অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कडलोर माला

कडलोर माला

भारताच्या आग्नेय किनाऱ्यालगत रामेश्वरम्‌पासून तो राजमहेंद्रीपर्यंतच्या पट्‌ट्यात व क्वचित त्याच्या उत्तरेकडील तशाच पट्‌ट्यात ठिकठिकाणी सापडणाऱ्या शैलसमूहाचे नाव. आर्कीयन कालीन पट्टिताश्म, उत्तर गौंडवन कालीन खडक व क्रिटेशस कालीन (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडक यांच्यावर कडलोर मालेचे खडक विसंगत  रीतीने वसलेले आढळतात. उलट कडलोर खडकांचा पृष्ठभाग ठिकठिकाणी नद्यानाल्यांच्या जलोढांनी (गाळांनी) व काही ठिकाणी जांभा दगडाने झाकला गेलेला आढळतो. या मालेतील जीवाश्मांवरून (जीवांच्या शिळारूप अवशेषांवरून) तिचे भूवैज्ञानिक वय इओसीन ते प्लायोसीन (सु. ५⋅५ ते १⋅२ कोटी वर्षांपूवीचे) असे ठरविण्यात आलेले आहे.
नद्यांच्या मुखांजवळ व उथळ समुद्राच्या तळावर गाळ साचून कडलोर मालेचे खडक तयार झालेले आहेत. त्यांच्यापैकी मुख्य म्हणजे वालुकाश्म होय. तो भुसभुशीत असून त्याच्यात कमीअधिक लोह असते व त्या लोहामुळे त्याला विटकरी, तांबूस, जांभळा, तपकिरी इ. रंग आलेले असतात. वालुकाश्माच्या थरांत मधून मधून माती, भरड वाळू किंवा गोटे यांचे थर आढळतात. दक्षिण अर्काट व पाँडिचरी यांच्याजवळच्या खडकांत ज्यांचे इंधन म्हणून फायदेशीर उत्पादन करता येईल, असे लिग्‍नाइटाचे अनेक जाड थर आहेत. त्यांपैकी प्रख्यात म्हणजे नेव्हेली येथील थर होत.
सागरी मॉलस्का (मृदुकाय प्राणी), फोरॅमिनीफेरा व शैवले यांचे जीवाश्म या खडकांत अनेक जागी आढळतात. मॉलस्कांपैकी मुख्य म्हणजे ऑस्ट्रिया, फुसुस, ऑलिव्हा व कॉनस हे होत. पाँडिचरीजवळील तिरुवक्कराईजवळ या खडकांत सपुष्प वनस्पतींच्या २३ मी. पर्यत लांबी व १ – १⋅५मी. व्यास असलेल्या, सिलीकीभूत (सिलिकारूप झालेल्या) खोडांचे जीवाश्म आढळलेले आहेत.
लेखक : क.वा.केळकर

 

अंतिम सुधारित : 6/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate