অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पग् वॉश चळवळ

पग् वॉश चळवळ : बर्ट्रड रसेल यांच्या प्रेरणेने जागतिक सुरक्षा व निःशस्त्रीकरण यांसाठी मुख्यतः शास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली एक चळवळ. ९ जुलै १९५५ रोजी लंडनमध्ये बर्ट्रंड रसेल यांनी एक जाहीरनामा वाचून दाखविला; शास्त्रज्ञांनी केवळ शास्त्रज्ञ म्हणून मानवाच्या कल्याणार्थ जागतिक घडामोडींत जबाबदारीचा वाटा उचलावा, अशी भूमिका त्यात त्यांनी मांडली. संहारक शस्त्रास्त्रांची निर्मिती हे शास्त्रज्ञांचेच अपत्य होय त्यांचा उपयोग मानवी विनाशासाठी होत असेल, तर त्याविरूद्ध आवाज उठवून जागतिक लोकमत संघटित करणे, ही शास्त्रज्ञांचीच जबाबदारी आहे. रसेलच्या या जाहिरनाम्याच्या पत्रकाला ॲल्बर्ट आइन्स्टाइन-सारख्या शास्त्रज्ञांनी पाठिंबा दिला व त्यांच्यासह इतर दहा प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी त्याच्या जाहिरनाम्यावर सह्याही केल्या. या चळवळीची पहिली परिषद ७ ते १० जुलै १९५७ मध्ये नोव्हास्कोशा (कॅनडा) प्रांतातील पग्वॉश या खेड्यात भरली, म्हणून तिला हे नाव मिळाले.

या खेड्यात आपल्या जन्मस्थळी ही परिषद भरावी, अशी इच्छा या परिषदेचे पहिले आश्रयदाते अमेरिकन धनिक बँकर सायरक ईटन यांची होती. सर्व खर्च त्यांनीच केला. पुढील कार्यासाठीही तरतूद केली. अशा परिषदेचे अधिवेशन भारतात नवी दिल्ली येथे भरावे, अशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची इच्छा होती. म्हणून रसेल यांच्या सहीने देशोदेशींच्या शास्त्रज्ञांनी त्यांनी निमंत्रणे पाठविली होती; पण त्याच वेळी सुएझ झगडा उद्‌भवल्यामुळे ती योजना बारगळली.

या चळवळीच्या १९७६ पर्यंत २४ परिषदा रशिया, भारत, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, यूगोस्लाव्हिया, स्वीडन, चेकोस्लोव्हाकिया इ, देशांत भरल्या. भारतात दोन वेळा पग्‌वॉश परिषदा भरविण्यात आल्या (उदयपूर १९६४ व मद्रास १९७६). भारतात पग्‌वॉश चळवळीचे कार्यालय विज्ञान भवनात नवी दिल्ली येथे आहे. येथे १९७८ मध्ये  पग्‌वॉश उद्देशांना अनुसरून एक आंतरराष्ट्रीय कार्यसत्र भरवि -ण्यात आले. त्याचा मसुदा जागतिक परिषदेपुढे विचारार्थ ठेवला.

भारता- मधील मद्रास परिषदेनंतर पुढील अधिवेशन म्यूनिक (प.जर्मनी) येथे १९७७ च्या जानेवारीत झाले.१९७८ ची पग्‌वॉस परिषद व्हांनी (बल्गेरिया) येथे भरली होती.

या चळवळींची उद्दिष्टे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहेत

  1. संहारक शस्त्रास्त्रांना विरोध,
  2. जैव व रासायनिक युद्धास विरोध,
  3. नैसर्गिक आपत्तिंचा अभ्यास करून त्यांवर उपाय शोधावे,
  4. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा,
  5. युद्ध-विरोध,
  6. शास्त्रीय ज्ञान मानवाच्या हितासाठी वापरले जावे,
  7. दुर्बल, नवोदित राष्ट्रांचा  आर्थिक विकास घडवून आणावा. शस्त्रास्त्रानिर्मितीची स्पर्धा थांबवून शस्त्रास्त्राच्या साठ्यांस आळा घालावा आणि वाढत्या लोकसंख्येबाबत विचार करून आर्थिक विकास व परिस्थितिजन्य समस्यांकडे लक्ष द्यावे.

ग्‌वॉशचे सदस्य-शास्त्रज्ञ वर्षातून एकदा वा अनेकदा एकत्र जमतात. विविध जागतिक समस्यांवर चर्चा करतात आणि कार्याची दिशा व पद्धती यांबद्दल विचार मांडतात. त्यांच्या या परिषदांचा वृत्तांत प्रसिद्ध होतो. याशिवाय पग्‌वॉश न्यूजलेटर हे त्रैमासिक चालू आहे. पहिल्या परिषदेस केवळ २२ शास्त्रज्ञ हजर होते, तर १९७६ च्या भारतातील या परिषदेश १०० शास्त्रज्ञ हजर होते. दिवसेंदिवस तिची व्याप्ती व कार्य वाढत आहे. ही चळवळ संघटित झाली असून, सुरुवातीचे हिचे प्रा. जोसेफ रॉटब्लॅट यांच्या खासगी वास्तूत असलेले कार्यालय लंडन येथे स्थिरावले आहे. प्रारंभी काही धनिकांनी या चळवळीस साहाय्य केले. पुढे वहुतेक मान्यवर संस्थांनी तिला पाठिंबा दिला.

भारतीय शास्त्रज्ञांनी या चळवळीस प्रथमपासून प्रतिसाद दिला. पग्‌वॉश समूहातील विक्रम साराभाई, होमी भाभा, हुसेन झाहीर, महालनोविस, करिआमणिक्कम कृष्णन, दौलतासिंग कोठारी वगैरे भारतीय शास्त्रज्ञ-विचारवंत मंडळी पग्‌वॉश मंडळाची सदस्य होती. भारतीय शास्त्रज्ञांनी १९७३ च्या जिनीव्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय आचार-संहिता सुचविली, ती पुढे पग्‌वॉश आचार-संहिता म्हणून प्रसिद्धीस आली.

रिषदा, चर्चासत्रे, अभ्यासमंडळे यांचे नियोजन व कार्य पग्‌वॉश मंडळातर्फे चालते. पग्‌वॉश ही सद्यःस्थितीत एक विचारवंत-शास्त्रज्ञांची संघटना असून मानवी समाज व विज्ञान यांचा अन्योन्य संबंध तसेच वैज्ञानिक संशोधनाने मानवी कल्याण साधणारी व विध्वंसक संशोधनाला विरोध करणारी एक संस्था आहे. तथापि शस्त्रनिर्मितीची स्पर्धा थांबलेली नाही. म्हणूनच पग्‌वॉश चळवळीला आधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या चळवळीस कोणत्याही शासनाचे प्रत्यक्ष साहाय्य नाही. शास्त्रज्ञांनी स्वयंस्फूर्तीने चालविलेले हे एक कार्य आहे.


संदर्भ : Rotblat, y3wuoeph, Scientists in the Quest for Peace, Cambridge (Mass.), 1972.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 2/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate