल पृष्ठाचा काही भाग प्राचीन ग्रॅनाइट व नाइस यांनी बनलेला असून त्यावर मधूनच ग्रॅनाइटी टेकड्या उभ्या राहिलेल्या दिसतात. पश्चिम घाटात अनेक खिंडी असून त्यांतून किनारीप्रदेश व पठार यांत दळणवळण चालते. जोग, गोकाक, शिवसमुद्रम्, पापनाशनम् इ. लहानमोठे धबधबेही आहेत. निलगिरी आणि लंकेतील पर्वत ज्युरासिक उत्प्रणोदानंतर उचलले गेले असावेत.

गंगासिंधूचे मैदान हे जगातील एक अत्यंत विस्तीर्ण, सुपीक व सपाट मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. हिमालयाच्या पायथ्याचा द्रोणीप्रदेश गाळाने भरून येऊन ते तयार झालेले आहे. त्याने बांगला देश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान आणि पाकिस्तानातील पंजाब व सिंध यांचा मोठा भूप्रदेश व्यापलेला आहे. गंगेच्या मुखापासून १,६०० किमी. दूर असलेली दिल्ली फक्त २१९ मी. उंच आहे. हिमालयाच्या बाजूला गाळ व माती यांऐवजी भरड खड्यांची मैदाने आहेत. त्यांस पंजाब व हरियाणामध्ये भाबर व आसाममध्ये द्वार म्हणतात. अरवलीच्या पश्चिमेस खडकाळ, रूक्ष, हॅमाडा जातीचे मैदान आहे. तो पुष्कळदा भारतीय पठाराचाच भाग मानला जातो. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे हा गंगेच्या मैदानाचाच एक भाग समजता येतो; कारण ब्रह्मपुत्रा गंगेस मिळते.

हिमालय

ही जगातील सर्वांत उंच आणि सर्वांत अलीकडे निर्माण झालेली पर्वतसंहती आहे. ८,००० मी. पेक्षा उंच असलेली जगातील बहुतेक सर्व शिखरे हिमालयात आहेत. जगातील पूर्वपश्चिम पर्वतसंहतीपैकी ही सर्वांत लांब, सु. २,५०० किमी. असून तिची रुंदी सु. ४०० किमी. आहे. तिने ५,००,००० चौ.किमी. प्रदेश व्यापला आहे. सिंधूचा वरचा भाग व त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) यांच्या खोर्‍यांनी तिबेटचे पठार हिमालयाच्या श्रेणींपासून वेगळे केलेले आहे. नंगापर्वत (८,१२६ मी.) आणि नामचा बारवा (७,७५६ मी.) यांचे दरम्यान हिमाद्री (ग्रेटर हिमालय) ची रांग असून तिच्यात मौंट एव्हरेस्ट (८,८४८ मी.), कांचनजंघा (८,५९८ मी.), धौलागिरी (८,१७२ मी.), मनास्लू (८,१५६ मी.), चो ओयू (८,१५३ मी.), अन्नपूर्णा (८,०७८ मी.), गोसाइंतान (८,०१३ मी.) इ. उत्तुंग शिखरे आहेत. हिमाद्रीच्या दक्षिणेस हिमाचल (लेसर हिमालय) पर्वताच्या रांगा आहेत.

हा डोंगराळ प्रदेश सु. ७५ किमी. रुंद व ५,००० मी. पर्यंत उंच असून त्यात अनेक दिशांना गेलेल्या पर्वतरांगा आहेत. येथील दक्षिण उतार खडे व उघडे असून उत्तर उतार सौम्य व अरण्यमय आहेत. याच्याही दक्षिणेस शिवालिक रांगा असून त्यांची उंची ६०० मी. पर्यंत आहे. यातून दून नावाची सपाट तळाची सांरचनिक दऱ्याखोरी असून ती दाट लोकवस्तीची व लागवडीखाली आणलेली आहेत. हिमालयाला त्याची पूर्ण उंची गाठावयास ६० ते ७० लक्ष वर्षे लागली. त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या नद्या उंच उंच पर्वतांना भेदून गेलेल्या दिसतात. हिमालयाला पुरेशी उंची प्राप्त झाल्यानंतरच भारतात मोसमी प्रकारचे हवामान आले . हिमालय चंद्रकोरीच्या आकाराचा असून तो दक्षिणेकडे बहिर्वक्र आहे. त्याची दक्षिण सीमा ३०० मी. उंचीची असून अवघ्या १५० किमी. मध्ये तो ८,००० मी. उंची गाठतो. त्यात अनेक हिमाल (हिमक्षेत्रे) असून त्यांतून हिमनद्या व जोरदार जलप्रवाह उगम पावतात. हिमालयाच्या निरनिराळ्या भागांना काश्मीर-हिमालय, पंजाब-हिमालय वगैरे निरनिरळी नावे आहेत. आसाम-हिमालयाच्या दक्षिणेस भारत-ब्रह्मदेश सरहद्दीवरून जाणाऱ्या पातकई व इतर रांगांचा समावेश पूर्वाचल या पर्वतश्रेणीत होतो. हिमालयाचे भारतातील सर्वोच्च शिखर नंदादेवी (७,८१७ मी.) हे कुमाऊँ हिमालयात आहे.

अरबी गिरिपिंड व इराकचे मैदान

तांबड्या समुद्राच्या अनुरोधाने आणि मध्यअरेबियात कँब्रियनपूर्व खडक पुष्कळच उघडे पडलेले दिसतात. मध्यजीव व तृतीयक कल्पातील सागरी थरही आहेत. हे खडक सामान्यत: फारसे विचलित झालेले नाहीत. जॉर्डनच्या पश्चिमेस मात्र त्यांस बाक आलेला व विभंग झालेला आढळतो. तसेच तुर्कस्तान, इराण व ओमान यांच्या जवळपासही थोडासाच फरक पडलेला दिसतो. प्रमुख सांरचनिक वैशिष्ट्य मात्र तृतीयक कालातील खचदरी हे होय. यात तांबडा समुद्र, मृतसमृद्र व जॉर्डनचे खोरे यांचा समावेश होतो. जोरदार विभंगक्रियेबरोबरच ज्वालामुखीक्रिया होते; त्यामुळे येमेनमधील सु. ३,७०० मी. उंचीचा लाव्हाजन्य प्रदेश, सु. २,८०० मी. उंचीचा उत्तर हेजाझ व सु. १,८०० मी. उंचीचा दक्षिण सिरीयाचा प्रदेश निर्माण झाला.

अरेबियाचे पठार त्याच्या पश्चिमेकडील उंच कडेपासून इराकच्या मैदानाकडे व इराणच्या आखातावरील ऊर्मिल किनारीप्रदेशाकडे सावकाश उतरत जाते. थोडाबहुत पाऊस पडताच वाहणाऱ्या अनेक प्रवाहांचे मार्ग दिसतात आणि पूर्वी केव्हातरी येथील हवामान अधिक आर्द्र होते हे बऱ्याच गोष्टींवरून दिसून येते. तथापि टायग्रिस, युफ्रेटीस आणि भूमध्यसमुद्राला मिळणाऱ्या काही नद्या एवढ्याच बारमाही आहेत. इराकचा उत्तरेकडील व पश्चिमेकडील थोडा भाग सोडला तर बाकीचा सर्व प्रदेश म्हणजे टायग्रिस व युफ्रेटीस नद्यांचे सखल खोरेच आहे. ते ५०० मी. पेक्षा अधिक उंच नाही.

तुर्कस्तान, इराण आणि अफगाणिस्तान हे देश आणि बलुचिस्तान येथे बरेचसे वलीपर्वत व गटपर्वत असून त्यांत अनेक द्रोणीप्रदेश आहेत. त्यांपैकी काही प्रदेश अंतर्गत जलवाहनाचे आहेत. उत्तर इराणमध्ये एल्बर्झ (अत्युच्च शिखर देमाव्हेंड ५,६६९ मी.) व कोपेत दा (२,९९१ मी.) हे पर्वत अफगाणिस्तानाच्या ईशान्येस हिंदुकुश पर्वताला मिळतात. दक्षिणेस झॅग्रॉस पर्वत अधिक रुंद असून त्यात कित्येक शिखरे ४,२७० मी. पेक्षा अधिक उंच आहेत. दक्षिण इराणमध्ये याची दिशा वायव्य-आग्नेय असून त्याची शाखा ओमानमध्ये जाते व पुढे तो बलुचिस्तानातून उत्तरेकडे वळतो. झॅग्रॉसच्या जवळपासच मध्यपूर्वेतील प्रमुख तेलक्षेत्र आहेत.

या दोन पर्वतश्रेणींमध्ये सीस्तान, लूट इ. क्षारयुक्त द्रोणीप्रदेश असून काही ज्वालामुखीही आहेत. तुर्कस्तानची रचना जटिल असून त्यात अतिनूतन काळातील ज्वालामुखी मौंट आरारात (५,१६५ मी.) आहे. तेथून भूमध्यसमुद्राकडे जाणारे व त्याच्या किनाऱ्यांनी जाणारे टॉरस व अँटिटॉरस पर्वत असून काळ्या समुद्राच्या काठाकाठाने पाँटिक पर्वत जातो. सभोवतीच्या पर्वतरांगांमुळे अनातोलियाच्या पठारावर कित्येक द्रोणीप्रदेश निर्माण झालेले आहेत. त्यांतील काहींमध्ये तूझ आणि वान सारखी अत्यंत क्षारयुक्त पाण्याची सरोवरे तयार झालेली आहेत. काळ्या समुद्रावरील झाँगूल्डाकजवळ महत्त्वाच्या कोळशाच्या खाणी आहेत. इतरत्र क्रोम आणि मँगॅनीज यांचे साठे आहेत. अगदी अलीकडच्या काळातही (१९७१) येथे मोठमोठे भूकंप झालेले आहेत. त्यांवरून या प्रदेशाची अस्थिरता अजून संपलेली नाही हे दिसून येते.

 

मध्य आशिया

तिबेट पठाराची सरासरी उंची ४,८७५ मी. आहे. त्याच्या दक्षिणेस काराकोरम पर्वताचे मौंट गॉडविन ऑस्टिन उर्फ के-टू हे एव्हरेस्टच्या खालोखाल ८,६११ मी. उंचीचे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर भारतात आहे. पामीर आणि तिएनशानमध्ये ६,००० मी. पर्यंत उंची आढळते तर चीनच्या चिंगहाई प्रांतातील त्साइदाम या दलदलीच्या प्रदेशाची उंची फक्त २,७५० मी. आहे. ताक्ला माकानच्या ईशान्येकडील तूर्फान या द्रोणीची उंची तर समुद्रसपाटीच्या खाली सु. ३०० मी. आहे. केवळ समुद्रसपाटीच्या उंचीपेक्षा येथे उंचीचा फरक लक्षवेधक आहे. बरेच द्रोणीप्रदेश हे बंदिस्त जलवाहनक्षेत्र आहेत. गोबीच्या वाळवंटासारख्या ईशान्येकडील द्रोणीप्रदेशांवर वाऱ्याच्या विदारण कार्याचा बराच परिणाम झालेला आहे.

आशियातील रशियाचा सखल प्रदेश

यात मुख्यत: येनिसे नदीच्या पश्चिमेचा मध्यजीव व तृतीयक निक्षेपांचा, वलीकरण न झालेला, उरल पर्वतापर्यंतचा सायबीरियाच्या मैदानाचा प्रदेश येतो. तथापि लीना व येनिसे यांच्या दरम्यानचा सु. १,००० मी. उंचीच्या पठारी प्रदेशाचा समावेशही यातच होतो. येथील बराच प्रदेश दलदलीचा आहे. आग्नेयीस अल्ताई व सायान श्रेणींच्या पायथ्याशी कुझनेट्स्क व मिनुसिन्स्क द्रोणीप्रदेशात पुराजीवकालीन कोळसा आहे.

 

मैदानी प्रदेशाच्या दक्षिणसीमेवर कझाक प्रदेश सु. ३०० मी. उंचीचा आहे. येथे अंतर्गत जलवाहनाचे बरेच द्रोणीप्रदेश असून दक्षिणेस किरगीझ स्टेपच्या बाजूस हवामान अधिकाधिक कोरडे होत जाते. याच भागात कॅस्पियनच्या पूर्वेचा तुराणी मैदानी प्रदेश येतो. यात किझिल-कुम व कारा-कुमसारखे वाळू, माती यांचे अल्कली मरुप्रदेश आहेत. सिरदर्या व अमुदर्या यांच्या पट्ट्यात थोडेसे ओलीत होते. कॅस्पियनच्या उत्तर किनाऱ्याजवळच्या प्रदेशात खनिजतेलक्षेत्रे आहेत.

 

पॅसिफिक किनारी प्रदेश

यात पूर्वसायबीरिया ते मलायापर्यंत अनेक प्रकारचे प्रदेश आहेत. लीना नदीच्या पूर्वेस व्हर्कोयान्स्क व चेर्स्की रांगा सु. २,५०० मी. उंच आहेत. कॅमचॅटकात सु. ५,००० मी. उंचीचे जागृत ज्वालामुखी पर्वत असून दोन दक्षिणोत्तर पर्वत रांगांमध्ये कॅमचॅटका नदीचे सखल खोरे आहे. अमुर नदीच्या दोहोबाजूंचा प्रदेश सु. २,४०० मी. पेक्षा कमी उंचीचा आहे. चीनमध्ये पुनर्युवीकरण झालेले विभंग गटपर्वत व अगदी अलीकडे तयार झालेली गाळमैदाने आहेत. मांचुरिया हे क्षरणजन्य मैदान असून त्याच्याभोवती ग्रेटर खिंगन, जेहोल व लिआउडुंग हे गट आहेत. लिआउडुंगच्या दक्षिणेस समुद्रापलीकडे शँटुंग द्वीपकल्प त्याच प्रकारचे आहे. कोरियामध्ये विच्छिन्न पठारे व मध्यजीवकालातील वलीपर्वत आहेत. आग्नेय चीनच्या भागात बरेच विभंग असून त्याच्या पश्चिमेच्या विस्तृत वलीकृत प्रदेशातही विभंगक्रिया झालेली आढळते. पोयांग व तुंगतिंग सरोवरे व सिक्यांगचे खोरे चिकणमाती व स्लेट यांच्या सांरचनिक द्रोणींमध्ये वसलेली आहेत.

 

पश्चिमेकडे दोन रुंद पायरीसारखे टप्पे नद्यांच्या खोऱ्यांनी खोलवर विच्छिन्न झालेले असून ते सु. १,८०० मी. उंचीच्या पश्चिम यूनान पठारापर्यंत उतरतात. त्याच्या फाट्यांमध्ये सेचवानचे लालखोरे असून त्याच्या उत्तरेस त्सिंगलिंग शानच्या ४,००० मी. पेक्षा उंच रांगा पसरल्या आहेत. या रांगामुळे चीनचे उत्तर व दक्षिण असे दोन प्रमुख विभाग येतात. ऑर्डास पठार हे चीनच्या वायव्येस पर्मियन काळापासूनचे अनम्य पठार असून त्यावर लोएसचे व भूजन्य निक्षेपांचे जाडजाड, विक्षुब्ध न झालेले थर आहेत. नद्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पसरलेले लोएसचे थर खोऱ्यांच्या तोंडाशी बसतात. ते पीत नदीने (हृोंगहो) वाहून नेऊन चीनच्या उत्तरेचे मैदान तयार झालेले आहे.

 

पीत नदीचे आणि यांगत्सेचे मैदान ही अतिशय अर्वाचीन आहेत. त्यात सरोवरे आणि वेगवेगळ्या दिशांनी वाहणारे फाटे पुष्कळ आहेत आणि अनर्थकारी पूर ही नेहमीचीच बाब आहे. यूनानचे पठार चीनच्या दक्षिणेस ब्रह्मदेश व इंडोचायना यांतील शान पठारापर्यंत विस्तारलेले आहे. त्यात साल्वीन आणि मेकाँग नद्यांनी खोलवर कोरून मार्ग काढले आहेत. डोंगरांचे फाटे दक्षिणेकडे गेलेले असून त्यांच्या दरम्यान चाऊ फ्राया आणि मेकाँग यांचे त्रिभुज प्रदेश आहेत. येथे डोंगरांची उंची ३,००० मी. पेक्षा अधिक क्वचितच असते आणि डोंगराळ मलायात सर्वाधिक उंची फक्त २,१९० मी. आहे.

 

द्वीपमालिका

सुमात्रापासून जपानपर्यंतचा पट्टा अत्यंत अस्थिर आहे. इंडोनिशियामधील ज्वालामुखींची मालिका, बेटांची दुहेरी रचना आणि गुरुत्वाकर्षणातील अनैसर्गिक फरक यांवरून येथे गिरिनिर्मितीची क्रिया अद्याप प्रथमावस्थेत आहे असे मानतात. मलाया व पश्चिम बोर्निओ यांना समाविष्ट करणाऱ्या मध्यजीवकालीन भूमिगटाने तृतीयककालीन वलीकरणाला अडथळा केला असावा. तृतीयककालीन निक्षेपांत पेट्रोलियम आहे. बहुतेक उंच शिखरे ज्वालामुखींचे शंकू असून त्यांपैकी जावामधील पुष्कळशी शिखरे ३,००० मी. पेक्षा उंच आहेत. जपानमध्ये ज्वालामुखीक्रियेबरोबर वलीकरणापेक्षा विभंगच अधिक झालेले दिसतात.

 

पूर्वेकडील वलीकृत थरांवरील ओबडधोबड बाह्य पर्वतांचा पट्टा विभंगाने खंडित झालेला आहे तर पश्चिमेकडील आतला पट्टा अर्वाचीन गटविभागांचा व जागृत ज्वालामुखीक्रियेचा आहे. मध्य होन्शूमधून गेलेल्या खोल खचदरीत ३,७७६ मी. उंचीचा फूजियामा उभा आहे. या भागात खड्या उतारांच्या मानाने अलीकडील गाळमैदाने व त्यांना लागून आधीच्या भरडखड्यांचा पट्टा अशी भूरचना थोडीच आहे.

 

हवामान

आशियाचा अंतर्भाग कोणत्याही महासागरापासून ३,२०० किमी. पेक्षा अधिक दूर असल्यामुळे किनारीप्रदेश व खंडाचा अंतर्भाग यांच्या हवामानात मोठाच फरक पडतो. अंतर्भागाचे हवामान अत्यंत विषम आहे. मनुष्यवस्ती असलेल्या कोणत्याही इतर ठिकाणापेक्षा कमी तपमान आणि जगातील अत्यंत उच्च तपमानाच्या ठिकाणांपैकी काही ठिकाणे आशियात आढळतात. आशियाच्या अंतर्भागाचे हिवाळ्याचे तपमान त्याच अक्षांशातील इतर कोणत्याही भागाच्या हिवाळी तपमानापेक्षा कमी असते. मलायाच्या सतत पावसाच्या विषुववृत्तीय हवामानापासून तो नॉव्हाया झीमल्याच्या हिमक्षेत्रीय हवामानापर्यंत हवामानाचे बहुतेक सर्व प्रकार आशियात आढळतात.

 

अगदी ढोबळ मानाने आशियाचे हवामान सांगावयाचे तर मोठा भूप्रदेश उन्हाळ्यात तापून त्यावर नीच भारमान निर्माण होते व समुद्रावरून बाष्पयुक्त हवा ओढली जाऊन उन्हाळी पाऊस पडतो; हिवाळ्यात या प्रदेशावर उच्च भारमान निर्माण होऊन तेथून कोरडे वारे सभोवतीच्या प्रदेशाकडे उच्च भारमान निर्माण होऊन तेथून कोरडे वारे सभोवतीच्या प्रदेशाकडे जातात. बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात डोंगर असतील तर तेथे खूप पाऊस पडतो व डोंगराच्या वातविन्मुख बाजूवर पाऊस कमी पडतो; भारतात या हवामानाचे मोसमी स्वरूप स्पष्ट असते, चीनमध्ये ते कमी स्पष्ट असते व इतरत्र मोसमी हवामानाची केवळ प्रवृत्ती दिसते. तथापि इतके सोपे आणि सरळ स्वरूप आशियाच्या हवामानाचे नाही. उत्तुंग हिमालयामुळे भारतातील मोसमी हवामानावर मोठाच परिणाम झाला आहे. तसेच नैर्ऋत्य आशियाचे हवामान भूमध्यसागरी असल्यामुळे तेथे उन्हाळा कोरडा जातो व पाऊस हिवाळ्यात येतो.

 

आवर्त आणि प्रत्यावर्त यांनाही आशियाच्या हवामानात महत्त्व आहे. अटलांटिकवरून यूरोपात शिरणाऱ्या आवर्त प्रत्यावर्ताच्या मानाने आशियातील गतिमान नीच व उच्च भारमान केंद्रे संख्येने कमी व आकाराने लहान असतात. अंतर्भागात जाईपर्यंत ती अगदीच दुर्बळ होतात; परंतु पॅसिफिककडे येताना ती पुन्हा वाढतात आणि त्यामुळे चीन व जपान येथे बदलती हवा अनुभवास येते. पूर्व आशियात दक्षिण चिनी समुद्रावरून चीनच्या आग्नेय भागात आर्द्र आवर्त वारे ओढले जातात. हिवाळ्यात कमी जोरदार आवर्ते पॅलेस्टाइन, इराण व उत्तर भारत यांवरून जातात. तथापि आवर्ताचा मार्ग सामान्यत: उत्तर भागातूनच असतो. चीनच्या आग्नेय किनाऱ्याजवळ जोरदार विध्वंसक चक्रीवादळे होतात. भारतातही बंगालचा उपसागर व अरबी समुद्र यांवर एप्रिल व मे आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पुष्कळ विनाशकारी वादळे होतात.

 

आशियाच्या तृतीयांश भागावर पाऊस किंवा हिम या रूपांनी होणाऱ्या वृष्टीचा उगम अटलांटिकवरून येणाऱ्या आर्द्रतेत असतो. कित्येकदा हे बाष्प सु. साडेसहाहजार किमी. अंतर ओलांडून आलेले असते. आर्क्टिक महासागरापासून फारच थोडी आर्द्रता आशियाला मिळते. ती काही थोड्या किनारी प्रदेशासच मिळते. पॅसिफिकवरून येणारे बाष्प फारतर पूर्व मंगोलियापर्यंत व क्वचित् बैकल सरोवरापर्यंत येते आणि हिंदी महासागरावरून येणारे बाष्प हिमालयाच्या दक्षिणेस आणि सिंधूखोऱ्याच्या पूर्वेस मर्यादित प्रदेशासच वृष्टी देते. आशियाच्या फार मोठ्या भूभागाला महासागरीय बाष्पापासून वृष्टी मिळतच नाही. जी काही थोडी वृष्टी होते ती नद्या, खारी सरोवरे, दलदली यांच्या बाष्पीभवनामुळे होते. हे पाणीही कमी कमी होत चालले आहे आणि खंडांतर्गत हवामानाची तीव्रताही वाढत आहे.

 

विषुववृत्तापासून ईशान्येकडे अंतर्भागात जावे तसतशी वार्षिक सरासरी तपमानकक्षा वाढत जाते. सिंगापूर व कोलंबो येथे ती सु. १० सें. असते. कर्कवृत्ताजवळ ती ११० से. होते. मॉस्कोजवळ ती २५० से. असते. पेकिंग किंवा अरल समुद्र येथे ती ३३० से., बैकल सरोवराजवळ ती सु. ४२० से. तर व्हर्कोयान्स्कला ती ६४० से. असते. हवामानाच्या दृष्टीने प्रत्यक्ष तपमानापेक्षा ही कक्षाच महत्त्वाची आहे.
भारत व आग्नेय आशिया यांची द्वीपकल्पे व त्यांजवळची बेटे येथील हवामान उष्णकटिबंधीय व बऱ्याच भागांत बारमहा पावसाचे आहे. या मोसमी हवामानाच्या प्रदेशात प्रत्येक महिन्याचे सरासरी तपमान २०० से. पेक्षा अधिक असते. किनाऱ्याजवळच्या प्रदेशात जवळजवळ बारमहा पाऊस असतो तर अंतर्भागात हिवाळा कोरडा जातो.
आशियाच्या अंतर्भागातील फार मोठा प्रदेश रुक्ष, वाळवंटी आहे व त्याभोवतीचा प्रदेश गवताळ आहे. येथे सर्वत्र उन्हाळा कडक असतो. अरेबिया, इराणचा सखल प्रदेश व थरचे वाळवंट येथे बारमहा कडक उष्णता असते तर मंगोलिया, सिंक्यांग व सोव्हिएट मध्य आशिया येथे हिवाळा कडक असतो.
चीन, जपान, उत्तर भारत व नैर्ऋत्य आशियाचा काही भाग येथील हवामान समशीतोष्ण असते. नैर्ऋत्य आशियाखेरीज बाकीच्या वरील प्रदेशात उन्हाळी मोसमी पाऊस असतो व हिवाळा सामान्यत: कोरडा जातो. उत्तर भारताचे हवामान हिमालयाचे संरक्षण, समुद्रदूरत्व व सखलपणा यांमुळे समशीतोष्णपेक्षा उष्णकटिबंधीयच अधिक आहे. दक्षिण जपान व यांगत्से खोरे येथे उन्हाळा अधिक कडक व पाऊस जवळजवळ वर्षभर असतो.
सोव्हिएट मध्यआशिया आणि ध्रुवीय प्रदेश सोडून आशियातील रशियाचा सर्व भाग, मांचुरिया व तुर्कस्तान येथे थंड समशीतोष्ण हवामान असते. पश्चिमेकडे अटलांटिकवरील वारे अधिक प्रभावी असतात. तेथे बारमहा पाऊस येतो व उन्हाळा सौम्य असतो. उत्तरेकडील भागात थंड, समशीतोष्ण, आर्द्र हवामान असते आणि उन्हाळा थोडे दिवस टिकतो. पूर्व सायबीरियात उन्हाळी पाऊस असतो, १०० से. तपमान चार महिनेसुद्धा नसते व काही भागात हिवाळ्याचे तपमान शून्याखाली ३७-३८० से. जाते. नॉव्हाया झीमल्या येथे सतत हिममय हवामान असते, तर ध्रुवीय प्रदेशातील किनारी भाग टंड्रा प्रकारच्या हवामानाचा आहे. ईशान्य सायबीरिया व तिबेट येथे उंच पर्वतीय प्रदेशात हवामान टंड्रा प्रकारचे असते किंवा अतिथंड, कोरडे असते.

 

लेखक : रा. शा. मोरखंडीकर
स्त्रोत : मराठी विश्वकोश

संदर्भ :

1. Barnett, Doak, Communist China and Asia, New York, 1961.

2. Brecher, Michael, Nehru A Political Biography, London, 1959.
3. Cressey, G. B. Asia’s Lands and Peoples, New York, 1963.
4. deBary, W. T. Ed. Sources of Indian Tradition, New York, 1958.
5. Emerson, Rupert, From Empire to Nation, Cambridge, 1960.
6. Gabriel, A.; Almand, James; Coleman, S. Ed. The Politics of the Developing Areas, Princeton, 1960.
7. Kahin, George M. Major Government of Asia, New York, 1963.
8. जावडेकर, शं. दा. आधुनिक भारत, पुणे, १९५३.

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate