অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुरुविंद

कुरुविंद

(कोरंडम). खनिज. स्फटिक षट्‌फलकीय; समांतर षट्‌फलकीय; विषम-त्रिभुजफलकी. स्फटिक नेहमी प्रचिनाकार किंवा टोकांशी प्रसूची असलेले प्रचिन असतात [स्फटिकविज्ञान]. कोपरे गोलसर झाल्याने स्फटिक बहुधा मृदुंगासारखे दिसतात. पुष्कळदा स्फटिकांवर आडव्या रेखा असतात. ओबडधोबड स्फटिकांच्या आणि संपुजित रूपातही हे आढळते. पाटन नसते. मात्र (०००१) आणि (१०११) या विभाजनतलांमधील कोन ९०० असल्याने याचे घनाकार तुकडे होतात [ पाटन; खनिजविज्ञान]. प्रचिनास समांतर असलेली विभाजनतलेही असतात. ताज्या कोऱ्या पृष्ठाचा कठिणपणा ९ असून कुरुविंदापेक्षा फक्त हिरा अधिक कठीण असतो. वि. गु. ४ ते ४·१. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक हिऱ्यासारखी ते काचेसारखी. रंग नेहमी उदी किंवा गुलाबी छता; कधी कधी तांबडा, निळा, पांढरा, करडा किंवा हिरवा. रंगांवरून याचे निरनिराळे प्रकार पडतात. उदा., गडद लाल  माणिक; निळा  नील. इतर रंगीत प्रकारांना नाव देताना त्या रंगाच्या खनिजाच्या नावाआधी ओरिएंटल हा कुरुविंददर्शक शब्द लावतात. जमुनिया जांभळे असल्याने जांभळ्या कुरुविंदास ओरिएंटल अ‍ॅमेथिस्ट (जमुनिया); तसेच पिवळ्यास ओरिएंटल टोपॅझ (पुष्कराज); हिरव्याला ओरिएंटल एमराल्ड (पाचू) म्हणतात. परंतु जवाहिऱ्यांच्या मते ही नावे अनुरूप नाहीत. काही वेळा कुरुविंदामध्ये रूटाइलाचे सुईसारखे स्फटिक व्यवस्थित मांडले गेले असल्याने आत षट्‌कोनी तारका असलेला तारकांकित प्रकार तयार होतो.

कुरुविंदाचे काळे कण व मॅग्‍नेटाइट, हेमॅटाइट किंवा हेर्सिनाइट यांच्या मिश्रणाला ⇨एमरी  म्हणतात. कुरुविंद अम्‍लरोधी, क्षार (अल्कली) रोधी, विद्युत् अपार्य, अगलनीय (वितळण्यास कठीण, वितळबिंदू २,०४०० से.) व अविद्राव्य (न विरघळणारे) असते. रा. सं. Al2O3. ते खडकांच्या संस्पर्शी रूपांतरणाने (जवळील अग्‍नीज खडकांच्या राशीमुळे होणाऱ्या बदलांनी) किंवा अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) शिलारसाच्या घनीभवनाने तयार होते. ते मुख्यत्वेकरून कमी सिलिका व विपुल अ‍ॅल्युमिना असणाऱ्या खडकांमध्ये सापडते. उदा., सायेनाइट, नेफेलीन सायेनाइट, नेफेलीन-फेल्स्पार पेग्मटाइट इत्यादी. कधीकधी पेग्मटाइटांमध्ये त्याचे मोठे स्फटिकही आढळतात. संगमरवर, अभ्रकी सुभाजा (सहज भंग पावणारा खडक) व पट्टिताश्म यांच्यासारख्या रूपांतरित खडकांमध्ये हे गौण खनिज म्हणून सापडते. अक्रिय (ज्यावर क्रिया होत नाही असे) व कठीण असल्याने काही ठिकाणी ते प्लेसर निक्षेपाच्या रूपातही आढळते. सामान्यपणे ते क्लोराइट, अभ्रक, ऑलिव्हीन, सर्पेंटाइन, मॅग्‍नेटाइट इ. खनिजांच्या बरोबर असते. अपघटनाने (रासायनिक बदलाने) त्याच्यापासून झॉइसाइट, सिलिका, कायनाइट व अ‍ॅल्युमिन्याची सजल खनिजे तयार होतात.

श्रीलंका, ब्रह्मदेश, लाओस, द. आफ्रिका, अमेरिका, कॅनडा, रशिया, मॅलॅगॅसी इ. प्रदेशांत कुरुविंद सापडते. भारतात ते अनंतपूर (आंध्र प्रदेश), खासी टेकड्या (आसाम) झास्कर पर्वतरांगा (काश्मीर), सिंगभूम (बिहार), कोईमतूर, त्रिचनापल्ली, नेलोर, सेलम, शिवामलाई (तमिळनाडू), रेवा (मध्य प्रदेश), हसन (कर्नाटक) इ. ठिकाणी आढळते. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील पोहरा भागात कुरुविंदाचा १०० टनांचा साठा आहे. १९६९ साली भारतात २,१९,००० रु. किमतीचे ४१२ टन कुरुविंद काढण्यात आले.

रत्‍न म्हणून घड्याळातील मौल्यवान खड्यांसाठी व शास्त्री उपकरणांमधील धारव्यांसाठी (फिरते दंड योग्य जागी रहावेत यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधारांसाठी, बेअरिंगांसाठी) कुरुविंद वापरतात. काच कापणे, झिलई देणे, पैलूकाम इ. क्रियांमध्ये अपघर्षक (घासून वा खरवडून पृष्ठ गुळगुळीत करणारा पदार्थ) म्हणून आणि उच्चतापसह (उच्च तापमान सहन करणाऱ्या) मुशी बनविण्यासाठी हलक्या दर्जाचे कुरुविंद वापरतात. बॉक्साइटापासून बनविलेल्या कृत्रिम कुरुविंदाचा सिलिकॉन कार्बाइडाच्या जोडीने अपघर्षक म्हणून उपयोग करतात. कुरुविंद या संस्कृत नावावरूनच इंग्रजी कोरंडम हे नाव पडले आहे.

लेखक : अ. ना.ठाकूर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate