অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करून पहा साधे सोपे प्रयोग - २

पाण्याची उकळी थांबवा

साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, साखर, चमचा. कृती – एक छोटे पातेले घ्या. ते पाण्याने अर्धे भरा. शेगडी पेटवून त्यावर पातेले ठेवा. पातेल्यातल्या पाण्याला खळखळ उकळी फुटू द्या. उकळत्या पाण्यात दोन चमचे साखर पटकन टाका. उकळी थांबते. पुन्हा उकळी फुटली की दोन चमचे साखर पटकन टाका. उकळी थांबते. असे किती वेळा करता येते ते करून पहा. नोंदवा. एखादा पदार्थ पाण्यात विरघळला की पाण्याचा उत्कलनांक वाढतो. त्यामुळे आहे त्या तापमानाला उकळी थांबल्याचे दिसते. हाच प्रयोग मीठ घेऊन करून पहा.पाण्याची उकळी वाढवा. साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, चहापत्ती, चमचा. कृती – एक छोटे पातेले घ्या. ते पाण्याने अर्धे भरा. शेगडी पेटवून त्यावर पातेले ठेवा. पातेल्यातल्या पाण्याला खळखळ उकळी फुटू द्या. उकळत्या पाण्यात एक चमचा चहापत्ती टाका. पाण्याची उकळी वाढते. ती कमी झाली की पुन्हा एक चमचा चहापत्ती टाका. उकळी वाढते.चहापत्तीतील काही घटक गरम पाण्यात विरघळणारे आहेत त्यांच्यामुळे पाण्यात रंग उतरतो.

चहापत्तीत चोथा भरपूर असतो. त्यात हवा अडकून बसलेली असते, ती उष्णतेने बाहेर येते. तसेच चहापत्तीला टोके असतात. टोकांमुळे बुडबुडे बनण्याला वाव मिळतो. उकळी जास्त फुटलेली दिसते. हाच प्रयोग भुस्सा वापरून करून पहा.उकळीला चमच्याची मदत.साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, लांब दांडीचा चमचा.कृती – एक छोटे पातेले घ्या. त्याच्या आतल्या भागात कोठेही पोचा आलेला नको, पातेले करपलेले नको, घाण अडकलेले नको. त्यात पाऊण पातेले पाणी भरा. शेगडीवर उकळायला ठेवा. उकळी फुटल्यावर धग कमी करा. उकळीचे बुडबुडे कमी झाले की एक लांब दांडीचा चमचा घेऊन तो पाण्याच्या बुडाशी टेकवून तळाला खरवडा. खरवडलेल्या जागी पाणी उकळते.एखादा द्रव उत्कलनांकाइतका तापला तरी बुडबुडा तयार होण्यासाठी टोकदार जागा लागते.कोमट पाणी लागेल उकळायला.

साहित्य – सिरींज किंवा पिचकारी, पातेले, पाणी, शेगडी.

कृती – एका पातेल्यात पाणी घ्या. शेगडीवर गरम करा. पाणी उकळू देऊ नका. इंजेक्शनची सिरींज किंवा पिचकारी घ्या. सिरींजची सुई काढून बाजूला ठेवा. सिरींज किंवा पिचकारीचे टोक गरम पाण्यात ठेवून दट्ट्या मागे ओढा. थोडे पाणी आत जाऊ द्या. सिरींज किंवा पिचकारी पाण्याच्या बाहेर काढा. टोकावर बोट ठेवून दट्ट्या मागे ओढा. आतले पाणी कोमट असतानाच उकळलेले दिसेल.दट्ट्या मागे ओढताना आतल्या कोमट पाण्यावरचा दाब कमी होतो. दाब कमी की उत्कलनांक कमी होतो म्हणून कोमट पाणीही उकळते.न तापवताच बुडबुडे.

साहित्य – छोटे पातेले, पाणी, लांब दांडीचा चमचा, झाकण. कृती – एक पातेले घ्या. नळाच्या पाण्याने पूर्ण भरा. पाण्यात एक लांब दांडीचा चमचा ठेवा. धक्का लागणार नाही अशा ठिकाणी हे सारे झाकून ठेवा. काही तासाभराने उघडून पहा. पातेल्याच्या कडेला तसेच चमच्यावर बुडबुडे आलेले दिसतील. नळाचे पाणी क्लोरीन वायूने शुद्ध केलेले असते. पाण्यात विरघळलेला वायू टोकाची जागा मिळताच बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडतो.

कोणता तळपाय मोठा ?

साहित्य – तुम्ही स्वत:, मोठ्या आकाराचा कागद, कात्री, टोकदार पेन्सिल कृती – एक मोठ्या आकाराचा कागद घ्या. त्याच्या एका बाजूला तुमचा डावा पाय पूर्णपणे टेकवा. टोकदार पेन्सिलीने त्या पायाची बाह्यरेषा काढा. बाह्यरेषेने तयार झालेली ही बाह्याकृती कात्रीने कापून घ्या. अशाच प्रकारे उजव्या पायाची बाह्याकृती कापून घ्या. या दोन्ही बाह्याकृती एकमेकांवर ठेवून त्याच्यांत काही फरक पडलेला दिसतो का ते बघा. तुम्हाला दोन तळपायातले अंतर लक्षात येईल.

एक तळपाय दुसर्‍या तळपायापेक्षा मोठा असल्याचे आढळते. अनेकांच्या तळपायांचे बाह्याकार घेऊन तपासा. डावखुर्‍यांचा डावा तळपाय मोठा असतो का ?

तळपायावरचा भार मोजा

साहित्य – तुम्ही स्वत:, वजन काटा, परात, पाणी, कुंकू किंवा मऊगाळ चिखल, मोठा आलेखाचा कागद. कृती – वजन काट्याचा वापर करून तुमचे वजन पहा. ते नोंदवून ठेवा. तळपाय बुडतील एवढे पाणी एका परातीत घ्या. त्यात कुंकू किंवा मऊगाळ चिखल घालून दाट गंध तयार करा. परातीशेजारी एक आलेखाचा मोठा कागद जमिनीवर ठेवा. परातीत एक एक पाय बुडवून त्याचा एक एक ठसा आलेखाच्या कागदावर उमटवा. ठशांचा मिळून आकार किती चौरस सेंटीमीटर आहे ते मोजा. त्या आकाराला तुमच्या वजनाने भाग द्या. त्यावरून तुमच्या तळपायावर किती भार पडतो ते समजेल.

किड्याची चाल

साहित्य – किडा, छोटी पिशवी, कुंकू, पाणी, छोटी ताटली, पांढरा कागद. कृती – एक संथ चालणारा किडा शोधा. तो हलकेच एका छोट्या पिशवीत ठेवा. एका छोट्या ताटलीत कुंकू आणि पाणी घालून गंध तयार करा. एक पांढरा कागद सपाट जमिनीवर पसरा. छोट्या पिशवीतून हलक्या हाताने किडा उचलून त्याचे पाय गंधात बुडवा. मग किडा पांढर्‍या कागदाच्या मध्यावर ठेवा. त्याला त्याच्या मर्जीने हलू द्या. किड्याच्या पायांच्या क्रमाचे निरीक्षण करा. दोन पायात पडलेल्या अंतराचे निरीक्षण करा. किड्याला तीन उजवे आणि तीन डावे पाय असतात. त्यांचा क्रम सांगण्यापेक्षा तपासून पहाण्यात शोध लागल्याचे समाधान मिळेल.

रंगीत ज्योत

साहित्य – कागद, मीठ, चुना, बोरीक पावडर, निळी ज्योत. कृती – हाताने फाडत एका खडबडीत कागदाच्या उभ्या पट्ट्या करा. कागदाच्या कडेला बारीक बारीक तंतू दिसतील अशी पट्टी घ्या. पट्टी मीठात बुडवा. तंतूंमध्ये मीठाचे काही कण उचलले जातील. हे कण एका निळ्या ज्योतीत जाळा. कण पेटतील तशी ज्योत सोनेरी पिवळ्या रंगाची होईल. अशाच प्रकारे चुन्यामुळे ज्योत विटकरी रंगाची होईल तर कॅरमसाठी वापरल्या जाणार्‍या बोरीक पावडरमुळे ज्योत हिरवट होईल. प्रत्येक मुलद्रव्याची ज्योत वेगळ्या रंगाची असते. सोडीयमची सोनेरी पिवळी, कॅल्शियमची विटकरी, बोरॉनची हिरवट इ. 

बर्फाच्या बोटाने उचला तांदूळ

 

 

 

 

 

 

साहित्य – तुम्ही स्वत:, पेला, पाणी, बर्फ, ताटली, तांदूळ, रुमाल. कृती – एका ताटलीत तांदूळ पसरून ठेवा. बोटाच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलून घेण्याचा सराव करा. एका पेल्यात थोडे बर्फाचे तुकडे घाला. पेला पाण्याने भरा. या बर्फाच्या पाण्यात बोटे बुडवून गार होऊ द्या. त्यानंतर हात बाहेर काढून बोटे रुमालाने कोरडी करा. आता बोटांच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलता येतो का पहा. बोटे गार पडल्यावर मेंदूचे संदेश त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाहीत

 

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद, पुणे

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate