অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भूद्रोणी

भूद्रोणी

ज्याच्यात प्रादेशिक प्रमाणावर (मोठ्या क्षेत्रावर) दीर्घ काळात प्रचंड जाडीचा गाळ साचला आहे, असे भूपृष्ठावरील लांबट व निरूंद क्षेत्र. भूकवचाचा असा लांब व सापेक्षतःअरूंद भाग खालील दिशेत वाकविला जाऊन पन्हळासारखी संरचना निर्माण होते. नंतर या पन्हळात गाळ साचत जातो. पन्हळाचा तळ खचत जाणे व गाळ साचणे या क्रिया दीर्घकाळ चालू राहातात. त्यामुळे अशा जागी हजारो मीटर जाडीचा गाळ साचतो व भूद्रोणी तयार होते. भूद्रोणीच्या व्याख्येविषयी मतभेद आहेत; मात्र परंपरागत अर्थाने भूद्रोणी शेकडो किलोमीटर लांब व काही दशक किलोमीटर रूंद असते आणि तिच्यात कोट्यवधी वर्षे हजारो मीटर जाडीचे खडक साचतात. उदा., अँपालॅचिअन भूद्रोणीत (न्यूयॉर्क राज्य) सु. ३० कोटी वर्षात सु. १३,००० मी. जाडीचे गाळाचे खडक साचले आहेत. सामान्यपणे असे गाळ उथळ पाण्यात साचलेले असतात. जसजसा गाळ साचतो तसतसा भूद्रोणीचा तळ खचतो व परिणामी उथळ पाण्यातील प्रचंड जाडीचे गाळ साचू शकतात. भूद्रोणीतील गाळाची जाडी मध्यभागी सर्वात जास्त असते, तर कडांना ती कमी होत जाते. उदा., कॅलेडोनियन भूद्रोणी (वायव्य यूरोप) मध्यभागी सु. १३,००० मी. तर कडांशी सु. ४,००० मी. जाड आहे. अशा तऱ्हेने भूद्रोणीचा मधला भाग सर्वाधिक खोल गेलेला असल्याने ती पन्हळासारखी असते. मात्र तिचा पृष्ठभाग सामान्यपणे सपाट असतो.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास डब्ल्यू. बी. रॉजर्स आणि एच्‌. डी. रॉजर्स यांनी अँपालॅचिअन पर्वतातील घड्या पडलेले खडक हे एका मोठ्या खोलगट प्रदेशात साचले असल्याचे दाखवून दिले. यांपैकी बहुतेक गाळाचे खडक हे उथळ पाण्यात साचल्याचेही त्यांना आढळले. याचा अर्थ गाळ साचत असताना हा खोलगट भाग हळूहळू खचत होता, हे स्पष्ट झाले. याच काळात (१८५९ मध्ये) जेम्स हॉल यांनी भूद्रोणीची कल्पना मांडली होती. मात्र ‘जिओसिंक्लिन’ ही इंग्रजी संज्ञा जे. डी. डेना यांनी १८७३ साली अँपालॅचिअन पर्वताच्या निर्मितीच्या संदर्भात प्रथम वापरली. डेना यांच्या मते भूकवच आडव्या दिशेत दाबले जाऊन असा खोलगट भाग बनत असावा. एल्‌. डी. कॉलेट यांच्या मतानुसार दोन खंडीय ठोकळ्यांत वा भूमींत भूद्रोणी असते व तिच्यात साचलेला काही गाळ हा गौण उंचवट्याची झीज होऊन आलेला असतो. आर्‌. एम्‌. फील्ड यांच्या मते भूद्रोणी हा दोन खंडीय ठोकळ्यांतील पन्हळासारखा प्रदेश असून तो जमिनीवरील व सागरी गाळ साचण्याचे केंद्र बनलेला असतो आणि हे गाळ भूद्रोणीतील आणि तिच्या कडांजवळील व तिच्याशी निगडित अशा उंचवट्याची झीज होऊन आलेले असतात. एच्‌. शिटले हे बराच काळपर्यत खचत जाणाऱ्या सर्वच क्षेत्रांना भूद्रोणी ही संज्ञा वापरीत असत.

एकोणिसाव्या शतकाअखेरीस अँपालॅचिअन भूद्रोणी ही भूद्रोणीचे नमुनेदार उदाहरण मानले जाई. एकेकाळी लांबट व निरूंद असलेला हा पन्हळासारखा भाग कुठल्या तरी उंचवट्याने महासागरापासून अलग झालेला होता व त्याच्या सीमावर्ती प्रदेशात तयार होणारे गाळ त्यात साचत होते, असे मानीत असत. खंडाच्या दोन स्थिर टोळक्यांतील अस्थिर पट्टा म्हणजे भूद्रोणी होय. असे जी. ई. हॉग यांचे मत होते. त्यांनी ईस्ट इंडियन गर्त (खोलगट भाग) वा जपानी गर्त यांसारख्या महासागरी खळग्यांचाही भूद्रोणीत समावेश केला होता; मात्र अशा खळग्यांसाठी त्यांनी ‘फोरडीप’ (अग्रखात) ही संज्ञा वापरली. अर्थात अशा खळग्यांतील गाळ हा खोल पाण्यात साचल्याचे दिसून येते. भूद्रोणीत गाळ साचताना खचण्याची क्रिया सतत एकाच गतीने होत नसते, असे जे. बॅरेल यांनी १९१७ साली दाखवून दिले. १९२३ साली सी. शुकर्ट यांनी भूद्रोणीतील गाळ साचण्याच्या क्रिया अनेक घटकांवर अवलंबून असल्याचे दाखविले. १९४७ साली एम्‌. एफ्‌. ग्लीसनर व सी. टाइशर्ट यांनी गाळ साचणे, पर्वतनिर्मिती व भूसांरचनिक (भूकवचाच्या मोठ्या संरचनांविषयीचे) आविष्कार या दृष्टींनी भूद्रोणीचा अभ्यास केला पाहिजे असे सुचविले. एच्‌. शिटले यांनी भूद्रोणींचे वर्गीकरण केले असून त्यात एम्. के यांनी थोडी सुधारणा केली; तर जे. ओबूअँ यांनी केलेले वर्गीकरण सर्वांत अलीकडचे आहे.

भूद्रोणी या भूकवचातील सापेक्षतः दुर्बल, अस्थिर व लवचिक अशी क्षेत्रे असतात. भूद्रोणीचा तळ तिच्यावरील गाळाच्या वजनाने खालील

दिशेत वाकविला जातो, असे पूर्वी मानीत असत; परंतु केवळ गाळाच्या वजनाने भूकवचाला एवढा बाक येणार नाही, हे नंतर लक्षात आले. भूद्रोणी निर्माण होताना भूकवचाला खालील दिशेत येणारा बाक हा अज्ञात भूवैज्ञानिक प्रेरणांमुळे येतो, असे हल्लीचे मत आहे. यामुळे भूकवचातील ⇨समस्थायित्वाचा समतोल ढळतो व भूकवचात तीव्र असे ताण निर्माण होतात. शेवटी या ताणामुळे भूद्रोणीतील गाळावर दोन्ही बाजूंस असलेल्या स्थिर ठोकळ्यांकडून वा भूमीकडून दाब पडतो आणि सांडशीत पकडलेल्या वस्तूप्रमाणे गाळाचे खडक चुरडले जाऊन त्यांना घड्या पडतात व त्यामुळे गाळ वर उचलले जात असतात. घड्यांशिवाय या खडकांत विभंग (तडे) पडतात व प्रणोद विभंगामुळे [ज्यातील उपरिभिती आधार भित्तीच्या सापेक्ष वर सरकवलेली आहे अशा ४५° पेक्षा कमी कोन असलेल्या विभंगामुळे;  विभंग, खडकांतील] हे खडक दूरवर सरकले जातात. भूकवचातील अशा हालचालींच्या जोडीने बहुधा ज्वालामुखी क्रियाही घडून येते (उदा., कॅलेडोनियन भूद्रोणीच्या जोडीनेच इंग्लंडमधील मिडलँड भागात लाव्हा प्रवाहही आढळतात) व सामान्यपणे भूद्रोणीच्या अक्षाच्या दिशेत स्फटिकमय अग्निज खडकांची अंतर्वेशने (घुसण्याची क्रिया) होतात. अशा तऱ्हेने या एकूण प्रक्रियेद्वारे भूद्रोणीपासून घडीचा पर्वत निर्माण होतो व या प्रक्रियेला  गिरिजनन असे म्हणतात.

हिमालय-आल्प्स ही पर्वतश्रेणी अशा गिरिजननाचे चांगले उदाहरण आहे. भूमध्य सागरापासून इंडोनेशियापर्यंतच्या भागात एकेकाळी टेथिस नावाचा महासागर पसरलेला होता. [कार्बॉनिफेरस (सु.३५ ते ३१कोटी वर्षापूर्वीच्या) काळापासून आल्प्स पर्वताच्या प्रदेशाची द्वीपसमूह, खोल महासागर द्रोणी व लांबट गर्त ही वैशिष्ट्ये होती, असे डब्ल्यू. डीके यांनी दाखवून दिले होते.] त्यामध्ये मध्यजीव व तृतीय कल्पाच्या पूर्व (सु. २३ ते ५.५ कोटी वर्षापूर्वीच्या) काळात प्रचंड जाडीचे गाळ साचून भूद्रोणी तयार झाली होती. तिच्यातील गाळ गोंडवन भूमी व यूरेशियन भूमी या स्थिर ठोकळ्यांत दाबले गेले व त्यांना तृतीय कल्पाच्या मध्यानंतर (सु. ३.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळानंतर) घड्या पडून ते वर उचलले गेले. अशा तऱ्हेने हिमालय-आल्प्स पर्वतश्रेणी निर्माण झाली असून या पर्वतांची उंची अजूनही वाढत आहे म्हणजे खडक वर उचलले जाण्याची गिरिजननाची क्रिया अद्यापही चालू आहे.

श्टिले यांनी भूद्रोणीचे सरळ भूद्रोणी (दोन स्थिर ठोकळ्यांच्या दरम्यान असणारी) व समभूद्रोणी (स्थिर ठोकळ्यावर असणारी) असे प्रकार पाडले. त्यांपैकी सरळ भूद्रोणीतील खडकांच्या थरांचे दोन विभाग ओळखता येतात. पैकी आतील व खोल पाण्यात साचलेला भाग म्हणजे खरी भूद्रोणी होय. गाळ साचताना अधून-मधून घडणारी ज्वालामुखी क्रिया हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. या भागामध्ये ग्रेवॅक, चर्ट तसेच खोल पाण्यात अथवा खोल पाण्याच्या क्रियेद्वारे बनलेले खडक आणि ज्वालामुखी खडकांचे जाड थर असतात. भूद्रोणाचा दुसरा विभाग तिच्या बाहेरील बाजूस खंडांच्या लगत असून तो उथळ पाण्यात साचलेल्या खडकांचा असतो, त्याला मध्य भूद्रोणी म्हणतात. त्याच्यात चुनखडक, क्वॉर्टझमय वालुकाश्म, शेल व कधीकधी दगडी कोळसा व जमिनीवर तयार झालेले गाळाचे खडक असतात (यात ज्वालामुखी खडक थोडेच असतात.) असे खडक व त्यांच्यातील जीवाश्म (जीवांचे शिळारूप अवशेष) यांवरून हे गाळ उथळ पाण्यात साचल्याचे लक्षात येते.

ईस्ट  इंडीज व वेस्ट इंडीज यांसारख्या मोठ्या द्वीपसमूहांच्या भूभौतिक व भूवैज्ञानिक अभ्यासावरून त्यांच्या पुढील खोलगट भाग हे भूद्रोणी बनत असल्याचे दिसून येते. उदा., जावा-सुमात्रा बेटांच्या नैर्ऋत्येचा भाग, मेक्सिको आखातालगतचा भाग इत्यादी. भारतातील स्पिती क्षेत्रात रूंद अशी भूद्रोणी असून गंगा-सिंधूचे मैदान ही एक भूद्रोणी असावी, असे काही तज्ञांचे मत आहे.

भूपट्ट सांरचनिकी या सिद्धांतामध्ये भूकवच काहीशा दृढ अशा १०-२५ तुकड्यांत म्हणजे भूपट्टांत विभागल्याचे व हे भूपट्ट खालील प्रावरणाच्या ( भूकवच व गाभा यांच्या दरम्यानच्या ३,४८० किमी. खोलीपर्यंत या पृथ्वीच्या भागाच्या) एका दाट थरावर तरंगत असल्याचे मानले आहे. काही प्रमाणात प्रत्येक भूपट्ट स्वतंत्रपणे हालचाल करतो व इतर भूपट्टांशी घासला जातो. परिणामी भूकवचातील बहुतेक विरूपण (रूप बदलण्याची क्रिया), ज्वालामुखी क्रिया व भूपट्टांच्या सीमांलगतच्या भूकंपजनक हालचाली घडून येतात, असेही हा सिद्धांत मानतो. भूद्रोणीच्या निर्मितीविषयीचा एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून चाललेला वाद या सिद्धांतामुळे १९७० च्या सुमारास मागे पडला व पुढील प्रकारची विचारसरणी पुढे आली : ज्या प्राचीन भूद्रोणीपासून हल्लीचे पर्वत बनले आहेत,त्या बहुतेक भूद्रोणींमध्ये २ किंवा ३ स्तरवैज्ञानिक श्रेणी (भोगोलिक दृष्ट्या वेगळे असे थरयुक्त खडकांचे मोठे प्रमुख गट) आढळतात; या श्रेणी मूलतः भिन्न असून उत्पत्तीच्या दृष्टीने त्यांच्यात काहीच परस्परसंबंध आढळत नाही. खंडीय स्थिर ठोकळ्यांच्या कडांमध्ये घुसलेल्या व सीमेलगत विभंग असणाऱ्या प्रमुख गर्तांना ऑलॅकोजेन म्हणतात. वर उल्लेखिलेल्या पुष्कळ श्रेणींमधील अशा ऑलॅकोजेनांमध्ये डबरी गाळाचे जाड थर ओळखता येतात. खंड भंग पावण्याच्या आधीच्या काळात हे थर बनल्याचे दिसते. दुसऱ्या प्रकारच्या श्रेणीत प्राचीन मध्य भूद्रोणीय (ज्वालामुखी क्रिया नसलेले व विपुल कार्बोनेटयुक्त खडकांचे) पट्टे आढळतात. हे पट्टे सांरचनिकीच्या (भूकवचावरील मोठ्या संरचना व विरूपणाने बनलेली स्वरूपे यांच्या) दृष्टीने निष्क्रिय असणाऱ्या खंडांच्या कडांवर (उदा., हल्लीच्या अटलांटिक महासागराच्या रुंदावणाऱ्या द्रोणीची कडा) गाळाच्या जाड प्रचिनांच्या रूपात आढळतात. या क्रियाशील (भंग पावणाऱ्या) व निष्क्रिय कडांच्या श्रेणीनंतर सामान्यपणे अधिक विषम असलेले ज्वालामुखी व डबरी खडकांचे समुच्चय आढळतात. सांरचनिकीच्या दृष्टीने क्रियाशील असणाऱ्या परिस्थितीत (उदा., एक भूपट्ट दुसऱ्याखाली जाऊन महासागराची द्रोणी अरुंद होत जातानाच्या परिस्थितीत) हे समुच्चय निर्माण झालेले आहेत. खरी भूद्रोणी म्हणून दीर्घकाळापासून माहीत असणाऱ्या ज्वालामुखी क्रियायुक्त अशा भागाचे हे समुच्चय एक ठळक वैशिष्ट्य आहे. मूलतःभिन्न असणारे हे समुच्चय पर्वतनिर्मितीच्या हालचालींनी एकमेकांमध्ये पूर्णतया मिसळून गेलेले आहेत. त्यामुळे ते वेगवेगळे ओळखून काढून त्या आधारे भूद्रोणीच्या निर्मितीचा उलगडा करण्यास बराच कालावधी लागेल, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

 

 

संदर्भ : Aubouin, J. Geosynclines, New York, 1965.

लेखक:, ठाकूर अ. ना. ;बोरकर वि. द.

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate