অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हिमालय

हिमालय

ही जगातील सर्वांत उंच आणि सर्वांत अलीकडे निर्माण झालेली पर्वतसंहती आहे. ८,००० मी. पेक्षा उंच असलेली जगातील बहुतेक सर्व शिखरे हिमालयात आहेत. जगातील पूर्वपश्चिम पर्वतसंहतीपैकी ही सर्वांत लांब, सु. २,५०० किमी. असून तिची रुंदी सु. ४०० किमी. आहे. तिने ५,००,००० चौ.किमी. प्रदेश व्यापला आहे.

सिंधूचा वरचा भाग व त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) यांच्या खोर्‍यांनी तिबेटचे पठार हिमालयाच्या श्रेणींपासून वेगळे केलेले आहे. नंगापर्वत (८,१२६ मी.) आणि नामचा बारवा (७,७५६ मी.) यांचे दरम्यान हिमाद्री (ग्रेटर हिमालय) ची रांग असून तिच्यात मौंट एव्हरेस्ट (८,८४८ मी.), कांचनजंघा (८,५९८ मी.), धौलागिरी (८,१७२ मी.), मनास्लू (८,१५६ मी.), चो ओयू (८,१५३ मी.), अन्नपूर्णा (८,०७८ मी.), गोसाइंतान (८,०१३ मी.) इ. उत्तुंग शिखरे आहेत. हिमाद्रीच्या दक्षिणेस हिमाचल (लेसर हिमालय) पर्वताच्या रांगा आहेत.

हा डोंगराळ प्रदेश सु. ७५ किमी. रुंद व ५,००० मी. पर्यंत उंच असून त्यात अनेक दिशांना गेलेल्या पर्वतरांगा आहेत. येथील दक्षिण उतार खडे व उघडे असून उत्तर उतार सौम्य व अरण्यमय आहेत. याच्याही दक्षिणेस शिवालिक रांगा असून त्यांची उंची ६०० मी. पर्यंत आहे. यातून दून नावाची सपाट तळाची सांरचनिक दऱ्याखोरी असून ती दाट लोकवस्तीची व लागवडीखाली आणलेली आहेत. हिमालयाला त्याची पूर्ण उंची गाठावयास ६० ते ७० लक्ष वर्षे लागली. त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या नद्या उंच उंच पर्वतांना भेदून गेलेल्या दिसतात. हिमालयाला पुरेशी उंची प्राप्त झाल्यानंतरच भारतात मोसमी प्रकारचे हवामान आले .

हिमालय चंद्रकोरीच्या आकाराचा असून तो दक्षिणेकडे बहिर्वक्र आहे. त्याची दक्षिण सीमा ३०० मी. उंचीची असून अवघ्या १५० किमी. मध्ये तो ८,००० मी. उंची गाठतो. त्यात अनेक हिमाल (हिमक्षेत्रे) असून त्यांतून हिमनद्या व जोरदार जलप्रवाह उगम पावतात. हिमालयाच्या निरनिराळ्या भागांना काश्मीर-हिमालय, पंजाब-हिमालय वगैरे निरनिरळी नावे आहेत. आसाम-हिमालयाच्या दक्षिणेस भारत-ब्रह्मदेश सरहद्दीवरून जाणाऱ्या पातकई व इतर रांगांचा समावेश पूर्वाचल या पर्वतश्रेणीत होतो. हिमालयाचे भारतातील सर्वोच्च शिखर नंदादेवी (७,८१७ मी.) हे कुमाऊँ हिमालयात आहे.

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate