অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओरिसा - भूवर्णन, हवामान

परिचय

भारताचे पूर्व किनाऱ्यावरील घटक राज्य. उ. अ. १७ ̊ ४८' ते २२ ̊ ३४' आणि पूर्व रे. ८१ ̊ ४२' ते ८७ ̊ २९'. क्षेत्रफळ १, ५५, ७८२ चौ. किमी.; लोकसंख्या २,१९, ४४, ६१५ (१९७१). ओरिसाच्या उत्तरेस बिहार, पश्चिमेस मध्य प्रदेश, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पूर्वेस बंगालचा उपसागर व ईशान्येस पश्चिम बंगाल आहेत. राज्याची राजधानी भुवनेश्वर ही आहे.

भूवर्णन

राज्याचे सामान्यत: चार नैसर्गिक विभाग पडतात.

(अ) उत्तरेचे पठार :

यात मयूरभंज, केओंझार व सुंदरगढ हे जिल्हे आणि धेनकानाल जिल्ह्याचा पाल्लहरा तालुका हा उंचसखल प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरत येतो. हा बिहारच्या छोटा नागपूर पठाराचाच दक्षिण भाग असून त्याच्या टेकड्यांवर पडणारा पाऊस असंख्य प्रवाहांनी नद्यांना जाऊन मिळतो. या पठाराचा सरासरी ९३० मी. उंचीचा मध्यभाग, वैतरणी व ब्राह्मणी नद्यांमधील सर्वांत महत्त्वाचा जलविभाजक आहे. त्याच्या उत्तर व पूर्व भागांत अनेक टेकड्यांच्या रांगा असून त्यांत मलयगिरी, मानकर्णाच, मेघसानी अशी १,१०० ते १,२०० मी. उंचीची शिखरे आहेत.

(आ) मध्यवर्ती  नदीखोऱ्यांचा विभाग :

हा उत्तरेचे पठार व पूर्वेच्या टेकड्या यांच्या दरम्यान येतो. यात राज्यातल्या मुख्य नद्यांची जलवाहन क्षेत्रे असून त्यांत बोलानगीर, संबळपूर व धेनकानाल जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात जमिनी सुपीक आहेत. सपाट मैदानांतून मधूनमधून उभ्या टेकड्या आढळतात. राज्याच्या वायव्य भागातले महानदीतले खोरे बरेच विस्तृत आहे. मध्य विभागातली महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या नद्यांची खोरी समांतर, कृषिसंपन्न व दाट वस्तीची आहेत.

(इ) पूर्वेकडच्या टेकड्यांचा भाग :

हा भाग म्हणजे भारतीय पूर्वघाटाच्या शेवटच्या रांगा आहेत. मध्यभागातील नदीखोऱ्यांच्या दक्षिणेस व नैर्ऋत्येस सु. २५० किमी., ईशान्य नैर्ऋत्य रोखाने या पसरल्या असून त्या कोरापुट, कालाहंडी, बौध खोंडमाल्स व गंजाम जिल्ह्यांतून जातात. त्यांच्यामधील प्रशस्त खुल्या पठारांभोवती वनप्रदेश व राज्यातली सर्वोच्च शिखरे– देवमाली १,६७० मी., तुरिआ कोंडा १,५९८ मी. व महेंद्रगिरी १,५०० मी. आहेत. या गिरिप्रदेशाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून ९३० मी. असून तो बहुमोल वृक्षांच्या दाट रायांनी व्यापलेला आहे. यावर पडणारा पाऊस दोन बाजूंना वाहून ऋषिकूल्या, नागावली व वंशधारा नद्यांतून थेट बंगालच्या उपसागरात आणि उपनद्यांतून गोदावरी व महानदी या नद्यांकडे जातो.

(ई) किनारी सपाटीचा प्रदेश :

यात बलसोर, कटक व पुरी जिल्हे आणि गंजाम जिल्ह्याचा काही भाग येतो. पश्चिमेकडील डोंगराळ भाग आणि पूर्वेकडील खारपट्ट्या यांच्या दरम्यान हा नदीगाळाचा विस्तृत पट्टा आहे. बंगालच्या उपसागराला अगदी लागून असलेल्या भूप्रदेशात अनेक मंदवाही आणि समुद्राच्या भरती-ओहोटीनुसार कमीजास्त मचूळ होणारे प्रवाह  आहेत. बलसोर व पुरी जिल्ह्यांतला यांचा भाग रेताड आणि कटक जिल्ह्यात दलदलीचा आहे. या किनारपट्टीमागची प्रशस्त गाळजमीन मात्र अनेक नद्यानाल्यांनी भिजून भरपुर भातपीक देते.

प्रदेशातील माती

राज्याच्या उत्तरेच्या पठारभागाची माती लाल आहे. इकडे ग्रॅनाइट खडक जास्त असल्याने त्याची रेती मातीत असते. या भागात पाणी धरून ठेवणाऱ्या चिकणमातीचेही काही प्रमाण जमिनीत आहे. मध्यपठारावरच्या मृदा विविध प्रकारांच्या आहेत. खडकापासून बनलेली माती, वाऱ्या-पावसाने वाहून आणलेली धूळ आणि गंजाम जिल्ह्याच्या ईशान्येतील व महानदीच्या दोन्ही काठांची कपाशीची काळी माती. आणखीही वेगवेगळ्या जातींच्या मृदा मध्यपठारावर सापडतात. किनाराभागात दुमट माती आहे. ओरिसाच्या मृदांची संपूर्ण पाहणी अजून झालेली नाही.

खनिजसाठे

राज्यात लोहधातुकाचे प्रचंड साठे आहेत. ६० प्रतिशतपेक्षा अधिक लोहांश देणारे कच्चे खनिज विशेषत: सुंदरगढ, केओंझार व मयूरभंज जिल्ह्यांत सापडते. कटक जिल्ह्यातही नवे साठे मिळाले आहेत. भारतातले २० प्रतिशत मँगॅनीज केओंझार, सुंदरगढ, बोलानगीर व कालाहंडी जिल्ह्यांत निघते. केओंझार, धेनकानाल व कटक जिल्ह्यांत क्रोमाइट उपलब्ध आहे. धेनकानालच्या तालचेर तालुक्यात भरपूर कोळसा मिळतो. गंजाम जिल्ह्याच्या गंगपूर भागात डोलोमाइट व चुनखडक काढण्यात येतात.

या भागातील नद्या

महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या राज्यातल्या मुख्य नद्या वायव्येकडून आग्नेयीकडे जवळजवळ समांतर वहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यांच्याखेरीज राज्यात उत्तर भागात सालंदी, बुराबलंग व सुवर्णरेखा आणि दक्षिण भागात ऋषिकूल्या, वंशधारा, नागावली, इंद्रावती, कोलाब आणि मचकुंद या लहान नद्या आहेत. मध्य प्रदेशातून येणारी महानदी ओरिसात ८५३ किमी. लांब वाहते. ती येथील सर्वांत मोठी नदी असून १,३२,६०० चौ. किमी. क्षेत्रातले पाणी वाहून नेते आणि महापुराचे वेळी ४४,८०० घमी./से. किंवा जवळजवळ गंगेइतके पाणी बंगालच्या उपसागरात सोडते. अशा वेळी तिचे पात्र दीड किमी. पेक्षाही जास्त रुंदावते. ती अनेक मुखांनी सागराला मिळते. या व दुसऱ्या दोन नद्यांच्या मुखप्रवाहांचे एक जाळेच त्यांच्या त्रिभुजप्रदेशात बनले आहे. ओरिसातले मोठे जलाशय म्हणजे हिराकूद धरणाने झालेला तलाव आणि भरतीच्या वेळी खाऱ्या व ओहोटीच्यावेळी गोड्या पाण्याचे किनाऱ्याच्या आतले चिल्का सरोवर हे होत. राज्याचा ४८२ किमी. लांबीचा समुद्रकिनारा रेताड व नद्यांच्या गाळाने उथळ बनलेला आहे.

हवामान

कर्कवृत्ताच्या दक्षिणेस एकच अंशावर उत्तरसीमा असणारे हे राज्य उष्ण कटिबंधात अतएव स्वाभाविकतः उष्ण वायुमानचे आहे. वातावरणाच्या कमी दाबाच्या पट्ट्यात येत असल्याने येथील पर्जन्यप्रमाण मध्यम आहे; वेगवेगळ्या भागांच्या उंचसखलपणामुळे त्यांत थोडेबहुत फेरफार होतात. उन्हाळ्यात पूर्वेकडील टेकड्या व उत्तरेकडचे पठार यांच्या उंचीवरची ठिकाणे वगळता सर्वत्र सामान्य तपमान ३८° से. असते व किनाऱ्याकडून अंतर्भागाकडे ते वाढत जाते. थंडीच्या दिवसात सरासरी तपमान २२·८० ते १५० से. पर्यंत उतरते. पावसाळ्यात सरासरी वार्षिक १४८ सेंमी. पाऊस पडतो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्हींवरचे मान्सून प्रवाह या राज्यात एकत्र येतात. नैर्ऋत्य मान्सूनचे काळात बंगालच्या उपसागरावरून किनाऱ्यावर पुष्कळदा तुफाने येतात. याच सुमारास ईशान्य मान्सूनचे काही झोत पूर्वेकडच्या टेकड्यांवर येतात. राज्यात झालेल्या १९७१च्या तुफानाने फार नुकसान झाले.

 

लेखक : ओक, शा. नि.

 

स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate