অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पंचमस्तंभ

पंचमस्तंभ

पंचमस्तंभ : स्वदेशाविरुद्ध शत्रूस घातपाताच्या मार्गाने साह्य करणारी देशद्रोही फितुरांची संघटना. विशेषतः युद्धकाळात हे लोक घातपात, हेरगिरी वा तत्सम राष्ट्रविरोधी कृत्ये करून राष्ट्राला प्रतिकूल व शत्रूला अनुकूल वातावरण निर्माण करतात. ‘पंचमस्तंभ’ ही संज्ञा कोणी व केव्हा प्रचारात आणली याविषयी एकमत नाही.

तथापि १३ जुलै १९३६ ते २८ मार्च १९३९ या काळात स्पेनमध्ये झालेल्या यादवी युद्धात या संज्ञेचा उगम झाला, असे एक मत आहे. नोव्हेंबर १९३६ मध्ये राजसत्ताकवादी (रॉयलिस्ट) पक्षाने सैन्याच्या चार स्तंभांनी (कॉलम्स) जनरल मोला यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताकवादी (रिपब्लिक) पक्षाच्या ताब्यातील माद्रिद राजधानीस वेढा घातला.

या चार स्तंभांपैकी कोणता स्तंभ माद्रिद हस्तागत करील, असा एक प्रश्न वार्ताहरांनी मोलास विचारला होता. त्या वेळी राजधानीतील राजसत्ताकवादीच्या गुप्त हितचिंतकांचा पंचमस्तंभ राजधानी काबीज करील, असे उत्तर मोलाने त्यांना दिले होते. तप्तूर्वीच भुंडो ऑब्रेरो या वर्तमानपत्राच्या ३ ऑक्टोबर १९३६ च्या अंकात पंचमस्तंभ या संज्ञेचा प्रथम वापर करण्यात आला होता, असे डॉक्टर डी. योंग यांनी त्यांच्या द जर्मन फिफूथ कॉलम हज द सेकंड वर्ल्ड वॉर (१९५८) या ग्रंथात म्हटले आहे; परंतु लॉर्ड सेंट ऑझ्वाल्ड या वार्ताहराच्या म्हणण्याप्रमाणे त्याने जुलै १९३६ च्या प्रारंभी स्पॅनिश मोरोक्कोत पंचमस्तंभ ही संज्ञा प्रथम प्रचारात आणली.

मोलान तिचा वारंवार पुनरुच्चार केल्यामुळे तिला लोकमान्यता मिळाली. रशिया-तुर्कस्तान युद्धात १७८९ मध्ये रशियन सेनापती सुव्हॉरॉव्ह याने ईस्माइल या तुर्की किल्ल्यास वेढा घातला होता. त्यावेळी किल्ल्यातील पंचमस्तंभीयांच्या फितुरीमुळे हा किल्ला रशियाने जिंकला. तेव्हापासून पंचमस्तंभ ही संज्ञा प्रचारात आली, असेही एक मत आहे.

भारताच्या इतिहासातही फितुरीची उदाहरणे आढळतात. उदा., सूर्याजी पिसाळाच्या फितुरीमुळे रायगड पडला (१६८९) चाणक्याच्या अर्थशास्त्रातील ‘दुर्गलम्भोपायः’ या प्रकरणत पंचमस्तंभसदृश कारवायांचे विवेचन आ़ढळते. विसाव्या शतकात पंचमस्तंभाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

 

संदर्भ : Thomas. Hugh, The Spanish Civil War, London, 1971.

लेखक - हे. वि. दीक्षित

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate