অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लघुग्रह, धूमकेतू व उल्काभ

लघुग्रह, धूमकेतू व उल्काभ

ग्रह व उपग्रह यांच्याशिवाय सूर्यकुलात असलेल्या नैसर्गिक पिंडांना लहान खस्थ पदार्थ म्हणतात. त्यांच्यात लघुग्रह, धूमकेतू व उल्काभ यांचा अंतर्भाव करतात. ग्रह निर्मितीच्या प्रक्रियेत अंतर्गत व बाह्य सूर्यकुलात अनुक्रमे लघुग्रह व धूमकेतू हे मागे राहिलेले घटक आहेत. हजारो लघुग्रहांपैकी बहुसंख्य लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यानच्या कक्षांमध्ये फिरत असतात. या कक्षांच्या चपट्या व अरुंद कड्याला लघुग्रह पट्टा म्हणतात. लघुग्रहांचे पिंड पृथ्वी गटातील ग्रहांपेक्षा लहान असतात. त्यांचे आकारमान सेरीस या सर्वांत मोठ्या ज्ञात लघुग्रहापासून (व्यास सु. ९२० किमी.). ते या पट्ट्यात सर्वत्र विखुरलेल्या सूक्ष्म धूलिकणांपर्यंत असलेले आढळते. बहुतेक लघुग्रहांची त्रिज्या सु. १ किमी. असून थोड्याच लघुग्रहांची त्रिज्या शेकडो किमी. आहे.

काही लघुग्रह मुख्यतः धातुयुक्त (मुख्यत्वे लोह), खडकाच्या संघटनाचे, विपुल कार्बनी संयुगे असलेले आणि थोडे कार्बनयुक्त काँड्राइट अशनींसारखे असतात. १९००–२००० या काळात दूरदर्शकांतून व अवकाशयानांमधून घेतलेल्या वेधांवरुन लघुग्रहांनाही त्यांचे स्वतःचे लघुउपग्रह असू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. काही लघुग्रहांच्या कक्षा अशा आहेत की, त्यामुळे ते पृथ्वीच्या आणि पृथ्वी गटातील इतर ग्रहांच्या कक्षांच्या आत येतात. अशा रीतीने काही लघुग्रहांचे प्रवासाचे मार्ग पृथ्वीच्या व या ग्रहांच्या कक्षांना छेदणारे आहेत. यामुळे ते पृथ्वीवर व या ग्रहांवर आदळण्याची शक्यता निर्माण होते. १० किमी.पेक्षा अधिक व्यास असलेले सापेक्षतः मोठे लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता अगदी विरळच आहे. लघुग्रह आदळण्याचा पृथ्वीवर विध्वंसक परिणाम होऊ शकतो. सुमारे ६·५ कोटी वर्षांपूर्वी क्रिटेशस कल्पाच्या अखेरच्या काळात पृथ्वीवर लघुग्रह आदळून झालेल्या आघातामुळे जीवजातींचे अतिशय मोठ्या प्रमाणावर ⇨ विलुप्तीभवन होऊन अनेक जातींचा निर्वंश झाला, असे मानतात.

मंगळापलीकडच्या मुख्य पट्ट्यातील लघुग्रह प्रसंगी पृथ्वीला ओलांडून जाणाऱ्या या कक्षांमध्ये क्षुब्धता निर्माण करतात. [⟶ लघुग्रह]. लघुग्रहांचे अपरिमित तुकडे व घन द्रव्याचे बरेच मोठे (काही मीटर लांबीचे) तुकडे आंतरग्रहीय अवकाशात आढळतात. अधिक मोठ्या लघुग्रहांपासून वेगळे ओळखण्यासाठी त्यांना उल्काभ म्हणतात. यांत धूमकेतूंचेही अवशेष असू शकतात. हे लहान पिंड मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर येतात. ते आकाशात प्रथम उल्केच्या रुपात दिसतात. त्यांतील जे पृथ्वीच्या वातावरणातील प्रवासात होणाऱ्या घर्षणानंतरही टिकून राहतात व भूपृष्ठावर येऊन पडतात, त्यांना अशनी म्हणतात. १९६९ मध्ये मेक्सिकोत एक अशनी पडला, त्याचे नाव ॲलेंडे ठेवले. त्यात समाविष्ट असलेल्या द्रव्याचा काळ किरणोत्सर्गापन पद्घतीने ४·५६ X १०९ (४·५६ अब्ज) वर्षे एवढा आला. हा आतापर्यंतचा खडकाचा सर्वांत जुना काळ असून हा काळ म्हणजे सूर्यकुलाचे अंदाजे वय असावे.

अपोलो अवकाशयान मोहिमांतून पृथ्वीवर आणलेले चंद्रावरील खडक, तसेच ॲलेंडे व इतर अशनी हे सूर्यकुलातील इतर पिंडांचे नमुने आहेत. लेंडेसारख्या अशनींच्या आदिम घटकांमुळे अगदी आधीच्या काळातील सूर्यकुलामधील परिस्थितींविषयी माहिती मिळते. अगदी थोडे अशनी चंद्रावरुन किंवा मंगळावरुन आल्याचे मानतात. [⟶ उल्का व अशनि]. धूमकेतूंच्या गाभ्यांची भौतिकीय वैशिष्ट्ये लघुग्रहांच्या अशा वैशिष्ट्यांहून मूलभूत रीत्या भिन्न असतात. विविध प्रकारचे बर्फ धूमकेतूंच्या गाभ्यांचे मुख्य घटक असून त्यांत मुख्यतः गोठलेले पाणी असते. शिवाय गोठलेल्या कार्बन डाय-ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड व इतर वायू यांचे बर्फही त्यात असतात. अशा वैश्चिक बर्फयुक्त गोळ्यांभोवती खडकांची धूळ व अनेक प्रकारची कार्बनी संयुगे यांची किनार असते. हे गोळे सर्वसाधारणपणे ओबडधोबड स्वरुपाचे असून त्यांचा व्याप काही किमी. पर्यंत असतो.

संदर्भ :1. Beatty, K.; Peterson, C. C.; Chaikin, A., Eds., The New Solar System, 1999.

2. Boss, A. P. The Race to Find New Solar Systems, 1998.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate