অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंडियम

घनरूप धातवीय मूलद्रव्य

घनरूप धातवीय मूलद्रव्य. चिन्ह In.; अणुभार ११४·७६; अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ४९; आवर्त सारणीतील (मुलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील) गट ३; स्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) ११३ व ११५, किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणारा) समस्थानिक ११६; २०० से. ला वि. गु. ७·३; द्रवांक (वितळबिंदू) १५६·४० से.; क्वथनांक (उकळबिंदू) २००००से. पेक्षा जास्त; पृथ्वीच्या कवचातील प्रमाण एक लक्षांश टक्के; सामान्य संयुजा ३, याच्या १ व २ संयुजाही आढळतात [ संयुजा].

गुणधर्म

इंडियमाची हॅलोजनांबरोबर (फ्ल्युओरीन, क्लोरीन, ब्रोमीन व आयोडीन या अधातवीय मूलद्रव्यांबरोबर) सरळ विक्रिया होऊन तद्‌नुरूप हॅलाइडे मिळतात. याचे कार्बोनेट, ऑक्झॅलेट व सल्फाइड पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारी) आहेत. इंडियमावर सामान्य तापमानात हवेचा परिणाम होत नाही पण ते लाल होईपर्यंत तापविले तर त्याचे इंडियम ट्राय-ऑक्साइड (In2O3) बनते. इंडियम थंड व विरल अम्‍लात सावकाश विरघळते पण उष्ण किंवा संहत अम्‍लात लवकर विरघळते. क्षारांचा (अल्कलींचा) व उकळत्या पाण्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. हे स्फटिकी, तन्य (तार काढण्याजोगे), शिशापेक्षा मऊ व प्लॅटिनमासारखे रुपेरी आहे. इंडियमाचे अतिशय कमी प्रमाण असलेल्या धातुपाषाणातून ते वर्णपटदर्शकाने [ वर्ण-पटविज्ञान] ओळखता येते.

प्राप्ती

एफ्. राइश व टी. रिक्टर यांनी १८६३ साली थॅलियमासाठी जस्ताचे धातुपाषाण (झिंकब्‍लेंड) तपासताना हे मूलद्रव्य शोधून काढले. हे निसर्गात निरनिराळ्या ठिकाणी लोखंड, शिसे, तांबे व विशेषत: जस्ताबरोबर धातुपाषाणात आढळते. या धातूंचे निष्कर्षण (धातुपाषाणापासून धातू मिळविणे) करीता असता, धातूंचा रस केल्यानंतर राहिलेल्या संहत मळीत उपफल (दुय्यम पदार्थ) म्हणून इंडियम शिल्लक राहते. त्यातून ते मिळवितात.

उपयोग

विमानातील नळीच्या धारव्यांसाठी (फिरत्या भागांच्या आधारांसाठी) त्याचा उपयोग करतात. धारव्यांच्या पृष्ठभागावर इंडियमाचा मुलामा चढविला असता ते गंजत नाहीत व वंगणाचा थर अधिक चांगल्या प्रकारे चिकटून राहण्यास मदत होते. कमी तापमानाला वितळणारे तिचे मिश्रधातू सांधेजोड करण्याच्या धातुमिश्रणांत वापरतात. वितळलेली इंडियम धातू काच व इतर पदार्थांचे पृष्ठभाग ओलसर स्थितीत ठेऊ शकते व यामुळे काच, धातू, क्वॉर्ट्झ, संगमरवर इ. पृष्ठभागांचे वाताभेद्य जोड करण्याकरिता तिचा चांगला उपयोग होता. इंडियम व जर्मेनियम यांचे मिश्रधातू अर्धसंवाहकांच्या उत्पादनात वापरतात. ट्रँझिस्टर व सौर विद्युत् घटमालेत इंडियम फॉस्फाइड वापरतात. अणुभट्टीतील ऊष्मीय न्यूट्रॉन स्रोत मोजण्यासाठी तसेच अणुभट्टीच्या जवळ काम करणाऱ्या लोकांचे व जवळपासच्या सामग्रीचे रक्षण करण्याकरिता न्यूट्रॉनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी इंडियमाचा उपयोग होतो.

लेखक : न.वि.कारेकर

स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate