অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मंगळ - ध्रुवीय टोप

ध्रुवीय टोप व पापुद्यांच्या प्रदेश

मंगळाच्या दोनही ध्रुवांवर दिसणारे पांढरे आवरण-टोप-हा मंगळावर दिसणाऱ्या आविष्कारांतील एक प्रमुख आविष्कार आहे. दक्षिण ध्रुवीय टोप वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी ५० ते ६० द. अक्षांशांपर्यंत पसरलेला दिसतो. वसंत ऋतूत त्याच्या आकुंचनास सुरूवात होऊन तुकडे झाल्यासारखे दिसतात. आकुंचन होत असताना टोपाच्या कडेला काळ्या-निळ्या रंगाचे पट्टे दिसतात. वातावरणातील सूक्ष्म धुके व ढग यांचे आच्छादन ३५ द. अक्षांशापर्यंत दिसते. उत्तर ध्रुवावरही असेच पांढरे आवरण हिवाळ्यात निर्माण होते व ते ७०° उ. अक्षांशांपर्यंत पसरते.

उन्हाळ्यात हे टोप आकारमानाने लहान होत असले, तरी सर्वस्वी नष्ट होत नाहीत. आकुंचन-प्रसरण पावणारे टोप शुष्क बर्फाचे बनलेले असावे, अशी कल्पना होतीच. अवकाशयानांद्वारे घेतलेल्या वेधांवरून असे दिसते की, कार्बन डाय-ऑक्साइडाच्या शुष्क बर्फाखाली पाण्याच्या बर्फाचा टोप असतो व तो उन्हाळ्यातही टिकून राहतो. दर हिवाळ्यात त्यावर कार्बन डाय-ऑक्साइडाच्या शुष्क बर्फाचा थर बसतो व हिवाळ्याच्या तीव्रतेबरोबर तो पसरत जातो. हिवाळ्यात ध्रुवाजवळील तापमान-१२३° से. व मध्य अक्षांशावर-८३° से. च्या आसपास असते. कार्बन डाय-ऑक्साइडाच्या वातावरणात उष्णता धारण करण्याची क्षमता फार कमी असल्यामुळे शुष्क बर्फाचा समतोल राखण्यास कार्बन डाय-ऑक्साइड वायूचा दाब कारणीभूत होतो. त्यामुळे टोप आकुंचन पावत असताना त्या खालील दऱ्या किंवा खोलगट प्रदेशावरील शुष्क बर्फ काही काळ तसेच रेंगाळत रहाते व टोपाचे तुकडे झाल्यासारखे दिसतात.

दोनही ध्रूवीय प्रदेश वाऱ्याने वाहून नेलेल्या धुळीने व बर्फाने आच्छादलेले आहेत. फार पूर्वीची भूमीही बर्फ व धूळ यांनी बनलेल्या गाळाची आहे व अर्वाचीन प्रदेश थराथरांचा बनलेला आहे. दक्षिण ध्रुवापासून सु. ७० द. अक्षांशांपर्यंतचा प्रदेश हा जाड थरांनी किंवा पापुद्र्यांनी बनलेला दिसतो. एका समूहात सु. ३० ते ४० थर असून त्यांची जाडी अर्धा किमी. आहे. असा समूह २०० किमी. पर्यंत पसरलेला दिसतो; शिवाय हे थर वर्तुळाकृती असून धूळ व बर्फ यांच्या लागोपाठ बसलेल्या थरांनी बनलेले असावे असे वाटते. यामुळे त्यांची निर्मिती ऋतुमानातील बदलानुसार ध्रुवाकडे येणाऱ्या व ध्रुवापासून दूर जाणाऱ्या संप्लवनशील पदार्थाशी संबंधित असावी, असे वाटते.

धुळीचे प्रमाण विचारात घेता पुरातन काळी वातावरण अधिक घनतेचे असावे व जलवायुमानात (दीर्घकालीन सरासरी हवामानात) आवर्ती (ठराविक कालावधीने पुन्हा होणारे) बदल झालेलेअसावेत, असे काहींचे मत आहे. या प्रदेशावर अशनींच्या आघातामुळे निर्माण झालेल्या आघाती विवरांची संख्या बरीच कमी आहे. त्याअर्थी हा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश अलीकडील काही दशलक्ष वर्षांत निर्माण झालेला असावा, असे काही ज्योतिर्विदांना वाटते. उत्तरध्रुवाच्या परिसरातील प्रदेशही असाच वर्तुळाकार पापुद्र्यांनी बनलेला दिसतो. ध्रुवाकडून आलेल्या धुळीमुळे ध्रुवीय प्रदेशासभोवार काळ्या वाळूचे बांध किंवा टेकड्या बनलेल्या दिसतात.

पृष्ठभाग

पृथ्वीवरून दिसणारे मंगळावरील डागांचे रंग, आकार व विस्तार हे तेथील ऋतुमानानुसार बदलतात. काही बदल वातावरणातील स्थानिक प्रक्षोभाशी संबंधित असतात, तर काही अगदीच अल्पकालिक असतात. याशिवाय निरीक्षणाच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणातील प्रक्षोभक प्रवाहसुद्धा मंगळावरील दृश्ये विकृत करण्यास हातभार लावतात. मंगळाचे उत्तम निरीक्षण करण्याची संधी सु. १५ ते १७ वर्षांनी काही आठवडेच येते.

यामुळे वर वर्णन केलेले सर्व आविष्कार प्रत्येक वेळी दिसतीलच असे नाही आणि काही काही आविष्कार शंकास्पदही ठरले आहेत. काही निरीक्षकांनी विषुववृत्ताजवळील थार्सीस प्रदेशावर इंग्रजी W अक्षरासारखा (दक्षिण ध्रुव वर धरून) विलक्षण आकार असलेला ढग पाहिल्याची नोंद केली आहे. तेथील विवरांच्या वितरणामुळे काही वेळा तसा आभास होतो, असे दिसते.

अवकाश युगात सूर्यकुलातील ग्रहांचा अगदी जवळून अभ्यास करण्यास आरंभ झाल्यापासून मंगळाचे खरे स्वरूप समजू लागले आहे.  १९६५ सालापासून मानवरहित अवकाशयाने टप्याटप्याने मंगळाच्या अधिकाधिक जवळ जाऊन त्याची निरीक्षण करू लागली. मरिनर-४ (१९६५), मरिनर- ६ व -७ (१९६९) या यानांनी मंगळाजवळून जाताना व मरिनर- ९ (१९७१-७२) यानाने मंगळाभोवती भ्रमण करून मंगळाचे वेध घेतले.

विवृत्ताकारी कक्षेत भ्रमण करीत असताना यानाचे कमाल व किमान अंतर अनुक्रमे १७,१०० किमी. आणि १,६५० किमी. होते. यानंतर १९७५-७६ मध्ये व्हायकिंग-१ व- २ या यानांनी प्रत्येकी एक ऑर्बिटर (परिभ्रमण यान) मंगळाच्या अधिक जवळच्या कक्षेत फिरते ठेवून प्रत्येकी एक लँडर (छोटी प्रयोगशाळा) दोन वेगवेगळ्या ठिकाणी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरविले. यांपैकी एक प्रयोगशाळा १९९४ पर्यंत आठवड्यातून एकदा मंगळाचे वेध पृथ्वीकडे पाठवीत राहील, अशी अपेक्षा आहे. अवकाशयानांनी मंगळाची छायाचित्रे पाठविण्याबरोबरच तेथील वातावरणाचा दाब, त्यातील घटक, तापमान, खडकांचे आकार व आकारमान, मातीचे घटक व तीमधील कार्बनी संयुगांचा शोध, पाण्याच्या वाफेचे प्रमाण वगैरेंविषयीही माहिती पुरविली आहे. छायाचित्रे व वेध यांच्या अभ्यासाने मंगळावर पूर्वी होऊन गेलेल्या व सध्या होत असणाऱ्या घडामोडी चांगल्या समाजावून घेण्यास काही कालावधी लागेल; पण आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सध्याचा मंगळ ग्रह घडविण्यास ज्वालामुखीचे उद्रेक, लाव्हा प्रवाह, अशनींचे आघात, फार पूर्वी निर्माण झालेले पाण्याचे प्रवाह, सोसाट्याचे वारे व धुळी वादळे कारणीभूत असल्याचे दिसते.

चंद्राशी तुलना करता मंगळाचा निम्मा पृष्ठभाग सु. चार अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या अशनींच्या आघातामुळे निर्माण झालेल्या विवरांनी भरलेला आहे. याशिवाय पृष्ठभागावर लांबच लांब पसरलेल्या भेगा व प्रचंड खोल दऱ्या आढळतात. एक तृतीयांशाहून अधिक पृष्ठभाग हा त्यानंतर उद्‍भवलेल्या ज्वालामुखींच्या लाव्ह्याने व्यापलेला असून त्यावर लहान मोठी ज्वालामुखे दिसतात. अधिक ज्वालामुखी असलेला भूभाग इतर भागांहून जास्त उंचीचा असून तेथे गुरूत्वाकर्षणाचेआधिक्य आढळले आहे. विस्तीर्ण प्रदेश ओबडधोबड असून ठिकठिकाणी नाल्यासारख्या खोबणी दिसतात.

स्थूलमानाने मंगळाच्या विषुववृत्ताला ३० अंशांनी कललेल्या वर्तुळाने पृष्ठभागाचे दोन भाग करता येतात. उत्तर गोलार्ध ज्वालामुखींच्या पर्वतांचा व लाव्ह्याने घडविलेला अर्वाचीन प्रदेश वाटतो, तर दक्षिणेकडील भाग सु. ४ अब्ज वर्षांपूर्वीचा अशनींच्या आघातांनी निर्माण झालेल्या लहान मोठ्या विवरांनी आणि असंख्य नाल्यांनी व खोल दऱ्यांनी डागाळलेला प्रदेश वाटतो. दक्षिण गोलार्ध हा थोडा फुगीर असून त्याचा व्यास उत्तर गोलार्धाच्या व्यासाहून सु. ३ किमी. ने अधिक आहे. मंगळावरील पातळ (अल्प) वातावरण आणि द्रवरूप अवस्थेतील पाण्याचा अभाव यांमुळे ज्वालामुखींच्या उद्रेकानंतरच्या काळात वाऱ्याने किंवा पाण्याच्या प्रवाहाने ग्रहाच्या पृष्ठभागाची झीज किंवा धूप होऊन तो खरवडला गेलेला वाटत नाही.

उत्तर गोलार्धाचा जवळजवळ निम्मा भाग घुमट, शंकू किंवा कटोरीसारख्या ढाल ज्वालामुखींनी भरलेला आहे. या भागावर ज्वालामुखीचे चार मोठे पर्वत असून त्यांपैकी सर्वात मोठ्याचे नाव ’निक्स ऑलिंपिका’ किंवा ‘ऑलिंपस मॉन्स’ आहे. सूर्यकुलातील हा सर्वांत मोठा ज्ञात ज्वालामुखी आहे. सभोवतालच्या भूभागाच्या वर त्याची उंची २३.४ किमी. असून तो हिमालयाच्या सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरापेक्षा (समुद्रसपाटीपासून उंची ८.८४८ किमी.) कितोतरी उंच आहे. त्याचा तळाकडील व्यास सु. ६०० किमी. असून मुखाचा व्यास ८० किमी. आहे. आणखी तीन ढाल ज्वालामुखी पर्वत तशाच प्रकारचे पण थोडे लहान आहेत. हे चार पर्वत व आणखी दोन डोंगर मिळून ज्वालामुखींच्या डोंगरांचा एक पट्टाच तयार होतो, त्याला ‘थार्सीस रिज’ असे नाव आहे. त्याचा विस्तार सु. ४०० किमी. असून उंची सरासरी पातळीपासून २० किमी. आहे.

मंगळावरील ढाल ज्वालामुखी व पृथ्वीवरील हवाई उद्रेक प्रकारचे ज्वालामुखी यांच आकार आणि संरचना यांच्या बाबतीत पुष्कळच साम्य आढळून येते. थार्सीस क्षेत्राच्या पश्चिमेस ५,००० किमी. अंतरावर ज्वालामुखीचे दुसरे लहान क्षेत्र आहे. त्यातील ‘इलिझईअम मॉन्स’ हा सु. २२५ किमी. व्यासाचा ढाल ज्वालामुखी प्रमुख आहे. यांशिवाय मंगळाच्या पृष्ठभागावर (विशेषतः उत्तर गोलार्धावर) विखुरलेल्या इतर ज्वालामुखींचा व्यास १०० किमी. पेक्षा कमी आहे. या ज्वालामुखीच्या आसमंतात लाव्ह्याच्या ओहोळांच्या खुणा दिसतात. डोंगराच्या उतारावरून आघाती विवरे फारशी नाहीत. त्या अर्थी हा परिसर दक्षिण गोलार्धाइतका पुरातन नसून मंगळाच्या निर्मितीनंतर एक-दोन अब्ज वर्षांनी तयार झालेला असावा असे वाटते. थार्सीस रिजच्या आग्नेयेस काही अंशी विवरांनी भरलेली विस्तृत मैदान असून त्यावर ज्वालामुखीच्या उद्रेकांचा परिणाम झालेला नाही असे दिसते. याच्या पूर्वेला १००० किमी. पर्यंत ५०. अक्षांशापासून ३० द. अक्षांशापर्यंत दगडधोंड्यांनी भरलेले विस्तृत मैदान आहे. त्यावरील विवरांची संख्या मोठी असून मोडतोड होऊन बुजत चाललेल्या पुरातन ज्वालामुखींच्या खुणा दिसतात. याच्या आरपार पूर्व-पश्चिम पसरलेली विषुववृताच्या थोडी दक्षिणेस एक प्रचंड दरी किंवा भगदाड आहे. या भेगेची लांबी ४,०००-५,००० किमी. असून खोली ६ किमी. आहे. रूंदी कित्येक ठिकाणी ७५ ते १२० किमी. आहे.

हा लांबट तेजस्वी प्रदेश (कॉप्रेटस) पांढरेपणाच्या छटांत बदल घडणारा म्हणून पृथ्वीवरील निरीक्षकांस चांगला परिचित आहे. या भेगेच्या पूर्वेकडील टोकाच्या उत्तरेकडे शेकडो किमी. लांबीच्या व दहा किमी. पर्यंत रूंद बऱ्याच दऱ्या असून त्या नदीच्या कोरड्या पात्राप्रमाणे दिसतात. उरलेला उत्तर गोलार्ध दगडधोंड्यांनी व धुळीने भरलेला चढ-उताराचा प्रदेश त्यावरही ९ मी. रूंदी  व १० सेंमी. असलेले बहुसंख्य नागमोडी नाले किंवा ओहोळ दिसतात. मंगळावरील धूळ बेसाल्टी खडकावर पाण्याच्या वाफेची रासायनिक प्रक्रिया होऊन किंवा जंबुपार किरणांनी ऑक्सिडीभवन होऊन बनली असावी. यांशिवाय वाऱ्यांनी बनलेले वाळूचे बांध किंवा टेकड्याही आढळतात.

विषुववृत्ताजवळ आइसिडीस (१५° उ., २७०° प.) हा विस्तीर्ण खोलगट प्रदेश असून त्याच्या सभोवार दक्षिणेस डोंगराळ प्रदेश आहे. हा प्रचंड आघातामुळे निर्माण झाला की, ज्वालामुखीचा अवशेष आहे, हे निश्चित सांगता येत नाही. याचसारखे हेलस (४५° द., २९०° प.; व्यास १,६०० किमी.) व आर्जर (५०° द., ४५° प.) हे आणखी दोन खोलगट प्रदेश दक्षिण गोलार्धात आहेत. हेलसची पश्चिम व वायव्य बाजू डोंगराळ असून आर्जर हा डोंगरांनी वेढलेला आहे. उरलेला दक्षिण गोलार्ध कमीजास्त विवरांनी भरलेला पठारी प्रदेश आहे. साधारणमानाने एकाकी विवरे ज्वालामुखीचे अस्तित्व दर्शवितात.

दक्षिण गोलार्ध चंद्राप्रमाणे विवरांनी भरलेला असला, तरी चंद्रावरील विवरांच्या १/१० विवरेच मंगळावर आढळतात. मंगळावरील वातावरणाच्या अडथळ्यामुळे ५० मी. व्यासाहून लहान व्यासाची विवरे फारशी नाहीत. जी लहान विवरे आढळतात ती मुख्य आघाताच्या वेळी उत्सर्जित झालेल्या द्रव्यामुळे बनलेली दुय्यम किंवा उपविवरे आहेत. गेल्या दोन अब्ज वर्षांत तयार झालेल्या आघाती विवरांपैकी २० टक्के विवरांत मध्यभागी खळगे पडलेले आढळतात. असे खळगे शुष्क बर्फासारखा संप्लवनशील पदार्थ निघून गेल्यामुळे तयार झाले की, खळग्यांची निर्मिती बाहेर पडणाऱ्या द्रव्याच्या गुणधर्मांवर आणि तेथील जमीन व अक्षांश यांच्यावर अवलंबून आहे, याविषयी निश्चित सांगता येत नाही.

मंगळावरील नाल्यांचे दोन प्रकार आढळतात. बहिर्गामी प्रवाही नाल्यांना शाखा नाहीत व ते आघातांमुळे किंवा पडझडीने एकदम आकार धारण केलेले असे वाटतात.

दुसऱ्या प्रकारचे प्रवाही नाले बहिर्गामी प्रवाही नाल्यांपेक्षा कमी लांब असून त्यांना शाखा व उपशाखा आहेत आणि त्यांचे प्रादेशिक समूह आढळतात. हे नाले प्राचीन काळच्या भूमीवर सर्वत्र आढळत असून पृष्ठभाग खरवडून किंवा त्याची धूप होऊन झाल्यासारखे वाटतात.

प्रचंड दऱ्या व नाले यांच्या निर्मितीची संभाव्य कारणे

मंगळावरील कोरड्या दऱ्या व हाजारो नाले हे लाव्हारसाच्या प्रवाहांनी किंवा प्रभावी वाऱ्यांच्या परिणामाने तयार झाले असण्याची शक्यता वाटत नाही. मंगळाच्या भूमीखाली व ध्रूवावर स्थायी बर्फाच्या स्वरूपात कित्येक घन किलोमीटर आकारमान असलेल्या पाण्याचा साठा आहे म्हणून ज्योतिर्विदांना असे वाटते की, हे लहान मोठे नाले पाण्याच्याच जोरदार प्रवाहाने किंवा हिमनगांनी बनलेले असावेत.

मंगळाच्या सध्याच्या विरळ वातावरणात मोठे ढग निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडेल, असे वाटत नाही. शिवाय मुक्त पाण्याचे झटकन संप्लवन होऊन जाईल. यामुळे प्रवाहनिर्मितीसाठी बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याकरिता उष्णता कशी निर्माण होत असावी, यासंबंधी तर्क केले जात आहेत. भूमीखालील व ध्रूव-टोपांवरील बर्फाचे पाणी झाले, तर त्या प्रवाहाने जमिनीची धूप होऊन नाले निर्माण होऊ शकतील.

फार पुरातन काळी मंगळाचे वातावरण अधिक घन (अधिक दाबाचे), अधिक उबदार व दमट असावे, असे दाखविणारे अनेक पुरावे मंगळभूमीवर आढळले आहेत. बाष्पीभवन मंदावत. असल्यामुळे असे वातावरण प्रवाहाच्या अस्तित्वास पोषकच असते. मोडतोड व झीज झालेली पुरातन विवरे आणि धुळीने व गाळाने भरलेले व आच्छादलेले नाले पाहून असे वाटते की, पूर्वीचे वातावरण अधिक घनतेचेअसून त्यात धुळीचे संचलन करण्यास समर्थ असलेले वारे होते. पावसाप्रमाणेच बर्फाचे पाणी झाल्यास ते अशा घन वातावरणात द्रव स्थितीत राहू शकेल. बर्फाचे पाणी होण्यासाठी खालील प्रक्रिया संभवतात.

(१) ज्वालामुखींच्या उद्रेकांत जमिनीखाली पाण्याचे मोठे साठे निर्माण झाले व त्यांना पुढे तडे जाऊन उसळलेल्या पाण्याचे प्रवाह नाल्यांच्या निर्मितीस कारणीभूत झाले.

(२) ज्वालामुखीत उत्पन्न झालेल्या संप्लवनशील पदार्थांच्या उत्सर्जनाने मंगळाचे वातावरण तयार झाले आणि त्याच वातावरणातील अभिसरणामुळे ध्रुवीय प्रदेशात बर्फ व धूळ यांचे एकावर एक थर बसून स्तरयुक्त भूमी तयार झाली. तसेच धुळीचे संचलन व जमिनीची धूपही घडून आली. वातावरण निर्मितीच्या प्राथमिक अवस्थेतच पाणी व बर्फ बाहेर पडून बर्फाच्या तुकड्यांच्या स्थानांतरामुळे नाले रूंद होत गेले असावेत.

(३) पुरातन काळी सूर्याच्या तेजस्वितेत बदल होऊन मंगळाचे वातावरण, त्याचा दाब व घटक यांवर परिणाम होऊन दीर्घ कालावधीचे बदल झाले असतील.

(४) बर्फमय भूस्तरावर प्रचंड अशनी पडल्यावर त्या आघातांच्या दाबाने निर्माण झालेल्या उष्णतेमुळे बर्फ वितळून आकस्मिक पूर निर्माण झाले असतील.

(५) भूगर्भातील किरणोत्सर्गी (भेदक कण अथवा किरण बाहेर पडण्याच्या) प्रक्रियेने स्थानिक उष्णता निर्माण होणे शक्य आहे.

(६) खगोलीय यामिकीच्या नियमांनुसार असे दिसते की, मंगळाच्या अक्षाचा मंगळाच्या कक्षेच्या लंबाशी होणारा कोन कित्येक सहस्त्र वर्षांत १२° पासून ३८° पर्यंत बदलत जाऊ शकतो. मंगळाच्या उत्तर गोलार्धावर ज्वालामुखींचे पर्वत निर्माण होऊन पृष्ठभागावर लाव्ह्याचे थर बनले आहेत. यामुळे मंगळाच्या वस्तुमान-वितरणात असमतोल निर्माण होऊन अक्षांचा वर उल्लेख केलेला कोन २२° ते ४५° पर्यंत बदलू शकतो. अक्षाचा कल कमी असलेल्या काळात ध्रृवीय प्रदेशास सौर प्रारण कमी मिळून तेथे विपुल प्रमाणात पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड वायू गोठलेल्या अवस्थेत राहू शकतात; पण अक्षाचा कल वाढत जाईल तसतसे ध्रूवीय प्रदेशाला अधिक सौर प्रारण मिळून कार्बन-डाय-ऑक्साइड वायू व पाण्याची वाफ अधिक प्रमाणात वातावरणात जाऊन वातावरणाचा दाब वाढेल. अशा काळातील प्रत्येक उन्हाळ्यात वातावरणात अधिक प्रमाणात गेलेल्या वाफेमुळे जमिनीची झीज घडविणाऱ्या प्रक्रिया वाढत जातील. यावरून असे वाटते की, ज्वालामुखीच्या निर्मितीपूर्वीचे ऋतुकालीन बदल हे नंतरच्या ऋतुकालीन बदलांहून भिन्न होते.

दाट वातावरणाचा ऱ्हास, यामिकीय बदल व प्रचंड ज्वालामुखींची निर्मिती यांचा विचार करता पुरातन काळात पाण्याचे प्रवाह आणि जमिनीची झीज किंवा धूप घडविणाऱ्या प्रक्रिया मंगळावर कार्यान्वित असाव्यात, असे म्हणावे लागते.

मंगळावरील नाल्यातील खाचखळगे, त्यांची ठेवण, लांबीरूंदी इ. बाबी विचारीत घेऊन या नाल्यांची पृथ्वीच्या दक्षिण ध्रुववृत्ताजवळील हिमनग-प्रवाहांनी बनलेल्या ओढ्यांशी तुलना केल्यास मंगळावरील कोरडे नाले किंवा ओढे पाण्यावरून घसरत जाणाऱ्या हिमनगांच्या प्रवाहाने झालेले असावे, असेही एक मत आहे.

जीवसृष्टी

मंगळाच्या ध्रुवीय प्रदेशांवरील पांढरे बर्फाचे आवरण वसंत ऋतूत संकोच पावू लागले की, ग्रहाच्या बिंबावर कधीकधी रेषात्मक जाळे दिसते. मंगळावरील मानवासारख्या जीवाने ध्रुवीय प्रदेशाकडून विषुवप्रदेशाकडे पाणी आणण्यासाठी खोदलेल्या नाल्यांचे हे जाळे असावे, असा एक समज होता. या कल्पनेमुळे व शिवाय मंगळव पृथ्वी यांच्यात अक्षीय व कक्षीय परिभ्रमण, दिनमान आणि ऋतुमान यांत बराचसा सारखेपणा असल्यामुळे मंगळवार जीवसृष्टी असण्याची शक्यता वाटत होती.

ऋतुमानानुसार नाल्यांच्या परिसरातील रंगछटांत बदल होतात आणि हा बदल नाल्यांच्या बाजूला वाढणाऱ्या व उन्हाळ्यात वाळून जाणाऱ्या सूक्ष्म वनस्पतींमुळे असावा, असा तर्क होता. दैनंदिन तापमानात मोठे चढ-उतार मंगळावार होत असतात. त्याचप्रमाणे तेथे पाणी व ऑक्सिजन यांचा अभाव असून जमीन अतिशय थंड असते.

अशा परिस्थितीत मानवासारखे आणि पृथ्वीवरील मोठ्या प्राण्यांसारखे जीव तेथे जिवंत राहू शकणार नाहीत, याची शास्त्रज्ञांना कल्पना होती. तरी पण पाणी व ऑक्सिजन यांची अल्प गरज असणारे साधे सूक्ष्म कीटक, तसेच शेवाळे, बुरशी, अळंबे यांसारख्या सूक्ष्म वनस्पती मंगळावर वाढत असण्याची शक्यता नाकारली गेली नाही. सध्याच्या मंगळाच्या अवस्थेत या वनस्पती नष्ट झाल्या असल्यास त्यांचे मातीतील अवशेष खरी वस्तुस्थिती दाखवू शकतील. ही कामगिरी अवकाशयानांवर सोपविण्यात आली होती.

व्हायकिंग अवकाशयानानी मंगळाच्या पृष्ठभागावर एक छोटी स्वयंचलित प्रयोगशाळा उतरविली. जमिनीखालील माती खणून ती या प्रयोगशाळेत नेण्यात आली आणि कार्बनी संयुगांचे अस्तित्व मातीत मिळते की काय ते पाहण्यासाठी या मातीवर तीन वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. दूरच्या ग्रहावर स्वयंचलित यंत्रणेने घडवून आणलेल्या रासायनिक विश्लेषणाचे निष्कर्ष शंभर टक्के बरोबरच असतील असे मानता येणार नाही, हे जरी खरे असले; तरी या प्रयोगांनी काय सिद्ध झाले हे पहाणे उद्‍बोधक ठरेल. या प्रयोगांच्या वेळी प्रयोगशाळेजवळील मातीत १० सेंमी. खोलीपर्यंत जीवसृष्टीस आवश्यक असणाऱ्या कार्बनी संयुगांचे अस्तित्व आढळले नाही; पण तेथील परिसर जीवसृष्टीत चालणाऱ्या रासायनिक प्रक्रियांना प्रतिकूल वाटला नाही. तसेच अवकाशयान ज्या ठिकाणी उतरले होते, त्या स्थानाखेरीज इतरत्रही पहाणी करणे आवश्यक आहे.

मानव प्रत्यक्ष मंगळावर जाऊन तेथील मातीचे विश्लेषण समक्ष करीपर्यंत हा प्रश्न अनिर्णितच राहणार. यासाठी मानवासहित मंगळावर पाठवावयाच्या अवकाशयानाच्या निर्मितीचा विचार काही शास्त्रज्ञ करू लागले आहेत.

मंगळावरील मानवी सफरीसाठी एकंदर दोन वर्षाचा कालावधी लागणार असून त्यासाठी चंद्रावरील सफरीतील अनुभव उपयोगी पडणार असला, तरी बरेच नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत.

मंगळ मोहिमेवर सात अंतराळवीरांना १९९० सालापर्यंत पाठवून मंगळाच्या पृष्ठभागाचे विश्लेषण तेथेच करावे किंवा तेथील मातीचे व खडकांचे नमुने पृथ्वीवर आणावेत, अशा योजनेवर विचार चालू आहे, चंद्र सफरीपेक्षा मंगळ सफरीसाठी काही गोष्टी अनुकूल असल्या, तरी या सफरीचा कालावधी लक्षात घेता मंगळावर काही काळ मुक्काम करावा लागेल व या काळात लागणारे इंधन व अन्न मंगळावर उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीच्या साहाय्याने मंगळावरच निर्माण करावे लागेल. मंगळावरील मातीचे व खडकांचे नमुने मानवरहित अवकाशयानाद्वारे स्वयंचलित रीतीने गोळा करून व पृथ्वीवर आणून त्यांचे येथेच तपशीलवार विश्लेषण करण्याच्या योजनाही आखण्यात आलेल्या आहेत.

उपग्रह

१८७७ मध्ये मंगळ प्रतियुतीत असताना एशफ हॉल या ज्योतिर्विदांनी वॉशिंग्टन वेधशाळेच्या २६ इंची परावर्तनी दूरदर्शकातून मंगळाच्या दोन उपग्रहांचा शोध केवळ सहा दिवसांच्या फरकाने लावला. आरीझ या ग्रीक देवतेच्या रथाच्या घोड्यांवरून किंवा सेवकांच्या नावावरून या उपग्रहांना फोबस (म्हणजे भय) व डायमॉस (म्हणजे घडक) अशी नावे दिली गेली. हे उपग्रह बटाट्याच्याआकाराप्रमाणे लांबट असल्यामुळे त्यांना ‘पोटॅटो मून्स’ असेही म्हटले गेले आहे. दोन्ही उपग्रह लहान असल्यामुळे दूरदर्शकातूनही त्यांचे बिंब दिसू शकत नाही. शिवाय मंगळाच्या तेजापुढे ते फारच अंधुक दिसतात. त्यामुळे ते परमापगम स्थितीत (पृथ्वीवरून मोजलेले मंगळ व उपग्रह यांतील कोनीय अंतर महत्तम असते त्या स्थितीत) मंगळापासून दूर असताना प्रभावी दूरदर्शकातून त्यांना पहाण्याची संधी मिळते.

दोन्ही उपग्रह पृथ्वीच्या चंद्राप्रमाणे आपली तीच बाजू मंगळासमोर ठेवून मंगळाभोवती परिभ्रमण करीत असतात. फोबसाचा कक्षीय

मंगळाचे उपग्रह व त्यासंबंधीची विविध माहिती

माहिती

फोबस

डायमॉस

शोध लागल्याचा दिनांकमंगळाच्या मध्यापासूनसरासरी अंतर

१७ ऑगस्ट १८७७ ९,३६५ किमी. यामधून३,४०० किमी.वजा  केल्यास पृष्ठभागावरील उंची मिळेल.

११ ऑगस्ट १८७७२३,५२५ किमी.

मंगळाची त्रिज्या १ मानूनमंगळ मध्यापासून अंतरे

२.८

६.९

विमध्यता 

०.०२१

०.००३

प्रदेक्षिणेचा नाक्षत्रकाल(आवर्तकाळ) 

७ तास ३९ मिनिटे

३० तास १८ मिनिटे

सूर्य सांवासिक काल 

०.३२ दिवस

१.२७ दिवस

मंगळाच्या विषुववृत्त पातळीशी कक्षेचा कल

सु. ०° ५७' 

सु. १° १८'

प्रतिक्षप 

०.०६५

०.०६५

तीन दिशांतील प्रमुखव्यास

 

२७,२१ व १९ किमी.

१५,१२ व ११ किमी.

 

उल्लेखनीय विवरे वत्यांचा व्यास

स्टिक्ने १० किमी.; हॉल ६ किमी.

व्हॉल्टेअर २ किमी स्विफ्ट १ किमी

सरासरी अंतरावर असतानातेजस्वितेची अंदाजे प्रत

११

१२

आवर्तकाल मंगळाच्या अक्षीय आवर्तकालापेक्षा खूप कमी असल्यामुळे (एक तृतीयांशाहून कमी) मंगळावरून पहाताना फोबस पश्चिमेला उगवताना व पूर्वेस मावळताना दिसेल. सूर्यकुलातील ग्रहांच्या सर्व उपग्रहांत पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळणारा हा एकच उपग्रह आहे. फोबस मंगळाच्या अगदी जवळ असल्यामुळे त्याच्या कक्षीय गतीच्या वेधांवरून मंगळाचे वस्तुमान ठरविले गेले आहे.

कक्षीय आवर्तकाल खूप कमी असल्यामुळे मंगळावरील एका दिवसात फोबसाच्या मंगळाभोवती दोन प्रदक्षिणा होतात आणि मंगळावरील एखाद्या योग्य स्थानावरून निरीक्षण केल्यास फोबस दोन वेळा उगवताना व दोन वेळा मावळताना दिसेल. मंगळाच्या पृष्ठभागापासून त्रिज्येच्या १.४ पट अंतरापेक्षा कमी अंतरावर (मंगळाची रोश मर्यादा; ग्रहाभोवतीच्या ज्या विशिष्ट मर्यादेपेक्षा उपग्रह अधिक जवळ आल्यास उपग्रहाचे विघटन होते, ती ई. ए. रोश या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी मर्यादा) मंगळाच्याच घनतेचा एखादा उपग्रह आल्यासगुरूत्वाकर्षणाच्याप्रभावामुळे उपग्रहाचे तुकडे पडतील.

फोबस उपग्रह रोश मर्यादेजवळचे आहे. काही कारणाने त्याच्या कक्षेत बदल होऊन तो मंगळाच्या अधिक जवळ गेल्यास त्याच्याही ठिकऱ्या उडू शकतील. मंगळाच्या एखाद्या योग्य स्थानावरून पाहिल्यास फोबस मंगळाचे आकाश काही तासातच ओलांडून गेलेला दिसेल; पण डायमॉस पूर्व क्षितिजापासून पश्चिम क्षितिजापर्यंत इतका सावकाश जाताना दिसेल की, तो आकाशात स्थिर (भूस्थिर) असावा असे वाटेल. मंगळावरील एखाद्या बिंदुसापेक्ष पाहिल्यास डायमॉसाचा आवर्तकाल १३२ तास येतो.

दोनही उपग्रह मंगळापासून फार दूर नसल्यामुळे व त्यांच्या परिभ्रमण कक्षा मंगळाच्या विषुववृत्ताच्या पातळीतच असल्यामुळे हे उपग्रह मंगळाच्या ध्रुवाकडील प्रदेशावरून दिसणार नाहीत. उदा., फोबस उपग्रह मंगळाच्या ७० अक्षांशापलीकडील अक्षांशावरून दिसणार नाही. या ओबडधोबड उपग्रहांची वस्तुमाने कमी असल्यामुळे गुरूत्वाकर्षणाच्या परिणामाने त्यांचा आकार संपूर्ण गोल होण्याचा संभव नाही.

फोबसाच्या गुरूत्वाकर्षणामुळे व्हायकिंग अवकाशयानाच्या कक्षेवर झालेल्या परिणामाच्या निरीक्षणावरून फोबसाची घनता २.० ± ०.६ गॅ,/सेंमी.३ असल्याचे आढळून आले. यामुळे फोबस उपग्रह पृथ्वीच्या चंद्राप्रमाणे बेसाल्टी द्रव्याचा बनलेला नसून मंगळाच्या कक्षेबाहेरील लघुग्रहासारखा कार्बनयुक्त काँड्राइटाचा बनलेला असावा असे दिसते.

मंगळाच्या विषुववृत्ताच्या पातळीसापेक्ष दोनही उपग्रहांच्या कक्षांच्या पातळ्यांतील सारखेपणा आणि अवकाशयानांनी प्रकाशमापनाने मिळविलेल्या त्यांच्या विषयीच्या माहितीतील सारखेपणा यांवरून दोनही उपग्रह एकाच ठिकाणाहून किंवा एकाच पद्धतीने निर्माण झाल्याचे दिसते. मंगळ निर्माण झाल्यावर मागे शिल्लक राहिलेल्या धुळीपासून किंवा मंगळाच्या पुरातन काळी असलेला एक उपग्रह फुटून त्याच्या तुकड्यांपासून हे उपग्रह निर्माण झाले असावेत.

अशीही शक्यता आहे की, मंगळापासून १४ पट त्रिज्येहून अधिक अंतरावर असलेले (१४ पट त्रिज्येहून अधिक अंतरावर मंगळाच्या गुरूत्वाकर्षणाचा प्रभाव नाहीसा होतो) सूर्यकुलातील दोन भटके उपग्रह मंगळाने ओढले असावेत आणि नंतर मंगळाच्या गुरूत्वाकर्षणाने निर्माण झालेल्या वेलीय (भरतीसारख्या) परिणामाने त्यांच्या कक्षा वर्तुळाकार होऊन त्यांचे अक्षीय व कक्षीय परिभ्रमण समकालिक झाले असावे.

या उपग्रहांचे पृष्ठभाग अशनींच्या आघातांनी निर्माण झालेल्या विवरांनी भरलेली आहेत. आघातांच्या वेळी उडालेले द्रव्य पुन्हा उपग्रहांवर पडल्यामुळे त्यांचे पृष्ठभाग ठिसूळ व सैल आवरणांनी आच्छादलेले आहेत. पृष्ठभागावर सु. १५० मी. रूंद व १५ मी. खोली असलेल्या लांबच लाब भेगा आहेत. मोठ्या अशनीच्या आघाताने अशा भेगा निर्माण होऊ शकतात.

 

लेखक : वि. वि. मोडक /  य. रा. नेने / अ. ठाकूर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate