অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुप्तसंघटना

गुप्तसंघटना

गुप्तसंघटना : इतर ध्येयांबरोबर संघटनेच्या सर्व बाबतींत गुप्तता राखणे, हे ज्या संघटनेचे अंतिम ध्येय व व्यवच्छेदक लक्षण असते, अशा संघटनेला गुप्तसंघटना म्हणतात. अनेक आदिम जमातींत आणि वांशिक गटांत अशा गुप्तसंघटना अस्तित्वात होत्या. समान हितसंबंध असणाऱ्या गटांच्या सभासदांमध्ये अंतर्गत बाबतींत एकात्मता निर्माण करून ती टिकविण्यासाठी, तसेच गटांत नसलेल्यांवर व गटांत न येणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी, अशा संघटनांचा उपयोग केला जात असे. नंतरच्या काळात समाजातील रूढ निष्ठांच्या विरोधी निष्ठा असणाऱ्या व्यक्तींना एकत्रित करून विरोधी निष्ठांची जोपासना करण्यासाठी अशा संघटनांचा उपयोग होऊ लागला.

गुप्तसंघटनांचे कार्य समाजाच्या सांस्कृतिक स्वरूपावर अवलंबून असते. आदिम जमातींत धार्मिक बाबतीत अधिक ज्ञान मिळवून, त्याचा उपयोग धार्मिक व इतर बाबतींत वर्चस्व मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी केला जाई. अशा वेळी गुप्तसंघटना पूर्वजांच्या अथवा जमातीच्या मूळ पुरुषाच्या मोठेपणाचा उपयोग करीत. अन्नपुरवठा व जमातीचे कार्य, सर्वसाधारण कल्याण तसेच संततीची प्राप्ती यांसारख्या वैयक्तिक बाबी यांबाबत गुप्त आचारधर्म रूढ होते. यामुळे आदिम गुप्तसंघटनांत दीक्षाविधी, आचारधर्म, सणसमारंभ, परवलीचे शब्द, मंत्र, प्रतीकात्मक चिन्हे, विशिष्ट पदार्थांचे सेवन, विशिष्ट पद्धतीचा पोषाख, विशिष्ट वस्तूंची मालकी इ. प्रकार रूढ झाले. प्रतीकात्मक वस्तू बाळगणाऱ्यांना दैवी शक्ती संरक्षण देते अथवा त्यांच्या इच्छा पुऱ्या करते, असा समज असल्याने प्रतीकांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले. मात्र हे महत्त्व गुप्तता कटाक्षाने पाळल्यासच मिळत असल्यामुळे गुप्तता टिकविणे महत्त्वाचे ठरले. काही जमातींत संपत्ती सामुदायिक मालकीची असताना फक्त अशा संघटनांच्या सभासदांना वैयक्तिक मालकीहक्काने संपत्ती ठेवता येत असे. जमातीचे प्रमुख अशा संघटनांच्या द्वारे आपली सत्ता टिकवून शांतता व सुव्यवस्था राखत. क्वचित काही ठिकाणी न्यायदानाचे कार्य अशा संघटनांतर्फे केले जात असे. काही ठिकाणी अशा संघटना जमातीत आणि जमातीच्या बाहेरदेखील धाकदडपशाहीने आपल्याला पाहिजे असेल, ते मिळवीत असत. राज्यसंस्थेची प्रगती झाल्यावर साहजिकच अशा संघटना फक्त प्रतीकांच्या किंवा समारंभाच्या स्वरूपात अस्तित्वात राहिल्या.

कालांतराने अशा संघटना करीत असलेले कार्य इतर संस्थांकडे गेले; पण सभासदत्वामुळे मिळत असलेल्या विशेष महत्त्वामुळे अशा गुप्तसंघटनांचे समारंभ, प्रतीकात्मक चिन्हे इ. गोष्टी अवशिष्ट राहिल्या. गुप्तसंघटनांच्या सभासदत्वामुळे आर्थिक फायदे व राजकीय क्षेत्रात विशेषाधिकार मिळतात. त्यामुळे गुप्तता कटाक्षाने व दक्षतेने पाळली जाते. संघटनांची रचना श्रेणीयुक्त असल्यामुळे नव्याने प्रवेश घेणारे सभासद, जुन्या अनुभवी सभासदांना विशेष मान देत असत व त्यामुळे त्यांचे महत्त्व आपोआप वाढत असे. व्यवसायांबाबत गुप्त माहिती, पैशांच्या व्यवहारांबाबत विशेष सवलती व अधिकार आणि सभासद नसलेल्यांकडून संपत्तीची प्राप्ती इ. आर्थिक फायदे सभासदांना मिळत.

आधुनिक काळात इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात आणि अनेक ठिकाणी प्रचलित सत्तेला विरोध करणाऱ्या गुप्तसंघटना अस्तित्वात असल्याचे आढळून येते. प्रचलित सत्ता पाशवी दंडशक्तीने विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करीत असेल, तर भूमिगत गुप्तसंघटना निर्माण होतात. एखाद्या अप्रिय गोष्टीविरुद्ध संघटना निर्माण होतात; पण त्या पुरोगामी असतातच असे नाही. याबरोबरच विशेषाधिकार आणि समाजातील विशिष्ट स्थान टिकविण्यासाठी अथवा सामाजिक प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठीही अमेरिकेतील ⇨कू क्लक्स क्लॅन यांसारख्या निग्रोविरोधी गुप्तसंघटना निर्माण झाल्या असल्याचे आढळून येते.

विशिष्ट धार्मिक हेतूने विशिष्ट साधना प्राप्त करून घेण्यासाठी निर्माण होणाऱ्या गुप्तसंघटनांचे उदाहरण म्हणून आपल्याकडील शाक्तपंथीय संघाचा दाखला देता येईल. जारण-मारण, चेटूक, जादू इ. गुप्त प्रकार आपल्या समाजात आढळतात. परकीय सत्तेचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात अनेक गुप्तसंघटना क्रांतिकारकांनी स्थापन केल्या. बंगालमधील अनुशीलन समिती, पंजाबमधील शहीद भगतसिंगाची हिंदुस्थान रेड आर्मी अथवा महाराष्ट्रातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अभिनव भारत, या अशा प्रकारच्या गुप्तसंघटना होत.

उद्देश भिन्न असले, तरी धार्मिक वा राजकीय गुप्तसंघटनांची संघटनापद्धती, शिस्त, फितूर सभासदांना शासन करण्याची पद्धती वगैरे कर्मकांडे सारखीच असत.

आदिम जमातींमधील गुप्तसंघटनांप्रमाणेच दीक्षाविधी, विशिष्ट पोषाख, बुरख्यासारख्या गोष्टी, प्रतीकात्मक चिन्हे इत्यादींचा उपयोग आधुनिक काळातील गुप्तसंघटनांमध्ये केला जातो. त्यामुळे सभासदाला आपण इतरांपेक्षा निराळे आहोत असे वाटते, अंगीकृत कार्याची सतत जाणीव राहते व संघटनेत एकात्मता टिकून राहते. सभासदाला संघटनेच्या व इतर सभासदांच्या संदर्भात काही कर्तव्ये बजावावी लागतात व त्यात चूक झाल्यास प्रसंगी प्राणाचे मोल द्यावे लागते. सभासदाची संघटनेशी असलेली निष्ठा इतर खुल्या संघटनांशी व संस्थांशी असलेल्या निष्ठेपेक्षा अधिक प्रखर, प्रभावी व सर्वश्रेष्ठ स्वरूपाची ठरते.

 

लेखक - श्री. प. सोहोनी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate