অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महासागर व माहासागरविज्ञान

महासागर व महासागरविज्ञा

पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाणी, बर्फ व जमीन यांचे आवरण आहे. त्यापैकी  सु. ७१% भाग खाऱ्या पाण्याच्या प्रचंड जलाशयाने व्यापलेला असून त्याला ‘जागतिक महासागर’ वा ‘महासागर’ म्हणतात. प्रत्येक गोलार्धातील पाणी व जमीन यांच्या प्रमाणाचा विचार केल्यास दक्षिण गोलार्धात पाणी व जमीन यांनी व्यापलेल्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जवळ-जवळ ५:१ आहे; तर उत्तर गोलार्धात ते ३:२ आहे. यामुळे अशीही कल्पना करता येते की, पृथ्वी हाच एक प्रचंड महासागर असून खंडे ही त्यामधील बेटे आहेत. महासागर हे पृथ्वीचे  सर्वांत ठळक वैशिष्ट्य असून सोयीसाठी याचे भौगोलिक दृष्ट्या विभाग पाडले जातात. याच्या प्रमुख खंडांशी तुल्य अशा विभागांनाही ‘महासागर’ म्हणतात. (उदा., हिंदी महासागर) आणि या महासागराच्या उपविभागांना ‘समुद्र’ म्हणतात. (उदा., अरबी समुद्र ). महासागराचे स्वरुप, त्याची भौतिकीय व रासायनिक वैशिष्ट्ये, त्यामधील अभिसरण व प्रवाह, जीवसृष्टी, त्यामध्ये घडणारे आविष्कार, त्याची उत्पत्ती इ. सर्व दृष्टींनी करण्यात येणाऱ्या याच्या अभ्यासाला व समन्वेषणाला ‘महासागरविज्ञान’  म्हणतात.

क्षिण गोलार्धाचा सु. ८१ टक्के, तर उत्तर गोलार्धाचा सु. ६१% भाग महासागराने व्यापलेला आहे. अशा तऱ्हेने जमीन व पाणी यांची भूपृष्ठावर झालेली वाटणी विषम आहे. शिवाय जमीन व पाणी यांचे परस्परसंबंध प्रतिध्रुवी अहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे  जमीन असलेल्या भूभागाच्या विरुद्ध दिशेला येणारा भूभाग पाण्याने व्यापलेला असतो (उदा., अंटार्क्टिका खंडाच्या विरुद्ध टोकाला उत्तर ध्रुवीय समुद्र येतो). जागतिक महासागराविषयीची  काही माहिती पुढे दिली आहे  : एकूण क्षेत्रफळ ३६·२ कोटी चौ. किमी.; एकूण घनफळ १३·५ कोटी अब्ज घ.मी.; माध्य वि.गु.१·०४५; एकूण वस्तुमान १४·१ कोटी अब्ज टन (पैकी पाणी १३·६ व लवणे ०·४९३  कोटी अब्ज टन ); सरासरी लवणता (लवणांचे  प्रमाण) हजार भागांत ३४·७५ भाग, सरासरी खोली ३,७२९ मी. (जमिनीच्या सरासरी उंचीच्या साडेचारपट) व सरासरी तापमान ३º.९ से.

कृतीमध्ये परंपरागत महासागरांच्या सीमा दर्शविलेल्या आहेत. खंडे, बेटे यांसारखी नैसर्गिक भूमिरूपे, राजकीय तडजोडी वा संकेत वगैरेंनुसार या सीमा ठरविल्या जातात. अटलांटिक पॅसिफिक, हिंदी, आर्क्टिक व अंटार्क्टिक हे परंपरागत प्रमुख महासागर मानले जातात. यांपैकी आर्क्टिक व अंटार्क्टिक काहींच्या मते स्वतंत्र महासागर नसून आर्क्टिक हा अटलांटिकचाच भाग आहे; तर अंटार्क्टिका खंडाभोवतीचा अंटार्क्टिक महासागर हा पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागरांच्या विस्तारलेल्या शाखांचा बनलेला आहे. तथापि १९५३ मध्ये स्वीकारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संकेतानुसार  आर्क्टिक हा चौथा महासागर मानला जातो. महासागरांलगतचे समुद्र आता त्यांचेच भाग मानले जातात. पॅसिफिक महासागर हा सर्वांत मोठा म्हणजे जवळजवळ अटलांटिक व हिंदी महासागरांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढा असून त्याचे क्षेत्रफळ पृथ्वीच्या / क्षेत्रफळाहून अधिक आहे. हा सर्वांत खोलही आहे. यातील सर्वांत खोल भाग ग्वॉमच्या आग्नेयीस असलेला ‘चॅलेंजर डीप’ हा असून याची खोली समुद्रसपाटीखाली ११,०३४ मी. आहे. पॅसिफिक शब्दाचा अर्थ शांत असून त्याप्रमाणे महासागर शांत दिसत असला, तरी सर्वांत भयानक वादळे, ज्वालामुखींचे उद्रेक व भूकंप यात होत असतात[⟶ पॅसिफिक महासागर] अटलांटिक हा हिंदी महासागरापेक्षा थोडा मोठा असून यातील सर्वांत खोल अशा प्वेर्त रीको खंदकाची खोली ८,६४८ मी. आहे. यात मोठी वादळे होत असली, तरी शांत आसणारी मोठी क्षेत्रेही यात येतात. शिवाय याच्या किनाऱ्याची लांबी हिंदी व पॅसिफिक  यांच्या किनाऱ्यांच्या एकत्रित लांबीपेक्षा जास्त आहे. व जगातील बहुतेक म्हत्त्वाच्या नद्या याला येऊन मिळतात. [⟶ अटलांटिक महासागर]. हिंदी महासागरातील सर्वांत खोल ठिकाण (सूंदा खंदक ७,७२५ मी.) जावाच्या दक्षिणेस आहे. सर्वसाधारणपणे या महासागरातील वारे मंद असतात; मात्र कधीकधी यात टायफूनसारखी वादळे होतात. याच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात हंगामानुसार वाऱ्यांमध्ये व वाऱ्यांनुसार प्रवाहांमध्ये बदल होतात. [⟶ हिंदी महासागर ]. आर्क्टिकमधील सर्वांत जास्त खोली ५,४५० मी. आढळली आहे. जमिनीलगतचा याचा बराचसा भाग वर्षभर बर्फाने आच्छादिलेला आसतो. [⟶ आर्क्टिक महासागर ].

पृथ्वीवरील महासागरांच्या सीमा

हासागरांच्या तसेच त्यांच्या लगतच्या व त्यांना जोडणाऱ्या उपविभागांना सामाऩ्यपणे समुद्र म्हणतात. (उदा., अरबी समुद्र). मात्र स्थानपरत्वे त्यांच्याकरीता समुद्राऐवजी उपसागर, आखात, सामुद्रधुनी, बाइट अथवा खाडी अशा पर्यायी संज्ञाही वापरतात (उदा., बंगालचा उपसागर, मेक्सिकोचे आखात, डेन्मार्कची सामुद्रधुनी, ग्रेट ऑस्ट्रेलियन बाइट इंग्लंडची खाडी ). मोठ्या खाऱ्या सरोवरांनाही काही ठिकाणी समुद्र म्हणतात. (उदा., साँल्टन व मृत समुद्र). पुष्कळ प्रमाणात जमिनीने वेढलेल्या  खाऱ्या जलाशयांना भूवेष्टित समुद्र म्हणतात. भूमध्य समुद्राशिवाय यात पुढील समुद्र येतात : मेक्सिकोचे आखात व कॅरिबियन समुद्र मिळून बनलेला अमेरिकी  भूवेष्टित समुद्र; अंदमान बेटे, ईस्ट इंडीज न्यू गिनी, फिलिपीन्स व तैवान यांच्यामध्ये  येणारा आशियाई  भूवेष्टित समुद्र आणि हडसन व बॅफिन उपसागर तसेच कॅनडियन सामुद्रधुऩ्या यांचा मिळून बनलेला आर्क्टिक  भूवेष्टित समुद्र (कोष्टक क्र. १).

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate