অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पूरनियंत्रण

पूरनियंत्रण

नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या प्रदेशांत न पसरू देता नदीतून वाहून नेणे याला पूर नियंत्रण असे म्हणतात. पूर नियंत्रण हा नदी नियंत्रणाचा एक प्रमुख उद्देश आहे म्हणून प्रस्तुत नोंदीत प्रथमतः नदी नियंत्रणाची मुख्य तत्त्वे, उद्देश व पद्धती यांसंबंधी थोडक्यात माहिती दिलेली असून नंतर पूर नियंत्रणाविषयी विस्तारपूर्वक विवेचन केलेले आहे.

नदी नियंत्रण

नदीच्या आजूबाजूचा प्रदेश व नदीच्या पात्रातील किंवा पात्राजवळील बांधकाम वा जमीन यांना धोका न पोहोचविता नदीतील पाणी व पाण्याबरोबर येणारा गाळ वाहून नेले जातील अशा रीतीने नदीचे नियंत्रण करणे याला नदी नियंत्रण म्हणतात.

पूर नियंत्रणाखेरीज नदी नियंत्रणाचे पुढील मुख्य उद्देश आहेत :

(१) नदीच्या किनाऱ्याची धूप थांबवून नदीकाठची सुपीक जमीन वाचविणे.

(२) नदीच्या किनाऱ्याजवळील (इमारती, धक्के इ.) किंवा नदीतील बांधकाम (पूल वगैरे) यांना धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे.

(३) जेथे जलवाहतूक शक्य आहे तेथे नदीच्या पात्राची  खोली व रुंदी नौकानयनाला योग्य राहील अशी ठेवणे.

मुख्य तत्त्वे

नदीचे मुख्य कार्य म्हणजे नदीत येणारे पावसाचे व इतर पाणी वाहून नेणे आणि नदीत येणारा गाळ वाहून नेणे. डोंगराळ प्रदेशातील नद्यांमुळे खडकांची झीज होऊन नदीत गाळ येतो. साधारणपणे डोंगराळ प्रदेशात जमीन कठीण असल्यामुळे तिची झीज होण्यास वेळ लागतो व नदी तिच्या दोन्ही मजबूत काठांमधून वाहत असल्यामुळे डोंगराळ प्रदेशात नदी नियंत्रणाचा प्रश्न उद्‌भवत नाही.

डोंगराळ प्रदेश सोडून नदी मैदानी प्रदेशात आली की, तिच्या नियंत्रणाचा प्रश्न उद्‌भवतो. मैदानी प्रदेशात नदी, तिनेच वाहून आणलेल्या गाळामुळे निर्माण झालेल्या प्रदेशातून वाहत असते. मैदानी प्रदेशातील नदी बहुधा नागमोडी वाहत असते. हा नागमोडी प्रवाह तिच्या दोन काठांमधून वाहत असतो. पुराच्या वेळी नदी हे काठ ओलांडून आजूबाजूच्या प्रदेशात पसरते.

पाणी व गाळ वाहून नेणे या नदीच्या कार्यांमुळे नदीचे पात्र व काठ यांच्यावरही नेहमी परिणाम होतो. नदीत वाहून येणारा गाळ तिने वाहून नेलेल्या गाळापेक्षा जास्त असेल, तर नदीच्या त्या भागात तिचे पात्र उचलले जाते. याउलट परिस्थिती असेल, तर नदीचे पात्र खणले जाते. त्याचप्रमाणे नदीच्या नागमोडी वळणाची बहिर्वक्र बाजू नदी खणून वाहून नेते, तर त्याच्या अंतर्वक्र बाजूत गाळ साठत जातो. यामुळे नदीचे काठही स्थिर नसतात.

साधारणपणे नदीचे पात्र व काठ यांच्यातील बदल फार सावकाश होतात. काही नद्या मात्र आपले पात्र फार लवकर बदलतात; उदा., कोसी नदीने आपले पात्र गेल्या २०० वर्षांत सु. २९० किमी. बदलले आहे. गंगेच्या डाव्या तीरावरील उपनद्या (कोसी, घागरा इ.) या बाबतीत कुप्रसिद्ध आहेत. अशा नद्यांचे नियंत्रण करणे फार कठीण असते. नदीच्या पात्रात एखादे बांधकाम केल्यास नदीचा मूळचा समतोल बिघडतो व नदी तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात मूळ बांधकामाला धोका पोहोचण्याची शक्यता असते. याबाबतीतही नदीचे नियंत्रण करून बांधकामाला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेतात.

नदीची गाळ वाहून नेण्याची क्षमता व पाणी वाहून नेण्याची क्षमता या एकमेकींवर अवलंबून असतात. यांपैकी पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेविषयी बऱ्याच अचूकतेने गणित करता येते आणि त्यासंबंधीची सूत्रे माहीत आहेत; पण गाळ वाहून नेण्याच्या क्षमतेबद्दल अजून पूर्णपणे माहिती नाही व त्यासंबंधी अजून संशोधन चालू

आहे. नदीमध्ये या दोन्ही क्रिया सतत चालत असल्यामुळे नदीतील प्रवाहाचे गणित करणे कठीण असते. त्यामुळे नदी नियंत्रणाचे प्रकल्प हाती घेण्यापूर्वी त्यांची प्रतिकृती (मॉडेल) तयार करून तिच्या साहाय्याने संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करावा लागतो व मगच तो प्रकल्प कार्यवाहीत आणता येतो.

पद्धती

नदी नियंत्रणाच्या पुढील मुख्य पद्धती आहेत :

(१) मार्गदर्शक बांध बांधणे,

(२) तीरबांध बांधणे,

(३) नदीकाठचे संरक्षण,

(४) नदीतील गाळ काढणे.

मार्गदर्शक बांध बांधणे

मैदानी प्रदेशातील नद्या आपले प्रवाह मार्ग बदलत असतात. अशा नदीवर पूल बांधला, तर नदीने प्रवाह बदलल्याने तो पूल निरुपयोगी ठरतो. हे टाळण्यासाठी नदीचा प्रवाह तिच्या काठाला मार्गदर्शक बांध बांधून बंदिस्त करतात व नदी पुलाखालूनच वाहील याची काळजी घेतात. जलवाहतुकीसाठी नदीच्या प्रवाहात योग्य खोली मिळावी म्हणून नदीचा मार्ग मार्गदर्शक बांध बांधून थोडा चिंचोळा करतात.

मार्गदर्शक बांध दोन्ही काठांवर बांधतात. हे बांध वाळूचे किंवा जवळपास उपलब्ध असणाऱ्या मातीचे बांधतात. जरूर वाटल्यास बांधावरील माती वाहून जाऊ नये म्हणून पृष्ठभागावर सपाट दगडांचे आवरण वापरतात. पुलाच्या बाबतीत नदीच्या प्रतिस्त्रोत (प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या) भागातील बांधाची लांबी शेवटचा प्रस्तंभ व अंत्याधार यांमधील अंतरापेक्षा १/१० ने जास्त ठेवली जाते. अनुस्त्रोत भागातील बांधाची लांबी शेवटचा प्रस्तंभ आणि अंत्याधार यांमधील अंतरापेक्षा १/५ ने जास्त ठेवली जाते. यामुळे पुलाच्या अनुस्त्रोत भागात नदीच्या पाण्यात भोवरे निर्माण होत नाहीत व बांधाला धोका पोहोचत नाही.

बांधाची माथ्यावरील रुंदी कमीत कमी ३ मी. असते. बांधाचा माथा पुलाच्या पातळीपेक्षा १.५ ते २ मी. उंच ठेवतात. बांधाच्या अनुस्त्रोत बाजूच्या ढाळावर ०.५ ते १.५ जाडीची दगडाची तोंडबांधणी पुराच्या पातळीपेक्षा १ मी. जास्त उंचीपर्यंत करतात. अनुस्त्रोत भागातील बांधावर नदीचा प्रवाह जेथे सरळ येऊन आदळतो तेथे १२०० ते १४०० ची गोलाई दिली जाते व अनुस्त्रोत बांधाच्या भागास ४५० ची गोलाई देतात.

पुलाच्या बाबतीत मार्गदर्शक बांध अंत्याधारापासून सुरू करून अनुस्त्रोत व प्रतिस्त्रोत बाजूला वर वर्णन केल्याप्रमाणे वाढवितात. जलवाहतुकीच्या बाबतीत दोन बांधांमधील अंतर असे ठेवतात की, नदीतून जाणाऱ्या नौका त्यांतून सहज जाव्यात आणि नदीच्या प्रवाहाची खोली व वेग जलवाहतुकीला सुलभ असावा. नदीत बांधल्या जाणाऱ्या गोदीच्या रुंदीचाही मार्गदर्शक बांधाच्या आराखड्यावर परिणाम होऊ शकतो.

तीरबांध बांधणे : नदीचे काठ धुपून जाऊन काठावरची सुपीक जमीन, बांधकाम किंवा गाव यांना धोका पोहोचत असेल, तर हे काठ वाहून जाऊ नयेत म्हणून तीरबांध बांधतात.

तीरबांध हे नदीच्या काठापासून अनुस्त्रोत मुखी, प्रतिस्त्रोत मुखी किंवा काटकोनात असू शकतात. अनुस्त्रोत मुखी बांध नदीचा प्रवाह आकर्षित करून घेतात. प्रतिस्त्रोत मुखी बांध नदीचा प्रवाह काठापासून दूर ढकलतात. काटकोनी बांध प्रवाहात अडथळा आणून गाळ साठण्याच्या क्रियेला मदत करतात. नदीच्या काठाचा जेवढा भाग सुरक्षित ठेवावयाचा असेल तेवढ्या भागात तीरबांध बांधतात. तीर भागातील अंतर त्यांच्या लांबीच्या २ ते २ १/२ पट ठेवतात. त्यांची उंची नदीतील पाण्याच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा थोडी जास्त असते.

काठ धुपून वाहून जात असेल, तर अनुस्त्रोत मुखी किंवा काटकोनी तीरबांध बांधतात. त्यामुळे या तीरबांधात गाळ साठून नदीचा प्रवाह पात्रात ढकलला जातो व काठाचे रक्षण होते. गाळ न साठविता प्रवाह काठापासून दूर ढकलण्याकरिता प्रतिस्त्रोत मुखी तीरबांध बांधतात.

प्रकार

तीरबांधासाठी वापरलेली सामग्री व तो बांधताना वापरलेली रीत यांवरून तीरबांधाचे झिरपणारे व न झिरपणारे असे दोन प्रकार करता येतात. न झिरपणारे तीरबांध : हे बांध संपूर्ण दगडाचे किंवा आतील भाग वाळू किंवा मातीचा करून त्यावर दगडाची तोंडबांधणी करून तयार करतात. या तीरबांधातून पाणी जाऊ शकत नाही म्हणून यांना न झिरपणारे तीरबांध म्हणतात. ज्या नद्यांमधून गाळ कमी प्रमाणात असतो तेथे असे तीरबांध बांधतात.

हे तीरबांध नदीची धार वळवून काठाचे संरक्षण करतात. झिरपणारे तीरबांध : ज्या नद्या मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणतात, त्यांच्या पात्रात या प्रकारचे तीरबांध वापरतात. यातून नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहू शकतो; पण बांधाच्या अडथळ्यामुळे त्याची गती कमी होते आणि नदीतील गाळ कमी प्रमाणात या बांधामध्ये साचतो.

हे बांध बांधताना लाकडाच्या वाशांचा किंवा झाडांच्या फांद्यांचा उपयोग करतात. वाशांच्या अनेक ओळी नदीच्या प्रवाहात रोवतात. त्यांना आडवे व तिरके वासे जोडतात आणि आतील रिकामी जागा झाडांच्या फांद्यांनी भरून काढतात.

तीरबांध हे मार्गदर्शक बांधापेक्षा कमी खर्चात बांधता येतात व ते मार्गदर्शक बांधांपेक्षा लवचिक असतात. त्यामुळे त्यांचे थोडे नुकसान झाले, तरी फारसा धोका नसतो.

पण तीरबांध हे प्रवाहात अडथळा आणतात व तो अडथळा योग्य प्रमाणात आहे याची खात्री करूनच ते बांधावे लागतात. तीरबांधावरून पाणी वाहत असेल, तर ते जलवाहतुकीला धोका निर्माण करू शकतात. अशा ठिकाणी जलवाहतुकीचा मार्ग स्पष्ट रीतीने आखून दाखवावा लागतो व त्याप्रमाणे तो राखावा लागतो.

नदीकाठाचे संरक्षण

ज्या वेळी काठाची मोठ्या प्रमाणावर धूप होत नसते त्या वेळी त्यांचे संरक्षण काठावर दगडांची तोंडबांधणी करून होऊ शकते. जास्त मजबुतीची आवश्यकता वाटली, तर दगडाच्या तोंडबांधणीवर तारेचे आवरण घालतात.

यापेक्षाही चांगले आवरण पाहिजे असल्यास दगडांचा ढीग किंवा काँक्रीटचे तुकडे पोलादाच्या तारेने एकत्र बांधतात व ते काठावर ठेवतात. काठ गवताने किंवा कडब्याने आच्छादणे हा काठाच्या संरक्षणाचा सर्वांत सोपा उपाय आहे.

कोणत्याही प्रकारचे संरक्षक आच्छादन काठावर घालतात, मात्र त्या खालची माती सुरक्षित राहील याची काळजी घेतली पाहिजे.

गाळ काढणे

जलवाहतुकीकरिता योग्य खोली व रुंदी ठेवण्याकरिता नदीतील गाळ ⇨गाळ उपसणी यंत्रणेच्या (ड्रेजरच्या) साहाय्याने काढून पात्र रुंद व खोल ठेवले जाते. विशेषतः नदीच्या मुखाजवळच्या भागात समुद्राच्या भरतीमुळे नदीतील पाणी मागे लोटले जाते व ओहोटीच्या वेळी ते पुन्हा समुद्राकडे वाहू लागते.

प्रवाहाच्या या उलटसुलट गतीमुळे मुखाजवळ गाळ साठतो. तो गाळ जर नियमीत काढला नाही, तर नदीचे पात्र उथळ होऊन जलवाहतुकीला ते निरुपयोगी होते. सुरत व भडोच ही नदीच्या काठावरील पूर्वीची बंदरे पात्र गाळाने भरून गेल्याने आता जलवाहतुकीच्या दृष्टीने निरुपयोगी झाली आहेत.

हुगळी बंदरातील गंगेचा गाळ सतत काढून ते बंदर जलवाहतुकीला योग्य असे ठेवले गेले आहे. हा गाळ काढणे अर्थातच सतत खर्चाचे काम असते.

नदीत सतत पाण्याचा प्रवाह ठेवल्यास तो आपल्या बरोबर गाळ वाहून नेतो व नदीचे पात्र मोकळे ठेवतो. त्याकरिता नदीच्या वरच्या भागात पाणी साठवून ते जरूरीप्रमाणे सोडावे लागते. हुगळी नदीकरिता गंगेवर फराक्का येथे दरवाजाचे धरण बांधून त्यात गंगेचे पाणी अडविले आहे. त्यातून जरूरीप्रमाणे गंगेत पाणी सोडून त्याबरोबर प्रवाहातील गाळ वाहून नेला जातो व पात्र जलवाहतुकीकरिता योग्य ठेवले जाते.

पूर नियंत्रण

नदीला पूर आल्याने तिचे पाणी आजूबाजूच्या सखल प्रदेशात पसरते. त्यामुळे मानवी जीविताची व संपत्तीची हानी होते पूर. ती टाळण्याकरिता पूर नियंत्रण करावे लागते. पूर नियंत्रण मुख्यतः दोन प्रकारे करता येते :

(१) नदीची पूर-वाहनक्षमता वाढवून,

(२) पुराला कारणीभूत होणारे नदीतील अतिरिक्त पाणी धरणे किंवा तलाव यांत तात्पुरते साठवून

नदीची पूर-वाहनक्षमता वाढविणे : नदीची पूर-वाहनक्षमता खालील प्रकारे वाढविता येते :  (अ) नदीच्या दोन्ही काठांवर बांध बांधणे, (आ) नदीत साठणारा गाळ व किनाऱ्यांवरील झुडपे काढणे, (इ) नदीच्या प्रवाहातील वळणे कमी करून तिचा प्रवाह सरळ करणे.

नदीच्या दोन्ही काठांवर बांध बांधणे

फार प्राचीन काळापासून हा उपाय अमलात आणला गेला आहे. नदीच्या दोन्ही काठांवर बांध बांधून पुराच्या वेळी नदीचा प्रवाह या बांधांमधून वाहील याची काळजी घेण्यात येते.

बांधांची उंची, पूर्वीच्या अनुभवावरून नदीतील पाणी किती उंचीवर चढू शकेल याचा अंदाज करून, त्या उंचीहून जास्त ठेवली जाते. नदीच्या मुख्य प्रवाहापासून दूर अंतरावर बांध बांधतात.

साधारणपणे हे बांध मातीचे असतात. बांधाच्या माथ्यावर रस्ता बांधता येतो. त्यामुळे नदीकाठाने दळणवळण करता येते आणि बांधाच्या दुरुस्तीकरिता लागणारे सामान व मदत या रस्त्यावरून नेता येते.

या पूर बांधाचे पुढील प्रमाणे तोटे होऊ शकतात

(१) पुराच्या वेळी नदीचा प्रवाह आजूबाजूच्या मोठ्या क्षेत्रावर पसरला जाऊन, नदीबरोबर वाहून येणारा गाळ नदीच्या आसपासच्या प्रदेशात पसरतो व जमीन सुपीक बनते. नदीच्या दुतर्फा बांध बांधल्याने हा गाळ आजूबाजूच्या प्रदेशात टाकला न जाता नदीच्या पात्रातच टाकला जातो व आजूबाजूची जमीन सुपीक बनण्याची क्रिया थांबते. त्याचप्रमाणे नदीच्या पात्रात टाकल्या गेलेल्या गाळामुळे नदीचे पात्र उचलेले जाते.

विशेषतः ज्या नद्यांमध्ये गाळ मोठ्या प्रमाणावर वाहून येतो त्या नद्यांमध्ये ही पात्र उचलले जाण्याची क्रिया प्रामुख्याने दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चीनमधील ह्‌वांग (हो) नदी. हिचे पात्र दर शतकाला १ ते १.२५ मी. इतक्या गतीने उचलले जात आहे. पात्र उचलले गेले की, नदीतील पाण्याची पातळी वाढते व ती दोन्ही बांधांच्या खाली ठेवण्याकरिता बांधांची उंची वाढवावी लागते. पात्र उचलणे व बांधाची उंची वाढविणे या क्रिया सतत चालू राहतात. त्याचा परिणाम म्हणजे या नदीचे पात्र काही ठिकाणी आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंच झाले आहे, अशा ठिकाणी बांध फुटला, तर फार मोठ्या प्रमाणावर पूर येऊन नुकसान होते.ज्या नद्यांमध्ये गाळाचे प्रमाण कमी असते (उदा., कृष्णा, गोदावरी, कावेरी इ.) त्या नद्यांच्या बाबतीत वरील प्रश्न उद्‌भवत नाही.

(२) प्रवाहामुळे होणारी धूप, लाटामुळे होणारी नुकसानी, बांधातून पाणी झिरपणे, बांधावरून पाणी वाहणे वगैरे कित्येक कारणांमुळे बांध वाहून जाऊ शकतात. त्यामुळे या बांधांची सतत पाहणी करून ते सुस्थितीत ठेवणे आवश्यक असते. शेकडो किमी. लांबीच्या बांधांची पाहणी करणे व ते सुस्थितीत ठेवणे हे कठीण व खर्चाचे काम असते.

नदीतील गाळ व किनाऱ्यावरील झुडपे काढणे : नदीत गाळ साठून किंवा किनाऱ्यावर झाडेझुडपे वाढून नदीची प्रवाह वाहनक्षमता कमी होते व पुराच्या वेळी नदीतील पाण्याची पातळी जास्त वाढते.

नदीतील गाळ काढून तिचे पात्र खोल व रुंद करणे, किनाऱ्यावरील झाडेझुडपे व इतर अडथळे काढणे या उपायांनी नदीची प्रवाह वाहनक्षमता वाढविता येते व पुराचा धोका कमी करता येतो; पण हे उपाय तात्पुरते ठरतात. नदीतील गाळ सतत काढावा लागतो व ते काम खर्चाचे असते. नदी किनाऱ्यावरील झाडेझुडपे काढल्याने किनाऱ्याची धूप होण्याची शक्यता असते.

या उपायांप्रमाणेच नदीच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये भू-संरक्षणाचे उपाय योजून जमिनीची धूप कमी करता येते व नदीत येणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी करता येते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पूर नियंत्रणाला सहाय्य होते.

हे सर्व उपाय केवळ तात्पुरते किंवा इतर उपायांना मदत म्हणूनच उपयोगी ठरतात. केवळ हेच उपाय वापरून पूर नियंत्रण करता येत नाही.

नदीचा प्रवाह सरळ करणे : मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांचे प्रवाह बहुतेक नागमोडी असतात आणि त्यांच्या वळणांची वक्रता नेहमी वाढत असते. नागमोडी नदीचा उतार सरळ नदीच्या उतारापेक्षा कमी असतो. त्यामुळे तिची प्रवाह वाहनक्षमता कमी असते. नदीतील वळणे काढून तिचा मार्ग सरळ केला, तर तिची प्रवाह वाहनक्षमता वाढते व पुराची तीव्रता कमी होते. अमेरिकेतील मिसिसिपी नदीतील वळणे काढून नदीचा प्रवाह सरळ केल्याने मेंफिस या शहराजवळ नदीतील पुराची पातळी ४ मी. पेक्षा खाली उतरली. वरवर पाहता हा उपाय फार परिणामकारक वाटतो; पण बऱ्याच वेळा उपायाचे परिणाम फार गंभीर होऊ शकतात.

नदीतील वळणे काढून टाकल्याने नदीतील प्रवाहाची गती वाढते व त्याची गाळ वाहून नेण्याची क्षमताही वाढते. हा गाळ वाहून नेण्याची क्षमता जर नदीत येणाऱ्या गाळापेक्षा जास्त असेल, तर नदी आपले पात्र खणून खोल करू लागते व त्याचा परिणाम नदीच्या प्रतिस्त्रोत भागात जाणवू लागतो. त्याचप्रमाणे नदीने वाहून आणलेला गाळ नदीच्या अनुस्त्रोत भागात साठतो व त्या भागात पुराची तीव्रता वाढते. म्हणून हा उपाय अंमलात आणण्यापूर्वी त्याचा सर्व नदीच्या क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकेल याचा प्रतिकृतीच्या साहायाने अभ्यास करावा लागतो. असा अभ्यास न करता जर हे उपाय अंमलात आणले, तर त्यांचा काही वेळा जास्त अपायच झाल्याची उदाहरणे आहेत.

पुराचे पाणी तात्पुरते साठविणे : हे दोन प्रकारांनी करता येते. (१) पूर रोधक तलाव आणि (२) धरणे बांधणे.

पूर रोधक तलाव

नदीच्या मार्गात एखादा मोठा नैसर्गिक तलाव वा सरोवर असल्यास, नदीतील पुराचे पाणी तात्पुरते या तलावात साठविता येते व नदीच्या अनुस्त्रोत भागातील पुराची तीव्रता कमी करता येते.चीनमधील तुंगतिंग हा यांगत्सी नदीवरील तलाव व कंबोडियातील टॉनले सॅप नदीवरील (त्याच नावाने ओळखण्यात येणारे) सरोवर ही नैसर्गिक तलावांची उदाहरणे आहेत. भारतातही तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांत अशी हजारो लहान तळी आहेत. त्यांचा उपयोग मुख्यता शेतीकरिता होत असला, तरी त्यांच्यामुळे पुराची तीव्रताही कमी होते.

तलाव पूर्ण भरला असता नदीला पूर आला, तर अर्थातच तलावाचा पूररोधक म्हणून उपयोग होऊ शकत नाही. पण तलाव नदीपासून अलग असेल, तर त्याच्या तोंडाशी दारे ठेवून पुराच्या अपेक्षित काळापर्यंत तलाव मोकळा ठेवता येतो. नदीला पूर आला की, दरवाजे उघडून पुराचे पाणी तलावात साठविता येते. मेकाँग नदीपासून टॉनले सॅप हे सरोवर वेगळे आहे. त्यावर दरवाजाचे धरण बांधण्याची योजना आखण्यात आली असून तिचा एक उद्देश पूर नियंत्रण हा आहे.नैसर्गिक तलावांचा अथवा सरोवरांचा पूर नियंत्रणाकरिता उपयोग करून घेणे नेहमीच फायद्याचे असते. कारण त्याकरिता जमिनी ताब्यात घेण्याचा प्रश्न येत नाही व इतर बांधकामाचा खर्च कमी असतो; पण असे नैसर्गिक तलाव फारच थोड्या ठिकाणी आढळून येतात.

धरणे बांधणे

नदीवर धरण बांधून, त्यांत पुराचे पाणी तात्पुरते साठविणे व नंतर हळूहळू ते नदीत सोडून देणे हा पूर नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. केवळ पूर नियंत्रण हाच धरण बांधण्याचा उद्देश असेल, तर पूर येण्यापूर्वी या धरणाचा जलाशय संपूर्ण रिकामा ठेवावा लागतो.पुराचे पाणी जलाशयात साठवून, धरणातील दारांमधून, नदीच्या प्रवाह वाहनक्षमतेपेक्षा कमी प्रमाणात ते नदीत सोडतात. अर्थात अशा प्रकारच्या धरणात पाणी कायमचे साठविता येत नाही व त्याचा इतर कामाकरिता उपयोग करता येत नाही; त्यामुळे केवळ  पुराची तीव्रता कमी करण्याकरिता धरणे बांधणे फार खर्चाचे काम होते. बहुतेक धरणे बहूद्देशीय असतात, म्हणजे ती बांधण्यामागे जलसिंचन, वीजनिर्मिती, पाणीपुरवठा इ. अनेक उद्देश असतात. ही धरणे पूर नियंत्रणाकरिताही वापरता येतात.

बहूद्देशीय धरणात वर उल्लेखिलेल्या कारणांकरिता ठराविक उंचीपर्यंत पाणी साठवून ठेवतात. त्या उंचीवरील जलाशयांतील काही

सोडले जाते. धरणाच्या सांडव्यावरून वाहू शकणाऱ्या पाण्याचे प्रवाहमान धरणाच्या खालच्या बाजूच्या नदीच्या प्रवाह वाहनक्षमतेपेक्षा कमी ठेवतात. काही वेळा नदीची प्रवाह वाहनक्षमता कमी असते व त्यामुळे धरणाची पूर साठविण्याची क्षमता जास्त लागते आणि धरणाची उंची व खर्च वाढतो. अशा वेळी नदीची वाहनक्षमता वर दिलेल्या उपायांनी वाढवितात व त्या प्रमाणात धरणाची उंची आणि खर्च कमी होतो.काही वेळा मुख्य नदीवर एक मोठे धरण बांधण्यापेक्षा उपनद्यांवर लहान धरणे बांधून त्यांत पुराचे पाणी साठविणे फायद्याचे ठरते. त्याकरिता नदीच्या संपूर्ण खोऱ्याचा विचार करावा लागतो. अमेरिकेतील टेनेसी नदीवरील अनेक धरणे व भारतातील दामोदर नदीवरील धरणांची मालिका ही या पद्धतीची उत्तम उदाहरणे आहेत.

समुद्रकिनाऱ्यावरील पुरांपासून संरक्षण

समुद्रात होणाऱ्या वादळांमुळे किती मोठ्या लाटा येऊ शकतील हे पूर्वीच्या अनुभवावरून व काही प्रमाणात गणित करून ठरविता येते. या उंचीच्या लाटांना तोंड देता येईल एवढ्या उंचीच्या व ताकदीच्या भिंती समुद्रात बांधतात. समुद्रात भिंती बांधणे हे खर्चाचे काम असते आणि महत्वाच्या बंदराच्या संरक्षणाकरिताच एवढा खर्च करणे परवडते . इतर ठिकाणी लहान भिंती बांधणेच शक्य असते. सामान्य वादळात त्या उपयोगी पडतात, पण मोठ्या वादळात उपयोगी पडत नाहीत.

समुद्रकिनाऱ्यावरील वादळांमुळे येणाऱ्या पुरांपासून संरक्षणाचा एक उपाय म्हणजे ती केव्हा व किती तीव्रतेची येऊ शकतील याचा अंदाज करून त्याप्रमाणे संबंधित लोकांना इशारा देणे. अलिकडे कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांचे निरीक्षण करता येते व ती किनाऱ्यावर केव्हा येऊ शकतील याचा अचूक अंदाज करता येतो आणि त्याप्रमाणे इशारा देता येतो. अशा प्रकारच्या इशाऱ्याने अलीकडे प्राणहानी टाळता आली आहे; पण वित्तहानी मात्र टाळता आलेली नाही.

पूर नियंत्रणाच्या जगातील प्रमुख योजना

पूरबांध : चीनमध्ये ह्‌वांग (हो), यांगत्सी; भारतात गंगा, यमुना, कोसी, दामोदर, गंडक; अमेरिकेत मिसिसिपी; यूरोपात ऱ्हाईन इ. नद्यांवर शेकडो किमी. लांबीचे बांध बांधण्यात आले आहेत व त्यामुळे त्या नद्यांवरील पुरांचे बरेच नियंत्रण होऊ शकले आहे.

नदीचा मार्ग सरळ करणे

मिसिसिपी नदीवरील मेंफिस या शहराजवळ नदीची १४ वळणे काढून टाकून नदीचा मार्ग सरळ करण्यात आला, त्यामुळे मेंफिस जवळची पुराची पातळी ४ मी.ने खाली आली; परंतु नदीच्या अनुस्त्रोत भागात नदी पुन्हा नागमोडी वाहू लागून त्या भागात पुराची पातळी वाढली. अशा प्रकारचे अनुभव इतर नद्यांच्या बाबतीतही आले आहेत.

धरणे बांधणे

केवळ पूर नियंत्रणाकरिता धरणे बांधण्याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे अमेरिकेतील ओहायओ राज्याच्या पश्चिम भागातील मिआनी नदीवरील पूर नियंत्रण योजना. या योजनेतील पांच धरणे फक्त पूर नियंत्रणाकरिता बांधलेली असून ती पुराचे पाणी तात्पुरते साठवितात व इतर वेळी ती रिकामी असतात.

टेनेसी व तिच्या उपनद्यांवर जवळजवळ तिसाहून अधिक धरणे बांधून त्यांतील पाणी अनेक कारणांकरिता वापरले आहे. या धरणांमुळे टेनेसी आणि तिच्या उपनद्यांतील पुरांची तीव्रता कमी झाली आहे. या प्रकल्पाला टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी प्रकल्प असे म्हणतात . भारतातील अशा प्रकारचे उदाहरण म्हणजे दामोदर नदी व तिच्या उपनद्यांवरील मैथॉन, कोनार, तिलैया, पानचेत ही चार धरणे व दुर्गापूर येथील दरवाजाचे धरण. या प्रकल्पामुळे दामोदर नदीच्या खोऱ्यातील पूर बरेचसे नियंत्रित केले गेले आहेत.

विसाव्या शतकात कित्येक बहूद्देशीय धरणे बांधण्यात आली आहेत. त्यांत अमेरिकेतील हूव्हर धरण, ग्रँड कूली धरण, फोर्ट पेक धरण, भारतातील भाक्रा, हिराकूद, राणा प्रतापसागर, नागार्जुनसागर इ. धरणे; ईजिप्तमधील आस्वान, ऱ्होडेशियातील करिबा इ. धरणे प्रमुख आहेत. या धरणांमुळे त्यांच्या भागातील पुरांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण झाले आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील पुरांपासून संरक्षण

या संदर्भात नेदर्लंड्‌समधील दोन प्रकल्पांची माहिती उद्‌बोधक आहे.

(अ) झायडर झी प्रकल्प : नेदर्लंड्‌सच्या उत्तर किनाऱ्यावर झायडर झी नावाचे मोठे आखात होते. उत्तर समुद्रात वादळ झाले की, या आखातात प्रचंड लाटा येऊन बाजूच्या किनारपट्टीचे नुकसान होई. समुद्राचे पाणी जमिनीत मुरून किनारपट्टीवरील जमीन शेतीला निरूपयोगी होई. ही जमीन शेतीला योग्य करण्याकरिता व किनारपट्टीचे वादळांपासून संरक्षण करण्याकरिता उत्तर समुद्रात ६० किमी. लांबीचा आणि २० मी. उंचीचा मातीचा बंधारा बांधला आहे आणि आखाताचे समुद्रापासून वेगळे सरोवर तयार केले आहे. या सरोवराला आता आयसलमेर असे म्हणतात.

बंधाऱ्यात दारे ठेवली आहेत. भरतीच्या वेळी ती बंद ठेवतात व ओहोटीच्या वेळी ती उघडून सरोवरातील खारे पाणी समुद्रात सोडतात. सरोवराला येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्यामुळे काही वर्षांनी या तलावातील पाणी गोड होईल अशी अपेक्षा आहे. बंधाऱ्यामुळे उत्तर समुद्रातील लाटा सरोवरात येऊ शकत नाहीत व किनारपट्टीचे वादळांपासून संरक्षण होते.

(आ) डेल्टा प्रकल्प : नेदर्लंड्‌सच्या नैऋत्य किनाऱ्यावर ऱ्हाईन नदीची ६ मुखे आहेत. उत्तर समुद्रातील वादळांचा तडाखा या मुखांभोवतीच्या प्रदेशाला बसतो. ऱ्हाईन नदीची ६ पैकी ५ मुखे नदीत मातीचे बांध घालून बंद करणे व नदीचा सर्व प्रवाह एकाच मुखातून समुद्रात सोडणे हा डेल्टा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. ज्या मुखातून नदीचे पाणी समुद्रात सोडले आहे तेथे ६० मी. लांबीचे व २० मी. उंचीचे असे सतरा प्रचंड दरवाजे बसविले आहेत. उत्तर समुद्रात जेव्हा वादळ होते, त्या वेळी हे दरवाजे बंद करून वादळाच्या लाटा नदीच्या आत त्या किनाऱ्यावर येणार नाहीत याची काळजी घेण्यात येते. हा प्रचंड प्रकल्प १९६० पासून सुरू असून ऱ्हाईन नदीची ५ पैकी ३ मुखे बंद केली गेली आहेत. दरवाजे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प १९८४ मध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

पूर नियंत्रणाबाबतच्या प्रतिकृती व इतर संशोधन

पूर नियंत्रणाचे प्रकल्प फार प्रचंड असतात आणि पूर नियंत्रण हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे केवळ गणित करून पूर नियंत्रणाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करता येत नाही. हा आराखडा तयार करण्यापूर्वी नदीच्या ( किंवा समुद्राच्या) ज्या भागात पूर नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे, त्या भागाची प्रतिकृती तयार करण्यात येते. ह्या प्रतिकृतीत कृत्रिम पूर आणून त्या पुराचे काय परिणाम होऊ शकतात याचा अभ्यास करण्यात येतो.

प्रतिकृती काही विशिष्ट प्रमाणे (स्केल) घेऊन तयार केलेली असते. ही प्रमाणे ठरविण्यासाठी नदीतील पाण्याचे प्रवाहमान, नदीतून वाहून नेलेला गाळ आणि पाणी व गाळ यांचा परस्परसंबंध यांबाबतची सूत्रे वापरतात. प्रतिकृती व प्रत्यक्ष नदी यांतील प्रवाहाला ही सूत्रे लागू पडत असल्याने जर योग्य प्रमाणे घेऊन प्रतिकृती तयार केली असेल, तर प्रतिकृतीत येणारे प्रत्यय व प्रत्यक्ष नदीच्या बाबतीत येणारे प्रत्यय यांमध्ये फारसा फरक नसतो. नदीच्या (किंवा समुद्राच्या) भागाच्या प्रतिकृती तयार करून त्यांच्या साहाय्याने नदीवरील प्रकल्प आखणे याचे आता शास्त्रच झाले आहे. जगातील सर्व भागांत अशी प्रतिकृती तयार करून त्यांवर काम करणाऱ्या प्रयोगशाळा स्थापण्यात आलेल्या आहेत. अमेरिकेतील युनायटेड स्टेट्‌स ब्युरो ऑफ रिक्लेमेशनची जलविज्ञानीय प्रयोगशाळा, युनायटेड स्टेट्‌स आर्मी कोअर ऑफ एंजिनियर्सची प्रयोगशाळा, नेदर्लंड्‌समधील डेल्फ्ट जलविज्ञानीय प्रयोगशाळा व भारतातील खडकवासला येथील ðसेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन या प्रयोगशाळा जगप्रसिद्ध आहेत.

भारतातील पूर नियंत्रण

भारतातील सु. २.५ कोटी हे. क्षेत्राला पुराचा धोका वारंवार उद्‌भवतो असा अंदाज करण्यात आला आहे. या क्षेत्राचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी १९५४ मध्ये पूर नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला. पहिल्या दोन वर्षांत राष्ट्रीय पातळीवर पहाणी करणे, आकडेवारी गोळा करणे व काही निकडीची कामे पार पाडणे ही कार्ये करण्यात आली. १९५६ सालानंतर पूर नियंत्रण व पाणी साठण्यास प्रतिबंध करण्याच्या योजना सुरू करण्यात आल्या. १९७८ पर्यंत सु. ९,७४० किमी. लांबीचे बांध घालण्यात आले; १६,९३० किमी. लांबीचे पाण्याचा निचरा करणारे कालवे खोदण्यात आले आणि २३५ नगर पूर संरक्षण योजना व ४,६९० खेड्यांची पातळी वाढविण्याच्या योजना पार पाडण्यात आल्या. या सर्व कामांकरिता सु. ५२६.९३ कोटी रू. खर्च करण्यात आलेले असून सु. ८८ लक्ष हे. क्षेत्राला त्याचा फायदा मिळालेला आहे.याशिवाय नद्यांच्या अनुस्त्रोत भागातील पुराची समस्या सोडविण्यासाठी अनेक नदी खोरे योजना पार पाडण्यात आल्या आहेत. यांतील उल्लेखनीय म्हणजे महानदीवरील हिराकूद धरण, दामोदर नदीवरील कोनार, पानचेत, तिलैया व मैथॉन ही धरणे, सतलज नदीवरील भाक्रा धरण, बिआस नदीवरील पोंग धरण आणि तापी नदीवरील उकाई धरण या होत. पुरापासून बचाव व मदत करणाऱ्या संघटनांना सज्ज राहण्यास आणि पूर प्रतिबंधक व देखभाल करणाऱ्या संघटनांना योग्य तयारी करण्याची वेळीच सूचना देण्यासाठी केंद्र सरकारने पूर अंदाज संघटना उभारलेली आहे.

या संघटनेचे मुख्य कार्यालय पाटणा येथे असून तिची गौहात्ती, मैथॉन व दिल्ली येथे मंडळे असून दिब्रुगड, गौहाती, जलपैगुरी, आसनसोल, पाटणा, लखनौ, झाशी, भुवनेश्वर, हैदराबाद व सुरत येथे विभागीय कार्यालये आहेत. पाचव्या पंचवार्षिक योजनेत पूर नियंत्रणाकरिता ३४५.२७ कोटी रूपये खर्च करण्यात येणार असून त्यामुळे आणखी १८ लक्ष हे. क्षेत्राला पुरापासून यथायोग्य संरक्षण मिळेल असा अंदाज आहे.

राज्य पातळीवर पूर नियंत्रण मंडळे धोरणासंबंधी निर्णय घेतात व आंतरराज्य पातळीवर नदी आयोगांमार्फत सहकार्य करण्यात येते. राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय पूर नियंत्रण मंडळ हे राज्य मंडळे व नदी आयोग यांच्या कार्याचा समन्वय करते. ब्रह्मपुत्रेचे खोरे व उत्तर बंगालमधील नद्या यांच्या बाबतीतील पुराची समस्या गुंतागुंतीची व मोठ्या प्रमाणावरील असल्यामुळे तेथील पूर नियंत्रण योजना कार्यवाहीत आणण्यासाठी आसाम व प. बंगाल राज्य सरकारांनी स्वतंत्र पूर नियंत्रण आयोग नेमलेले आहेत. केंद्रीय सरकारने नेमलेल्या ब्रह्मपुत्रा पूर नियंत्रण मंडळ व उत्तर बंगाल पूर नियंत्रण मंडळ यांच्यावर धोरणे निश्चित करणे, योजनांना अनुमती देणे व योजनांचा अग्रक्रम ठरविणे या जबाबदाऱ्या आहेत.

गंगा खोऱ्यातील पूर नियंत्रण योजनांसाठीही केंद्र सरकारने गंगा पूर नियंत्रण मंडळ व गंगा पूर नियंत्रण आयोग नेमलेले आहेत. भारतातील पूर समस्येची जटिलता व प्रमाण लक्षात घेऊन पूर नियंत्रणाच्या सध्याच्या कार्याची दिशा व कार्यक्रम यांचा सखोल अभ्यास करून या समस्येवर समन्वयित व शास्त्रीय दृष्टीकोनावर आधारलेली राष्ट्रीय पातळीवरील योजना आखण्यासाठी व अग्रक्रम निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने जुलै १९७६ मध्ये राष्ट्रीय पूर आयोगाची नियुक्ती केलेली आहे.

भवितव्य : स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ३० वर्षांच्या काळात भारतात पूर नियंत्रणाच्या बऱ्याच योजना आखण्यात आल्या व पार पाडण्यात आल्या; पण अजूनही पूर नियंत्रणाचा प्रश्न सुटला नाही. उलट तो जास्तच गंभीर झाला आहे, असे १९७७ च्या पुरावरून दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे आतापर्यंत हा प्रश्न प्रत्येक ठिकाणचा स्थानिक प्रश्न म्हणून पाहिला गेला व त्याप्रमाणे सोडविला गेला.

संपूर्ण नदी खोरे लक्षात घेऊन पूर नियंत्रणाचे यशस्वी प्रयत्न फारसे झाले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की, जेथे पूर नियंत्रणाचे प्रयत्न झाले तेथे हा प्रश्न सुटला, तरी नदीच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला तो निर्माण झाला म्हणजे मूळ प्रश्न सोडविण्याऐवजी तो नदीच्या दुसऱ्या भागात ढकलला गेला.

आता या प्रश्नाचे खरे गांभीर्य सरकार व अभियंत्यांच्या लक्षात आले असून संपूर्ण नदी खोरे किंवा संलग्न असणारी तीन चार नद्यांची खोरी यांचा एकत्रित विचार करून त्यांच्यामुळे येणाऱ्या पुराचे कसे नियंत्रण करावे याचा विचार चालू झाला आहे. या दृष्टीने उल्लेखनीय योजना म्हणजे (अ) के. एल्‌. राव यांची गंगा-कावेरी जोड कालवा योजना आणि (आ) डी. जे. दस्तुर यांची गार्लंड कालवा योजना. या दोन्ही योजनांमधील मुख्य कल्पना खालीलप्रमाणे आहे.

उत्तर भारतातील नद्या व दक्षिण भारतातील नद्या यांच्यातील पुढील फरक सर्वज्ञात आहेत.

(१)उत्तर भारतातील नद्या बारमाही आहेत, तर दक्षिण भारतातील नद्या मोसमी आहेत.

(२) उत्तर भारतातील नद्यांचे पूर फार प्रचंड असतात, तर दक्षिण भारतातील नद्यांचे पूर त्यामानाने लहान असतात.

(३) उत्तर भारतातील नद्या हिमालयाच्या दक्षिण उतारावर १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर उगम पावतात. दक्षिण भारतातील नद्या दक्षिण पठारावर उगम पावतात आणि त्यांची सरासरी उंची ५०० मी. आहे.

यावरून असे दिसून येते की, उत्तर भारतातील नद्यांस पाणी जास्त प्रमाणावर आहे, तर दक्षिण भारतातील नद्यांत पाणी कमी आहे. उत्तरेकडील जादा पाणी काही उपायाने दक्षिणेकडे आणता आले, तर उत्तरेतील पुराचा त्रास कमी होईल व दक्षिणेत या पाण्याचा इतर प्रकारे उपयोग करून घेता येईल हा यावरील योजनांचा मुख्य उद्देश आहे.

(अ) गंगा-कावेरी जोड कालवा योजना : या योजनेनुसार पाटण्याजवळ गंगेचे पाणी अडवून प्रचंड पंपांच्या साहाय्याने ते दक्षिण पठारावर उचलले जाईल आणि तेथून दक्षिण भारताच्या पठाराच्या मध्य भागातून एका मोठ्या कालव्यातून हे पाणी सर्व दक्षिण भारतातील नद्यांतून सोडण्यात येईल.

(आ) गार्लंड कालवा योजना : हिमालयाच्या दक्षिण उतारावर ३,००० किमी. लांब, ३०० मी. रुंद व २० मी. खोल असा कालवा भिंती बांधून तयार करण्यात येईल. हिमालयातून वाहणाऱ्या सर्व नद्यांचे जादा पाणी या कालव्यात साठविले जाईल. हा कालवा समुद्रसपाटीपासून सरासरी १,००० मी. उंचीवर असेल. दक्षिण भारताचे पठार सरासरी ५०० मी. उंचीवर आहे आणि त्यामुळे कालव्यातील पाणी प्रचंड नळांच्या साहाय्याने दक्षिण पठारावर वाहून आणता येईल. त्याकरिता पंपांची आवश्यकता लागणार नाही. उलट कालवा व पठार यांच्यातील ५०० मी. उंचीच्या फरकाचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करता येईल. दक्षिण पठारावर पाणी आणल्यावर ते मध्यभागातून वाहणाऱ्या मोठ्या कालव्यातून दक्षिणेतील सर्व नद्यांमध्ये सोडता येईल.

या दोन्ही योजना सर्व भारतातील नद्यांचा विचार करून तयार केल्या असल्यामुळे त्या फारच प्रचंड आहेत व त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार आहे (प्राथमिक अंदाजाप्रमाणे १५ ते २० हजार कोटी रूपये).

काही स्थापत्यशास्त्रज्ञांच्या मते स्थापत्यशास्त्रदृष्ट्या या योजना योग्य व शक्य असून प्रश्न फक्त त्या पुऱ्या करण्याकरिता लागणाऱ्या प्रचंड खर्चाचा व वेळेचाच आहे, तर काही स्थापत्यशास्त्रज्ञांच्या मते या योजनांत स्थापत्यशास्त्रदृष्ट्याही काही त्रुटी व दोष आहेत आणि त्यावर संपूर्ण विचार केल्याशिवाय त्यांची कार्यवाही होऊ नये. याशिवाय या योजनांमुळे परिस्थितिविज्ञानाच्या दृष्टीने संपूर्ण प्रदेशात होणाऱ्या बदलांचा विचार करणे अत्यावश्यक आहे, असे काही तज्ञांचे मत आहे.

तज्ञांमध्येच या योजनांबाबत दुमत असल्याने सध्यातरी या योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत येण्यासंबंधी काही निश्चित सांगता येत नाही; पण भारतातील पुराची जुनी समस्या सोडवावयाची असेल, तर अशा योजनांसारख्या मूलभूत उपायांची फार जरूरी आहे. असे तज्ञांना वाटते.

 

लेखक: शं, द. फणसळकर /  वि. गो. गुजर / श्री. वि. चितळे /

संदर्भ :1. Bureau of Flood Control, United Nations, Economic Commission for Asia and Far East, Methods and Problems of Flood Control in Asia and far East, Series No. 2 and 4.

2. Central Board of Irrigation and Power, Manual on River Behaviour, Control and training, Publication No. 60, New Delhi, 1956.

3. Chow V. T., Ed., Handbook of Applied Hydrology, New York, 1964.

4. Davis, C. V., Ed., Handbook of Applied Hydraulics, New York, 1962.

5. Leliavsky, S. Introduction to Fluvial Hydraulics, London, 1955.

 

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate