অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटर्बियम

इटर्बियम

विरल मृत्तिका गटातील एक धातुरूप मूलद्रव्य [ विरल मृत्तिका]. चिन्ह Yb. अणुक्रमांक (अणूकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ७०; अणूभार १७३·०४; याचे १६८,१७०, १७१, १७२, १७३, १७४ व १७६ या अणुभारांचे समस्थानिक (तोच अणुक्रमांक पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) नैसर्गिकरीत्या आढळतात; क्वथनांक (उकळबिंदू) सु. २,४७५० से.; द्रवांक ८२४० से.; फलककेंद्रित घनीय संरचनेच्या स्फटिकांची [ स्फटिकविज्ञान] घनता ६.९७७ व शरीरकेंद्रित घनीय संरचनेच्या स्फटिकांची घनता ६·५४ ग्रॅ./सेंमी.३; याच्या द्विसंयुजी व त्रिसंयुजी [ संयुजा] अवस्था असतात; भूकवचातील याचे प्रमाण २·६ × १०-४ टक्के आहे; ही रुपेरी व मऊ धातू हवेत हळूहळू गंजते. तिचे विरल मृत्तिका गटातील मूलद्रव्यांपेक्षा (मूलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील म्हणजे आवर्त सारणीतील अणुक्रमांक ५७ ते ७१च्या मूलद्रव्यांपेक्षा) कॅल्शियम-स्ट्राँशियम-बेरियम या श्रेणीशी अधिक साम्य असल्याचे दिसून येते; विद्युत् विन्यास (अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, ३२, ८, २.

जे. सी. जी. मारीन्याक यांना १८७८ साली इटर्बी (स्वीडन) येथे आढळलेल्या मातीत इटर्बियम जास्त प्रमाणात असल्याचे प्रथम दिसून आले. त्यांनी त्या मातीला इटर्बी गावाचे नाव दिले. नंतर १९०७-०८ साली जी. यूर्बी व ए. सी. फोन वेल्सबाख यांनी स्वतंत्रपणे असे दाखवून दिले की, मारीन्याक यांना सापडलेली माती म्हणजे दोन ऑक्साइडांचे मिश्रण आहे. त्या ऑक्साइडांना यूर्बी यांनी ल्युटेशिया व इटर्बिया आणि त्याच्यातील धातूंना ल्युटेशियम व निओइटर्बियम अशी नावे दिली. निओइटर्बियमाचेच पुढे इटर्बियम झाले. कधीकधी इटर्बियमाला अल्डेबेरॅनियम असेही म्हणतात. हे अतिशय विरल असे मूलद्रव्य असून विरल मृत्तिकांनी युक्त अशा गॅडोलिनाइट, ब्लोमस्ट्रांडाइन, समर्स्काइट इत्यादींसारख्या खनिजांत ते अत्यल्प प्रमाणात आढळते.

द्विसंयुजी अवस्थेतील इटर्बियम इतर विरल मृत्तिकांपासून सहज वेगळे काढता येते. सोडियम पारदमेलाने (सोडियमाच्या पाऱ्याबरोबरील मिश्रधातूने) प्रथम  क्षपण  व नंतर शोषण करून इटर्बियम इतर विरस मृत्तिकांपासून वेगळे केले जाते. ही पद्धती जे. के. मार्श यांनी १९४२ साली शोधून काढली. आयन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) विनिमय तंत्राने [ आयन-विनिमय] त्रिसंयुजी अवस्थेतील इटर्बियम इतरांपासून वेगळे करता येते. ऊर्ध्वपातनाने (तापवून तयार झालेले बाष्प थंड करून) इटर्बियम धातू मिळविण्याची पद्धती सर्वात चांगली आहे. या पद्धतीमध्ये Yb2O3 या ऑक्साइडाचे लँथॅनम धातुबरोबर ऊष्मीय क्षपण करण्यात येते. नंतर निर्वात ऊर्ध्वपातन करून बाहेर पडणारी शुद्ध इटर्बियम धातू मिळविली जाते, कारण इटर्बियम ही बाष्पनशील विरल मृत्तिकांपैकी एक आहे. इटर्बियमाच्या निर्जलीय हॅलाइडांचे (क्लोराइड, ब्रोमाइड इ.) क्षार (अल्कली) किंवा क्षारीय धातू (सोडियम, पोटॅशियम, लिथियम इ.) यांच्याद्वारे ऊष्मीय क्षपण करूनही शुद्ध इटर्बियम धातू तयार करतात.

हिचे Yb2O3हे सामान्य ऑक्साइड वर्णहीन असून ते अम्लामध्ये सहज विरघळते व त्यापासून त्रिसंयुजी, वर्णहीन व समकर्षुकीय (निर्वातापेक्षा जास्त चुंबकीय पार्यता असलेल्या) लवणांचे विद्राव मिळतात. याची द्विसंयुजी संयुगेही असतात. डब्ल्यू. क्लेम व डब्ल्यू. शूथ यांनी त्रिसंयुजी संयुगाचे (YbCl3) हायड्रोजनानेक्षपण करून द्विसंयुजी संयुग (YbCl2) मिळविले.त्रिसंयुजी संयुगांच्या विद्युत् विच्छेदी क्षपणानेही द्विसंयुजी संयुगे तयार करता येतात व ती अतिशय शुद्ध स्वरूपात मिळू शकतात. तसेच त्रिसंयुजी लवणाची सोडियम पारदमेलाशी विक्रिया घडवून आणून Yb+2 हा आयन मिळविता येतो. हा आयन फिकट हिरव्या रंगाचा असतो.

YbSO4, YbCl2, YbBr2, Yb(OH)2 व YbCO3 ही द्विसंयुजी संयुगेही फिकट हिरवी असतात. Yb+2 हा आयन जलीय विद्रावात अगदी अस्थिर असल्यामुळे पाण्याचे जलद क्षपण होऊन हायड्रोजन मुक्त होतो. त्रिसंयुजी अवस्थेतील इटर्बियमाचे गुणधर्म विरल मृत्तिकांच्या गुणधर्माशी जुळणारे असे असतात. त्याची Yb2O3, Yb2(SO4)3 व YbCl3 ही त्रिसंयुजी लवणे पांढरी आहेत. Yb+3 हा आयन वर्णहीन असतो.

संदर्भ : Hampel, C. A. Rare Metals Handbook, London, 1961.

 

लेखक : अ. ना. ठाकूर

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate