অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्यू राष्ट्रीय आंदोलन

ज्यू राष्ट्रीय आंदोलन

ज्यू राष्ट्रीय आंदोलन : (झाय्‌निझम). रोमन साम्राज्याच्या काळापासून ज्यू लोकांचे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात नव्हते. त्यांचा सर्वत्र होणारा छळ पाहून त्यांना एकत्र आणून त्यांचे एक राष्ट्र निर्माण करण्याचा विचार थीओडोर हेर्ट्‌झल (१८६०–१९०४) या व्हिएन्ना येथे वृत्तपत्रव्यवसाय करणाऱ्या यहुदी तरुणाच्या मनात आला. त्याने १८९७ साली पंधरा निरनिराळ्या देशांतून आलेल्या १९७ यहुदी व्यक्तींची एक सभा (पहिली झाय्‌निस्ट काँग्रेस) बाझेल येथे भरविली व पॅलेस्टाइनमध्ये ज्यू लोकांचे राष्ट्र निर्माण करण्याचा उद्देश जाहीर केला. हेर्ट्‌झलने लिहिलेल्या द ज्यूइश स्टेट (१८९६) या पुस्तकाने जगातील ज्यू लोकांच्या मनावर परिणाम झाला. यातूनच ज्यू राष्ट्रीय आंदोलन निर्माण झाले. आपल्या जनतेसाठी राष्ट्र निर्माण करण्याच्या हेर्ट्‌झलच्या प्रयत्नाला दोन दिशा होत्या : तुर्कस्तानचे मन वळवून पॅलेस्टाइनमध्ये ज्यूंसाठी एक प्रांत स्वतंत्रपणे मिळवायचा किंवा जगात इतरत्र कुठेही मिळेल त्या भागात वस्ती करायची. तुर्कस्तानचे मन वळविणे जेव्हा अशक्य झाले, तेव्हा ब्रिटिशांनी देऊ केलेला युगांडा हा भाग घेण्यासाठी हेर्ट्‌झलच्या मनाची तयारी होती.

१९०३ साली रशियात किशिनेव्ह या ठिकाणी यहुद्यांची अमानुष कत्तल झाली व इतरत्रही तसे प्रकार होऊ लागले. ते पाहून ब्रिटिशांच्या देणगीचा स्वीकार करावा, अशी सूचना त्या वर्षी भरलेल्या सभेत हेर्ट्‌झलने मांडली; परंतु व्हाइट्समानसारख्या इतर सभासदांना ते पटले नाही. याचा हेर्ट्‌झलच्या मनावर परिणाम झाला व लवकरच तो मरण पावला. पहिल्या महायुद्धात ज्यूंची मदत घेण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांच्या राष्ट्रीय आंदोलनाचा प्रश्न उचलून धरला; परंतु याच वेळी तुर्कस्तानविरुद्ध अरबांच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊन ब्रिटिश सरकारने मध्यपूर्वेच्या राजकारणात नवी समस्या उभी केली. युद्धसमाप्तीनंतर राष्ट्रसंघाने पॅलेस्टाइन हा ब्रिटिशांच्या हाताखालील संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केला, तिथे यहुदी लोकांची एजन्सी निर्माण केली व पॅलेस्टाइनमध्ये इंग्रजी व अरबी या भाषांबरोबर हिब्रू ही तिसरी भाषा जाहीर केली. हे करण्यात पॅलेस्टाइनमधील अरबांचा प्रश्न सुटण्याऎवजी तिथे येणाऱ्या यहुद्यांचे व अरबांचे वैर दिवसेंदिवस वाढत गेले व पॅलेस्टाइनचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करु लागला.

जगभरातले ज्यू आता पॅलेस्टाइनकडे धावू लागले. जर्मनीतल्या ज्यूंच्या हत्याकांडाने तर ही निर्वासित ज्यूंची संख्या अरबांपेक्षा जास्त झाली. १९३६ मध्ये अरबांनी ज्यूंविरुद्ध व ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. शेवटी पॅलेस्टाइनची विभागणी करण्याची कबुली ब्रिटिशांना द्यावी लागली; परंतु यहुद्यांच्या वाट्याला जो प्रदेश आला तो त्यांना फार छोटा वाटला. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे सोपविला. २९नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रे या संघटनेने आपला निकाल जाहीर केला. ज्यूंचे समाधान झाले; पण अरबांनी मात्र चिडून ज्यूंवर सर्वत्र हल्ले केले. १४ मे १९४८ रोजी मुख्य प्रधान डेव्हिड बेन-गूरिऑन याने 'ज्यू जनतेचे राष्ट्र-इझ्राएल' याचा जन्म जाहीर केला. यहुदी जनतेने त्या दिवशी आनंद व्यक्त केला. पण १५ मेच्या सकाळी संयुक्त अरब राष्ट्रांच्या सैन्याने इझ्राएलवर बाँबवर्षाव सुरू केला. १९४९ साली इझ्राएल या युद्धात यशस्वी झाले व सर्व अरब राष्ट्रांशी त्याने शांततेचा करार केला. ज्यू राष्ट्रीय आंदोलन ही जशी राजकीय तशीच धार्मिक व सामाजिक चळवळ आहे. ज्यू लोकांना स्वतःचे राष्ट्र मिळवून दिल्यानंतर आता या चळवळीच्या पुढाऱ्यांनी यहुदी धर्माच्या प्राचीन सहिष्णुतेच्या परंपरेप्रमाणे आपल्या राष्ट्रातील अल्पसंख्यांक अरब व ख्रिस्ती लोकांना शिक्षण वगैरे बाबतींत खास सवलती दिल्या आहेत. सर्व राष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक उन्नती हे आजच्या ज्यू राष्ट्रीय पुढाऱ्यांचे ध्येय आहे.

 

संदर्भ : 1. Buber, Martin, Israel and Palestine; The History of an Idea, New York, 1952.

2. Halpern, B. The Idea of the Jewish State, London, 1961.

3. Kaplan, M. M. A New Zionism, New York, 1959.

4. Weizmann, Chaim, Trial and Error, London, 1949.

5. पालकर, ना. ह. इझ्राएल : छळाकडून बळाकडे, पुणे, १९६६.

लेखक - दि. द. माहुलकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate