অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ध्रुवतारा

ध्रुवतारा

(पोलॅरीस, आल्फा उर्सा मायनॉरिस). उत्तर खगोलात खगोलीय उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळचा व ध्रुवमत्स्य या तारकासमूहातील सर्वांत ठळक तारा. खगोलीय ध्रुवापासून फक्त ५५ मिनिटे हा दूर असल्याने नुसत्या डोळ्यांना स्थिर दिसतो, म्हणूनच याला आपण ध्रवतारा म्हणतो.

सप्तर्षीतील मरीची या ताऱ्याने योग्योत्तरवृत्त ओलांडल्यानंतर १० मिनिटांनी ध्रुवतारा ते वृत्त उलट बाजूने ओलांडतो. अगदी सूक्ष्मपणे पाहिल्यास चंद्राच्या दृश्य व्यासाच्या सु. चौपट व्यासाच्या अगदी लहान अशा लघुवर्तुळावर तो दररोज एक प्रदक्षिणा इतर ताऱ्यांप्रमाणेच करतो. याच्या सभोवार १०° पर्यंत नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एकही तारा नाही.  संपातचलनामुळे पृथ्वीचा आस आणि त्यामुळे खगोलीय ध्रुव स्थिर राहत नाही.

पृथ्वीचा आस २५,८०० वर्षांनी खगोलावर कदंबाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे कोणताही एकच तारा अनंतकाळपर्यंत ध्रुव राहणार नाही. ४,६०० वर्षांपूर्वी थुबन (आल्फा ड्रॅकोनिस) हा ध्रुव होता, तर ५,३०० वर्षांनंतर अल्डरामिन (आल्फा सीफाय) हा होईल. हल्लीचा तारा २८,००० वर्षांनी पुन्हा ध्रुवतारा होईल.

हल्ली ध्रुवतारा व खगोलीय ध्रुव यांमधील अंतर कमी कमी होत आहे. १९६५ मध्ये ते ५४ मिनिटे होते, तर २१०२ साली हे २७ मिनिटांपर्यंत कमीतकमी होईल व नंतर ते वाढू लागेल. इ. स. पू. ३०० च्या सुमारास ध्रवतारा खरा स्थिर नसल्याने पिथिअस या ग्रीक खलाशांच्या लक्षात आले होते.

सप्तर्षीतील पहिले दोन तारे पुलह व ऋतू यांना साधणारी रेषा साडे चार पट वाढविली, तर ती ध्रुवताऱ्यातून जाते, ही ध्रुवतारा ओळखण्याची सोपी रीत होय.  ध्रुवतारा २·१ प्रतीचा, सेफीड प्रकारचा चल तारकात्रिकूट आहे. त्यांच्या तेजस्पंदनाचे एक आवर्तन ४ दिवसांत पूर्ण होते. हा सूर्यापेक्षा सु. २००० पट तेजस्वी, सूर्याच्या १०० पट व्यासाचा आणि ६०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

 

लेखक: स. ग. काजरेकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate