অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वफ्‌द

वफ्‌द

ग्रेट ब्रिटनपासून ईजिप्तला स्वातंत्र्य मिळवून देण्यात प्रामुख्याने साधनीभूत ठरलेला राष्ट्रीय राजकीय पक्ष. अल्‌−वफ्‌द या मुळ अरबी शब्दाचा अर्थ प्रतिनिधिमंडळ असा असून ईजिप्तमध्ये अल्-वफ्‌द अल्‌ मिस्त्री (ईजिप्शियन प्रतिनिधिमंडळ) असा त्यावेळी वाक्‌प्रचार परिचित होता. सुरूवातीस साद झगलूल पाशा हा त्याचा प्रमुख सूत्रचार होता आणि त्याने राष्ट्रवादी लोकांचे एक स्थायी स्वरूपाचे प्रतिनिधिमंडळ १३नोव्हेंबर १९१८रोजी स्थापन केले. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीपासून ईजिप्त आणि इंग्लंड यांमधील राजकीय संबंध ताणले गेले होते. सुएझ कालव्यामुळे वाळवंटातील युद्धाकरिता इंग्लंड ईजिप्तचे महत्त्व जाणून होता. या मंडळाने लंडनमध्ये ईजिप्तच्यास्वातंत्र्यासाठी प्रथम आवाज उठविला आणि युद्धनंतरच्या सर्व शांतता परिषदांत स्वातंत्र्याची मागणी केली.

ईजिप्तमधील राष्ट्रवाद्यांचे एकमेव प्रतिनिधी म्हणून बोलण्याचे अधिकार आपल्यालाच असावेत, अशी वफ्‌दने भूमिका घेतली. पुढे आंदोलन तीव्र झाल्यावर काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. मार्च १९१९मध्ये झगलूल पाशा, इस्माईल सिद्की, हमिद अल्‌-बासिर इ. नेत्यांना ब्रिटिश शासनानेकाही काळ हद्दपार केले. त्यानंतर झगलूल पाशा आणि तत्कालीनवसाहत मंत्री लॉर्ड मिलनर यांत जून १९२०मध्ये बोलणी झाली. मर्यादित स्वातंत्र्याचा निर्णय होत असताना करारासंबंधी ब्रिटिशांशी बोलणी कोण करणार, याविषयी सुलतान आणि राष्ट्रवादी यांमध्ये वादनिर्माण झाला.

परिणामतः ब्रिटिशांनी वफ्‌द आणि त्यांचा नेता झगलूल पाशा यांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले आणि राजासअवाजवी महत्त्व दिले. तेव्हा झगलूल पाशा संशेल्समध्ये भूमिगत झाला (२१डिसेंबर १९२०) आणि राष्ट्रवाद्यांचे आंदोलन अधिक प्रखर झाले. यामुळे लॉइड-जॉर्जने ईजिप्तला मर्यादीत स्वातंत्र्य देण्याची घोषणासंसदेत २८फेब्रुवारी १९२२रोजी केली. ईजिप्त हे संरक्षित राज्य असल्यामुळे ब्रिटिशांना तेथील राजेशाहीवर वर्चस्व ठेवणे आणि तेथील सत्ता टिकविण्यासाठी सैन्य ठेवणे क्रमप्राप्तच होते. मतभेद होऊनही वफ्‌दने नवीन शासनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. वफ्‌द पक्ष, झगलुल पाशा आणि पुढे झगलूल पाशाच्या मृत्यूनंतर (१९२७) नाकासपाशा याने पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न केले; परंतु ब्रिटिश सेना व नौदल सुएझच संरक्षणासाठी १९३६पर्यंत ईजिप्तमध्ये ठाण मांडून होते. त्यामुळे ईजिप्तमध्ये स्थिर शासन प्रस्थापित होणे अवघड झाले.

वफ्‌दचे १९२३ च्या सप्टेंबरमध्ये पूर्णतः राजकीय पक्षात रूंपांतर करण्यात आले. याच सुमारास पाश्चात्त्य धर्तीवरील संविधान स्वीकारण्यात येऊन द्विसदनी संसद अस्तित्वात आली. राजा, वफ्‌द पक्ष आणि ब्रिटिश शासन असा त्रिसूत्री कारभार सुरू झाला. राजेशाहीचे वर्चस्व होतेच. वफ्‌द पक्षाने अंतर्गत स्वायत्तता, सांवैधानिकशासनव्यवस्था, नागरी हक्क आणि सुदान व सुएझ कालवा यांच्यानियंत्रणाची मागणी केली.

नवीन संविधानानुसार १९२४मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत वफ्‌द पक्षाला बहुमत (नव्वद टक्के जागा) मिळाले. घटनेतील अनेक तरतुदीविरूद्ध विशेषतः सुलतानास दिलेले खास अधिकार वफ्‌दला अमान्य होते; तरी पक्षाने घटनेला पाठिंबा दिला. पुढे अप्रत्यक्ष निवडुकांऐवजी प्रत्यक्ष निवडणुकांचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुलतान पहिले फाउद याने जुलै १९२८मध्ये संसद बरखास्त करून निवडणुका तीन वर्षे पुढे ढकलल्या; परंतु वफ्‌द पक्षाच्या अथक प्रयत्नांमुळे १९२९ मध्ये निवडणुका होऊन वफ्‌द पक्षच पुन्हा बहुमताने निवडून आला आणि नाकास पाशा पंतप्रधान झाला. त्यावर्षी शासनाने राजावर काही निर्बंध लादले; परिणामतः राजाने मंत्रिमंडळ बरखास्त करून संविधानच निलंबित केले. (१९३०).

या सर्व घटनांमुळे स्वातंत्र्यसंबंधी ब्रिटिशांबरोबरचा करार होण्यातअडचणी निर्माण झाल्या. वफ्‌द पक्ष, ब्रिटिश शासन आणि सुलतान यांत तिहेरी वाद चालू होता. १९२३ची घटना पुर्नजीवित करण्यात आली आणि त्यानुसार १९३५मध्ये पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. वफ्‌दला पुन्हा बहुमत मिळाले; पण त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली. देशात मुस्लिम ब्रदरहुड, कम्युनिष्ट वगैरे अन्य पक्ष कार्यरतझाले होते. मुस्लिम ब्रदरहुडा हा पूर्णतः धर्माधिष्ठित पक्ष होता. मुस्ताफानाकासच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बनविण्यात आले. (१९३६−३७). नवीन सुलतान फरूक याबरोबर पक्षाचे संबंध फारसे सौहार्दपूर्ण नव्हते.म्हणून पुन्हा तणाव निर्माण झाला आणि सुलतानाने हेही मंत्रिमंडळ बरखास्त केले.

तत्पूर्वी इंग्लंड व ईजिप्तमध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा करार झाला (१९३६). युद्धकाळापूर्वी वफ्‌द पक्षानेतरूणांना प्रशिक्षण देण्यासाठी तरूणांचा संघ (राबित अश्‌-शुब्बान अल्‌-वफ्‌दीयीन)स्थापन केला. यातूनच पुढे वफ्‌दची ब्ल्यूशर्टनामक सैनिकिसम संघटना जन्मास आली. याच सुमारास वफ्‌द पक्षातून ब्ल्यूशर्टनामक सैनिकिसम संघटना जन्मास आली. याच सुमारास वफ्‌द पक्षातून अहमद मेहेर यांसारखे प्रभावी नेते बाहेर पडले (१९३८). फुटीरांनी नवीन पक्षकाढला. त्यामुळे वफ्‌दची लोकप्रियता आणखी घटू लागली. युद्धकाळात वफ्‌दने ब्रिटिशांना सहकार्य दिले; परंतु सुलतानाचा विरोध ही कायमची डोकेदुखी झाली. तेव्हा ब्रिटिशांनी सुलतानावर लष्कराचा वापर करून दडपण आणले आणि नकास यास पंतप्रधान केले (१९४२−४४) व आवश्यक ते सर्व सहकार्य मिळविले.

ईजिप्त-इझ्राएल संघर्ष, पक्ष व शासन यांतील भ्रष्टाचार, वफ्‌द पक्षातील फाटाफूट आणि सुलतान फरूकची अकार्यक्षमता यांतून लष्करातील तरूण अधिकाऱ्यांनी मुहंमद नगीब व गमाल अब्दुल नासर यांच्या नेतृत्वाखाली २३जुले १९५२रोजी अवचित सत्तातराद्वारे उठाव केला. फरूकने राज्यत्याग केला आणि नगीब सर्वसत्ताधारी−अध्यक्ष−पंतप्रधान−झाला. त्याने सर्व राजकीय पक्ष बरखास्त करून एकतंत्रीसत्ता स्थापन केली. यावेळी वफ्‌द पक्ष चार दैनिके व चार साप्ताहिके चालवीत होता. नगीबने राजेशाही नष्ट करून ईजिप्तमध्ये एकपक्षीय−एकाधिकारशाही आणली.

नगीबला १९५४मध्ये सत्तेवरून काढूननजरकैदेत टाकण्यात आले आणि गमाल नासर (१९५४−७०) सर्व सत्ताधीशझाला. त्याच्या मृत्यूनंतर अन्वर सादत (१९७०−८१)अध्यक्ष झाला. त्याच्या कारकिर्दीत इस्राएलबरोबर संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून सादतने इस्राएलला भेट देऊन कॅम्प डेव्हिड येथे ऐतिहासिक करार केला (१९७७). यानंतर सादतने देशांतर्गत आणि परराष्ट्रीय धोरणांत आमूलाग्र बदल घडवून आणले. सादतच्या बहुपक्षीय पद्धतीच्या धोरणानुसार वफ्‌दच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे पुन्हा संघटन केले.

(४फेब्रुवारी १९७८); तथापि अल्पकाळातच त्यांनी स्वतः होऊन या पक्षाचे विसर्जन केले (२जून १९७८) आणि संसदेत अपक्ष सदस्य म्हणून बसण्याचे मान्य केले. वफ्‌द पक्षाने ईजिप्तच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्याचे मूळ नेतृत्व निधर्मी, राष्ट्रवादी आणि आधुनिकतेकडे झुकणारे होते.

वफ्‌द पक्षाने ईजिप्तच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्याचे मूळ नेतृत्व निधर्मी, राष्ट्रवादी आणि आधुनिकतेकडे झुकणारे होते.

 

संदर्भ : 1. Little, Tom Modern Egypt, London, 1967.

2. Quraishi, Z. M. Liberal Nationalism in Egypt, London, 1967.

लेखक - एकनाथ साखळकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate