অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गाळाचे खडक

गाळाचे खडक

भूपृष्ठाचे अनाच्छादन (झीज) घडवून आणणाऱ्या कारकांच्या रासायनिक व भौतिक क्रियांनी आधीच अस्तित्वात असलेल्या खडकांच्या अपघटनाने (रासायनिक दृष्ट्या घटक अलग झाल्याने) किंवा विघटनाने (तुकडे झाल्याने) तयार झालेला चुरा म्हणजे गाळ सामान्य तापमानाच्या व दाबाच्या परिस्थितीत निक्षेपित होऊन (साचून) तयार झालेल्या खडकांना गाळाचे किंवा अवसादी खडक म्हणतात. हा चुरा मोठाले धोंडे, गोटे, दगड तसेच माती इ. भिन्न आकारमानांच्या घटकांचा असतो.

सामान्यतः चुऱ्याचा बराचसा भाग पाण्यामध्ये अविद्राव्य (न विरघळणारा) असतो आणि वाहत्या पाण्याबरोबर तो निलंबनाच्या (लोंबकळत्या) स्वरूपात वाहून नेला जातो. सामान्य भाषेत गाळ ही संज्ञा पाण्यात किंवा इतर द्रवांत मिश्रित असलेल्या घन पदार्थांना उदा., पुराच्या गढूळ पाण्यातील दगड, माती किंवा रेती यांसारख्या पदार्थांना देण्यात येते; पण भूवैज्ञानिक वर्णनात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या पदार्थांचाही गाळ किंवा अवसाद या संज्ञेत समावेश केला जातो. गाळांचे थर एकावर एक असे पडत जाऊन व साचत जाऊन हे खडक तयार होत असल्यामुळे ते अनेक थरांचे बनलेले असतात. अशी स्तरांकित रचना किंवा स्तरण हा गाळाच्या खडकांचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे.

भूकवचाच्या तीन प्रकारच्या खडकांपैकी गाळाचे खडक हा एक प्रकार असून अग्निज खडक  व  रूपांतरित खडक  हे इतर दोन प्रकार होत. अग्निज खडक निर्मितीच्या काळापासून घन असतात, म्हणून त्यांना आद्य खडक असेही म्हणतात. उलट गाळाचे खडक हे आधीच असलेल्या तिन्ही प्रकारच्या खडकांच्या चुऱ्यापासून तयार झालेले असतात, म्हणून त्यांना कधीकधी द्वितीयक खडक असेही म्हणतात. पृथ्वीच्या भूवैज्ञानिक इतिहासाबद्दल गाळाचे खडक इतर प्रकारांच्या खडकांपेक्षा बरीच अधिक माहिती पुरवितात. पृथ्वीवर प्राणी व वनस्पती यांचा क्रमविकास (उत्क्रांती) कसा झाला, हे त्यांच्यातील जीवाश्मांवरून (जीवांच्या अवशेषांवरून) समजू शकते. कोळसा, नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) व खनिज तेल, लोह धातुके (कच्ची धातू), चुनखडक, निरनिराळी लवणे व इतर औद्योगिक व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे पदार्थ गाळाच्या खडकांतून मिळतात.

भूपृष्ठाची झीज

पृथ्वीच्या कवचाच्या खडकांवर वातावरणक्रियेचा म्हणजे वातावरण, ऊन, पाऊस इत्यादींचा परिणाम होऊन त्यांचे भौतिक विघटन व रासायनिक अपघटन होते व एकसंध खडकांचे तुकडे पडतात व त्यांचा चुरा होतो. भूपृष्ठावर किंवा उथळ जागी भूपृष्ठाची झीज घडवून अनाच्छादनाचे कार्य करणाऱ्या निरनिराळ्या कारकांच्या; उदा., नद्या, हिमनद्या, वारा इत्यादींच्या; क्रियांनी देखील खडकांचा चुरा तयार होतो.

हा सर्व प्रकारांनी तयार होणारा चुरा सामान्य दाब व तापमानाच्या परिस्थितीत तयार होत असतो. पाण्यात विरघळू शकतील अशी काही खनिजे मूळच्या खडकांत असणे शक्य असते व अपघटनाच्या प्रक्रियेत मूळच्या काही अविद्राव्य खनिजांपासून पाण्यात विद्राव्य (विरघळणारे) असे पदार्थ निर्माण होतात. वरील प्रकारांनी तयार झालेले पदार्थ दीर्घकाळ मूळ जागीच पडून राहत नाहीत.

वाहते पाणी, वारा इत्यादींमुळे ते कमी अधिक वेगाने मूळ जागेपासून दुसरीकडे वाहून नेले जातात. त्यांच्यातील पाण्यात अविद्राव्य असे पदार्थ जमिनीवरील दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात किंवा समुद्राच्या तळावर साचविले जातात. पाण्यातील विद्राव्य पदार्थ जमिनीत मुरणाऱ्या किंवा नद्यानाल्यांच्या पाण्याबरोबर निघून जातात व त्यांपैकी बरेचसे अखेरीस समुद्रात शिरतात. परंतु काही विशिष्ट परिस्थितीत भौतिक किंवा रासायनिक फेरफार घडून येऊन पाण्यात विरघळलेले पदार्थ सरळ अवक्षेपित (साका होऊन खाली बसणे) होणे शक्य असते. तसेच प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जीवनक्रियांमुळेही ते अवक्षेपित होणे शक्य असते. वर उल्लेख केल्यासारख्या प्रक्रियांनी निक्षेपित चुऱ्याच्या किंवा अवक्षेपित झालेल्या पदार्थांच्या राशींपासून गाळाचे खडक तयार होतात.

गाळाचे खडक पृथ्वीच्या कवचाचा फक्त पाच टक्के भाग व्यापतात. असे असले तरी भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या एकूण खडकांपैकी ७५ टक्के भाग त्यांचा बनलेला आहे. यावरून भूपृष्ठावरील सापेक्षतः पातळ जाडीच्या पट्ट्यात गाळाचे खडक पसरलेले आहेत, हे सहज दिसून येते. गाळाच्या खडकांची जाडी मात्र निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. अग्निज खडकांच्या पर्वतावर काही ठिकाणी ते आढळत नाहीत, उदा., जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आढळणाऱ्या बेसाल्टावर गाळाचे खडक नाहीत. काही पर्वतांवर २ ते ५ मी. इतक्याच जाडीचे आहेत. उदा., अमेरिकेतील ओझार्क किंवा अ‍ॅडिराँडॅक पर्वत; तर कधीकधी ते हजारो मीटर जाडीचे असतात.

उदा., (१) खंबायत द्रोणी सु. २,७०० मी., (२) कावेरी द्रोणी सु. ७,५०० मी., (३) अमेरिकेतील मिसिसिपी नदीचे खोरे १०,००० मी., (४) आसाममधील द्रोणी १५,००० मी.

खडकांवर वातावरणक्रिया होऊन तयार होणाऱ्या सुट्या पदार्थांचे पुढील वर्ग करता येतात :

(१) मूळ खडकांचे लहान मोठे तुकडे, धोंडे,  ठोकळे इत्यादी. यांच्यातील खनिजांत फारसा किंवा मुळीच बदल झालेला नसतो. (२) मूळच्या खडकातील टिकाऊ व अपघटन न झालेल्या खनिजांचे सुटे झालेले स्फटिक, बारीक कण किंवा चकत्या : क्वॉर्ट्‌झ व शुभ्र अभ्रक ही खनिजे अतिशय टिकाऊ असतात. झिर्‌कॉन, रूटाइल, गार्नेट, तोरमल्ली, कायनाइट, मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, इल्मेनाइट, क्रोमाइट इत्यादींपैकी काही खनिजे खडकात अल्प किंवा अत्यल्प प्रमाणात असतात. तीही अतिशय टिकाऊ असतात. अशी खनिजे मूळच्या खडकात असली, तर त्यांचे अपघटित न झालेले मोठे स्फटिक किंवा कण वातावरणाच्या क्रियेने तयार झालेल्या चुऱ्यात आढळतात. अशा चुऱ्यात फेल्स्पारांचे कणही असणे शक्य असते, पण सामान्यतः ते बरेच अपघटित असतात.

(३) मूळच्या खडकांतील खनिजांचे अपघटन होऊन तयार झालेले पदार्थ : खनिजांच्या अपघटनाने तयार होणाऱ्या पदार्थांपैकी काही जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारे) असणे शक्य असते.

उदा., फेल्स्पारांच्या गटातील खनिजांत असणाऱ्या सोडीयम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम यांच्यापासून जलविद्राव्य कार्बोनेटे तयार होतात. फेरोमॅग्नेशियमी सिलिकेटातील मॅग्नेशियम व लोह यांच्यापासूनही जलविद्राव्य कार्बोनेटे तयार होतात. परंतु ऑक्सिजनाच्या सानिध्यात विद्रावातील लोही कार्बोनेटाचे हेमॅटाइट किंवा मॅग्नेटाइट या खनिजांच्या स्वरूपात अवक्षेपण होते. सिलिकेटांच्या अपघटनातदेखील जलविद्राव्य सिलिका काही प्रमाणात तयार होते.

अपघटनाने तयार होणाऱ्या अविद्राव्य पदार्थांपैकी मुख्य म्हणजे सजल अ‍ॅल्युमिनियम सिलिकेट असणारी मृद्‌-खनिजे; सर्पेंटाइन-संगजिरे यांच्या गटातील सजल मॅग्नेशियम सिलिकेटे आणि क्लोराइट, हायड्रोमायका, झिओलाइट व एपिडोट या गटातील खनिजे ही होत. लोह व अ‍ॅल्युमिनियम यांची विविध हायड्रॉक्साइडे व कलिल (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असणाऱ्या द्रव मिश्रणाच्या स्वरूपातील) सिलिका हीसुद्धा वरील खनिजांच्या बरोबर थोड्याफार प्रमाणात असणे शक्य असते. अपघटनाने तयार झालेले हे पदार्थ सामान्यतः पिठासारखे सूक्ष्मकणी असतात.

वातावरणक्रियेने तयार झालेले पदार्थ वाहते पाणी, वारा इत्यादींनी सर्वस्वी वाहून नेले न जाता त्यांचा कमीअधिक अंश ते तयार झाले त्या ठिकाणीच कधीकधी राहणे शक्य असते. ते साचून सुट्ट्या पदार्थांचे कमीअधिक जाडीचे आच्छादन जमिनीच्या पृष्ठावर तयार होते, त्याला आवरणशिला  म्हणतात. आवरणशिलेतील घटकांची वाहतूक झालेली नसल्यामुळे तिच्यातील दगडी तुकडे लहान मोठे, विविध आकारमानांचे व सामान्यतः खडबडीत किंवा अणकुचीदार असतात.

आवरणशिलेतील घटकांची आकारमानानुसार वर्गवारी झालेली नसते. विघटनाने व अपघटनाने तयार झालेले विविध प्रकारचे आणि भिन्न आकारमानांचे पदार्थ तिच्यात असतात. अशा रीतीने तयार झालेल्या आच्छादनाच्या खडकांना अवशिष्ट निक्षेप म्हणतात. भिन्न प्रकारच्या खडकांपासून व वेगवेगळ्या जलवायुमानांत (दीर्घ काळातील सरासरी हवामानांत) वायुक्रियेने निर्माण होणारे पदार्थ निरनिराळे असतात. अवशिष्ट निक्षेपांचे रासायनिक संघटन, संरचना इ. लक्षणे ही अंशतः मूळच्या खडकांच्या प्रकारावर व अंशतः कोणत्या परिस्थितीत वातावरणक्रिया होऊन खडकांचे विघटन किंवा अपघटन झाले, यावर अवलंबून असतात. खडकांचे व वातावरणक्रियेच्या परिस्थितीचे अनेक प्रकार निसर्गात असल्यामुळे अवशिष्ट निक्षेपांचे देखील अनेक प्रकार आढळतात. त्यांच्यापैकी मुख्य म्हणजे

(१) स्वस्थानीय मृदा किंवा शेतमाती,

(२) स्वस्थानीय  जांभा  किंवा लॅटेराइट,

(३) टेरा रोसा नावाची एक प्रकारची लाल रंगाची मृदा ही होत. रुक्ष जलवायुमानाच्या प्रदेशात चुनखडक उघडे पडलेले असले म्हणजे त्यांच्यातील कॅल्शियम कार्बोनेटाचा काही अंश क्वचित पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात विरघळून जमिनीत मुरणाऱ्या वा भूपृष्ठावरून वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर निघून जातो. मूळच्या खडकांतील अविद्राव्य खनिजे किंवा त्यांच्यात असणाऱ्या खनिजांच्या अपघटनाने तयार झालेली मृत्तिका आणि इतर अविद्राव्य खनिजे बव्हंशी शिल्लक राहतात, ती साचून त्यांचे मूळ स्थानावर आच्छादन तयार होते. टेरा रोसा अशा रीतीने तयार झालेली असते.

एड्रिअ‍ॅटिक समुद्राच्या लगत यूगोस्लाव्हियाचा जो भाग आहे, त्याच्यातील कार्स्ट (फ्रॉस) नावाच्या पठारात टेरा रोसाचे उत्कृष्ट नमुने आढळतात. हे पठार पांढऱ्या चुनखडकांचे बनलेले असून त्याच्या अवशिष्ट खनिजांत लोहाची खनिजे अल्प प्रमाणात असतात. त्यांच्यामुळे टेरा रोसाला लाल रंग आलेला असतो.

पाऊस अधिक असला म्हणजे चुनखडकातील अविद्राव्य खनिजेही वाहून नेली जातात व टेरा रोसा किंवा इतर मृदा साचू शकत नाहीत. (४) काही वालुकाश्मांतील वाळूचे कण किंवा पिंडाश्मातील (गोलसर भरड कण चिकटविले जाऊन बनलेल्या खडकातील) गोटे कॅल्शियम कार्बोनेटासारख्या लुकणाने चिकटविलेले असतात. त्यांच्यातील लुकण निघून जाऊन सुटी वाळू किंवा सुटे गोटे मात्र शिल्लक राहतात. अशा अवशिष्ट वाळूचे किंवा गोट्यांचे निक्षेपही निसर्गात क्वचित आढळतात.

गाळाची वाहतूक किंवा परिवहन

भूपृष्ठाची झीज घडवून आणणाऱ्या वातावरणाच्या व इतर कारकांच्या क्रियांनी तयार झालेले विद्राव्य व अविद्राव्य पदार्थ काही काळ ते तयार झाले त्या क्षेत्रातच राहणे शक्य असते व कधीकधी त्यांचे वर वर्णन केल्याप्रमाणे अवशिष्ट निक्षेपही तयार होतात. पण सामान्यतः हे पदार्थ मूळच्या जागेवरून दुसरीकडे वाहून नेले जातात व दुसऱ्या एखाद्या किंवा अनेक क्षेत्रांत निक्षेपित होतात. त्यांची वाहतूक मुख्यतः नद्या, समुद्राच्या लाटा व प्रवाह, वारा, हिमनद्या व बर्फाचे वाहते थर यांच्यामुळे घडून येते. विद्राव्य पदार्थांची वाहतूक वाहत्या पाण्यामुळे व अविद्राव्य पदार्थांची वाहतूक वाहते पाणी व इतर सर्वच कारकांमुळे होते.

वाहतुकीमुळे अविद्राव्य पदार्थांचे दगडी चुऱ्याचे उत्तरोत्तर बारीक तुकडे होत जाऊन अखेरीस त्यांच्यापासून वाळूचे किंवा मातीचे कण तयार होतात. नद्यांच्या पाण्याबरोबर वाहत जाणाऱ्या चुऱ्यापैकी भरड पदार्थ त्यांच्या तळाशी व काठाशी असलेल्या खडकांवर घासटत, घरंगळत, आपटत जात असतात.

वाऱ्याबरोबर जाणारे लहान आकारमानाचे वाळूचे कण परस्परांवर किंवा मार्गात येणाऱ्या खडकांच्या पृष्ठांवर आदळत किंवा घासटत जातात. यामुळे नद्यांच्या पाण्याबरोबर व वाऱ्याबरोबर वाहत जाणाऱ्या चुऱ्याची झीज होत असतेच, पण ज्या खडकांवरून ते घासटत, आपटत जातात त्यांचीही  झीज होऊन नवा चुरा तयार होतो व तोही वाहून नेला जातो. समुद्राच्या लाटांचे पाणी किनाऱ्यावरील दगडी चुरा उचलून घेऊन लगतच्या खडकांवर आदळत असते. यामुळे किनाऱ्यावरील खडकांचे तुकडे होतात व त्यांच्यावर  आदळणाऱ्या चुऱ्याचीही झीज होते.

वाहतुकीत चुऱ्याची जी झीज होते तिचे प्रमाण

(१) वाहतुकीच्या माध्यमावर,

(२) चुऱ्यातील पदार्थांच्या कठिनतेवर,

(३) त्यांच्या आकारावर व

(४) वाहतूक किती झाली यांवर मुख्यत्वेकरून अवलंबून असते. इतरही काही गोष्टींवर हे प्रमाण अवलंबून असते, उदा., ज्या प्रकारच्या प्रदेशातून व ज्या प्रकारच्या खडकांवरून चुरा आदळत आपटत जाणार त्यांवरही हे प्रमाण अवलंबून असते. मऊ खनिजांची किंवा खडकांच्या तुकड्यांची झीज वेगाने होते व कठीण चुऱ्याची झीज मंद गतीने होते. सामान्यत: वाहतूक थोडी झाली म्हणजे झीज अल्प आणि वाहतुकीचे अंतर जितके अधिक तितकी झीज अधिक असते. चुऱ्याचा प्रवास दीर्घ झाला, म्हणजे त्याच्यातील मऊ पदार्थ झिजून त्यांचे मातीसारखे कण झालेले असतात, पण कठीण पदार्थांची वाळू झालेली असते.

वायुक्रियेने तयार झालेल्या चुऱ्यातील तुकडे व कण प्रारंभी सामान्यतः खडबडीत अणकुचीदार असतात. वाहतुकीतील, विशेषतः वाहत्या पाण्याने अथवा वाऱ्याने होणाऱ्या वाहतुकीतील झिजेमुळे चुऱ्यातील पदार्थांचे कोनेकोपरे झिजत जाऊन त्यांना गोलाई येते व त्यांचे पृष्ठभाग गुळगुळीत होतात. गोलाई येऊन कोणत्या आकाराचे तुकडे किंवा कण तयार होतील, हे काही अंशी मूळच्या तुकड्याच्या ठेवणीवर आणि काही अंशी वाहतुकीच्या माध्यमावर अवलंबून असते.

उदा., वाहत्या पाण्याने होणाऱ्या वाहतुकीत मूळच्या समपरिमाणी तुकड्यांपासून गोल गोटे, प्रचिनाकार तुकड्यांपासून लांबट, विवृत्तीय (लंबवर्तुळाकार), अंड्याच्या आकाराचे व फरशीसारख्या तुकड्यांपासून चपटे व कडांना गोलाई आलेले व भरड वाळूपासून वाळूचे गोल कण तयार होतात. वाहत्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर जाणारे पदार्थ एकमेकांवर तसेच तळाच्या किंवा मार्गातल्या खडकांवर आदळत, आपटत, घासत, घरंगळत जात असतात. त्यामुळे त्यांचे कोनेकोपरे, कडा व खडबडीत पृष्ठभाग झिजून त्यांना गोलाई येते.

गोलाईचे प्रमाण काही अंशी वाहतुकीच्या माध्यमाच्या श्यानतेवर (दाटपणावर) अवलंबून असते. पाणी हे हवेपेक्षा अधिक श्यान असते. इतर परिस्थिती सारखीच असताना, काही कण पाण्याबरोबर व अगदी तसेच काही कण वाऱ्याबरोबर वाहत जात आहेत अशी कल्पना केली, तर वाऱ्यातील कण एकमेकांवर किंवा मार्गातल्या खडकांवर आदळणे अधिक सुलभ असते. पाण्याच्या अधिक श्यानतेच्या घर्षणामुळे त्याच्यातील कण एकमेकांवर किंवा तळाच्या खडकावर आदळण्यास प्रतिकार होत असतो. एखादा दगड रिकाम्या व पाण्याने भरलेल्या भांड्यात सारख्याच जोराने फेकला, तर रिकाम्या भांड्याच्या तळावर होणारा आघात अधिक जोरकस असतो. म्हणजे इतर परिस्थिती सारखीच असताना कणांचे हवेत होणारे आघात हे पाण्यात होणाऱ्या आघातापेक्षा अधिक प्रभावी असतात.

आणखी असे की, पाण्यात असणाऱ्या एखाद्या कणाचे आकारमान काही विवक्षित मर्यादेच्या खाली गेले, त्याचा व्यास ०·७५ मिमी. पेक्षा कमी असला, म्हणजे त्या कणाभोवती पाण्याचे जे अतिशय पातळ आवरण असते, त्याच्या पृष्ठताणाच्या (पृष्ठाजवळच्या रेणूंवर त्यांच्या जवळपासच्या रेणूंमुळे कार्य करणाऱ्या आणि पृष्ठाला लंब असणाऱ्या आकर्षण प्रेरणांमुळे निर्माण होणाऱ्या ताणाच्या) प्रतिसारक प्रेरणेमुळे तो कण दुसऱ्या कणावर किंवा पात्रातील खडकावर आदळू शकत नाही.

अशा कणांना अर्थातच पाण्याच्या वाहतुकीत गोलाई येत नाही, ते कोणीय (कोपरे असलेले) किंवा खडबडीतच राहतात. वरील मर्यादेपेक्षा अधिक मोठ्या कणांना गोलाई येणे शक्य असते. पाण्यात असणाऱ्या कणांच्या मानाने हवेत असणाऱ्या  कणांच्या पृष्ठताणाची प्रेरणा पुष्कळच कमी असते. म्हणून वाऱ्याने वाहतूक होत असताना वाळूचे अगदी बारीक कणही एकमेंकावर व वाटेतल्या खडकांवर आदळू शकतात. त्यामुळे दीर्घकाळ वाहतूक झालेल्या वाळूचे कण वरी-बाजरीसारखे बारीक व गोलाकार असतात. त्यांना ‘मिलेट सीड सँड्‌स’ म्हणतात.

वाहतूक होत असताना खडकांच्या चुऱ्यातील पदार्थांचे आकार व आकारमान यांना अनुसरून पृथक्करणही होते. पृथक्करण करण्याच्या बाबतीत वारा प्रभावी ठरतो. हलक्या वाऱ्याबरोबर चुऱ्यातील सूक्ष्मकणी धूळ निघून जाते. अधिक जोराच्या वाऱ्याबरोबर अभ्रकाच्या चकत्या किंवा चकतीचा आकार असणारी इतर हलकी खनिजे निघून जातात व वाळूचे कण मात्र शिल्लक राहतात. पाण्याने दीर्घकाळ वाहतूक झाल्यास मूळच्या चुऱ्यातील मऊ, ठिसूळ व पाटनक्षम (ठराविक प्रतलाच्या दिशेत सहज भंग पावण्याचा गुणधर्म असलेल्या) खनिजांचे विघटन व अपघटन होऊन ती नाहीशी होतात.

उदा., क्वॉर्ट्‌झाच्या मानाने फेल्स्पारे अधिक मऊ असतात, त्यांच्यात पाटन असते व त्यांचे कमीअधिक अपघटनही झालेले असते.  त्यामुळे त्यांचे कण अधिक सुलभपणे झिजून त्यांच्यापासून माती तयार होते, ती निघून जाऊन जो भाग उरतो तो मुख्यतः क्वॉर्ट्‌झाच्या कणांच्या वाळूचा म्हणजे अधिक समांग (एकजिनसी) खनिज संघटन असणाऱ्या वाळूचा असतो.

वाहते हिम व बर्फ यांच्यामुळेही खडकांच्या चुऱ्याची वाहतूक होते. हिमनद्यांमध्ये पुष्कळ डबर रुतलेले असते. त्यांच्या पृष्ठावरही डबराचे ढिगारे असतात. बर्फाच्या थरांच्या तळाकडील भागात पुष्कळ डबर रुतलेले असते. अशा वाहत्या हिमाने व बर्फाने वाहून नेलेले बहुतेक सर्व डबर सुरूवातीला जसे असते जवळजवळ तसेच वाहून नेले जाते. मात्र बर्फाच्या राशींच्या तळाच्या पृष्ठभागावर जे डबर असते ते खालच्या खडकांवर घासटत, ओरखडे काढीत पुढे नेले जाते. तळाकडील डबरातील जे तुकडे किंवा धोंडे खालच्या खडकावरून घासटत जातात त्यांचे फक्त खालचे भाग झिजून तासले जातात, त्यांना झिलई येते व त्यांच्यावर चरे पडतात. पण त्यांचा उरलेला व बर्फात रुतलेला भाग आहे तसाच टिकून राहतो.

अखेरीस ज्या ठिकाणी हिमाच्या व बर्फाच्या राशी वितळून त्यांचे पाणी होते, तेथे त्यांच्याबरोबर आलेले सर्व डबर तसेच टाकून दिले जाते. त्याच्यातील काही सूक्ष्मकणी माती बर्फ वितळून तयार होणाऱ्या पाण्याबरोबर निघून जाते, पण इतर सर्व डबर पृथक्करण न होता तसेच साचून राहते. त्याच्यात लहानमोठे दगड, धोंडे, खडे, वाळू इ. विविध आकारमानांचे, मऊ किंवा कठीण खनिजांचे किंवा खडकांचे तुकडे असतात. त्यांपैकी बहुतेकांची झीज झालेली नसते व त्यांना गोलाई आलेली नसते. ज्यांच्या तळाच्या पृष्ठभागावर वेडेवाकडे व कठीण असे डबर असते, असे हिमाचे व बर्फाचे थर ज्या खडकांच्या पृष्ठभागावरून घासटत ओरखडत जातात त्या खडकांच्या पृष्ठभागावर पण ओरखडे पडून रेखांकित पृष्ठभाग तयार होतात.

गाळाचे निक्षेपण

वाहतुकीच्या कारकांनी वाहून नेलेला चुरा बहुतेककरून अखेरीस समुद्रात नेऊन टाकला जातो. पण ज्याचा काही अंश जमिनीवरही काही ठिकाणी साचविला जाणे शक्य असते, अशा निक्षेपास ‘खंडीय’, -‘महाद्विपीय’ – किंवा ‘भौम-निक्षेप’ म्हणतात. त्यांच्यात मुख्यतः नादेय म्हणजे नद्यानाल्यांमुळे तयार झालेल्या, सरोवरी म्हणजे जमिनीवरील लहानमोठ्या व गोड्या वा खाऱ्या पाण्याच्या सरोवरांत तयार झालेल्या, हिमनादेय म्हणजे वाहत्या हिमाबर्फाने तयार झालेल्या व वातज म्हणजे वाऱ्यामुळे तयार झालेल्या निक्षेपांचा तसेच तुटलेल्या कड्यांच्या पायथ्यांशी व मुख्यतः गुरुत्वाकर्षणाने साचलेल्या डबरांच्या राशींचा समावेश होतो.

डोंगराळ प्रदेशातील नद्या सपाट प्रदेशात शिरताच त्यांचा वेग कमी  होतो व त्यामुळे त्यांच्या पाण्याबरोबर वाहत आलेल्या पदार्थांपैकी अधिक भरड पदार्थ उदा., वाळू व भरड गाळवट टाकून दिले जातात. पुराचे पाणी ओसरल्यावर नद्यांच्या काठांवर गाळाच्या (जलोढाच्या) राशी साचतात. सपाट तळ असलेल्या नद्यांच्या खोऱ्यांत व गंगा-सिंधू यांसारख्या नद्या वाहत असलेल्या प्रदेशांत जलोढाच्या प्रचंड जाडीच्या व अतिविस्तीर्ण राशी आढळतात.

नदीच्या मार्गात एखादे सरोवर असले म्हणजे नदीबरोबर येणारा गाळ साचून ते भरून जाते व अखेरीस बुजून जाते. नदी वाहण्यास आवश्यक तेवढे पात्र मात्र शिल्लक राहते. ज्यांत नद्यानाले सतत न शिरता वर्षातील काही काळच शिरतात अशीही काही सरोवरे असतात. त्यांच्यातही गाळ साचून अखेरीस ती बुजून जातात. रुक्ष प्रदेशातील लवणमय सरोवरे आटून सैंधवाचे वा इतर लवणांचे निक्षेप (साठे) तयार होतात.

रुक्ष प्रदेशातील अवसादांची वाहतूक मुख्यतः वाऱ्याकडून होत असते. वाऱ्याबरोबर आलेली धूळ जमिनीवर साचत राहून चीनमधील लोएस या खडकासारखे प्रचंड जाडीचे निक्षेप रुक्ष प्रदेशात तयार होतात.  पुष्कळ समुद्रांच्या किनाऱ्यांलगतच्या पट्ट्यात वाऱ्याबरोबर आलेली वाळू साचून तयार झालेल्या टेकड्या (वालुकागिरी) आढळतात.

खाड्यांतील निक्षेप

कित्येक नद्यांच्या पाण्यात पुष्कळ सूक्ष्मकणी गाळ-मातीचे कण निलंबी स्थितीत असतात. समुद्राच्या पाण्यात मिसळताच, खाऱ्या पाण्यातील लवणांमुळे नद्यांच्या पाण्यातील निलंबी कणांचे किलाटन होऊन (एकत्रित येऊन व घट्ट होऊन) ते अवक्षेपित होतात. म्हणून खाड्यांमध्ये साचलेल्या निक्षेपांत मातीचे थर वारंवार आढळतात.

अशा निक्षेपांत गोड्या, मचूळ व खाऱ्या पाण्यात किंवा जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांचे व कधीकधी जमिनीवरील वनस्पतींचे विपुल अवशेष सापडतात. समुद्रात नदी शिरली म्हणजे तिच्यातील सूक्ष्मकणी माती समुद्राच्या प्रवाहांबरोबर निघून जाते. मात्र खाड्यांमध्ये आडोसा मिळाल्याने ती टिकून राहते.

सागरी निक्षेप

निरनिराळ्या कारकांनी, मुख्यतः नद्यांनी आणलेला व किनाऱ्याची झीज होऊन तयार झालेला गाळ समुद्रात शिरल्यावर त्याची वाहतूक, पृथक्करण व निक्षेपण ही समुद्राच्या लाटांनी व प्रवाहांनी केली जातात. लाटांचे कार्य सापेक्षतः उथळ व सु. २०० मी. पर्यंत खोली असणाऱ्या पाण्यात व प्रवाहांचे कार्य त्यापेक्षा अधिक खोल पाण्यातही घडून येते. या दोहोंच्या कार्यामुळे किनाऱ्यालगत सर्वांत भरड जाड आणि किनाऱ्यापासून अधिकाधिक दूर व खोल असणाऱ्या तळावर उत्तरोत्तर अधिक बारीक गाळ साचत जातो.

किनाऱ्याचा उतार सामान्यतः कमी असतो, अशा किनाऱ्यावर सरकत पुढे येणाऱ्या‍ लाटांचा वेग अधिक पण ओसरून मागे जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी असतो. लाटांबरोबर वर वाहत गेलेल्या गाळातील अधिक भरड गाळ लाट पोहोचली त्या ठिकाणीच राहतो. अधिक बारीक गाळ ओसरणाऱ्या पाण्याबरोबर मागे जातो. कोणत्याही विवक्षित शक्तीची लाट घेतली, तर तिच्या अंगी एका मर्यादित आकारमानाचे पदार्थ हलविण्याची क्षमता असते. त्या सीमित आकारमानापेक्षा अधिक मोठे पदार्थ किनाऱ्यावरच व भरतीच्या उच्च पातळीच्या जवळपास साठविले जातात. त्यांच्यापेक्षा बारीक आकारमानाचे पदार्थ किनाऱ्यापासून अधिक दूर व खोल पाण्याकडे जातात.

सागरी गाळांच्या निक्षेपणाच्या स्थानास अनुसरून त्यांचे पुढील वर्ग केले जातात.

(१) समुद्रतटीय निक्षेप : भरतीच्या उच्चतम पातळीच्या व ओहोटीच्या नीचतम पातळीच्या पट्ट्यात असलेल्या निक्षेपांचा यात समावेश होतो. त्यात धोंडे, गोटे, खडे व वाळू ही कमीअधिक प्रमाणात असतात. पुळण याच वर्गात मोडते. या निक्षेपात सागरी तलस्थ जीवांचे अवशेष  विशेषतः प्राण्यांचे सांगाडे सामान्यतः अल्प व क्वचित बऱ्याच प्रमाणात आढळतात.

(२) उथळ सागरी निक्षेप : ओहोटीच्या नीचतम पातळीच्या रेषेपासून ते सु. २०० मी. इतक्या खोलीपर्यंतच्या समुद्र तळाचा भाग या कक्षेत येतो. या भागाला खंडाचा निधाय म्हणतात. त्याच्या तळाचा उतार अगदी कमी असतो. या भागातील बऱ्याचशा क्षेत्रातील निक्षेप मुख्यतः वाळूचे असून त्यांत तलस्थ जीवांचे अवशेष अल्प प्रमाणात असतात, पण काही क्षेत्रांतील अवशेष मुख्यतः सागरी प्राण्यांच्या कवचांचे व सांगाड्यांचे असतात.

(३) खोल सागरी निक्षेप : हे  खंडाच्या निधायाच्या पलीकडच्या आणि अधिक खोल असलेल्या समुद्रांच्या व महासागरांच्या तळांवर आढळतात. त्यांचे दोन भाग पडतात.

(अ) गभीर निक्षेप: खंडाच्या निधायाच्या पलीकडील खोल भागात समुद्राच्या तळाचा उतार एकाएकी तीव्र होतो. या भागाला खंडाचा उतार म्हणतात. पाण्याची खोली सु. ४,००० मी. झाल्यावर उतार संपतो व समुद्राच्या तळाचा उतार पुन्हा अगदी कमी होतो. सारांश, सु. २०० मी. ते ४,००० मी. या खोलीवरील समुद्राच्या तळावर म्हणजे खंडाच्या उतारावर साचलेल्या निक्षेपांस गभीर निक्षेप म्हणतात. ते प्रामुख्याने सूक्ष्मकणी गाळाचे, मातीचे वा चिखलाचे असतात. त्यांच्यात सागरी प्लवक (तरंगणाऱ्या) जीवांचे अवशेष १५ टक्क्यांपर्यंत असतात.

(आ) अगाध निक्षेप : खंडाच्या उताराच्या पलीकडील व अतिशय खोल पाणी असलेल्या महासागरांच्या तळावर साचणारे निक्षेप म्हणजे अगाध निक्षेप होत. हे मुख्यत्वेकरून सागरातील प्लवक जीवांच्या सांगाड्यांचे किंवा त्या सांगाड्यांपासून उरणाऱ्या रक्त (तांबड्या) मृत्तिकेचे बनलेले असतात. हा भाग भूमीवरील समुद्रकिनाऱ्यापासून इतका दूर असतो की, कोणताही भूजात गाळ किंवा मातीचे सूक्ष्मकणदेखील त्यावर येऊन पोहोचू शकत नाहीत. क्वचित अंतःसागरी अतितीव्र भूकंपाचा धक्का बसून खंडाच्या उतारावरील चिखलाचे थर घसरून किंवा ते ढवळले जाऊन त्यांच्यावरील पाणी गढूळ होऊन त्याचे प्रवाह अगाध प्रदेशात जाणे मात्र शक्य असते. तसेच अंतःसागरी ज्वालामुखी उद्‌गिरणात (उद्रेकात) बाहेर आलेल्या पदार्थांचा शिरकावही अगाध प्रदेशात होणे शक्य असते. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प असते. अगाध निक्षेपांचे ऊझ  व रक्त मृत्तिका असे दोन प्रकार आहेत. हे दोन्ही सूक्ष्मकणी असून मातीसारखे दिसतात.

वयन व संरचना

भूपृष्ठावर अगोदरच असणाऱ्या निरनिराळ्या आकारमानांचा चुरा, त्यांच्यातून सुटी झालेली खनिजे, मृत्तिका, काही प्रमाणात जैव पदार्थ इ. भिन्न प्रकारचे पदार्थ गाळाच्या खडकांत असल्यामुळे हे पदार्थ एकमेकांशी कशा रीतीने जोडलेले अथवा चिकटविलेले असतात हे समजणे फार उपयोगाचे असते.

गाळाच्या खडकांतील प्रत्येक घटक कणाचा आकार, आकारमान व त्याचे सभोवतालच्या घटकांशी असलेले रचनात्मक संबंध यांची पाहणी केल्यास हे खडक कशापासून कसे तयार झाले? कसे तयार झाले? कुठल्या परिस्थितीत आणि केव्हा तयार झाले? इत्यादींबद्दल माहिती मिळविता येते.

गोलकाई व गोलाई

गाळाच्या खडकांतील घटक तुकड्याच्या गोल गोळ्यासारख्या असण्याच्या प्रमाणाला, म्हणजे त्याचा किती प्रमाणात गोल गोळा तयार झाला असेल, त्याला गोलकाई म्हणतात. तर त्याचे कोनकोपरे, कडा व पृष्ठभाग किती प्रमाणात बोथट, पसरट, गुळगुळीत असतील त्यास गोलाई म्हणतात. एखाद्या घटक कणाच्या कडा, कोपरे व पृष्ठभाग सापेक्षतः तीक्ष्ण असल्यामुळे त्याची गोलाई कमी असून सुद्धा त्याचा सर्वसाधारण आकार गोल गोळ्यासारखा असू शकतो.

याउलट एखादा घटक लांब दांडक्यासारखा असल्यामुळे आकारात गोल गोळ्यापेक्षा भिन्न परंतु गुळगुळीत व कडा कोपरे बोथट व गोल झालेले असल्यामुळे उच्च गोलाईचा असू शकतो. निक्षेपणापूर्वी गाळाचे जे परिवहन होते, त्यावेळी झालेल्या अपघर्षणामुळे (खरवडला व घासला गेल्यामुळे) झिजून डबरातील घटकांना गोलाई व गोळ्यासारखा आकार येतो. जितक्या प्रमाणात अपघर्षण जास्त तितक्या प्रमाणात गोलाई व गोळ्यासारखा आकार जास्त जास्त येतो; तर परिवहन दीर्घकाळ व दीर्घ अंतरावर झाल्यास अपघर्षण अधिक होते. जर कठीण खडकांवरून आदळत, आपटत, घासत गाळ वाहून गेला, तर अपघर्षण अधिकच जास्त होते. या कारणांनी गोलाई व गोल गोळ्यासारखा आकार घटकांना येतोच, शिवाय त्यांचे आकारमानही कमी कमी होत जाते.

आकारमान

घटक कणांच्या आकारमानानुसार चुऱ्याच्या किंवा डबरी गाळाच्या खडकांचे वर्गीकरण करतात. सामान्यतः कुठल्याही खडकातील सर्व घटकांचे आकारमान सारखे नसते. यामुळे कुठली तरी योग्य अशी सांख्यिकीय पद्धत वापरून गाळाच्या खडकांतील कणांचे आकारमान व्यक्त करतात.

उदा., कणांचे सरासरी आकारमान किंवा ज्या आकारमानाचे घटक जास्तीत जास्त संख्येने असतात. ते आकारमान (म्हणजे मध्यस्थ मूल्य) वगैरे. भूवैज्ञानिक पाहणीसाठी बहुतेककरून आकारमानाचे मध्यस्थ मूल्य उपयोगात आणतात. त्यावरून गाळ वाहून नेणाऱ्या प्रवाहात मोठ्यात मोठ्या किती आकारमानाचे कण वाहून नेण्याची पात्रता होती हे सांगता येते. कणाच्या आकारमानांची पाहणी करून समुद्र किनारी, नदी किनारी, दांड्याभोवती व इतर ठिकाणी निक्षेपण झालेली वाळू ओळखण्याचे काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत.

घटकांचे वयन आणि संरचना

खडकातील घटकांच्या वयनाचा म्हणजे मांडणीचा विचार करताना ते किती जवळजवळ अथवा  विरळ मांडलेले आहेत हे पाहतात. त्यांची  घनता वरच्या खडकांमुळे पडणाऱ्या  ओझ्यावर तसेच गिरीजननाच्या (पर्वत निर्माण होण्याच्या प्रक्रियेच्या) वेळी दोन्हीं बाजूंकडून पडणाऱ्या संपीडक (संकोचन करणाऱ्या) दाबावरही अवलंबून असते.

वयनाची पाहणी करताना घटक वाटेल तसे मांडलेले आहेत, का ते ठराविक दिशांमध्ये शिस्तशीरपणे मांडलेले आहेत हे पहावे लागते. खडकांतील घटक कुठल्याही एका दिशेत मांडलेले असतात तेव्हा लांबट किंवा चपटे कण एकाच दिशेत असतात. प्रवाहाच्या दिशेत गाळातील घटकांचे निक्षेपण होऊन वा कुठल्या तरी एकाच बाजूकडून निक्षेपित गाळावर दाब पडून या दोन कारणांनी मुख्यत्वे ठराविक दिशेमध्ये घटकांची मांडणी होते.

सच्छिद्रता व पार्यता

सामान्यतः गाळाचे निक्षेपण होत असताना गाळातील घटक कुठल्याही नियमित पद्धतीने रचले जात नाहीत. त्यावेळी गाळातील दगड, माती, गोटे, धोंडे इ. भिन्न आकारमानांचे घटक वेगवेगळ्या प्रकारांनी मांडले जाऊन त्यांची निरनिराळ्या तऱ्हांनी बांधणी होते. बांधणीच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये घटक कणांमध्ये भिन्न आकारांच्या व आकारमानांच्या रिकाम्या जागा राहतात.

या रिकाम्या जागांना छिद्रे म्हणतात व खडकाच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के रिकाम्या जागा त्यात असतील त्यास सच्छिद्रता असे म्हणतात. स्फटिकीभवनाने तयार झालेल्या खडकांत सच्छिद्रता नसते. याउलट गाळाच्या खडकांत सच्छिद्रता मध्यम ते उच्च असते, कारण गाळाचे निक्षेपण होत असताना त्यातील सर्व घटक सामान्यतः एकमेंकाना अगदी चिकटून शेजारी शेजारी मांडले जात नाहीत.

द्रायूच्या (वायू व द्रव यांच्या) मूळच्या स्वरूपात काहीही बदल न होता ते खडकांतून आरपार वाहून जाण्याच्या गुणधर्मास पार्यता म्हणतात. काही ठराविक वेळात खडकातून द्रायू आरपार वाहून गेले, तर त्यास पार्य खडक म्हणतात व ते आरपार वाहून जाण्याचे प्रमाण नगण्य असेल, तर त्यास अपार्य खडक म्हणतात. सच्छिद्रता व पार्यता हे दोन अगदी भिन्न गुणधर्म आहेत. मात्र काही बाबतींत ते एकमेंकाशी संबंधित आहेत.

सामान्यतः सच्छिद्र खडक पार्य असतो, पण कधीकधी अगदी सच्छिद्र खडकदेखील अपार्य असतो. उदा., सूक्ष्मकणी मृत्तिकेचे खडक. छिद्रे नसलेला ग्रॅनाइट वास्तविक अपार्य असतो, पण त्यात एकमेंकीना जोडणाऱ्या संधिरेषा, भेगा इ. असल्यामुळे तो पार्य होतो. खडक पार्य होण्यास तो नुसता सच्छिद्र असून भागत नाही, तर त्यातील छिद्रे योग्य आकाराची व आकारमानाची तसेच एकमेकांना सलग रीतीने जोडलेली असावी लागतात. मगच त्यातून द्रायूंचे प्रवाह वाहू शकतात. मृत्तिकांची सच्छिद्रता अधिक असते परंतु छिद्रांचे आकारमान लहान असते, त्यामुळे त्यातून द्रायू वाहू शकत नाहीत. सच्छिद्रता व पार्यता वरीलप्रमाणे काही बाबतीत परस्परावलंबी असल्यामुळे त्या दोन्हींमध्ये फरक होण्याची कारणे जवळजवळ एकच असतात.

ती पुढीलप्रमाणे :

(१) घटक कणांचे आकारमान,

(२) घटकांचे आकारमानानुसार पृथक्करण,

(३) घटक कणांचा आकार,

(४) घटकांच्या निक्षेपणाचा व त्यांच्या बांधणीचा प्रकार व

(५) निक्षेपणाच्या वेळी आणि नंतर खडक घट्ट किंवा पक्का म्हणजे संहत होणे.

घटकांच्या आकारमानाचा सच्छिद्रतेवर तत्वतः काहीच परिणाम होत नाही आणि प्रत्यक्षात सूक्ष्मकणी गाळाच्या खडकांमध्ये भरडकणी गाळाच्या खडकांपेक्षा अधिक सच्छिद्रता असते. मात्र घटकांचे आकारमान नियमित व एकसारखे आहे का ते भिन्न प्रकारचे आहे, हे महत्वाचे असते. सर्वच घटक एकाच आकारमानाचे असले, तर सच्छिद्रता बरीच असते. एकसारख्या आकारमानाचे घटक असलेल्या गाळात लहान किंवा मोठे कण मिसळले, तर काही मर्यादेपर्यंत मिसळलेल्या कणांच्या प्रमाणात सच्छिद्रता कमी होते.

एकाच आकारमानाचे गोल गोळे घेऊन घनीय पद्धतीने एकमेकांना चिकटून मांडले, तर खुल्या प्रकारची बांधणी तयार होते व या बांधणीची सच्छिद्रता ४७·५ टक्के असते. याच गोळ्यांची मांडणी समांतर षट्फलकीय पद्धतीने केली, तर कमीत कमी जागा व्यापणारी बांधणी होते व तिची  सच्छिद्रता २६ टक्के असते. इतर कुठल्याही प्रकारच्या मांडणीमुळे ४५ ते ५० टक्के सच्छिद्रता असलेली बांधणी तयार होते. घटक कणांचा गुळगुळीतपणा (गोलाई), गोळ्यासारखा गोलपणा, कणांचे पृथक्करण होऊन निवडक आकारमानाचे घटक एकत्र येणे या कारणांनी बांधणीच्या प्रकारात व सच्छिद्रतेत फरक पडतात.

वेड्यावाकड्या आकारांचे घटक जर एकमेकांतील खाचखळग्यात, कानाकोपऱ्यांत अडकून एकमेकांना चिकटून एकत्र मांडले गेले, तर सहज बांधणी होते व अर्थातच खडकाची सच्छिद्रता कमी असते. पण हेच घटक अस्ताव्यस्त रीतीने मांडले गेले, तर अधिक सच्छिद्रतेची बांधणी होते.

भिन्न आकारमानांचे व कुठल्याही प्रकारची निवड न झालेले घटक असतील, तर मोठ्या आकारमानाच्या घटकांमधील रिकाम्या जागेत लहान घटक मांडले जाऊन लहान आकारमानांची व कमी सच्छिद्रतेची बांधणी होते. घटकांचे कमीत कमी पृथक्करण झाले असेल व त्यांची कमीत कमी वेगवेगळी निवड झाली असेल, तर सच्छिद्रता कमी असते.

गाळाच्या संघटनानुसार गाळ घट्ट व संहत होण्यामुळे सच्छिद्रतेत फरक पडतात. वर साचत जाणाऱ्या गाळाच्या थरांच्या ओझ्यामुळे खालचे थर दाबले  जातात. अशा वेळी गाळात चपटे घटक बरेच असतील, तर सच्छिद्रतेत खूप फरक पडतो. वाढत्या दाबाबरोबर सच्छिद्रता कमी होत जाते. मृत्तिकांचा गाळ अधिक दाबला जातो व तो संहत होत असताना त्याची सच्छिद्रता मोठ्या व नियमित प्रमाणात घटत जाते. मात्र असा परिणाम वाळूमध्ये आढळत नाही. सामान्यतः गाळ गाडला जाण्याच्या खोलीनुसार सच्छिद्रतेत बदल होतात.

खालच्या भागातील गाळाच्या थरांवर वरच्या थराचा दाब पडतो. हा दाब खालच्या थरावर समांग पडत नाही. तो एकमेकांना स्पर्श करणारे घटक असणाऱ्या काही थोड्या भागांवर अधिक पडतो. मग जास्त दाब  पडलेल्या ठिकाणी व विशेषकरून घटक एकमेकांना चिकटतात त्या जागी घटकांचे विद्रावण होते व विद्रावातील पदार्थांचे छिद्रात अवक्षेपण होऊन सच्छिद्रता कमी होते. कधीकधी छिद्रांमध्ये असणारे द्रायुरूप पदार्थ रासायनिक विक्रिया घडण्याचे माध्यम व क्षेत्र ठरतात, तर कधीकधी  ह्या पदार्थांची घटक कणांबरोबर रासायनिक विक्रिया घडून येते आणि छिद्रे नवीन अवक्षेपित पदार्थांनी व्यापली जातात.

गाळातील घटकांचे संयोजन (चिकटविले जाण्याची क्रिया) होताना निरानिराळ्या प्रकारच्या संयोजकानी (चिकटवणाऱ्या पदार्थांनी) छिद्रे बुजविली जातात व सच्छिद्रता कमी होते.

बांधणी या शब्दामध्ये फक्त चुऱ्यातील घटकांच्या मांडणीचा विचार केला जातो. बांधणीचा हिशोब करताना खडकात असणाऱ्या संयोजकाची व खडकामध्ये निक्षेपणानंतर जागच्या जागी तयार झालेल्या (तत्रजात) खनिजांची गणना छिद्रांबरोबर करतात. मोठ्या प्रमाणात संयोजन झालेल्या कित्येक वालुकाश्मांतील घटकांची बांधणी अगदी विरळ प्रकारची असते.

विद्रावण, अवक्षेपण यांच्यामुळे तसेच संयोजनासारख्या व इतर निक्षेपणोत्तर प्रक्रियांमुळे घटकांमधील रिकाम्या जागा भरल्या जाऊन गाळाच्या खडकांची सच्छिद्रता व पार्यता या जसजसा काळ लोटत जाईल तसतशा कमी होत जातात.

स्तरण : वेगवेगळ्या प्रकारचा व निरनिराळ्या वेळी निक्षेपीत होणारा गाळ एकावर एक अशा थरांच्या स्वरूपात रचला जाऊन तयार होणारी स्तरांकित रचना किंवा स्तरण हे गाळाच्या खडकांचे प्रमुख वैशिष्ट्य होय.  शेजारी शेजारी असणाऱ्या थरांमध्ये असणाऱ्या गाळाचे खनिज संघटन, घटक कणांचे आकारमान, वयन, कठिनता, पक्केपणा, रंग इत्यादींमध्ये असणाऱ्या फरकांमुळे स्तरण स्पष्ट व उठावाने दिसून येते. ज्या ठिकाणी दोन थर एकमेंकाना चिकटलेले असतात त्या पृष्ठाला स्तरण-तल असे म्हणतात. बऱ्याच वेळा स्तरण-तल हे विभाजन पृष्ठ असते म्हणजे या पृष्ठावर खडक सहज फुटून त्याचे दोन भाग होतात.

स्थिर पाण्यात वेगवेगळ्या आकारमानांचा गाळ टाकला, तर त्यातील भरड व जड भाग अगदी प्रथम तळावर जाऊन पडतो आणि तळाकडून जसजसे वरच्या बाजूकडे जावे तसतसे अधिक बारीक आकारमानाचे आणि हलक्या वजनाचे भाग पडत जातात. अशा रीतीने तळापासून वरच्या दिशेमध्ये, जाड भरड भाग तळाकडे व बारीक ते सूक्ष्मकणी भाग वरच्या बाजूकडे असे आकारमानानुसार साधे व नियमित स्वरूपाचे स्तरण तयार होते.

वाहत्या पाण्यात म्हणजे प्रवाहात भिन्न प्रकारचा गाळ टाकला, तर आकारमानानुसार होणारे निक्षेपण हे उभ्या दिशेत न होता क्षैतिज (आडव्या) दिशेमध्ये होते. अशा वेळी भरड पदार्थ सुरुवातीला टाकले जातात व अधिकाधिक सूक्ष्मकणी भाग पुढे पुढे दूरवर टाकले जातात. अगदी सूक्ष्मकणी मृत्तिका प्रवाहाच्या मुखापासून अगदी दूर टाकली जाते (आ. २). या प्रकाराने आकारमानानुसार एकावर एक थर तयार होत नाहीत, मात्र अशाच  प्रकाराने भिन्न  गतींच्या प्रवाहांतून एका पाठोपाठ एक असे भिन्न गाळाचे निक्षेपण झाले, तर क्षैतीज दिशेत श्रेणीभवन असलेले थर एकावर एक रचले जाऊन स्तरित रचना तयार होते.

थरांची जाडी थोड्या मिलिमीटरांपासून ते काही मीटरांइतकी असते. मृत्तिका, गाळवट व सूक्ष्मकणी वाळू यांच्या निक्षेपणामुळे बऱ्याच वेळा अगदी पातळ थर तयार होतात. त्यांना पत्रके म्हणतात.

अभ्रकासारख्या आकाराच्या व सूक्ष्म आकारमान असलेल्या खनिजांच्या धलप्या व चकत्या निक्षेपणाच्या वेळी सपाट मांडल्या जाऊन अगदी पातळ थर असलेली  रचना तयार होते. कित्येकदा वर साचत जाणाऱ्या गाळाच्या (थरांच्या) ओझ्याचा दाब खालच्या भागातील गाळात असणाऱ्या खनिजांच्या अऱ्या, धलप्या, चकत्या इत्यादींवर पडून व हे पदार्थ दाबामुळे फिरविले जाऊन एका दिशेत, म्हणजे दाबाच्या दिशेच्या लंबरूप दिशेत मांडले जातात. यामुळेही अगदी पातळ थर तयार होतात. खडक तापल्यामुळे  किंवा प्रवाहात वाहत जाऊन निक्षेपण होत असतानादेखील वरील प्रकारच्या सूक्ष्मकणी पदार्थापासून पातळ थर तयार होतात. अशा प्रकारच्या संरचनेमुळे गाळांच्या खडकात स्तरभिदुरता (थरांना अनुसरून भंगण्याचा गुणधर्म ) येते.

एखाद्या ठिकाणचे एका विशिष्ट प्रकारचे थर एकत्र करून एक एकक तयार होते, त्यास शैलसमूह असे म्हणतात. जेव्हा स्तरतले एकमेंकाना समांतर असतात तेव्हा सुसंगत स्तरण तयार होते. कधीकधी गाळाच्या खडकातील काही थरांमध्ये मुख्य स्तरतलांना तिरपे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्तरण असते त्याला आडवे, तिरपे, खोटे किंवा छद्मी, प्रवाह स्तरण ही नावे देतात. हे सर्व विसंगत स्तरणाचे प्रकार होत. विसंगत स्तरणाच्या निरनिराळ्या प्रकारांपैकी प्रवाह स्तरण हे अधिक महत्वाचे होय. या प्रकारामध्ये तिरपे स्तरण

असलेल्या थराच्या वर आणि खाली सुसंगत स्तरण असलेले थर आढळतात (आ. ३). गाळ वाहून नेणाऱ्या  प्रवाहाच्या वेगात आणि दिशेत वरचे वर व झटकन बदल झाल्यास प्रवाह स्तरण निर्माण होते. प्रवाहाबरोबर वाहून नेलेला गाळ मुखाजवळील उतारावर क्षैतिज दिशेमध्ये आकारमानानुसार पसरला जातो. भूशिर, दांडे, वाळूचे दांडे आणि त्रिभुज प्रदेश या ठिकाणी प्रवाह स्तरण प्रामुख्याने तयार होते. या स्तरणामध्ये थरांचे वरचा, समोरचा व तळाचा असे तीन संच असतात.

वरचा संच हा त्रिभुज प्रदेशात उघड्यावर निक्षेपित होतो, म्हणजे तो समुद्रसपाटीच्या वरच्या बाजूस असतो. त्यातील थरांचा उतार हा त्रिभुज प्रदेशातील ज्या पृष्ठभागावर निक्षेपण होते त्याच्या उताराइतका असतो. अधिक बारीक कणी गाळ प्रवाहाबरोबर पुढे वाहत

जाऊन समोरच्या संचातील थर पाण्याखाली तयार होतात, तर सूक्ष्मकणी चिखल किंवा गाळवट समोरच्या संचाच्या थोडे पुढे तरंगत जाऊन द्रोणीच्या तळावर निक्षेपित होतात व तळाचा संच तयार होतो.

वेगधारी स्तरणामध्ये भरड पदार्थाचे प्रवाही स्तरण असलेले थर व सूक्ष्मकणी गाळाचे अगदी पातळ थर एकाआड एक असतात (आ. ५). अशा प्रकारचे स्तरण अर्धशुष्क प्रदेशातील जलोढ त्रिभुजामध्ये आढळते. या भागात नद्या, नाले इ. पुराच्या वेळी भरड गाळ, तर इतर सामान्य व शांत वेळी मृत्तिका व गाळवटाचा सूक्ष्मकणी गाळ आणून टाकतात. त्यामुळे भरड पदार्थांचे प्रवाह स्तरण असलेले व सूक्ष्मकणी गाळाचे अगदी पातळ थर एकावर एक तयार होतात.

वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रवाह स्तरणामध्ये मृत्तिका, गाळवट व सूक्ष्मकणी यांचे अगदी पातळ पत्र्यासारखे व तिरपे थर फार मोठ्या प्रमाणात असतात. या स्तरणाच्या वक्रतेची त्रिज्या पाण्यामुळे होणाऱ्या स्तरणाच्या वक्रतेच्या त्रिज्येपेक्षा जास्त असते. वाऱ्याच्या दिशेमध्ये व वेगामध्ये वरचेवर बदल होत असल्यामुळे त्याबरोबर वाहून जाणाऱ्या कणांच्या झिजेमध्ये व निक्षेपणामध्ये फरक होतात त्यामुळे तयार होणारे प्रवाह स्तरण बरेच अनियमित प्रकारचे असते.

तरंगचिन्हे

वालुकामय समुद्र किनाऱ्यावर तसेच प्रवाहामुळे निक्षेपण होऊन तयार झालेल्या काही अवसादी खडकांत कित्येकदा वर खाली हेलकावे असणारी लाटांच्या आकाराची पन्हळी पृष्ठे आढळतात. लाटांच्या हेलकाव्यांबरोबर गाळाचे हेलकाव्याच्या आकाराचे निक्षेपण होते. असे निक्षेपण एकसारखे होत राहून लाटांचे आकार असलेला थर तयार होतो. लाटांच्या आकाराचे हेलकावे असणाऱ्या पृष्ठांना तरंगचिन्हे म्हणतात.

समुद्र किनाऱ्यावर तयार झालेली तरंगचिन्हे समुद्राच्या लाटांमुळे तयार होतात. लाटांमुळे लहान लहान हेलकावे असणारी व सममित तरंगचिन्हे तयार होतात. प्रवाहाबरोबर वाहत येणाऱ्या गाळाच्या निक्षेपणामुळे पाण्याखाली वा जमिनीवर असममित तरंगचिन्हे तयार होतात. वाळूचे कण प्रवाहाच्या हेलकाव्याच्या लांबट बाजूच्या उतारावरून पुढे वाहून नेले जातात व ते तरंगाच्या शिखराच्या दुसऱ्या बाजूकडील खोलगट भागात टाकले जातात.

अशा रीतीने हेलकावे वालुकागिरीप्रमाणे पुढे पुढे सरकत जातात. वाऱ्यामुळे तयार झालेल्या तंरगचिन्हांमध्ये तरंगाच्या शिखरांवर भरडकणी वाळू असते, तर बारीक वा सूक्ष्मकणी वाळू खळग्यांमध्ये असते. याउलट पाण्यामुळे तयार झालेल्या तरंगचिन्हांमध्ये शिखरांजवळ सूक्ष्मकणी तर खळग्यांमध्ये भरडकणी  गाळ असतो.

चिखलातील भेगा : वाळू सुकून कडक झालेल्या सूक्ष्मकणी गाळांच्या खडकांत उदा., पंकाश्म, गाळवटी खडक यांत तडे अथवा भेगा आढळतात. ज्या ठिकाणचे पाणी, उदा., डबकी, तळी, सरोवरे, पूरभूमी इ. बाष्पीभवन होऊन नाहीसे झालेले असले, अशा ठिकाणच्या चिखलात विशेषकरून भेगा पडतात. वाळताना चिखलातील पाणी बाहेर घालवून दिले जाते व चिखल आकुंचन पावतो त्यामुळे त्यात वेड्यावाकड्या एकमेंकीना छेदणाऱ्या भेगा पडतात.

या भेगांचे जाळे तयार होते व यामुळे भेगांच्या मधल्या भागात पंचकोणी, षट्‌कोणी, इ. बहुभुजाकृती तयार होतात. कित्येकदा या भेगांमध्ये नंतर निक्षेपित होणारी वाळू भरली जाते व त्यांचे आकार टिकविले जातात. खडकात चिखल-भेगा असणे याचा अर्थ चिखलमय गाळ भूपृष्ठावरील वातावरणात बराच काळपर्यंत उघडा पडलेला होता असा होतो. मोठाल्या नद्यांच्या पूरभूमीमध्ये किनाऱ्यावरील पंक-मैदानात तसेच सरोवरांच्या उतरत्या किनाऱ्यांवर तयार झालेल्या सूक्ष्मकणी गाळाच्या खडकांत चिखल-भेगा प्रामुख्याने आढळतात.

पर्जन्य मुद्रा : (पावसाच्या थेंबांच्या खुणा ). ज्या परिस्थितीत चिखल-भेगा तयार होतात व रक्षण करून ठेवल्या जातात, त्याच स्थितीत पावसाच्या थेंबांच्या खुणाही सापडणे शक्य असते. सूक्ष्मकणी गाळाच्या अथवा चिखलाच्या पृष्ठभागावर जेव्हा पावसाचे जोरदार व टपोरे थेंब पडतात तेव्हा थेंबाच्या आकारमानानुसार व आपटण्याच्या जोरानुसार गोल व खड्डे त्यात पडतात. त्यांना पर्जन्य मुद्रा असे म्हणतात.

थेंब जोरदारपणे आपटल्यामुळे सामान्यतः या खड्ड्यांच्या कडा वर उचलून आलेल्या असतात. पाऊस पडत असताना जोरदार वार वाहत असले, तर पावसाचे थेंब तिरपे पडतात. अशा वेळी थेंबाच्या खुणांचे खड्डे देखील तिरपे असतात व त्यावरून वाऱ्याची दिशा कळू शकते. तिरप्या खड्ड्यांमध्ये कडेवरील उंचवट्याचा भाग वारा वाहत असलेल्या दिशेच्या उलट बाजूला असतो. मात्र पावसाच्या थेंबांमुळे होणाऱ्या खुणांसारख्या दिसणाऱ्या खुणा

(१) गारा आपटल्यामुळे,

(२) बर्फ वितळून पाण्याचे थेंब खाली पडत असताना,

(३) काही कारणांनी गाळात वायू निर्माण होऊन ते गाळातून बाहेर पडत असताना,

(४) गाळ लवकर लवकर पाण्याखाली साचत असताना त्यातील पाणी बाहेर घालवून दिले जाताना अशा कारणांमुळेही तयार होतात. त्यामुळे अशा खुणा अन्वेषणाच्या (संशोधनाच्या) कामात वापरताना विशेष खबरदारी घ्यावी लागते.

पाऊल ठसे चाल ठसे : कधीकधी सूक्ष्मकणी गाळाच्या किंवा चिखलाच्या पृष्ठभागावरून चालत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचे छाप त्यावर उमटतात, त्यांना पाऊल ठसे म्हणतात. तसेच त्यावरून सरपटणारे प्राणी गेल्यास प्राण्यांच्या मार्गाच्या खुणा उमटतात, त्यांना चाल ठसे म्हणतात.

सूक्ष्मकणी गाळात राहणाऱ्या गांडुळासारख्या कृमींच्या हालचालींमुळे त्यात लांब, अरुंद, वेडीवाकडी बिळे तयार होतात. काहींच्या मते गुंतावळा असणारी वेडीवाकडी व तीव्र वळण असलेली बिळे लांबट प्राण्यांपेक्षा गॅस्ट्रोपॉड (शंखधारी) व इतर लहान देह असलेल्या प्राण्यांनी तयार केलेली असतात. गांडुळासारख्या लांबट प्राण्यांनी केलेली बिळे जवळजवळ सरळ किंवा वाकडी असल्यास कमी वक्रतेची म्हणजे मोठ्या त्रिज्येची असतात.

रासायनिक संघटन :गाळाच्या खडकांचे रासायनिक संघटन निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या ऑक्साइडांच्या स्वरूपात देतात. निरनिराळी मूलद्रव्ये ऑक्साइडांच्या स्वरूपांत खडकांत असतात अशी कल्पना येथे केलेली असते. खडकांत असणाऱ्या खनिज संघटनानुसार व घटक कणांच्या आकारमानानुसार रासायनिक संघटन देतात. गाळांच्या खडकांच्या खनिज संघटनानुसार व घटक कणांच्या आकारमानानुसार रासायनिक संघटन फार मोठ्या प्रमाणात वेगळे असू शकते.

तरी बहुतेककरून कुठल्याही गाळाच्या खडकात सर्वसामान्यपणे सु. ५८ टक्के सिलीकॉन डाय-ऑक्साइड (SiO2), १३ टक्के अ‍ॅल्युमिनियम ऑक्साइड (Al2O3), १३ टक्के कॅल्शियम ऑक्साइड (CaO)  व ५ टक्के कार्बन डाय-ऑक्साइड (CO2)  ही असतात.  मॅग्नेशियम ऑक्साइड (MgO), पोटॅशियम ऑक्साइड (K2O) आणि सोडियम ऑक्साइड (Na2O) ही अल्प प्रमाणात व काही मूलद्रव्ये लेशमात्र असतात. असे सर्वसामान्य रासायनिक संघटन असलेला गाळाचा खडक वालुकाश्म (मुख्यत्वेकरून SiO2), शेल (मुख्यत्वेकरून Al2O3) व चुनखडक (मुख्यत्वेकरून CaO व CO2) यांच्या संयोजनाने तयार झालेला आहे असे समजण्यास हरकत नाही.

सामान्य अग्निज खडकांपेक्षा सामान्य गाळाच्या खडकात कार्बन डाय-ऑक्साइड जास्त असतो, सोडियम ऑक्साइड कमी असतो व फेरस (ज्याची संयुजा, म्हणजे इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक, दोन असते अशा) लोहापेक्षा फेरिक (ज्याची संयुजा तीन असते असे) लोह जास्त असते. याला कारण वातावरणक्रिया होत असताना वातावरणातून गाळात कार्बन डाय-ऑक्साइडाची भर घातली जाते, विद्राव्य लवणांच्या स्वरूपात सोडियम वाहून नेले जाते ते समुद्रात जाऊन पडते आणि भरपूर ऑक्सिजन असलेल्या भूपृष्ठावरील वातावरणात फेरस लोहाचे ऑक्सिडीभवन  होऊन फेरिक लोह तयार होते.

खनिज संघटन : निरनिराळी व बरीच खनिजे गाळांच्या खडकांत सापडत असली, तरी बहुतेक सर्व गाळांचे खडक २० खनिजांचेच बनलेले असतात. ही खनिजे अपघटनरोधी असून बरीच टिकाऊ असतात. या खनिजांचे दोन गट पडतात :

(१) चुऱ्यांची किंवा डबरी खनिजे व

(२) रासायनिक खनिजे.

चुऱ्यातील किंवा डबरी खनिजे वातावरणक्रियेने मूळच्या खडकापासून धलप्या पडून, तुकडे निघून, फुटून, तुटून निघालेली असतात. रासायनिक खनिजे निक्षेप तयार होत असलेल्या ठिकाणीच अकार्बनी किंवा जैव पदार्थांच्या क्रियांमुळे तयार होतात. काही खनिजे दोन्ही प्रकारची असतात. उदा., क्वॉर्ट्‌झ सामान्यतः डबरी असते, पण कधीकधी ते रासायनिक अवक्षेपणाने देखील तयार होते.

उलट तत्रजात कॅल्साइट रासायनिक अवक्षेपणाने तयार झालेले असते, पण कित्येक खडकांत ते इतर ठिकाणाहून वाहून आलेले असते. गाळामध्ये फार मोठ्या प्रमाणात असणारी डबरी खनिजे म्हणजे क्वॉर्ट्‌झ व मृद्-खनिजे, कमी प्रमाणात परंतु महत्त्वाची असणारी फेल्स्पारे व भरड अभ्रके, तसेच सर्व प्रकारच्या खडकांचे तुकडेही त्यात असतात. याव्यतिरिक्त अनेक खनिजे गाळाच्या खडकात असतात.

परंतु ती सर्व एकत्र केली असता खडकाच्या एक टक्कादेखील होत नाहीत. या खनिजांपैकी बहुतेक सर्व खनिजे जड (वि.गु. २·८५ पेक्षा अधिक) असतात. झिर्‌कॉन, तोरमल्ली (टुर्मलीन), गार्नेट, हॉर्नब्लेंड, एपिडोट, रूटाइल, स्टारोलाइट, मॅग्नेटाइट व एल्मेनाइट ही ती खनिजे होत. रासायनिक क्रियांनी अवक्षेपित होणारी प्रमुख खनिजे ही कार्बोनेटे असतात (उदा., कॅल्साइट, अ‍ॅरॅगोनाइट, डोलोमाइट व सिडेराइट). चर्ट, जिप्सम, अ‍ॅनहायड्राइट व इतर अवशिष्ट लवणे (उदा., साधे मीठ), बरीचशी फॉस्फेटे (उदा., कॅलोफेन) ही सापेक्षतः कमी प्रमाणात निक्षेपित होतात. काही जड खनिजेही अंशतः रासायनिक क्रियांनी तयार होतात. उदा., डबरी झिर्‌कॉन व तोरमल्लीवर रासायनिक विक्रियांनी अवक्षेपित झालेले झिर्‌कॉन व तोरमल्ली आढळतात. बहुतेक वरील अ‍ॅनॅटेज रासायनिक अवक्षेपणानेच तयार होते.

वर्गीकरण : वर्णनात्मक व निर्मितीचा प्रकार यांच्यावर आधारलेल्या दोन प्रमुख प्रकारांनी गाळाच्या खडकांचे वर्गीकरण करतात (पृष्ठ १६ वरील आराखडा).

(१) चुऱ्याचे किंवा डबरी आणि

(२) रासायनिक क्रियेने तयार झालेले, हे ते दोन प्रकार होत. अविशिष्ट निक्षेपांचे वर्णन या अगोदरच केले आहे.

चुऱ्याचे (डबरी ) खडक : या खडकांचे पुढील चार भाग पडतात.

(१)  उपलाश्मिक : गोटे, उपले, धोंडे व मोठ्या आकाराचे भरड डबर यांच्या संयोजनाने तयार झालेल्या खडकांना उपलाश्मिक खडक म्हणतात. यातील सर्वसामान्य घटक कणांचा आकार २ मिमि. पेक्षा मोठा असतो. वरील पदार्थांच्या

संयोजनाने पिंडाश्म  व ⇨कोणाश्म  तयार होतात.

(२) वालुकामय: बव्हंशी वाळूच्या आकारमानाच्या (०·१ ते २·०० मिमि.) कणांपासून तयार झालेल्या खडकांना वालुकामय म्हणतात. वाळूच्या संयोजनाने

वालुकाश्म,  संकोण वालुकाश्म, ⇨अर्कोज  व ⇨ग्रेवॅक  तयार होतात.

(३) गाळवटी खडक : ०·०१ ते ०·१ मिमी. या आकारमानाचे घटक कण असणाऱ्या गाळास गाळवट म्हणतात. गाळवटापासून तयार झालेल्या खडकांना गाळवटी खडक म्हणतात. बऱ्याच वेळा या गटाच्या आकारमानाचे कण असणाऱ्या खडकांचा मृत्तिकामय खडकांत समावेश करतात.

(४) मृण्मय (मृत्तिकामय) : सूक्ष्मकणी म्हणजे ०·०१ मिमी. पेक्षा कमी आकारमानाच्या कणांनी बनलेल्या खडकांना मृण्मय म्हणतात. हे वर्गीकरण अंशतः रासायनिक व अंशतः खनिजवैज्ञानिक आहे. उपलाश्मिक ते मृण्मय खडकांच्या दिशेने पाहिल्यास रासायनिक व खनिज संघटनाच्या बाबतींत आनुक्रमिक (पद्धतशीर) फरक दिसतात. धोंडे, दगड, गोटे यांचे खडक या बाबतींत अगदी अनियमित व असमांग असतात. वालुकामय खडक बव्हंशी क्वॉर्ट्‌झाचे व गौण प्रमाणात फेल्स्पार असणारे असतात. अर्थातच ते मोठ्या प्रमाणात सिलिकामय असतात. मृण्मय खडक बहुधा सजल अ‍ॅल्युमिनियम सिलिकेटांचे बनलेले असतात. गाळवटी खडक सिलीकामय व मृण्मय खडकांच्या मधल्या संघटनाचे असतात. सामान्यतः ही माहिती बरोबर आढळते. पण कधीकधी व क्वचित या सर्व गटांतील खडकांचे रासायनिक संघटन अगदी भिन्न असू शकते. उदा., काही मृण्मय खडक चुनखडकाच्या सूक्ष्मकणी गाळाचे बनलेले असतात, त्यात सजल अ‍ॅल्युमिनियम सिलिकेटे  नसतात.

रासायनिक क्रियांनी तयार होणारे गाळाचे खडक : वातावरणक्रियेमुळे मूळच्या खडकांत तयार झालेले विद्राव्य पदार्थ पाण्यात विरघळतात. त्यांच्यापैकी काही खाली जमिनीत मुरतात व बरेचसे प्रवाहाच्या पाण्यात वाहत जातात व पुढे योग्य अशी भौतिक-रासायनिक परिस्थिती जेथे निर्माण होईल तेथे अवक्षेपित होतात. अशा रीतीने वाहत्या पाण्यातील विद्रावांचे परत अवक्षेपण होऊन तयार होणाऱ्या निक्षेपांना रासायनिक क्रियांनी तयार होणारे गाळाचे खडक असे म्हणतात.

विद्रावांचे अवक्षेपण होऊन तयार होणारे पदार्थ हे एक तर अतिसूक्ष्मकणी स्फटिकांच्या किंवा अस्फटिकी स्वरूपाचे असतात किंवा याउलट योग्य अशा परिस्थितीत विद्रावांचे बाष्पीभवन होऊन जर खनिजे तयार झाली, तर ती मिठासारखी किंवा जिप्समासारखी भरडकणी होणे शक्य असते. कधीकधी पुनर्स्फटिकीभवनामुळे सूक्ष्मकणी किंवा अस्फटिकी खनिजांचे एकावर एक थर बसून अंदुकाश्म  व कलायाश्म (पिसोलाइट) यांसारख्या संरचना तयार होऊन भरडकणी दिसणारे पदार्थही तयार होतात.

संधिते

गाळाच्या खडकातील कुठल्या तरी एका गौण घटकाचे एकत्रीकरण होऊन ⇨संधिते  तयार होतात. यामुळे संधिताचे रासायनिक संघटन, ते ज्या खडकात आढळतात त्या खडकातील एखाद्या गौण घटकाच्या रासायनिक संघटनाप्रमाणे असते. उदा., चुनखडक किंवा चॉकमध्ये असणारी संधिते चर्ट किंवा फ्लिंट यांची असतात, तर मृत्तिकांमध्ये ती कॅल्शियमी किंवा लोहाच्या सल्फाइडाची असतात. आजूबाजूच्या खडकांतून झिरपत येणाऱ्या पाण्यातून विद्रावाच्या स्वरूपात हे पदार्थ गोळा होतात व एखाद्या मध्यवर्ती कणाभोवती निक्षेपित होतात.

स्त्राविते

खडकांमध्ये असणाऱ्या भेगा, फटी, कुप्या, खाचखळगे व गुहा यांमध्ये झिरपत येणाऱ्या पाण्यातील विरघळलेल्या खनिज पदार्थांचे अवक्षेपण व निक्षेपण होऊन या रिकाम्या पोकळ्या अंशतः किंवा पूर्णपणे भरल्या जातात व स्त्राविते तयार होतात. या बाबतीत निक्षेपण पोकळ्यांच्या कडांकडून होत असल्यामुळे बऱ्याच वेळा कडांना समांतर असे लेप एकावर एक चढून पट्टे असणारी रचना तयार होते. ज्या खडकामध्ये पोकळी असते, त्या खडकाचे संघटन असलेल्या पदार्थांनीच ती भरलेली असल्यास तिला स्फटिकयुक्त कुहर म्हणतात. पोकळीतील स्त्राविते आजूबाजूच्या खडकाशी पक्की संलग्न नसतील व त्यापासून सहज बाजूला निघत असतील, तर त्यांना स्फटग्रंथी म्हणतात. शेवाळासारख्या किंवा शाखायुक्त वृक्षासारख्या दिसणाऱ्या लोह व मॅंगॅनीज यांच्या स्त्रावितांना शाखाकृती खनिजे म्हणतात.

रासायनिक क्रियांनी तयार होणाऱ्या खडकांचे (१) सिलिकामय, (२) कार्बोनेटे, (३) लोहमय व (४) लवणे असे प्रकार आहेत.

सिलिकामय निक्षेप

कॅल्सेडोनी, ओपल यांसारखे सिलिकेचे प्रकार पाण्यामध्ये, विशेषेकरून कार्बोनेटी पाण्यामध्ये विद्राव्य असतात. तसेच काही ज्वालामुखींच्या प्रदेशांत, उदा., आइसलँड, अमेरिका (यलोस्टोन पार्क), न्यूझीलंड या देशांत व इतरत्र असणारी,  उन्हाळी व गायझरे  सूक्ष्मकणी सिलिका निक्षेपित करीत असतात. रासायनिक क्रियांनी तयार झालेल्या सिलिकामय निक्षेपांपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे फ्लिंट  व चर्ट   यांचे निक्षेप होत. ते गूढस्फटिकी किंवा  सूक्ष्मस्फटिकी कणांचे बनलेले असतात. अनियमित आकारांच्या संधितांच्या, ग्रंथिलांच्या (गोलसर गाठींच्या) किंवा नियमित पट्ट्यांच्या स्वरूपात ते आढळतात. सामान्यतः त्यांचे पट्टे चुनखडकांत सापडतात. कधीकधी चुनखडकात चर्टाचे प्रतिष्ठापन होऊन (चर्टाची जागा इतर निक्षेपाने घेतली जाऊन) त्याचे मोठाले थर तयार होतात.

उदा., आर्क्टिक नावाच्या महासागरातील स्पिट्सबर्गेन नावाच्या बेटांच्या समूहात चर्टाचा सु. २६० मी. जाडीचा शैलसमूह तयार झाला आहे. समुद्राच्या तळावर चुनखडकाचा गाळा निक्षेपित होत होता त्या वेळेच्या थोडे मागे पुढे किंवा त्याबरोबरच जी कलिल सिलिका निक्षेपित झाली तीमुळे काही सिलीकामय निक्षेप तयार झाले, असे समजतात. चॉकच्या निक्षेपांमध्ये इतस्ततः पसरलेल्या सिलिकेचे पद्धतशीर अवक्षेपण होऊन फ्लिंटाचे थर एकाआड एक मांडले जाऊन लीसेगँग (या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारे) पट्टे अथवा कडी तयार झाली असे समजतात. चॉकच्या गाळामध्ये असणाऱ्या सिलिकामय जैव पदार्थांपासून काही सिलिका या पट्ट्यांमध्ये येऊन मिळाली असेही दिसते. बरेचसे चर्ट चुनखडक तयार झाल्यावर बराच काळ उलटून गेल्यावर त्यांच्यात सिलिकेचे प्रतिष्ठापन होऊन तयार झालेले आढळतात. तसे चर्ट

(१) भेगांमध्ये असते,

(२) त्याच्या संधितांचे आकार अनियमित असतात,

(३) त्याच्याबरोबर सिलिसीकृत जीवाश्म (सिलिकेने प्रतिष्ठापित झालेले जीवांचे अवशेष) सापडतात व

(४) त्याच्यामध्ये मूळच्या खडकातील वयन आढळते.

कार्बोनेटी निक्षेप

बरेचसे कार्बोनेटी निक्षेप जैव पदार्थांच्या क्रियांनी तयार झालेले आहेत, पण कित्येक भौतिक व रासायनिक परिस्थितीत बदल होऊन निव्वळ अकार्बनी प्रक्रियांनीही तयार झालेले आहेत. असे निक्षेप जैव क्रियांनी तयार होत असलेल्या निक्षेपांबरोबर किंवा अगदी स्वतंत्रपणेही तयार होता.

(१) ज्या ठिकाणी थंड हवामान असते, अशा ध्रुव प्रदेशाखेरीज इतर भागांतील समुद्राचे पाणी, पृष्ठभागाजवळच्या जाडीपर्यंत कॅल्शियम कार्बोनेटाने बऱ्याच प्रमाणात संतृप्त (कमाल प्रमाण असलेले) असते. त्यातील कार्बन  डाय-ऑक्साइड बाहेर घालवून दिला गेला किंवा पाण्याचे तापमान वाढले किंवा दोन्ही गोष्टी एकदम झाल्या, तर कॅल्शियम कार्बोनेटाचे अवक्षेपण होते. त्यापासून जीवाश्मरहित व सूक्ष्मकणी चुनखडक तयार होतात.

(२) गोड्या स्वच्छ पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटाचे निक्षेपण मुख्यत्वेकरून त्यातील कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर निघून गेल्यामुळे होते.

(३) भूमिजलाच्या स्वच्छ पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट असते व पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइड असल्यास त्याचे प्रमाण बरेच वाढते. असे पाणी चुनखडकांतील चिरांतून, फटींतून त्यांतील रिकाम्या पोकळ्यांत किंवा गुहांत झिरपते आणि तेथे बाष्पीभवन होऊन त्यातील कॅल्शियम कार्बोनेटाचे झुंबरे, स्तंभ, छताचे पडदे वगैरे संरचना असणारे निक्षेप तयार होतात.

(४) उन्हाळ्यांच्या व गायझरांच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट विरघळलेले असल्यास ते भूपृष्ठाकडे येत असताना त्यावरील दाब कमी होऊन ते कॅल्शियम कार्बोनेटाने संतृप्त होते. भूपृष्ठावर येऊन ते इतस्ततः पसरल्यावर त्याचे बाष्पीभवन होऊन कॅल्शियम कार्बोनेटाचे निक्षेप तयार होतात. त्यांना कॅल्क टुफा, कॅल्क सिंटर किंवा ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. कॅल्शियमी शैवलांच्या व सूक्ष्मजंतूंच्या क्रियांनी उन्हाळ्यांच्या व गायझरांच्या पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटाचे अवक्षेपण होते, असेही आढळून आले आहे.

(५) ज्या ठिकाणी पावसाळ्यानंतर दीर्घकाळ कोरडे हवामान असते, अशा उष्ण कटिबंधी प्रदेशांत कॅल्शियमी कार्बोनेटाने संतृप्त असे भूमिजल कैशिकतेने (सूक्ष्म पोकळ्यांद्वारे आपोआप) भूपृष्ठाकडे येते व तेथे बाष्पीभवन होऊन त्यातील कॅल्शियम कार्बोनेटाचे जमिनीवरील शेतमातीखाली निक्षेपण होते. त्याचा कठीण असा थर तयार होतो. हा बऱ्याच वेळा संधितांनी युक्त व लोह जास्त प्रमाणात असलेला असतो. त्याला भारतात ⇨ कंकर  म्हणतात.

(६) सूक्ष्म आकारमानाच्या वालुकेच्या कणांभोवती किंवा जीवाश्मांच्या सूक्ष्म तुकड्यांभोवती कॅल्शियम कार्बोनेटाचे अवक्षेपण होऊन संकेद्री (एकाच केंद्राभोवती एकावर एक पापुद्रे असल्यासारखी) संरचना असलेले गोलाकार अंदुक किंवा कलाय (मोठे अंदुक) तयार होतात. त्यांच्यापासून अंदुकाश्म व कलायाश्म तयार होतात.

बहुतेक सर्व डोलोमाइट साध्या चुनखडकात मॅग्नेशियम कार्बोनेटाचे प्रतिष्ठापन होऊन तयार होतात. मॅग्नेशियम कार्बोनेटयुक्त पाणी काही ठिकाणी जमिनीखाली भूमिजलाच्या स्वरूपात येते, तर सागरी निक्षेपांच्या बाबतीत ते समुद्राच्या पाण्यातून सरळ मिळते. चुनखडकाचे मॅग्नेशियम कार्बोनेटाने संपूर्ण प्रतिष्ठापन झाल्यास आकारमानात १२·३ टक्के घट होते व सच्छिद्र खडक तयार होतो. प्रवालभित्तींच्या चुनखडकामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेटाचे प्रतिष्ठापन सहज होते. जर्मनीमधील ट्रायसिक डोलोमाइटाबरोबर साधे मीठ, जिप्सम व अ‍ॅनहायड्राइट आढळते. यावरून प्राचीन विमोचित (अवशिष्ट) सागरातून हे पदार्थ सरळ निक्षेपित झाले असावेत असे दिसते.

लोहमय निक्षेप

बहुतेक सर्व भूमिजलात लोहाची लवणे विरघळलेल्या स्थितीत असतात व योग्य अशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती ऑक्साइडे, हायड्रॉक्साइडे, कार्बोनेटे किंवा सिलिकेटे या स्वरूपांत निक्षेपित होतात. विरघळलेले लोह बहुतेक बायकार्बोनेटांच्या आणि कधीकधी क्लोराइडांच्या व सल्फेटांच्या स्वरूपात असते. कार्बन डाय-ऑक्साइड निघून गेल्यावर बायकार्बोनेटाचे फेरस कार्बोनेट तयार होते. उघड्या हवेत या कार्बोनेटाचे ऑक्सिडीभवन होऊन लोहाच्या हायड्रॉक्साइडाचे निक्षेपण होते. या प्रकाराने मऊ सच्छिद्र असे दलदली लोह धातुक (दलदलीच्या भागात तयार होणारे सजल आयर्न ऑक्साइड) तयार होते. निक्षेपणाच्या वेळची परिस्थिती क्षपणकारक असल्यास फेरस कार्बोनेटच निक्षेपित होते.

कोळशाच्या थरांमध्ये सापडणारे मृत्तिका लोहपाषाण किंवा काळ्या पट्ट्यांचे लोहपाषाण हे सिडेराइटाबरोबर काही मृत्तिकामय व काही कोळशाचे भाग  मिसळून बनलेले असतात. लोहयुक्त विद्रावातून कार्बन डाय-ऑक्साइड निघून गेल्यावर क्षपणकारक परिस्थितीत दलदलीच्या किंवा सिंधुतडागाच्या (मुख्य समुद्रापासून एखाद्या अटकावामुळे अलग झालेल्या समुद्राच्या उथळ भागाच्या) प्रदेशात निक्षेपण होऊन ते तयार होत असावेत असे मानतात. दलदलीतील, पीटमय (मृत वनस्पतींच्या थरांनी युक्त असलेल्या ) मृदेतील तसेच अर्धशुष्क प्रदेशातील गाळामध्ये जमिनीच्या पृष्ठभागाखाली सु. ३० - ४० सेंमी. वर लोहाच्या ऑक्साइडाचा कडक थर कित्येकदा आढळतो. त्यास लोहपट्टा असे म्हणतात.

ज्या प्रकाराने कॅल्शियमयुक्त विद्रावांचे कैशिकतेने निक्षेपण होऊन कंकर तयार होते, त्याच प्रकाराने लोहपट्टाही तयार होतो. सिलिकेटांच्या स्वरूपात तयार होणारे लोह सामान्यतः अंदुकमय व सागरी असते. फेरस लवणे व अ‍ॅल्युमिनोसिलिका अम्ल यांनी संतृप्त असलेल्या सागरी पाण्यापासून चॅमॉसाइटाचे  (3FeO·Al2O3·2SiO2) अंदुकाश्माच्या संरचनेचे निक्षेप तयार होतात. काही लोहपाषाणांत सूक्ष्मजंतू सापडतात, तसेच त्यांत असणाऱ्या  शंख-शिंपल्यांच्या तुकड्यांमध्ये शैवलांनी तयार केलेल्या नळ्या व पोकळ्या आढळतात. यांवरून लोहयुक्त लवणांचे अवक्षेपण व निक्षेपण काही प्रमाणात शैवलांच्या व सूक्ष्मजंतूंच्या क्रियांनी होते असे दिसते. हे सूक्ष्मजंतू लोहमय विद्रावातून लिमोनाइट निक्षेपित करू शकतात.

लवणे

समुद्राच्या पाण्याची लवणता १०० भागात ३५ भाग इतकी असते व त्यातील लवणांची टक्केवारी पुढीलप्रमाणे असते : सोडियम क्लोराइड – ७७·७६, मॅग्नेशियम क्लोराइड – १०·८८, मॅग्नेशियम सल्फेट – ४·७४, कॅल्शियम सल्फेट – ३·६०, पोटॅशियम सल्फेट – २·४६, कॅल्शियम कार्बोनेट – ०·३४ व मॅग्नेशियम ब्रोमाइड – ०·२२. या लवणांचे अवक्षेपण होण्यासाठी पाणी त्यांनी संतृप्त असावे लागते. सामान्य परिस्थितीत समुद्राचे पाणी या लवणांनी असंतृप्त असते. परंतु पृथ्वीत काही भूवैज्ञानिक घडामोडी होऊन उदा., जमिनीच्या हालचालींमुळे समुद्राचा काही भाग आखाताच्या स्वरूपात वेगळा किंवा उथळ केला जाऊन, तसेच योग्य असे वातावरण निर्माण होऊन पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने या पदार्थांचे प्रमाण वाढू लागते व मग लवणांचे अवक्षेपण होते. सामान्यतः ते पुढील क्रमाने होते. चुन्याची लवणे प्रथम, मग सोडियमाची, नंतर मॅग्नेशियमाची आणि पूर्ण बाष्पीभवन झाल्यावर शेवटी पोटॅशियमाची लवणे अवक्षेपित होतात.

भूपृष्ठावरील सरोवरातील लवणांमध्ये सोडियम कार्बोनेट असते. त्यामुळे हे निक्षेप सागरी निक्षेपांपासून वेगळे ओळखता येतात. कडू पाण्याच्या सरोवरांत सोडियम आणि मॅग्नेशियम यांची सल्फेटे भरपूर आढळतात व अशा बहुतेक सर्व ठिकाणी कॅल्शियम सल्फेट (जिप्सम) असते. आजूबाजूच्या खडकांतून विरघळून आलेल्या लवणांमुळे कार्बोनेटे, नायट्रेटे, अ‍ॅलम (तुरटी), क्लोराइडे व सल्फेटे तयार होतात.  चिली व पेरू या देशांच्या पश्चिम किनाऱ्यांवर नायट्रेटांचे विशेषकरून सोडियम नायट्रेटाचे निक्षेप आहेत. सोडियम नायट्रेटाबरोबर साधे मीठ (सोडियम क्लोराइड) फार मोठ्या प्रमाणात आढळते.

ही लवणे अतिशय विद्राव्य असल्याने बहुतेक पर्जन्यरहित प्रदेशातच त्यांचे निक्षेप  टिकू शकतात. या निक्षेपात आयोडीन आढळत असल्याने ते सागरी असावेत असे काहीचें मत आहे. काहींच्या मते शेतजमिनीतील कार्बनी पदार्थांचे ऑक्सिडीभवन होऊन नायट्रेटे तयार होतात व हजारो चौ. किमी. क्षेत्रातून ती वाहत्या पाण्यामध्ये गोळा केली जातात व योग्य अशा ठिकाणी व परिस्थितीत ती निक्षेपित होतात.

टाकणखार व त्याच्याप्रमाणेच रासायनिक संघटन असलेल्या टिंकल (Na2B4O7·10H2O) या खनिजाच्या स्वरूपात बोरेटे आढळतात. ज्वालामुखींच्या आसपास असणाऱ्या सरोवरांमध्ये ती सापडतात. टस्कनी येथील धूममुखांतून (वायुरूप पदार्थ बाहेर टाकणाऱ्या ज्वालामुखीतील द्वारांतून) बाहेर पडणाऱ्या  वाफेच्या झोतामध्ये बोरिक अम्ल आढळते. ते जवळपासच निक्षेपित होते. इतरही काही लवणे रासायनिक क्रियांनी तयार होतात, पण ती अल्प प्रमाणात व स्थानिक स्वरूपात असल्यामुळे फारशी महत्त्वाची नसतात.

जैव निक्षेप

प्राणी व वनस्पती यांच्यापासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या तयार होणाऱ्या गाळांच्या खडकांना जैव निक्षेप म्हणतात. अशा प्रकारचा गाळ मुख्यत्वेकरून समुद्राच्या तळावर साचतो, पण भूपृष्ठावरील काही गोड्या पाण्याची सरोवरे, त्रिभुज प्रदेश, नद्यांचे काठ इ. ठिकाणीही तो थोड्या फार प्रमाणात साचतो.

पर्जन्यरहित वाळवंटामध्ये व गोठलेल्या ध्रुव प्रदेशांत असा गाळ आढळत नाही. प्रवाळांच्या खडकांप्रमाणे व काही शैवलांच्या चुनखडकांप्रमाणे काही प्रकारांत तो सुरुवातीपासूनच घन असतो, तर इतर प्रकारांत तो जीवरासायनिक किंवा जीवयांत्रिक असतो. जीवरासायनिक प्रक्रियांत काही प्राणी, सूक्ष्मजंतू व शैवले पाण्यातील लवणांचे अवक्षेपण होईल अशी परिस्थिती निर्माण करतात.

अशा निक्षेपांविषयीचे वर्णन रासायनिक क्रियांनी तयार होणाऱ्या गाळाच्या खडकांमध्ये वेळोवेळी या अगोदर आलेले आहे. जीवयांत्रिक प्रकारांमध्ये गाळ तयार होत असताना जैव पदार्थच म्हणजे जिवंत व मृत प्राणी आणि वनस्पती यांचे भाग, प्राण्यांच्या कवचाचे तुकडे इ. त्यात गाडले जातात. जैव पदार्थांचा गाळच खडक बनविण्यास कारणीभूत होतो. उदा., क्रिनॉइडी चुनखडक, शंखशिंपल्यांचा चुनखडक आणि निरनिराळ्या प्रकारचे कोळशाचे निक्षेप.

वनस्पती व प्राणी यांच्यापासून सरळ तयार होणाऱ्या खडकांतील घटकांचे आकारमान हे निक्षेपणाच्या वेळी जैव घटकांच्या असलेल्या आकारमानाप्रमाणे असते. फोरॅमिनीफेरा, रेडिओलॅरिया व डायाटम यांच्या ऊझांपासून तयार झालेल्या गाळातील घटक कणांचे आकारमान सूक्ष्म म्हणजे मृत्तिकेच्या आकारमानाइतके असते. काही प्रकारचे शंखशिंपले असलेल्या खडकांतील घटकांचे आकारमान फार मोठे असते; क्रिनॉइडे, समुद्री अर्चिने इ. काही प्राण्यांचे कडक व कठीण भाग भिन्न आकाराचे व भरड स्वरूपाचे असतात.

जैव पदार्थांपासून तयार झालेले कॅल्शियमी खडक

हे बव्हंशी अ‍ॅरॅगोनाइटाचे व कॅल्साइटाचे (दोन्हीही कॅल्शियम कार्बोनेटे) बनलेले असतात. त्यांच्यात असलेल्या इतर खनिजांमुळे त्यांचे वालुका, मृत्तिका, ग्लॉकोनाइट, लोह, फॉस्फेट, बिट्युमेन इत्यादींनीयुक्त असे प्रकार होतात. ज्या प्राण्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात असतात, त्याचे नाव चुनखडकाला दिले जाते.

कॅल्शियमी गाळात विविध प्रकारच्या प्राण्यांच्या अवशेषांचे भिन्न आकार व आकारमानांचे तुकडे असतात. अर्थातच त्यांपासून तयार होणारे खडक असमांग असतात. मुख्यत्वेकरून फोरॅमिनीफेरा, प्रवाळ, क्रिनॉइडे, मॉलस्का. ब्रॅकिओपोडा व क्रस्टेशिया या गटांच्या प्राण्यांच्या अवशेषांपासून जैव चुनखडक तयार होतात. कॅल्शियमी शैवले व इतर अनेक प्रकारच्या प्राण्यांचे अवशेषदेखील चुनखडकांत आढळतात. परंतु सामान्यतः ते वरील प्रकारच्या विपुल अवशेषांबरोबर मिसळेलेले असतात.

बव्हंशी किंवा सर्वस्वी फोरॅमिनीफेरांचे व त्यांपैकी विशेषकरून ग्लोबिजेरीना ऊझाचे चुनखडक फार मोठ्या प्रमाणात  आहेत. मुख्यत्वेकरून अटलांटिक महासागरात आणि काही प्रमाणात हिंदी व पॅसिफिक महासागरांत फोरॅमिनीफेरांच्या निक्षेपांनी सु.७·५ कोटी चौ. किमी. जागा व्यापलेली आहे. हे निक्षेप सु. २,५०० ते ४,५०० मी. खोलीपर्यंत आढळतात.

टेरोपॉडांपासून तयार झालेल्या सूक्ष्मकणांचा चुनखडक सु. १,४०० ते २,७०० मी. खोलीपर्यंत अटलांटिक महासागरात व विषुववृत्ताच्या आजूबाजूला आढळतो.

चॉकच्या निक्षेपात फोरॅमिनिफेरांचे व त्यातही विशेषकरून ग्लोबिजेरिनाचे तुकडे फार मोठ्या प्रमाणात व शंख शिंपल्यांचे बारीक तुकडे, स्पंजाच्या कंटिका, कोकोलिथ व रॅब्डोलिथ ही कमी प्रमाणात असतात. परंतु चॉकच्या निक्षेपांचा बराचसा भाग सूक्ष्मकणी कॅल्शियमी चिखलाचा असतो. फोरॅमिनीफेरांपासून तयार होणारे इतर चुनखडक म्हणजे न्युम्युलिटीक, सॅकमिना, फ्युस्युलिना यांचे होत.

प्रवालभित्ती सुरुवातीपासून घन व सलग असतात. त्यांत गाळांच्या खडकांच्या नेहमीच्या संरचनांचा अभाव असतो. त्यात स्तरित नसतात. प्रवालभित्तींचा चुनखडक अनियमित व भिंगाच्या आकाराचा असतो, प्रवालभित्ती निर्माण करण्यात इतरही जीव उदा., कॅल्शियमी  शैवले भाग घेतात, असे आढळून आले आहे.  प्रवालभित्तीवर राहणाऱ्या अनेक जीवांचे भाग, शंख-शिंपल्यांचे तुकडे इ. त्यांत गाडले जाऊन योगायोगाने प्रवालभित्ती तयार करण्यास कारणीभूत होतात. प्रवालभित्तींची बारीक बारीक कवचे, तुकडे निघून ते कॅल्शियमी गाळात पडून प्रवाली चुनखडक तयार होतात. इतर काही संबंधित प्राण्यांचे अवशेषही त्यात असतात.

फॉस्फेटी निक्षेप

अग्निज खडकांमध्ये  असणाऱ्या अ‍ॅपेटाइट या फॉस्फेटी खनिजापासूनच फॉस्फेटी खडक बनविण्यास कारणीभूत असणारे फॉस्फोरिक अम्ल मिळत असावे. कार्बोनेटी पाण्यात अ‍ॅपेटाइट विरघळून तयार झालेले फॉस्फोरिक अम्ल पाण्याबरोबर वाहत जाऊन शेवटी समुद्रात नेले जाते. समुद्रात ०·०१५ टक्के फॉस्फोरिक अम्ल असते व ते समुद्रात असणाऱ्या एकूण लवणांच्या ०·१८ टक्के असते. काही मासे, क्रस्टेशिया, ब्रॅकिओपॉड वगैरे प्राणी त्यांच्या शरीरांचे सांगाडे व कवचे बनविण्यासाठी कॅल्शियम फॉस्फेटाच्या स्वरूपात त्याचा उपयोग करतात.

या प्राण्यांच्या अवशेषांपासून कमी प्रमाणात फॉस्फेट असणारे थर तयार होतात. या विरळ फॉस्फेटी पदार्थांचे पुनर्विद्रावण होऊन (पुन्हा विरघळून)  व पुढे पुन्हा अवक्षेपण होऊन अधिक फॉस्फेटी निक्षेप तयार होतात. अवक्षेपित फॉस्फेट इतर पदार्थांच्या कणावर लेपांच्या स्वरूपात निक्षेपित होऊन मोठाली फॉस्फेटी ग्रंथिले तयार होतात. काही फॉस्फेटी चुनखडक व चॉक यांच्यात मूळच्या विरळ फॉस्फेटी खडकांचे अवशेष सापडतात. फॉस्फेटी निक्षेप उत्थानामुळे भूपृष्ठावर उघडे पडले, तर त्यांच्यातील फॉस्फेटी खनिजांपेक्षा अधिक विद्राव्य पदार्थ भूपृष्ठावरील कार्बोनेटी पाण्यात विरघळून वाहत जातात व निक्षेपातील फॉस्फेटांचे प्रमाण अधिकच वाढते.

जैव पदार्थांपासून तयार होणारे महत्त्वाचे फॉस्फेटी निक्षेप म्हणजे ⇨ग्वानोचे होत. हे निक्षेप मुख्यतः पक्ष्यांच्या मलोत्सर्गापासून तयार होतात. त्यांत मृत पक्ष्यांच्या शरीरांचे भाग, पिसे, सागरी शेवाळे, माशांचे तुकडे, वाळू व खडे ही  मिसळलेली असतात. ग्वानोतून वाहत येणाऱ्या फॉस्फेटी विद्रावांमुळे आजूबाजूंच्या खडकांत प्रतिष्ठापनाने फॉस्फेटी खडक तयार होतात. उदा., ख्रिसमस व ओशन बेटांवर प्रवाली खडकांच्या प्रतिष्ठापनाने फॉस्फेटी चुनखडक तयार झाला आहे. फ्लॉरिडात ग्वानोच्या थराखाली असलेल्या चुनखडकांच्या प्रतिष्ठापनाने फॉस्फेटी खडक तयार झाला आहे.

लोहमय निक्षेप

शैवलांच्या व सूक्ष्मजंतूंच्या क्रियांमुळे लोहयुक्त विद्रावातून फेरिक ऑक्साइड व फेरस सल्फाइड ही अवक्षेपित होतात. लोही सूक्ष्मजंतूंना जगण्यासाठी लोहाची किंवा कार्बनयुक्त पदार्थांची व ऑक्सिजनाची आवश्यकता असते आणि त्यांच्या जीवरासायनिक क्रियांतून लोह अवक्षेपित होते.

लोही सूक्ष्मजंतू लोहयुक्त विद्रावांतून लोह शोषून घेतात व त्यांच्या कोशिकांभोवती (पेशींभोवती) फेरिक ऑक्साइड निक्षेपित करतात. या प्रकारच्या व इतर रासायनिक प्रक्रियांनी तयार झालेल्या पदार्थांपासून दलदली लोह धातुकाचे निक्षेप तयार होतात. सागरातील चॅमॉसाइटाच्या प्रकारचे तसेच इतर बरेचसे लोहमय निक्षेप जैव पदार्थ सरळ गाडले जाऊन तयार होत नाहीत, तर त्यांच्या उपस्थितीमुळे व त्यांनी तयार केलेल्या भौतिक-रासायनिक परिस्थितीमुळे अप्रत्यक्ष रीत्या तयार होतात.

सिलिकामय निक्षेप

डायाटम (करंडक वनस्पती) या नावाची सूक्ष्म वनस्पती सिलिकेच्या गोल किंवा चकत्यांच्या आकाराच्या सूक्ष्म ग्रंथी स्त्रावांपासून तयार करते. डायाटम गोड्या व खाऱ्या दोन्ही प्रकारच्या पाण्यात राहू शकतात. मोठ्या प्रमाणात डायाटण असेलेले सागरी विक्षेप उपध्रुवीय प्रदेशातच उदा., अंटार्क्टिक व उत्तर पॅसिफिक महासागरांत आढळतात. मुख्यत्वेकरून डायाटम असलेली ऊझे अंटार्क्टिक व उत्तर पॅसिफिक महासागरांत आहेत. खंडांच्या निधायावर व उतारावर डायाटम गाळाचे  निळ्या चिखलात रूपांतर होते. थंड प्रदेशातील सरोवरात व दलदली प्रदेशात डायाटमयुक्त मातीचे निक्षेप (उदा., ट्रिपोली येथील) तयार होतात.

सध्या तयार होत असलेली रेडिओलॅरियांची व डायाटमांची ऊझे, तसेच त्यांचे अवशेष असलेली माती आणि सिलिकामय स्पंजाच्या अवशेषांनी बनलेले खडक ही जैव सिलिकामय निक्षेपाची उदाहरणे होत.  रेडिओलॅरियांचे चर्ट व रेडिओलॅरियांचे खडक उथळ पाण्यात तयार होतात. हे जीव सिलिकेमध्ये राहू शकतात किंवा त्यांचे देहच गूढस्फटिकी (अतिसूक्ष्म स्फटिकी) सिलिकेचे बनलेले असतात. काही रेडिओलॅरियांच्या चर्टांचे निक्षेप सिंधुतडागात तयार झालेले आढळतात.

कार्बनमय निक्षेप

वनस्पतींचा गाळ साचत जाऊन त्यापासून कार्बनमय निक्षेप तयार होतात. गाळातील वनस्पतींच्या कार्बनीभवनाच्या क्रियेतील वेगवेगळ्या टप्प्यांत पीट, लिग्नाइट, दगडी कोळसा, अँथ्रॅसाइट, कॅनल कोळसा व दलदली कोळसा हे तयार होतात.

 

संदर्भ : 1. Dunbar, C. O.; Rodgers, J. Principles of Stratigraphy, New York, 1957.

2. Hatch, F. H.; Rastall, R. H. Petrology of Sedimentary Rocks, London, 1965.

3. Holmes, A. Principles of Physical Geology, London, 1965.

4. Krumbein, W. C.; Sloss, L.L. Stratigraphy and Sedimentation, New York, 1963.

5. Pettijohn, F. J. Sedimentary Rocks, New Delhi, 1957.

6. Tremier, H.; Tremier, G. Erosion and Sedimentation, London, 1963.

7. Twenhofel, W. H. Principles of Sedimentation, New York, 1950.

लेखक: क. वा. केळकर / र. पां. आगस्ते

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate