অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भूगोलशास्त्र

‘भूगोल’ या नावाने परिचित असलेल्या विषयास ‘भूगोलविद्या’ अथवा ‘भूवर्णनशास्त्र’ म्हणणे उचित होईल. याचे मुख्य कारण म्हणजे भूगोलाची पारंपारिक व्याख्या व व्याप्ती यांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत व होत आहेत. भूगोलास ‘शास्त्र’ या दृष्टीने स्थान मिळावे अशी आधुनिक भूगोलतज्ञांची आकांक्षा असून, आता सामाजिक शास्त्रांबरोबरच नैसर्गिक शास्त्रांमध्ये म्हणजे विज्ञानातही भूगोलशास्त्राचे स्थान महत्वाचे मानले जात आहे.

भूगोलशास्त्राची सुटसुटीत व्याख्या ‘पृथ्वीसंबधी माहीती देणारे शास्त्र’ अशी करता येईल. या व्याख्येत पृथ्वीपेक्षा जग असा बदल करणे अधिक उपयुक्त ठरते. हिच्यात प्रामुख्याने भूपृष्ठवर्णनाचा समावेश होतो. सोयीकरिता हे भूपृष्ठवर्णन पृथ्वीचे किंवा जगाचे नैसर्गिक, भौगोलिक तसेच राजकीय भाग पाडून केले जाते. भूपृष्ठवर्णनात एखाद्या प्रदेशातील खडक, हवामान, शेती, संपत्ति–साधने, दळणवळण इत्यादींच्या माहितीचा अंतर्भाव होतो. भूगोलशास्त्राचा दुसरा मूलभूत घटक म्हणजे मानव व पर्यावरण यांचे परस्पर व नेहमी बदलत असणारे संबंध आणि या संबंधाचे पृथःकरणात्मक विवेचन करण्याकडे आधुनिक भूगोलशास्त्राचा वाढता दृष्टीकोन आहे.

अठराव्या शतकापर्यंत भूगोलशास्त्राचे स्वरूप प्रामुख्याने स्थलनामांची जंत्री करण्याइतके मर्यादित होते. त्यानंतर भौगोलिक विचारधारेचे स्वरूपच बदलले. भौगोलिक अभ्यासाची साधनसामग्री वाढली असून नकाशांव्यतिरिक्त हवाई छायाचित्रे, उपग्रहांद्वारे घेतलेली छायाचित्रे (लँड सॅट इमेजरी) इत्यादींचा वापर केला जातो.

या नोंदीत पुढील मुद्यांना धरून विवेचन केलेले आहे : (१) भूपृष्ठावरील प्रदेशाच्या शोधनाचा स्थूल इतिहास, (२) भूगोलशास्त्रातील संकल्पनांचा उदय व विकास, (३) विसाव्या शतकातील भूगोलशास्त्राची  प्रगती, (४) भारतीय भूगोलशास्त्र.

भूपृष्ठावरील प्रदेशाच्या शोधनाचा स्थूल इतिहास

ईजिप्शियन व फिनिशियन लोकांनी इ. स. पू. सु. चौदाव्या शतकात काही मध्यपूर्वेतील देशांचे व नाईल नदीच्या खोऱ्याचे शोधन केले. उत्तर आफ्रिका व यूरोपातील आयबेरियन द्वीपकल्प (अर्वाचीन स्पेन व पोर्तुगाल) हे प्रदेशही त्यांना माहीत होते. हीरॉडोटस (इ. स. पू. ४८४ ?–४२५ ? ) या ग्रीक शास्त्रज्ञाने तांबड्या समुद्राचे वर्णन केले आहे.

ग्रीक संस्कृतीच्या भरभराटीच्या कालखंडात काळा समुद्र, दक्षिण यूरोप, पश्चिम यूरोपीय सागरकिनारा इत्यादींची माहिती नव्या सागरी मार्गाद्वारे व ठिकठिकाणी केलेल्या ग्रीक वसाहतीमुळे झाली. अलेक्झांडरच्या हिंदुस्थानावरील स्वाऱ्यांमुळे (इ. स. पू. ३२७) भारतीय उपखंडाची थोडीफार माहिती पाश्चिमात्यांना प्रथम उपलब्ध झाली. रोमन साम्राज्याच्या विस्तारामुळे निरनिराळ्या प्रदेशांची ओळख होत होती. आफ्रिकेचा उत्तर किनारा रोमन लोकांना परिचित होता.

हिप्पालस (इ. स. ७९) याने अरबांकडून मॉन्सून प्रदेशात नियमितपणे होणाऱ्या ऋतुबदलांविषयी माहिती मिळविली व त्या वाऱ्यांचा उपयोग करुन तांबडा समुद्र व हिंदुस्थान यांदरम्यानचा खुल्या समुद्रातील सागरी व्यापारी मार्ग शोधून काढला. टॉलेमीचा जिऑग्रॅफिया हा विशेष महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यात भारतीय द्वीपकल्पाचा पूर्व आणि पश्चिम किनारा तसेच उत्तर भारत यांतील स्थळांविषयी माहिती आहे. रोमन सम्राट जस्टिनिअन याच्या कारकीर्दीत (इ. स. ५२७ ते ५६५) नेस्टोरियन पंथाचे दोन धर्मप्रसारक खुष्कीच्या मार्गाने कॉन्स्टँटिनोपलपासून चीनपर्यंत गेले. त्यांनी तेथून भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशात पहिल्यांदा रेशमाचे किडे आणले.

रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर भौगोलिक ज्ञानात भर घालण्याचे कार्य काही अरब शास्त्रज्ञांनी केले. इस्लामचा प्रसार, अरबांचा भारत व चीन यांच्याबरोबर वाढत असणारा व्यापार आणि संलग्न आफ्रिका खंडातील दूरवरच्या भागाशी होत असलेला व्यवहार यांमुळे अनेक अरब शास्त्रज्ञांनी प्रवासातील आपले अनुभव दैनंदिनीच्या व प्रवासवर्णनपर ग्रंथाच्या रुपाने लिहीले. त्यांत अल् इद्रीसी, अल् मसूदी यांचे कार्य महत्त्वाचे होते.

उत्तर ध्रुवीय प्रदेश

उत्तर ध्रुवीय प्रदेशाचे शोधन प्रथम नॉर्स या दर्यावर्दी लोकांनी केले. त्यांत इ.स. दहाव्या शतकातील एरिक द रेड व त्याचा मुलगा एरिकसन लेव्ह यांची प्रामुख्याने गणना होते.

ग्रीनलंड बेट व अमेरिका खंड यांचा शोध लावण्याचे श्रेय या बापलेकांना दिले जाते. आशिया–आफ्रिका यांदरम्यानचा खुष्की मार्ग शोधून यूरोपातून निघून मध्य आशियातील ओसाड व डोंगरी प्रदेश ओलांडून चीनला जाऊन, तेथे राहून, मलाया व हिंदुस्थानमार्गे घरी परतून आपल्या सफरीतील देशांची विविध मनोरंजक माहिती देऊन मार्कोपोलो (१२५४ –१३२४) याने पूर्वेकडील भौगोलिक ज्ञानात महत्त्वाची बरीच भर घातली.

इब्न बतूता (१३०४ ? –७८) या अरबी प्रवाशाने आपल्या पुस्तकांतून अरबस्तान, इराण, हिंदूस्थान, चीन, मलाया, पूर्व व पश्चिम आफ्रिकेचे किनारी प्रदेश व सहारा वाळवंट यांची चांगली माहिती दिला आहे. इ. स. चौदा ते सोळा या शतकात आशिया व आफ्रिका खंडातील खुष्की मार्गाच्या शोधामुळे व्यापार व दळणवळण वाढले. याच काळात दक्षिण यूरोप व चीन यांमधील व्यापारास अत्यंत उपयुक्त ठरलेला रेशीम मार्ग (सिल्क रूट) प्रसिद्धीस आला.

सागर व सागरी मार्गाचे शोध

१४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या हाती पडल्यावर यूरोपमधून भारताकडे येण्याचा खुष्कीचा मार्ग बंद झाला. त्यामुळे समुद्रमार्गे भारताकडे जाण्याचे मार्ग शोधणे आवश्यक ठरले. त्याच सुमारास नौकानयनात होकायंत्राचाही उपयोग होऊ लागला. या नवीन साहसात पोर्तुगाल व स्पेन यांनी आघाडी मारली.

पोर्तुगालच्या प्रिन्स हेन्ऱी द नॅव्हिगेटर या राजपुत्राने यात पुढाकार घेतला. प्रथम पोर्तुगिजांनी आफ्रिकेचे दक्षिण टोक शोधले (१४८८) व मग वास्को द गामा आफ्रिकेला वळसा घालून हिंदुस्थानात पोहोचला (१४९८). स्पेनच्या राजाने क्रिस्तोफर कोलंबस या साहसी नाविकाला आर्थिक व इतर मदत दिली. पश्चिमेकडून हिंदुस्थानाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणारा कोलंबस तोपर्यंत अज्ञात असणाऱ्या अमेरिका खंडाच्या पूर्वेकडील बेटांवर (वेस्ट इंडीज) १४९२ मध्ये प्रथम पोहोचला व नंतर अमेरिकेच्या भूखंडावर त्याने आपले पाऊल ठेवले. नवज्ञात अमेरिका नवे जग म्हणून ओळखली जाऊ लागली. आमेरीगो व्हेसपूची याच्या सन्मानार्थ या नव्या खंडाला पुढे अमेरिका हे नाव देण्यात आले.

नवी  क्षितिजे

सोळाव्या शतकात यूरोपहून आशियास पश्चिमेकडून जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याच्या प्रयत्नांमागे ख्रिस्ती धर्माचा प्रसार, नव्या प्रदेशातील साधनसंपत्तीची लालसा, साम्राज्यवाद, साहस करण्याची जिद्द, गुलामांचा व्यापार यांसारखी प्रेरक उद्दिष्टे होती. या प्रयत्नांत स्पॅनिश ,पोर्तुगीज, इंग्लिश नाविकांनी उत्तर व दक्षिण अमेरिका या खंडातील तसेच आफ्रिकेच्या सागरी किनारी प्रदेशाची बरीच माहिती मिळविली.

पोपच्या लवादान्वये स्पेनकडे पश्चिम गोलार्धात व पोर्तुगालकडे पूर्व गोलार्धात नवे प्रदेश शोधण्याचे हक्क प्राप्त झाले स्पॅनिश लोकांनी मध्य व दक्षिण अमेरिकेतील अंतर्गत प्रदेश शोधले व जिकंले,तर पोर्तुगीजांनी सीलोन (श्रीलंका) व ईस्ट इंडीज या मसाल्याच्या बेटांकडे आपले लक्ष वळविले. या सर्व नवीन प्रदेशांच्या शोधात मॅगेलन. कॅबट. फ्रोबिशर या नाविकांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. मॅगेलन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाला होता. या सफरीत त्याला जरी मृत्यू आला, तरी त्याच्या पथकाने जगातील पहिली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. इंग्लंडमध्येही समुद्रमार्ग संशोधनाबद्दल औत्सुक्य वाढू लागले. हॅक्लूटच्या अनेक प्रवासवर्णनांनी अज्ञात व दूरवरच्या देशांबद्दलचे कुतूहल वाढले. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत (१५५८–१६०३) अशा सागरी साहसांना उत्तेजन मिळत गेले. पूर्वेकडील व्यापाराच्या निमित्ताने इंग्रजांनी हळूहळू वसाहती करून ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला.

सतराव्या व अठराव्या शतकांतही व्यापार व वसाहतवाद यांच्या स्पर्धेत स्पेन व पोर्तुगाल मागे पडले व इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड यांनी आघाडी मिळविली. डच लोकांनी दक्षिण आफ्रिकेत आपला पगडा बसवून पुढे जावा. सुमात्रा ही आग्नेय आशियातील बेटे काबीज केली. जेम्स कुक याने पॅसिफिक महासागरातील अनेक बेटांचा शोध लावून (१७६८–७१) ऑस्ट्रेलियाचा किनारा निश्चित केला. या काळात कुक व बेलिंग्सहाउझेन हे अंटार्क्टिक प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. अठराव्या शतकात अंटार्क्टिका खंडाचा बहुतेक सागरी किनारा व लगतचे प्रदेश ज्ञात होऊन त्यांचे व तेथे पोहोचणाऱ्या मार्गाचे नकाशे तयार होऊ लागले.

आफ्रिका खंडाचा उत्तर व ईशान्य किनारी प्रदेश, अंतर्भागातील उंटांच्या तांड्यांच्या मार्गावरील प्रदेश हे बऱ्याच काळापासून ज्ञात असूनही, त्या खंडांच्या अंतर्भागाचे शोधन अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी सुरू झाले. विशेषतः  नाईल नदीचा उगम, नायजर नदीचे मध्यखोरे,सहारा व कालाहारी वाळवंटी प्रदेश, मोठ्या सरोवरांचा प्रदेश या भागांविषयी कुतूहल निर्माण झाले. या कार्यात डेनम, क्लॅपर्टन, लिव्हिंगस्टन, बर्टन, स्पीक, बेकर, स्टॅन्ली यांचा वाटा फार मोठा आहे. जसजसे आफ्रिका खंड ज्ञात होऊ लागले. तसतशी यूरोपीय राष्ट्रांमध्ये तेथे वसाहती करण्याची महत्त्वाकांक्षा वाढली. त्यामुळेही फ्रेंच , बेल्जियन व जर्मन सैनिकी अधिकारी मिशनरी व प्रवासी यांनी प्रादेशिक, भौगोलिक ज्ञानात भर घातली.

ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा इंडोनेशियन रहिवाशांना पुरातन काळापासून माहीत असावा, असे अनुमान निघते. तथापि या खंडाची पद्धतशीर व पूर्ण माहिती तेथील गौरवर्णीय वसाहतकारांपासून एकोणिसाव्या शतकातच झाली. प्रथमतः  सर्व किनारा, नंतर आग्नेय पर्वतीत भाग व मरी –डार्लिंगचे खोरे, त्यानंतर नैऋर्त्य किनारी प्रदेश व शेवटी खंडांतर्गत वाळवंट व उत्तरेकडील प्रदेश या अनुक्रमाने ऑस्ट्रेलिया खंडाची माहिती मिळत गेली. फ्लिंडर्स, औक्स्ली, स्ट्यूअर्ट, बर्क, फॉरेस्ट, ग्रेगरी द्वय, वॉरबर्टन, जाईल्स द कार्नेगी यांनी या संशोधनात विशेष पुढाकार घेतला.

उत्तर व दक्षिण अमेरिका या भागांचे पद्धतशीर शोधन हे पोर्तुगीज व स्पॅनिश लोकांच्या दक्षिण अमेरिकेतील वर्चस्वापासून सुरू झाले. प्रथमतः किनारपट्टी व विशाल नद्यांच्या खाड्यांपासून अंतर्भागातील काहीशी माहिती बांडेरा या साहसी गटांनी मिळविली. ओरेयाना या स्पॅनिश प्रवाशाने अँमेझॉनच्या खोऱ्याविषयी अधिक माहिती मिळविली. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर स्थानिक झालेल्या इंग्लिश वसाहतीचा राजकीय प्रभाव जसजसा पश्चिमेकडे वाढू लागला, तसतसे खंडाच्या अंतर्भागांचे ज्ञान मिळू लागले. याचे श्रेय डॅन्येल बून व इतर पुढाऱ्यांना बऱ्याच प्रमाणात दिले जाते. लूइझिअँना तहानुसार (१८०३) स्पेनचे दक्षिण व पश्चिम भागांतील महत्त्व कमी होऊन पुढे ब्रिटिशांचा प्रभाव वाढला. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर स्वतंत्र अमेरिकन राष्ट्राला अमेरिकेच्या पद्धतशीर सवक्षणास व शोधनास मुभा मिळाली.

आशियातील अंतर्भाग

आशिया खंडातील ओसाड व डोंगराळ अशा अज्ञात प्रदेशांच्या शोधनात टी. ई. लॉरेन्स व रिचर्ड बर्टन (अरबस्तान) एव्हरेस्ट, स्ट्रेची, गॉडविन–ऑस्टिन, श्लोगेनवेट बंधू, आब्रूत्सी, वर्कमन (हिमालय) ह्यूक, गॅबेट व फ्रेशफील्ड, पर्झेव्हाल्यस्की, यंगहजबंड, ऑरेल स्टाइन, डब्लू. एम्. डेव्हिस हंटिंग्टन (मध्य आशिया–गोवी) ,स्मिथ, टिलमन (गिर्यारोहण) यांनी भौगोलिक ज्ञानात भर घातली. भारतीयांच्या दृष्टीने गौरवास्पद गोष्ट ही की, आशियातील अंतर्भाग संशोधनात काही भारतीयांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे.

पंडित या नावाने ओळखले गेलेले नैनसिंग व किशनसिंग आणि इतर काही धाडशी सर्वेक्षण तज्ञ यांनी वायव्य सरहद्द प्रांत, तिबेट, हिमालय या प्रदेशांत संचार करून महत्त्वाची माहिती गोळा केली. या सर्वांना ब्रिटिश सरकार गुप्तपणे मदत करीत होते.

आर्क्टिक व अंटार्क्टिक प्रदेशांचे विशेष शोधन एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत झाले. या बाबतीत रॉस, मारकम, नूर्डेनशल्ड, नान्सेन, आमुनसेन, रॉबर्ट पीअरी, बर्ड, नॉबीले, विल्क्स, स्कॉट, शॅकल्टन या प्रवाशांनी विशेष कामगिरी बजावली. दुसऱ्या महायुद्धात व युद्धानंतर विमाने व कृत्रिम उपग्रह यांच्या साहाय्याने दोन्ही ध्रुवीय प्रदेशांविषयीच्या माहितीत खूपच भर पडली आहे. अगदी अलीकडे (१९८२–८३) भारतीय संशोधकांनीही अंटार्क्टिका खंडाविषयी आपल्या ज्ञानात बरीच उपयुक्त भर घातली आहे.

भूगोलशास्त्रातील संकल्पनांचा उदय व विकास

भौगोलिक संकल्पनांचा उदय आणि विकास यांची दीर्घकालीन परंपरा असल्याचे दिसून येते. या संदर्भात मेलानीशियातील नौकानयनाचे आराखडे किंवा बॅबिलन येथील मणिशंखाचे आराखडे, कोरलेल्या विटा उल्लेखनीय आहेत. ग्रीक काळात पृथ्वीचा आकार, तिच्या परिघाचे मापन इत्यादींची प्रादेशिक वर्णने व माहिती मायलीटसचा थेलीझ, एराटॉस्थीनीझ, हीरॉडोटस वगैरेच्या लिखाणांत सापडते. ‘भूवर्णन’ या शब्दाचा उपयोग एराटॉस्थीनीझने प्रथम केला असावा असे अनुमान आहे.

नकाशे काढण्याकरिता प्राथमिक स्वरूपाचे प्रक्षेपणाचे तंत्र वापरण्यास या काळात प्रारंभ झाला. इतिहास व भूगोल यांतील परस्पर–संबंधांचा विचारही याच काळात मांडला गेला. मानव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधविषयक विचार ॲरिस्टॉटलसारख्या तत्वज्ञांनी मांडला. होमरच्या ओडिसीमध्येही भूवर्णनाचा उल्लेख आढळतो. रोमन साम्राज्यकालात स्ट्रेबो (इ. स. पू. ६४ ते इ. स. २०) याने प्रदेशविषयक विश्वकोशच लिहिला, तर जगाचा पहिला नकाशा काढण्याचे श्रेय टॉलेमीकडे (इ. स. ९०–१६९) जाते. त्याने अक्षांश रेखांश यांचीही चर्चा केली. रोमन लोकांचा भर प्रामुख्याने सर्वेक्षणावर होता.

ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतरच्या काळात बऱ्याच धर्मवेड्या समजुती भौगोलिक कल्पना म्हणून प्रचलित झाल्या. तथापि यूरोपातील  धर्मयुद्धांमुळे (क्रूसेड्‌स) यूरोपियनांच्या आफ्रिकेबद्दलच्या कल्पना बदलल्या व मार्को पोलोच्या सफरीमुळे यूरोपमधून चीनमध्ये मध्य आशियामार्गे जाण्यासाठी खुष्कीचा मार्ग ज्ञात झाला.

इस्लामच्या वाढत्या प्रसारामुळे अरब शास्त्रज्ञांचा भारत, ग्रीस यांसारख्या प्रदेशांशी संबंध आला व त्यांनी खगोल व निरनिराळे प्रदेश यांविषयी आपल्या लिखाणांत विस्तृत माहिती दिली. इब्न बतूता (१३०४–७८) अल् बीरूनी (९७३–१०४८?) इब्न खल्दून (१३३२–१४०६) यांच्या लिखाणांतून एकूणच ग्रीक ज्ञानपरंपरा जतन करण्यात आली; त्यांत ग्रीक भौगोलिक कल्पनांचा अंतर्भाव होता. याशिवाय जागतिक हवामानाबाबत त्यांनी काहीशा नव्या कल्पना मांडल्या.

यूरोपात भौगोलिक संकल्पनांचे ज्ञान रुजण्याचे श्रेय प्रथम यूरोपमधील प्रबोधनास व नंतरचे स्पेन–पोर्तुगाल यांनी केलेल्या नवीन देशांचे व सागरी मार्गाचे शोधन यांना द्यावे लागते.

सोळाव्या, सतराव्या व अठराव्या शतकांत जे अनेक भूवर्णनविषयक ग्रंथ तयार करण्यात आले, त्यांत पेट्रुस आपीआनुस याच्या ग्रंथास अग्रस्थान मिळते (१५२४) आपीआनुसच्या मर्केटर (१५१२–९४) या विद्यार्थ्याचे नाव त्याने आखलेल्या प्रक्षेपणाद्वारे सर्वश्रुत आहे. म्यून्स्टर (१५४४) क्लूव्हर (१५८०–१६२२) व व्हेरेनियस (१६२२–५०) यांचेही भूवर्णप्रचुर ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांत व्हेरनियसचे पुस्तक महत्त्वाचे गणले जाते. त्यानेच प्रथम भूवर्णशास्त्राची ‘सामान्य भूवर्णन’ व ‘विशेष भूवर्णन’ अशी विभागणी केली. पुढील जवळजवळ १०० वर्षे त्याचा ग्रंथ प्रमाणभूत समजला जाई.

अठराव्या शतकात भूगोलशास्त्राचे क्षितिज वाढू लागले. त्याचे कार्य फक्त भूवर्णापुरते मर्यादित राहिले नाही. या शास्त्राच्या स्वरूपासंबंधीचा विचारही करण्यात आला. इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४) या प्रसिद्ध जर्मन तत्ववेत्त्याने इतर शास्त्रांप्रमाणे भूवर्णशास्त्रावरही आपल्या विचारांचा ठसा उमटविला. इतिहास व भूवर्णशास्त्राची सांगड घालताना काळाचे मोजमापन व चर्चा हा ‘इतिहास’ आणि स्थलांचा विचार हे ‘भूवर्णन’ असे त्याने पटवून सांगितले. त्याचप्रमाणे भूवर्णनशास्त्राची विविध उपांगे कोणती व ती कशी आहेत, यांचीही चर्चा त्याने केली. भूवर्णनशास्त्राची व्याप्ती व चौकट तसेच या शास्त्राचा इतर शास्त्रांशी असलेला परस्परसंबंध कांटने विशद करून सांगितला.

अठराव्या शतकाच्या शेवटी भूगोलशास्त्राचे स्वरूप जवळजवळ संपूर्ण बदलले, आधुनिक भूगोलशास्त्राचा पाया घालण्याचे श्रेय अलेक्झांडर फॉन हंबोल्ट (१७६९–१८५९) व कार्ल रिटर (१७७९–१८५९) या दोन शास्त्रज्ञांना दिले जाते. हंबोल्टने पाहिलेल्या निरनिराळ्या देशांचे वर्णन करताना भूस्थलांवर दिसणारे साम्य आणि विविधता यांची पद्धतशीर कार्यकारणमीमांसा केली. निसर्गात हवामानासारख्या घटकांचे आपण प्रत्यक्ष मापन करू शकतो हे त्याने दाखविले. या नैसर्गिक क्रिया कशा घडतात व बदलत जातात याचे त्याने स्पष्टीकरण दिले.

कॉसमॉस (१८४५–६२) या ५ खंडात प्रसिद्ध केलेल्या आपल्या ग्रंथात हंबोल्टने या गोष्टीचा ऊहापोह केला आहे. रिटरने हंबोल्टप्रमाणे विविध देशांचा प्रवास केला नव्हता. तो आरंभी इतिहासाचा प्राध्यापक होता आणि नंतर तो भूगोलशास्त्राकडे वळला. त्याच्या लिखाणावर हगेलच्या विचारांचा परिणाम झाला होता; त्याने भूगोलशास्त्र मानवकेंद्रित पायावर उभे केले. त्यामुळे त्याच्या विश्लेषणात थोडी त्रृटी जाणवते. पण त्याने केलेला सृष्टीनिरीक्षणाचा तुलनात्मक अभ्यास आदर्श ठरतो. हंबोल्ट व रिटर यांनी दाखविलेल्या भिन्न कार्यपद्धतीचा भूवर्णनशास्त्राच्या पुढील प्रगतीस फार उपयोग झाला.

हंबोल्ट व रिटर यांच्यानंतरच्या भूवर्णशास्त्राच्या प्रगतीत अनेक उपांगे निर्माण झाली व वाढली. कार्यपद्धती आणि तंत्रे यांतही फरक पडला. भूवर्णनशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टीकडे ,त्याचे ध्येय आणि उद्दिष्टे यांतही महत्त्वपूर्ण बदल घडून आले. प्रदेशा-प्रदेशांमधील दिसून येणाऱ्या समान व भिन्न घटकांकडे तज्ञांचे विशेष लक्ष वेधले. कार्यपद्धतीत इतरांनी लिहिलेल्या वृत्तांतावर विसंबून न राहता भूघटकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे, त्याची नकाशावर नोंद करणे आणि भौगोलिक वर्णनाऐवजी भूवर्णशास्त्राशी निगडीत असलेले घटक व त्यांविषयीचे प्रश्न शोधून  त्यांचा अभ्यास करणे असे प्रमुख बदल घडून आले.

एकोणिसाव्या शतकात हंबोल्ट व रिटर यांचा जर्मनीतील शिष्यवर्ग आणि फ्रान्समधील भूगोलतज्ञ हे भूवर्णनशास्त्राचे अभ्यासक म्हणून अधिक महत्त्वाचे ठरले. फ्रेंच भूगोलतज्ञांनी या विषयाचा प्रादेशिक विवरणशास्त्र या दृष्टीकोनातून अभ्यास केला. पुढे माल्ट–ब्रून (१७७५–१८२६) रक्ल्यू (१८३०–१९०५) व्हीदाल द ला ब्लाश (१८४५–१९१८) यांनी या पद्धतीचा पाया रोवला. व्हीदलचा तर त्याच्या अनेक शिष्यांवर इतका प्रभाव उमटला की, ‘व्हीदाल परंपरा’ (ला त्रॅदिशीयेन व्हीदालियन) ही भूवर्णनशास्त्रातील महत्त्वाची घटना समजली जाते. एखाद्या प्रदेशातील भूरचना, हवामान, वनस्पती, प्राणिजीवन, मानवनिर्मिती घटक व मानवाचा निसर्गाच्या चौकटीत चाललेला प्रदीर्घ प्रयत्न यांचा अभ्यास करून या सर्व घटनांचे संश्लिष्ट व सुंदर असे चित्र चितारण्यात फ्रेंच भूगोलतज्ञ अग्रेसर मानले गेले.

व्हीदालचा शिष्य ब्रुने (१८६९–१९३०) यानेही या परंपरेत भर घातली. या गुरू-शिष्याचे मानवी भूगोलविद्येवरचे ग्रंथ अद्यापही मौलिक समजले जातात. गाल्वा, दमानझॉन्, द मार्तां, जॉर्ज ,रोबकेन इ. नंतरच्या शास्त्रज्ञांनी व्हीदालची परंपरा जास्त समृध्द केली. याच काळात जिऑग्राफिक युनिव्हर्सल ही (१८१०–२९) सुरू झालेली. विश्वकोशमालिका नवीन ग्रंथांनी व आवृत्त्यांनी उच्च स्तरावर नेली. फ्रेंच भूगोलतज्ञांच्या शाखेबरोबरच रिख्थोफेन राटसेल व इतर शिष्य यांनी जर्मनीत भूगोलाची परंपरा सुरू ठेवली होती. या परंपरेचा भर भौगोलिक तत्वविचारांवर अधिक होता. शास्त्रातील ‘नियतिवाद’ राटसेलने प्रचलित केला व त्याचे उत्तर म्हणून व्हीदालने ‘शक्यतावाद’ मांडला.

विसाव्या शतकातील भूगोलशास्त्राची प्रगती

या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच व जर्मन शाखांचा भूगोलशास्त्रावर पगडा होता. कालांतरांने ब्रिटिश, अमेरिकन, स्लाव्ह या शाखा उदयास आल्या. अलीकडे रशियन भूगोलतज्ञांची शाखाही आपला प्रभाव पाडत आहे.

या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीचा प्रभावही भूवर्णनशास्त्रावर पडला. विज्ञानाबरोबरच इतर सामाजिक शास्त्रे हीदेखील भूवर्णनशास्त्राजवळ आली. यांपैकी काही विषयीचे भूगोलशास्त्रांशी अतिशय अर्थपूर्ण संयोजन होऊन भूगोलाच्या नव्या उपशाखा निर्माण झाल्या . उदा. राज्यशास्त्र आणि भूगोलशास्त्र यांची मिळून झालेला राजकीय भूगोल.

अशा प्रकारच्या उपशाखेत मूळ विषयामध्ये नंतर झालेली प्रगतीही प्रतिबिंबित होते. आर्थिक भूगोल हे याचे एक उदाहरण आहे. अर्थशास्त्र व भूगोल या दोहोंना संख्याशास्त्र व गणितशास्त्र यांचीही जोड मिळाली. आर्थिक भूगोल हा मग फक्त वर्णनात्मक न राहता त्यात सांख्यिकीकरणही आले.

माणसे आपल्या परिसराचे आकलन कसे करतात हा भूगोलशास्त्रातील नवा विषय आहे. अशा प्रकारे भूगोलविषयक अभ्यासाच्या नव्यानव्या उपशाखा उदयास येत आहेत. उदा. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, प्राणिभूगोल, मृदा भूगोल, आर्थिक भूगोल, वाणिज्य भूगोल, सामाजिक  भूगोल, ऐतिहासिक  भूगोल, नागरी  भूगोल, राजकीय  भूगोल, आरोग्य  भूगोल, प्रादेशिक नियोजन इत्यादी.

भूवर्णनशास्त्राच्या ध्येयातच काही मूलभूत फरक झाल्याचे आढळतात. भूवर्णनशास्त्र म्हणजे केवळ भिन्नभिन्न प्रदेशांचे यथोचित वर्णन ही कल्पना जुनी झाली आहे. भूवर्णनशास्त्राच्या विसाव्या शतकातील संकल्पना पुढीलप्रमाणे मांडल्या जातात.

(१) मानव-पर्यावरण यांचे परस्परसंबंध शोधणारे शास्त्र : हा दृष्टिकोन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास येऊन त्यास भूविज्ञान व वनस्पतिविज्ञान या शास्त्रांची जोड मिळाली. या विचारसरणीचा उगम ॲरिस्टॉटलच्या काळापासून दिसत असला, तरी डार्विनच्या क्रमविकासवादाच्या प्रभावामुळे निसर्गाचे नियमबध्द परिणाम मानवाच्या जीवितावरही होत असले पाहिजेत, असे भूगोलशास्त्रज्ञांनाही वाटू लागले. निसर्गाने निर्माण केलेल्या पर्यावरणाचा विशिष्ट प्रकारेच मानवावर प्रभाव पडतो. या विचाराचे ठळक स्वरूप रोटसेलच्या नियतिवादाच्या उपपत्तीत दिसून येते.

डेव्हिस, हंटिंग्टन, व्हिटबेक या शास्त्रज्ञांनी या उपपत्तीस पाठिंबा दिला. एलेन सेंपल ही पर्यावरणात्मक नियतिवादाची कट्टर पुरस्कर्ती होती. या संकल्पनेचा पुढील पिढ्यांवर इतका पगडा बसला की, ग्रिफिथ टेलर यांसारख्या भूगोलतज्ञांनी ही संकल्पना मूलभूत मानली. तथापि या पर्यावरणात्मक नियतिवादाचा प्रभाव नंतर कमी झाला. माणूस व पर्यावरण यांना समान संधी देऊन, व्हीदाल द ला ब्लाशने शक्यतावाद ग्रिफिथ टेलरने ‘थांबा व जा नियतिवाद’ (स्टॅप अँड गो डिटरमिनिझम) हे दोन नवे दृष्टीकोन मांडले. रशियन परंपरेत स्टालिनच्या कारकीर्दीत माणूस हा पर्यावरणावर प्रभाव पाडू शकतो. अशी संकल्पशक्तिवादी भूमिका प्रतिपादन करण्यात आली. या दृष्टीकोनाचा प्रभाव आधुनिक रशियाच्या आर्थिक व प्रादेशिक नियोजनबध्द प्रगतीत ठिकठिकाणी उमटलेला दिसतो.

(२) भूदृश्य अभ्यासणारे शास्त्र : कार्ल साऊर याच्या ‘भूदृश्याचे स्वरूप’ या लिखाणाद्वारे हा दृष्टिकोन विशेष परिचित झाला. पण नंतरच्या शास्त्रज्ञांनी हे विश्लेषण भूरूपापुरतेच मर्यादित न ठेवता त्यास मानवाचे स्थान व कार्य यांच्या मीमांसेची जोड दिली. या दृष्टिकोनावर जर्मन शास्त्रज्ञांच्या विचारांचा व मानवशास्त्राचा प्रभाव उमटला. हा दृष्टीकोन विशेष लोकप्रिय ठरला.

(३) पृथ्वीवरील विविध घटकांचे वितरण अभ्यासणारे शास्त्र : यात नैसर्गिक (पर्वत, नद्या इ.) आणि मानवनिर्मित (शेती, कारखाने इ.) घटकांचे वितरण कसे व का झाले आहे, यांवर भर दिला जातो. आदर्श वितरण कसे असावे (उदा. क्रिस्टलरचा षट्‌कोनी जनवस्तीचा सिद्धांत) याचे सिद्धांत व प्रत्यक्ष वितरण यांमधील फरक, हेही या अभ्यासाचे मुख्य विषय होत.

(४) मानवी परिस्थितिविज्ञानाचा अभ्यास करणारे शास्त्र : मनुष्यप्राणी हा सर्व प्राण्यांच्या विविध वंशांपैकी होमो या एका वंशातील एक जाती असून त्यामध्ये काही प्रजाती आहेत आसमंतातील वनस्पती व भौगोलिक परिसर यांचा परिणाम मानवाच्या शरीरावर इतर प्राण्याप्रमाणेच होतो. मानवाचे प्राकृतिक अस्तित्व याच परिसराने घडविलेले असते. शारीरिक मानवशास्त्रात माणसाची विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत जी प्राकृतिक अवस्था आढळते. तिचे विवरण केलेले असते.

(५) प्रादेशिक भिन्नत्वाचा अभ्यास करणारे शास्त्र: या दृष्टीकोनाचा प्रचार रिचर्ड हार्टशॉर्न या अमेरिकन भूगोलतज्ञाने विशेषेकरून केला. या युक्तिवादात नैसर्गिक व मानवी या दोन्ही घटकांच्या प्रभावामुळे प्रदेशाप्रदेशांमध्ये भिन्नता कशी निर्माण होते, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला जातो.

(६) भू-राज्यशास्त्र : भूराजनीतिविचाराचा पुरस्कार मॅकिंडर व माहॅन यांनी केला. जर्मनीत नाझीवादाचा प्रचार करण्यासाठी त्यास हाउशोफरचे समर्थन लाभले. अर्थात भूवर्णनशास्त्र म्हणजे भू-राज्यशास्त्र असा आग्रह अतिरेकी स्वरूपाचा आहे व त्यामुळे त्याची वाढ होऊ शकली नाही.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून भूगोल विचारात द्विभाजन झाल्याचे दिसून येते. उदा. प्राकृतिक विरूध्द मानवी भूगोल, प्रादेशिक विरुध्द क्रमबद्ध भूगोल इत्यादी. पुढे या प्रकारचे ऐकांतिक विचार मागे पडून द्विभाजनाचा पुरस्कार मावळत गेला. ‘भौगोलिक प्रदेश’ या संकल्पनेविषयी जे मतभेद आहेत, त्यांचेही मूळ अनेक वर्षापूर्वीचे आहे.‘ भौगोलिक प्रदेश’ हा सृष्टीत खरोखरच आढळतो का ? त्याची वैशिष्ट्ये कोणती ? मर्यादा कोणत्या ? भौगोलिक प्रदेश हा तज्ञांचा मानसिक खेळ तर नाही ना ? यांसारखे अनेक प्रश्न आहेत.

काहींनी ही कल्पना ‘निष्फळ’ तर काहींनी ‘खरी आणि उपयुक्त’ ठरविली. काहींना ही सर्व वायफळ चर्चा वाटते, तर काहींनी ‘अवघड पण उपयोगी व आधारभूत कल्पना’ म्हणून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . बऱ्याच अभ्यासकांनी हे ‘मृगजळ’ सोडून भूवर्णनशास्त्रातील इतर विशेष उपशाखांकडे आपले लक्ष वेधले आहे. याचा परिणाम अलीकडील शास्त्रांत उद्‌भवलेल्या अनेक उपशाखांच्या वाढीत दिसून येतो. या सर्व उपशाखांचा गोषवारा देणेही जवळजवळ अशक्य आहे. पण एवढे खरे की, ‘भौगोलिक प्रदेश’ ही सकंल्पना भूवर्णनशास्त्रात अपरिहार्य ठरली असून अगदी अलीकडे या संकल्पनेचे पुनरुज्जीवन होऊ लागले आहे.

भूगोलविषयक निरीक्षण व विश्लेषण यांबाबतच्या कार्यपद्धतीतही क्रांतिकारक बदल घडून आला आहे. लहान प्रदेशांच्या भूरूपांची व नमुनादाखल घेतलेल्या शेतवाडी, शहर वगैरेंचे विस्तृत विवेचन करण्याची पद्धत सुरू झाली. केवळ स्थायी घटकांचाच अभ्यास न होता वाहतूक, स्थलांतर अशा गतिमान घटकांचादेखील अभ्यास होऊ लागला. समाजशास्त्र व अर्थशास्त्र यांतील सर्वेक्षण व नोंदणी या पद्धतींचा वाढता उपयोग होत आहे. विश्लेषणाकरिता नकाशा बरोबरच महत्त्वाच्या नैसर्गिक आर्थिक, सामाजिक या घटकांचे संख्याशास्त्राच्या साहाय्याने पृथःकरण केले जाते. या पद्धतीचा वापर इतक्या वेगाने सुरू झाला की, १९७० नंतरचा काळ हा ‘भूगोल विद्येतील सांख्यिकीय क्रांती’ चा काळ म्हणून ओळखला जातो. संख्याशास्त्र ,भूमिती, बीजगणित या सर्वांचा उपयोग आता भूगोलशास्त्रात होऊ लागला आहे. अनेक विद्यापीठीय अभ्यासक्रमांत ‘सांख्यिकीय भूगोल’ असा स्वतंत्र विषयही शिकविला जातो.

गणितशास्त्राच्या वाढत्या उपयोगामुळे भूगोलविद्येची मापनक्षमता वाढू लागली. या प्रकारच्या विश्लेषणाचा फायदा म्हणजे त्यावरून भविष्यातील अनुमान करण्याची शक्यता निर्माण होते. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे भूवर्णनशास्त्रातही काही नियम आढळू शकतील का? हा एक प्रश्न आहे. याचे उत्तर डेव्हिसच्या क्षरणचक्र आणि क्रिस्टलरचा षट्‌कोनी जनवस्तीविषयक सिद्धांत यांच्या आधारे अंशतः मिळू शकते. कोणत्याही प्रदेशाचा भूमिती मापनाद्वारे तसेच प्रतिमानांच्या साहाय्याने अभ्यास करण्यास प्रारंभ झाला आहे. हे विद्यमान भूगोलशास्त्राचे खास लक्षण समजले जाते. एके काळी ज्या विषयावर त्याला स्वतःचा आशय नाही. ज्याला अभ्यासाचे तंत्र नाही, जो फक्त वर्णनात्मक आहे यांसारखे आक्षेप घेतले जात ,त्याच भूगोलविचारास शास्त्राची प्रतिष्ठा मिळू लागली आहे.

नवीन कार्यपद्धतींचा वाढता उपयोग होत असला, तरी मुख्यतः प्रादेशिक, आर्थिक व सामाजिक नियोजनाकरिता ‘प्रादेशिक भूगोल’ या अभ्यासपद्धतीकडे पुन्हा लक्ष दिले जात आहे. जमिनीचा उपयोग, पर्यावरण, निसर्गसंपदा यांचे जतन व संवर्धन यांवर रशियन भूगोलतज्ञांनी विशेष भर देऊन त्यात विशेष अधिकार प्राप्त करून घेतला आहे. भारत, फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन व अन्य राष्ट्रांतही या पद्धतीवर आता भर दिला जात आहे. दुसरे म्हणजे सामाजिक विषमता, दारिद्र्य, झोपडपट्ट्या दूषित पर्यावरण यांचा सखोल विचार केला पाहिजे, ही भूमिका बहुसंख्य शास्त्रज्ञांना पटू लागली आहे. मानव-पर्यावरण संबंधाचे आणखी दोन महत्वाचे पैलू स्पष्ट होऊ लागले आहेत:

(१) निसर्गात तयार झालेले पर्यावरण व मानवी पर्यावरण यांचा अभ्यास आणि

(२) रहिवाशांना स्वतःच्या दृष्टीकोनातून पर्यावरण कसे दिसते व त्यांच्याकडून ते कसे अनुभवले जाते, यांचा विचार.

विद्यमान भूगोलशास्त्रात

(१) निसर्ग व पर्यावरण यांचे यथायोग्य विश्लेषण आणि

(२) सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा प्रादेशिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर विचार, हे मुख्य प्रवाह आहेत. भूगोलशास्त्र जसे अन्य शास्त्राची मदत घेते. त्याचप्रमाणे या शास्त्राचा अन्य शास्त्रांनाही चांगला उपयोग होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

नकाशाशास्त्रातही भूगोलतज्ञांनी मौलिक भर घातली आहे. भूगोलशास्त्रीय अभ्यासात स्थलवर्णनात्मक नकाशे (टोपोशीट्‌स) अनेक वर्षे वापरले जात आहेत. बर्न येथील आंतरराष्ट्रीय भूगोलतज्ञांच्या परिषदेत (१८९१) आल्ब्रेख्ट पेंग्ख यांनी साऱ्या जगाकरिता एकाच प्रमाणावर नकाशांची मालिका काढण्याची सूचना मांडली. अनेक अडचणींना तोंड देत १९३९ सालापर्यंत अपेक्षित ९७५ नकाशापैकी ४०५ प्रसिद्ध झाले. १ : १०,००,००० अथवा ‘आंतरराष्ट्रीय नकाशे’ या नावाने ओळखली जाणारी ही योजना संपूर्ण यशस्वी झाली नसली, तरी त्यामुळे याच प्रमाणावर इतर काही नकाशे (जसे रोमन साम्राज्याचा, लॅटिन अमेरिकेचा) काढण्यास चालना मिळाली.

सर्वेक्षण व प्रत्यक्ष निरीक्षण यांद्वारे भूमि-उपयोग नकाशांची पद्धत इंग्लंडमध्ये डडले स्टँपने अंमलात आणली व तिचे अनुकरण इतरत्र करण्यात आले. जागतिक पातळीवर ‘हवामान प्रदेश’, ‘कृषि प्रदेश’, ‘विशाल नैसर्गिक प्रदेश’ यांसारख्या संकल्पना नकाशारूपात हर्बर्ट्‌सन, टेलर यांसारख्या भूगोलतज्ञांनी मांडल्या.

त्याचप्रमाणे लहान , मध्यम व मोठ्या आकाराच्या प्रदेशांचे विषय वार नकाशासंच (अँटलास) विविध देशांकरिता तयार होऊ लागले आहेत. आपल्या ‘भारतीय राष्ट्रीय अँटलास’ प्रमाणे बहुतेक सर्व प्रगत व विकसनशील राष्ट्रांनी आपापले राष्ट्रीय नकाशासंग्रह प्रसिद्ध केले आहेत. प्रादेशिक नियोजनाकरिता त्यांचा उपयोग होतो. या प्रकारच्या नवीन संचात द ग्रेट सोव्हिएट अँटलास; द टाइम्स सर्व्हे अँटलास ऑफ द वर्ल्ड व कल्चरल अँड हिस्टॉरिकल अंटलास ऑफ साउथ एशिया हे उल्लेखनीय आहेत.

भारतीय भूगोलशास्त्र

भारतीय भूगोलशास्त्राचा आढावा घेत असताना सोईसाठी त्याच्या इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन टप्पे पाडता येतील.

प्राचीन म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या पूर्वीचा कालखंड मानता येईल. चारही वेदांतून वेदनकालीन भारताची माहिती मिळते. धर्मसूत्रे (वसिष्ठ व बोधायन), धर्मशास्त्रे ,पाणिनीचे व्याकरण, पतंजलीची योगसूत्रे, रामायण (किष्किंधा कांड), महाभारत (भीष्मपर्व), पुराणातील भुवनकोश, मार्कंडेयपुराण, भागवतपुराण यांसारख्या अनेक हिंदू ग्रंथांतून भूगोलाचे उल्लेख आढळतात. कदाचित हिंदू धर्मातील तीर्थयात्रांना दिलेल्या महत्त्वानुसार असेल, पण भारतवर्षातील बऱ्याच स्थळांचे निर्देश बरोबर आढळतात. सप्तखंडे व त्यांभोवती असलेले सप्तसमुद्र अशी हिंदूची जगाबद्दलची संकल्पना होती. बौद्धांच्या पाली भाषेतील ग्रंथांतूनही भौगोलिक संकल्पना आढळतात. उदा., जंबुद्वीपाची कल्पना. त्यांच्या भूगोलात आठ द्वीपे मिळून झालेले जग अशी कल्पना आहे. जैन समजुतीप्रमाणे १९ द्वीपे तितकेच समुद्र होते. तसेच तमिळ भाषेतील ‘संगम वाङ्मया’ मध्ये भौगोलिक माहिती बरीच आढळते. प्राचीन शिल्पकला व कोरीव लेण्यातं तसेच ककालिदासादी श्रेष्ठ वाङ्मयकर्त्यांच्या लिखाणांतही उत्कृष्ट दर्जाचे भौगोलिक वर्णन आढळते.

मध्ययुगीन काळातील (इ. स. १००० ते ब्रिटिश अमदानी) भूगोलविषयक ज्ञान, काही यात्रावर्णने, अरबी व फारसी प्रवासवर्णनांत, बखरी व जंत्र्यांत मिळू शकते. या दृष्टीने महानुभव पंथाची ‘स्थळपोती’ उल्लेखनीय आहे. संस्कृत भाषेमधील बौद्धांच्या ग्रंथामधून भारतीय प्रदेशाची माहिती असली, तरी भूगोलशास्त्राच्या दृष्टीने त्याचे महत्व अल्प आहे.

पाणिनीच अष्टाध्यायी, कौटिल्याचे अर्थशास्त्र, राजशेखरची काव्यमीमांसा भरताचे नाट्यशास्त्र, वात्स्यायनाचे कामसूत्र, कल्हणाची राजतरंगिणी यांसाऱख्या ग्रंथांतूनदेखील स्थलवर्णने आढळतात. मानसार या ग्रंथात ‘नगररचना व योजना’ याविषयीची माहिती मिळते. देशी व विदेशी प्रवाशांच्या लिखाणात स्थलवर्णने दिलेली आहेत. भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियाई प्रदेशात झाला असला, तरी या विस्तृत प्रदेशाचे तत्कालीन भूवर्णन, जहाजमार्गे इत्यादींबद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे.या काळात भूगोलशास्त्रावरील खास चर्चा करणारे ग्रंथ उपलब्ध झालेले नाहीत.

आधुनिक काळात म्हणजे ब्रिटिश अमदानीत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेले अनुभव, त्यांच्या रोजनिश्या, प्रवासवर्णने व शासकीय अहवाल यांमधील अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील भौगोलिक माहिती महत्त्वाची आहे. या काळातच भारतीय भूगोलशास्त्राला नवी दिशा मिळाली. प्रथमच भारतीय सर्वेक्षण संस्थेद्वारे देशाचे उत्कृष्ट नकाशे मिळाले. त्याचप्रमाणे ब्रिटिश शासनकर्त्यांना मार्गदर्शनासाठी भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक माहिती देणारे इंपीरिअल वा जिल्हा गॅझेटीअर प्रकाशित झाले. अर्थात हे कार्य राज्यकर्त्यांनी आपली शासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी केले होते. या भौगोलिक माहितीचा तत्कालीन भूगोलाच्या शालेय पाठ्यपुस्तकांवर मात्र फारसा प्रभाव पडला नाही.

एकोणिसाव्या शतकातील भूगोलाची पाठ्यपुस्तके म्हणजे ब्रिटिश पाठ्यपुस्तकांचा वेळीवेळी केलेला अनुवाद एवढेच म्हणता येईल. १९६० नतंरच्या काळात भूगोल पाठ्यपुस्तकविषयक लिखाण स्थानिक संदर्भासह व नकाशाच्या अर्थपूर्ण वापरासह देण्याचा प्रयत्न सुरू झाला. भूगोलविषयक पाठ्यपुस्तकनिर्मितीचा राज्य पातळीवरील अनुकरणीय प्रयत्न प्रथम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती मंडळाने केला.

सुमारे १९३० पर्यंत भूगोल हा विषय केवळ शाळांतूनच शिकविला जात असे. विद्यापीठीय स्तरावर भूवर्णनशास्त्र अध्यापन व अध्ययन हे प्रथम अलीगढ मुस्लीम विद्यापीठ आणि कलकत्ता व मद्रास या विद्यापीठांत सुरू झाले. आता जवळजवळ ७० विद्यापीठांत सु. ६,००० शिक्षक हा विषय पदवी व पदव्युत्तर कक्षेपर्यंत शिकवितात. विद्यापीठांतून या विषयाचे संशोधनकार्यही चालू आहे.

काही प्रमाणात पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याने भारतीय भूगोल विद्येची प्रगती होत गेली आहे. प्रथमतः  ब्रिटिश भूगोलतज्ञांचा प्रभाव पडण्याचे कारण म्हणजे पहिले भारतीय शिक्षक हे त्यांचेच विद्यार्थी होते. तथापि फ्रेंच व जर्मन तज्ञांचा व त्यांच्या लिखाणाचाही काहीसा परिणाम दिसून येतो. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकनांच्या ‘भूगोल अध्ययन, अध्यापन व संशोधन’ पद्धतीचा प्रभाव भारतातील नव्या पिढीतील तेथे अभ्यास केलेल्या भूगोलतज्ञांवर दिसून येतो . त्यामुळे या पिढीतील भारतीय भूगोलतज्ञ या विषयाकडे भारतीय दृष्टीकोनातून पाहू लागले आहेत.

भारतात ‘प्रादेशिक भूगोल’, शेतीच्या दृष्टीने केलेले भसर्वेक्षण यांसारख्या बाबतीत महत्त्वाचे कार्य होत आहे. वनस्पती, शहरे, लोकसंख्या, आर्थिक व सामाजिक विकास यांसारख्या घटकांवर भारतीय परिस्थितीला अनुरूप असे बरेच ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. इंग्रजी बरोबर भारतीय भाषांमध्येही अशी ग्रंथसंपदा वाढत आहे.

‘राष्ट्रीय अँटलास संघटना’ ही संस्था उपयुक्त नकाशे वेळोवेळी प्रसिद्ध करते. भूगोलतज्ञांच्या आणि सर्वेक्षणतज्ञांच्या प्रेरणेने नवीनच स्थापन झालेली इंडियन नॅशनल कार्टोग्राफर्स असोसिएशन ही संस्था वार्षिक परिषदा व प्रकाशने यांद्वारे भूगोलविद्येस पूरक ठरणारे कार्य करीत आहे. १९६१ पासून जनगणना आयोगातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या जनगणनाविषयक प्रकाशनांत भौगोलिक दृष्टीकोनास महत्त्वाचे स्थान लाभले आहे.

‘प्रादेशिक नियोजन’ हा विद्यापीठीय अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा विषय असून नागरी व ग्रामीण नियोजन प्रकल्पांच्या निर्मितीत भूगोलतज्ञांची मोठीच मदत होते. १९६८ साली नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषद भरविण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोग व भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंघान परिषद (आयसीएस्एस्आर) या केंद्रीय संस्थांकडून अध्यापन पद्धतीमधील सुधारणा आणि संशोधन या विषयांना प्रोत्साहन दिले जाते. रिव्हू इन जिऑग्रफी १९७२ या उपयुक्त संदर्भग्रंथाचे प्रकाशन भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेतर्फे करण्यात आले. देशात ठिकठिकाणी भूगोल विद्यामंडळे स्थापन झालेली असून या मंडळातर्फे वार्षिक परिषदा होतात व त्यानिमित्ताने शोधनिबंध वाचले जातात.

ह्या सर्व मंडळांची मासिकेही प्रसिद्ध होतात. महाराष्ट्रात बाँबे जिऑग्राफिकल मॅगझीन (मुंबई), ट्रान्स ॲक्शन ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिऑग्राफर्स (पुणे), डेक्कन जिऑग्राफर (अमरावती व हैदराबाद) ही संशोधनाला वाहिलेली काही मासिके आहेत. कलकत्त्याहून प्रसिद्ध होणारे जिऑग्राफिकल रिव्हू ऑफ इंडिया, मद्रासचे इंडियन जिऑग्राफिकल जर्नल अलीगढचे दि जिऑग्राफर वाराणसीचे नॅशनल जिऑग्राफिकल जर्नल ऑफ इंडिया, गौहातीचे नॉर्थईस्टर्न जिऑग्राफर इ. महत्त्वाची प्रकाशने आहेत. हिंदीतील भू दर्शन (उदयपूर) तर मराठीतील भूगोल शिक्षक त्रैमासिक ही प्रकाशने महत्त्वाची आहेत.‘ नागी’ (नॅशनल असोसिएशन ऑफ जिऑग्राफर्स इंडिया) ही संस्था वार्षिक परिषदा घेते व ॲनल्‌स हे नियतकालिक प्रसिद्ध करते.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एनसीईआरटी) तसेच इतर संबंधित मंडळांद्वारे भूगोलाच्या शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीकोनातून भूगोल शिक्षणावरही संशोधन होत आहे. मुंबईत ‘नॅशनल असोशिएशन ऑफ ब्लांइंड’ या संस्थेच्या पुढाकाराने अंधाकरिता एक नकाशासंग्रहही तयार करण्यात आला आहे. विद्यापीठीय स्तरावरील दर्जेदार पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीतही भूगोलशास्त्रज्ञांनी मोठा हातभार लावला आहे.

संदर्भ :

1. Brunhes, J. Human Geography London, 1952.

2. Chisholm M. Human Geography, 1975.

3. Chorley R. J. Directions in Geography, 1973.

4. Chorley R. J. Haggett P., Ed., Frontiers in Geographical Teaching, London, 1965.

5. Cooke R. V.; Johnson, J. H. Trends in Geography :An Introductory Survey, London, 1969.

6. Cronc, G. R. Maps and Their Makers London, 1962.

7. Freeman, O. W. Raup, H. F. Essentials of Geography ,London, 1949.

8. Gregory D. Ideology Science and Human Geography, 1968.

9. Griffith Taylon Ed, Geography in the Twentieth Century, New York, 1962.

10. Haggelt P. Geography : A, Modern Synthesis, New York, 1975.

11. Indian Council of Social Science Research, A Survey of Research in Geography, Bombay, 1972.

12. Makinder H, G. Democratic Ideals and Reality 1942.

13. Minsbull Roger, The Changing Nature of Geography ,London, 1970.

14. Strahler, A. N. Physical Geography, New Delhi, 1971.

15. Vidal De La Blache,P.Principles of Human Geography, London, 1962.

16. Wooldridge S, W. East, W.G. The Spirit and purposeof Geography, London, 1970.

लेखक: चं. धुं. देशपांडे / अविनाश पंडित

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate