অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑक्साइडे

ऑक्साइडे

 

ऑक्सिजन व इतर एखादे मूलद्रव्य यांच्या द्वि-अंगी (दोन घटक असलेल्या) संयुगाला ऑक्साइड म्हणतात.
बंधाच्या प्रकारास अनुसरून त्यांचे पुढील गट पडतात :
(१)आयनी ऑक्साइडे : यांच्यात धातुजालकावर आधारलेले  O2-धातूंचे ऋणायन (धन विद्युत् भारित अणू) असतात. उदा., क्षार (अल्कली) धातूंची M2Oव क्षारीय मृत्तिकांची MOऑक्साइडे (येथे M= धातू. उदा,. सोडियम Na).
(२) सहसंयुजी ऑक्साइडे:यांच्या रेणूतील अणू सहसंयुजी (दोन अणूंत इलेक्ट्रॉनांची भागीदारी असणाऱ्या) बंधाने जोडलेले असतात. उदा. , SO2, P4O10, CO2, SiO2.
(३) मध्यस्थित ऑक्साइडे : यांचे बंध पूर्णपणे आयनी नाहीत व पूर्णपणे सहसंयुजीही नाहीत, अशा स्वरूपाचे असतात. उदा., AS4O6, Sb4O6, SeO2, TeO2, SnO, PbO.
रासायनिक लक्षणास अनुसरून ऑक्साइडांचे पुढील गट पडतात :
(१) अम्‍लीय ऑक्साइडे : यांची व क्षारकांची विक्रिया होऊन लवणे तयार होतात. ही सामान्यतः कमी विद्युत् घनता असलेल्या (संयुजी इलेक्ट्रॉन निघून जाण्याची व धन विद्युत् भार वाढविण्याची प्रवृत्ती असलेल्या) मूलद्रव्यांपासून झालेली व सहसंयुजी असतात. यांपैकी पाण्यात विरघळू शकणाऱ्या ऑक्साइडांपासून अम्‍ले तयार होतात. उदा., CO2, SO2, SO3, P4O10, P4O6, N2O4, CrO3, Mn2O7, SiO2.
(२) क्षारकीय ऑक्साइडे : यांची व अम्‍लांची विक्रिया होऊन फक्त लवणे व पाणी मिळते. यांतील बंध सामान्यतः आयनी पण कित्येकांतील बरेचसे बंध सहसंयुजीही असू शकतात. पाण्यात विरघळू शकणाऱ्यांपासून क्षार तयार होतात. उदा., Na2O, MgO, CaO, CuO, NiO.
(३) उभयधर्मी ऑक्साइडे : अम्‍ले व क्षार या दोहोंशीही यांची विक्रिया होते व लवणे तयार होतात. त्यांच्यात काही आयनी व काही सहसंयुजी अशा दोन्ही प्रकारचे बंध असतात. उदा. PbO (आयनी), As4O6(सहसंयुजी).
(४) उदासीन ऑक्साइडे : ही अम्‍लीय नसतात व क्षारकीयही नसतात. इतर कोणत्याही गटात त्यांचा समावेश करता येत नाही. उदा., H2O, N2O, NO, CO.
(५) संयुक्त ऑक्साइडे : दोन साध्या ऑक्साइडांच्या मिश्रणासारखे यांचे वर्तन असते. उदा., Pb3O4, (PbO2, 2PbO); Fe3O4 (Fe2O3, FeO).
(६) पेरॉक्साइडे : थंड पाण्याशी किंवा थंड खनिज अम्‍लाशी यांची विक्रिया होऊन हायड्रोजन पेरॉक्साइड (H2O2) मिळते. ही हायड्रोजन पेरॉक्साइडाची लवणे असून त्यांच्यात O22-आयन असतात. उदा. Na2O2, Ba2O2, काही ऑक्साइडांना (उदा., NO2, PbO2). पेरॉक्साइड हे नाव चुकीने दिले गेले आहे.
(७) सुपर ऑक्साइडे : यांच्यात O2-आयन असतात व त्यांच्यावर थंड पाणी किंवा थंड विरल अम्‍लांची विक्रिया केल्याने हायड्रोजन पेरॉक्साइड व ऑक्सिजन ही मिळतात. उदा., Na2O, K2O.
(८) उच्चतर ऑक्साइडे : एखाद्या मूलद्रव्याच्या ऑक्सिडीभवनाच्या सामान्य अवस्थेपेक्षा उच्चतर अवस्थेतील ऑक्साइडांना उच्चतर ऑक्साइडे म्हणतात.पण ती पेरॉक्साइडे नाहीत कारण विरल अम्‍लाने त्यांपासून हायड्रोजन पेरॉक्साइड मिळत नाही. उदा.,Pbo2, Mno2 यांच्यातील बरेचसे बंध सहसंयुजी असतात.
(९) नीचतर ऑक्साइडे :एखाद्या मूलद्रव्याच्या सामान्य ऑक्साइडापेक्षा कमी प्रमाणात ऑक्सिजन असणारी ऑक्साइडे . उदा., Pb2O, C3O2.
एखाद्या मूलद्रव्याचा व ऑक्सिजनाचा २:३ या प्रमाणात संयोग होऊन तयार झालेल्या ऑक्साइडांना सेस्क्वी ऑक्साइडे म्हणतात. उदा.,Cr2O3, Mn2O3, Pb2O3, Al2O3.पण त्यांचा विशिष्ट लक्षणे असणारा गट होत नाही.
ऑक्साइडे तयार करण्याच्या रीती : (१) मूलद्रव्य व ऑक्सिजन यांचा सरळ संयोग घडवून, उदा., 2Ca+O2=2 CaO,किंवा मूलद्रव्यावर एखाद्या ऑक्सिडीकारकाची विक्रिया करून उदा.,
(२) रासायनिक संयुगांच्या तप्त अपघटनाने (घटक पदार्थ सुटे होण्याने), उदा.,
CaCO3 → CaO2+CO2.

 

लेखक : अ. ना. ठाकूर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

संदर्भ :  Abbot, D., Inorganic Chemistry, London 1965.

अंतिम सुधारित : 3/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate