অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंटरनॅशनल संज्ञा

इंटरनॅशनल संज्ञा

 

आंतरराष्ट्रीय सभासदत्व असलेल्या अनेक संस्थांना आणि संघटनांना ‘इंटरनॅशनल’ ही संज्ञा लावली जाते. पण राजकीय दृष्ट्या ही संज्ञा अशा आंतरराष्ट्रीय संघटनांशी संलग्न झालेली आहे, की ज्या संघटना भांडवलदारी समाजरचनेचे रूपांतर समाजवादी समाजरचनेत करण्यासाठी कटिबद्घ झालेल्या आहेत. मार्क्स  आणि एंगेल्स यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी आणि जगातील कामगारांना संघटित करण्यासाठी, १८६४ साली ‘द इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन’ या नावाची संघटना स्थापन केली. हीच संघटना ‘फर्स्ट इंटरनॅशनल’ या नावाने जागतिक कामगार संघटनांच्या इतिहासात ओळखली जाऊ लागली.
फर्स्ट इंटरनॅशनल : फर्स्ट इंटरनॅशनलची स्थापना मार्क्स आणि एंगेल्स यांच्या मार्गदर्शनाखाली झाली व तिने पश्चिम यूरोपातील काही देशांतील कामगार संघटनांना एकत्र आणण्याचा महत्त्वाचा प्रयत्‍नही केला. स्पेन, इटली, बेल्जियम इ. देशांत त्या काळात समाजवादी विचारांच्या कामगार संघटना उदयास आल्या होत्या. त्यांच्या कार्याला फर्स्ट इंटरनॅशनलमुळे अधिक चालना मिळाली. पण स्थापनेनंतर थोड्याच दिवसांत या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मार्क्स आणि रशियन क्रांतिकारक बकून्यिन  यांचे मतभेद व्यक्त होऊ लागले. बकून्यिन अराज्यवादी होता. त्याला मार्क्सच्या साम्यवादाची कल्पना मंजूर नव्हती. या मतभेदांना १८७१ मध्ये संघर्षाचे स्वरूप आले. त्या वर्षी क्रांतिकारकांनी पॅरिस कम्युन स्थापन केले होते. मार्क्सने इंटरनॅशनलच्या वतीने पॅरिस कम्युनची कल्पना (क्रांतिकारक सरकारची कल्पना) आपल्या साम्यवादी विचाराशी जुळणारी आहे, असे जाहीर केले. पण त्यावर एका बाजूने ब्रिटिश कामगार संघ आणि दुसऱ्या बाजूने रशियन अराज्यवादी यांनी टीकेची झोड उठविली. १८७२ मध्ये मार्क्सवादी आणि बकून्यिनवादी यांचे मतभेद विकोपाला गेले आणि शेवटी ही आंतरराष्ट्रीय संघटना दुभंगली. बकून्यिनने अराज्यवादी आंतरराष्ट्रीय संघ स्थापन केला. मार्क्सनेही आपल्या गटाचे कार्यालय न्यूयॉर्कला हलविले आणि इंटरनॅशनलचे काम पुढे चालू ठेवले. पण पॅरिस कम्युनच्या संदर्भात झालेल्या संघर्षामुळे दुर्बल बनलेली ही संघटना फार काळ टिकाव धरू शकली नाही. १८७६ पर्यंत या संघटनेने कसाबसा जीव धरला होता, पण त्या वर्षी तिचे अस्तित्व संपले.
सेकंड इंटरनॅशनल : आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार संघटनांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्‍न पॅरिसमध्ये १८८९ साली भरलेल्या एका मेळाव्यात करण्यात आला. त्यातूनच तेथे जमलेल्या प्रतिनिधींनी सेकंड इंटरनॅशनलची स्थापना केली. त्यासाठी एक घटनाही मान्य करण्यात आली. त्या सुमाराला काही यूरोपीय देशांत समाजवादी पक्ष स्थापन झालेले होते. कामगार संघटनांनाही आकार प्राप्त होत होता. त्यांना नवे अनुभव येत होते. समाजवादी गट आणि कामगार संघ यांचे संबंध काही देशांत दृढ होऊ लागले होते. अशा समाजवादी पक्षांना आणि कामगार संघटनांना सेकंड इंटरनॅशनलशी जोडण्यात आले. इंटरनॅशनलशी संलग्न असलेली कामगार संघटना, आपल्या क्षेत्रात तरी त्या वेळी प्रमाणभूत मानली जाऊ लागली. पण या व्यासपीठावरही मतभेद निर्माण झाले आणि त्यांना संघर्षाचे स्वरूप येत गेले. सेकंड इंटरनॅशनलवर लेनिन आणि रोझा लक्सेंबर्ग यांच्यासारख्या डाव्या मार्क्सवाद्यांचा प्रभाव वाढत गेला. पहिल्या महायुद्धाच्या आरंभी सेकंड इंटरनॅशनलने यूरोपात क्रांती घडवून आणण्याचे धोरण जाहीर केले. महायुद्धाचा उपयोग क्रांतीसाठी करण्यासाठी कल्पना दृढ केली. क्रांतीसाठी राष्ट्रीय युद्धाचे यादवी युद्धात रूपांतर करण्याचा आदेश दिला. पण त्याला प्रत्यक्ष युद्धकाळात कोणत्याही पश्चिम यूरोपीय कामगार संघटनेने पाठिंबा दिला नाही. या संघटनांनी आपापल्या देशांतील राष्ट्रीय सरकारच्या युद्धविषयक धोरणाला पाठिंबा दिला. फक्त जर्मनीतील सोशल डेमॉक्रॅटिक पक्षात महायुद्धाच्या धोरणांवरून मतभेद निर्माण झाले आणि तो पक्ष दुभंगला; पण इतर देशांत मात्र कामगार संघ क्रांतीच्या वाटेने न जाता राष्ट्रीय संरक्षणासाठी आपापल्या देशांतील प्रस्थापित सरकारच्या धोरणामागे उभे राहिले. त्यामुळे युद्धकाळात सेकंड इंटरनॅशनल ही संघटना जवळजवळ नि:स्वत्त्व बनली. सर्व समाजवादी पक्षांनी क्रांतीच्या कार्यक्रमाचा विश्वासघात केला, असे लेनिनने जाहीर केले आणि १९१६ साली आणखी एका आंतरराष्ट्रीय कामगार संघाची स्थापना होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. १९१७ मध्ये रशियात क्रांती झाली आणि लेनिनच्याच नेतृत्वाखाली सोव्हिएट सरकारने सत्ता हाती घेतली. त्यामुळे नवी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करणे लेनिनला अधिक सुलभ झाले.
कम्युनिस्ट इंटरनॅशनल :  पहिल्या महायुद्धानंतर रशियाप्रमाणेच यूरोपातील इतर देशांत कामगार क्रांती होईल, असे अनेक रशियन नेत्यांना वाटत होते. त्यासाठीच काही ठिकाणी सोव्हिएट सरकारने मदतही केली. पण ते सारे प्रयत्‍न अयशस्वी ठरले आणि मग अपयशाची चिकित्सा सुरू झाली. तेव्हा ज्या ठिकाणी क्रांतीचे प्रयत्‍न करण्यात आले, तेथील कम्युनिस्टांचे नेतृत्व असंघटित, बेशिस्त आणि क्रांतीची निश्चित दिशा न समजलेले होते, असा निष्कर्ष काढण्यात आला. निरनिराळ्या देशांतील कम्युनिस्ट पक्षांना संघटित करणे, त्यांना क्रांतीच्या ध्येयधोरणाची निश्चित कल्पना देणे, मार्क्सवादावर त्यांची निष्ठा दृढ करणे आणि त्यांना पक्षशिस्त लावणे आवश्यक आहे, असे लेनिनने ठरविले. मार्च १९१९ मध्ये मॉस्कोत जगातील कम्युनिस्टपक्षांची परिषद भरविण्यात आली. त्याच वेळी थर्ड इंटरनॅशनल किंवा कम्युनिस्ट इंटरनॅशनल (कॉमिंटर्न) या संस्थेची स्थापना झाली. जुलै १९२० मध्ये कॉमिंटर्नचा दुसऱ्या अधिवेशनात एकवीस कलमी कार्यक्रम आखण्यात आला. यूरोपप्रमाणेच आशियातील वसाहतींकडेही अधिक लक्ष देण्याचे ठरले. त्या देशांत मार्क्सवादी साहित्याचा प्रसार, कम्युनिस्ट पक्षांची स्थापना आणि कामगार संघांचे कार्य यांना उत्तेजन देण्याचेही परिषदेने ठरविले. कॉमिंटर्नवर रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे वर्चस्व आणि नियंत्रण होते. पण पॉलिटब्यूरोला इतर देशांतील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा निश्चित अंदाज नसल्यामुळे अनेक ठिकाणी त्याचे मार्गदर्शन चुकीचे ठरले. त्यामुळे स्थानिक कम्युनिस्ट पक्ष व कामगार संघटना यांच्या वाढीवर आघात झाले. रशियन धोरणाच्या दडपणामुळे जर्मन व फ्रेंच कम्युनिस्ट पक्ष पराभूत होत गेले. त्यांना आणि त्यांच्याप्रमाणेच इतर देशांतील कम्युनिस्ट पक्षांनाही स्वतंत्र धोरण आखणे अशक्य झाले. वसाहतीच्या देशांतील राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळींतून ते बाहेर फेकले गेले.
कॉमिंटर्नने १९२४-२५ नंतर संयुक्त आघाडीचे धोरण अंमलात आणण्याचा इतर देशांतील कम्युनिस्ट पक्षांना आदेश दिला. समाजवादी पक्षांचे कम्युनिस्ट पक्षात विलीनीकरण करण्याचा आग्रह धरण्याऐवजी, त्यांना संयुक्त आघाडीत सामील करून घ्यावयाचे आणि त्यांची शक्ती खच्ची करून ते निष्प्रभ बनवावयाचे, असे हे धोरणे होते. पण त्यामुळेही अनेक कटकटी वाढू लागल्या. विशेषत: लेनिनच्या मृत्यूनंतर खुद्द रशियन कम्युनिस्ट पक्षातच स्टालिन आणि ट्रॉट्स्की यांचा संघर्ष वाढत गेला. एका देशात समाजवाद या स्टालिनच्या धोरणाने कॉमिंटर्नचे महत्त्व कमी झाले. ट्रॉट्स्कीचा गट पराभूत झाल्यामुळे इतर देशांतील त्याच्या पुरस्कर्त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आणि शेवटी कॉमिंटर्नचे धोरण संपूर्णपणे स्टालिनच्या हाती गेले. स्टालिनची आज्ञा म्हणजेच कॉमिंटर्न असे समीकरण होऊन बसले. या धोरणामुळे इतर देशांतील कम्युनिस्ट पक्ष रशियाच्या धोरणावर अवलंबून राहू लागले. त्यांना राष्ट्रीय धोरण आखणे अशक्य होऊ लागले, किंबहुना राष्ट्रीय धोरण प्रतिगामी आणि कॉमिंटर्नने आखून दिलेले धोरण पुरोगामी असे मानले जाऊ लागले. पण त्यामुळेच पक्षाच्या धोरणाची विसंगती वाढत गेली.
दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी स्टालिनने हिटलरशी अनाक्रमणाचा करार केला. त्यामुळे अनेक देशांतील कम्युनिस्ट पक्ष गोंधळून गेले. खुद्द जर्मनीतील कम्युनिस्ट पक्ष नेस्तनाबूद झाला. यूरोपातील अनेक कम्युनिस्ट पक्षांना तोंडघशी पडावे लागले. स्टालिनच्या धोरणामुळे यूरोपात हिटलरच्या आक्रमणाला कम्युनिस्ट पक्ष विरोध करू लागला. पण थोड्याच दिवसांत हिटलरने अनाक्रमणाचा करार मोडून रशियावर हल्ला केला आणि त्याबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे धोरण एकदम बदलले. फॅसिझमविरोधी लोकशाही युद्ध असे त्या युद्धाचे स्वरूप जाहीर करण्यात आले. भारतातही कम्युनिस्ट पक्षाने लोकयुद्धाचा प्रचार सुरू केला. पुन्हा एकदा संयुक्त आघाडीच्या राजकारणाला भर आला. पण या अस्थिर धोरणामुळेच अनेक देशांतील कम्युनिस्ट पक्षांत अतंर्गत मतभेद वाढले. युद्धमान परिस्थितीमुळे रशियाचे मार्गदर्शनही अवघड होऊन बसले. रशियालाही महायुद्धात गुंतल्यामुळे इतर देशांच्या कम्युनिस्ट पक्षांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होऊ लागले. शेवटी २२ मे १९४३ रोजी कॉमिंटर्न विसर्जित केल्याचे जाहीर झाले.
संदर्भ : 1. Roy, M. N. The Communist International, Bombay, 1943.
२. सुंठणकर, बा. रं. रॉयवाद-वसाहतींतील क्रांतीचे तत्त्वज्ञान, बेळगाव, १९३८.
३. सुंठणकर, स. रं. मार्क्सवादाचा प्रयोग - सोव्हिएट रशिया, धारवाड, १९३८.
लेखक : स. मा. गर्गे,

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate