Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/21 19:00:47.655202 GMT+0530
शेअर करा

T3 2019/08/21 19:00:47.660277 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/21 19:00:47.692645 GMT+0530

फ्रांस्वा मांसार

फ्रांस्वा मांसार प्रसिद्ध फ्रेंच वास्तुशिल्पज्ञ.

(२३ जानेवारी १५९८– २३ सप्टेंबर १६६६). प्रसिद्ध फ्रेंच वास्तुशिल्पज्ञ. पॅरिस येथे जन्म. रेन येथील तत्कालीन प्रसिद्ध वास्तुतज्ञ गोतिए याच्याकडे मांसारने वास्तुकलेचे शिक्षण घेतले. परंतु नंतर सालॉमाँ द ब्रास आणि मॅतेझ या समकालीन वास्तुकारांच्या शैलीचा प्रभाव त्याच्या वास्तूंवर ठळकपणे आढळून येतो. पंधराव्या शतकाच्या प्रारंभापासून प्रबोधनकालीन इटलीमध्ये सर्व कलाविष्कारांचे पुनरुज्जीवन झाले. यूरोपात इतरत्र ही प्रबोधनकाळान शैली प्रसृत होण्यास सु. पाउणशे वर्षे लागली. फ्रान्समध्ये सामान्यतः १४९४ पासून हा कालखंड सुरू झाला. मांसारने आपल्या हयातीत इटलीला भेट दिल्याचा पुरावा नाही; परंतु १६३० पासून त्याने फ्रान्समध्ये प्रबोधनकालीन वास्तुशैलीच्या इमारती बांधण्यास प्रारंभ केला. शातो दी मेझों ही पॅरिस शहराजवळ उभारलेली हवेली (१६४२–४६) ही त्याची सर्वांगसुंदर कलाकृती मानण्यात येते. इंग्रजीतील (E)या अक्षरासारख्या अवकाशरचनेची ही वास्तू त्यातील अभिजात स्तंभरचनेचा कलात्मक वापर, उतरती छप्पर-रचना, धुराड्याच्या मनोऱ्याची रचना आणि आतील छत व जिने यांवरील मनोहर शिल्पकाम इ. गुणवैशिष्ट्यांमुळे लक्षणीय ठरली. फ्रांस्वा मांसारने मांसार रूफ ही त्याच्या नावाने ओळखली जाणारी छप्पर-रचना फ्रान्समध्ये लोकप्रिय केली. मांसार रूफ ही फ्रेंच पद्धतीची छप्पर-रचना असून, त्यात छपराच्या खालील भागाचा ढाळ (उतार) जास्त असतो व वरील भाग काहीसा सपाट असतो. यामुळे कातरमाळ्याची रचना सपाट छपराची करता येते आणि माळ्यावर निवासी खोल्या बांधणे सुलभ होते. ही छप्पर-रचना मांसारच्या आधीही इंग्लंड, इटली या देशांत आढळते. अमेरिकेत अशा छप्पर-रचनेस गॅम्ब्रेल रूफ असे संबोधण्यात येते. त्याच्या इतर वास्तुरचनांमध्ये शातो ऑफ बाल्‌र्वा (१६२६–३६), फेलन्ट्स चर्च (१६२३–२४),वॅल दी ग्रेस चर्च(१६४५–६५), हॉटेल दी ला व्हेरील (१६३५), गॅलरी मॅझॅरीन (१६४४) इ. पॅरिसमधील वास्तूंचा समावेश करावा लागेल.

शातो हा शाही हवेलीचा भव्य वास्तुप्रकार मांसारने फ्रान्समध्ये रूढ केला. १६३६ मध्ये त्याची राजदरबारी वास्तुतज्ञ म्हणून नेमणूक झाली होती. फ्रान्समधील सतराव्या शतकातील बरोक वास्तुकलेमध्ये नव-अभिजाततावादी शैली रुजवणारा वास्तुतज्ञ म्हणून त्याची कारकीर्द महत्त्वाची आहे. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

झ्यूल-आर्दवँ मांसार (१६ एप्रिल १६४६–११ मे १७०८) हाही एक प्रख्यात फ्रेंच वास्तुतज्ञ असून तो फ्रांस्वा मांसारचा नातू आणि शिष्य होता. पॅरिस येथे त्याचा जन्म झाला. चौदाव्या लूईचा हा आवडता वास्तुतज्ञ. त्याच्या उत्तेजनाने व आश्रयाने झ्यूल-आर्दवँ मांसारने प्रचंड प्रमाणात वास्तुनिर्मिती केली. १६७४ मध्ये त्याला प्रथम क्लॅनी येथे राजशाही शातो बांधण्याचे काम मिळाले. त्यानंतर १६७६ मध्ये व्हर्सायच्या जगप्रसिद्ध राजप्रासादाच्या बांधकामाची जबाबदारी प्रामुख्याने त्याच्यावर सोपवण्यात आली. ही झ्यूल-आर्दवँची सर्वांत मोठी व महत्त्वाची निर्मिती मानली जाते. या प्रासादात प्रबोधनकालीन वास्तुशैलीची सर्व वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. त्यातही आरसेमहालाची रचना म्हणजे झ्यूल-आर्दवँच्या प्रतिभेची थक्क करणारी झलक आहे. ७३·१५ मी. (२४० फुट) लांब, १०·३६ मी. (३४ फुट) रुंद आणि १३·१० मी. (४३ फुट) उंच असे हे दालन कॉरिंथियन शैलीच्या हिरव्या संगमरवरी स्तंभांनी तसेच शिल्प, चित्र, सुशोभित छतरचना इ. अलंकरणाने नेत्रदीपक झाले आहे. याशिवाय झ्यूल-आर्दवँने निर्मिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंमध्ये पॅरिसमधील सेकंड चर्च ऑफ द इनव्हॅलिड्स (१६९३–१७०६), प्लेस दी व्हिक्टरीज चा वास्तुकल्प (१६८७),प्लेस व्हांदोम (१६८५) इ. वास्तूंचा उल्लेख करता येईल. आपल्या ऐन उमेदीत झ्यूल-आर्दवँ मांसारची पॅरिस येथील अकॅडमीज ऑफ पेंटिंग, स्कल्प्‌चर अँड आर्किटेक्चर या विख्यात संस्थेच्या संचालकपदी नेमणूक झाली होती. फ्रान्समध्ये प्रबोधनकालीन कलेच्या पुनरुज्जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या वास्तुशिल्पज्ञांत झ्यूल-आर्दवँचा वाटा मोठा आहे. वास्तुरचनेत चित्र, शिल्प, स्थलशिल्परचना (लँडस्केप डिझाइन) इ. कलाघटकांचे प्रमाणबद्ध व अलंकरणयुक्त संश्लेषण साधण्यात मांसारची प्रतिभा दिसून येते. मार्ली-ल-र्‌वा येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ: Blunt, Anthony, Art and Architecture in France, 1500 to 1700, London, 1953.

लेखिका : विजय दीक्षित

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/08/21 19:00:47.900498 GMT+0530

T24 2019/08/21 19:00:47.907316 GMT+0530
Back to top

T12019/08/21 19:00:47.574932 GMT+0530

T612019/08/21 19:00:47.593977 GMT+0530

T622019/08/21 19:00:47.643124 GMT+0530

T632019/08/21 19:00:47.644028 GMT+0530