অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करून पहा साधे सोपे प्रयोग - 1

करून पहा साधे सोपे प्रयोग - 1

1. पानामागे दडलंय काय ?

साहित्य – झाडाची पाने, मोठ्या तोंडाच्या बाटल्या.कृती – वीतभर उंचीची मोठ्या तोंडाची बाटली घ्या. तुमच्या आसपास असणारी झाडे न्याहाळा. ज्या झाडांची पाने दोन सेंटामीटरपेक्षा लांब आहेत त्याची तपासणी करा. पान न मोडता वाकवून पानाच्या खालच्या बाजूला पहा. ज्या पानाखाली पुंजक्यात घातलेली अंडी दिसतील अशी एक दोन पाने तोडून घ्या. बाटलीत उभी ठेवा. झाकण लावा. काही काळाने अंड्यातून अळ्या बाहेर आलेल्या दिसतील. त्यावेळी त्याच प्रकारची आणखी एक-दोन पाने बाटलीत भरा. झाकण लावण. रोज निरीक्षण करा. अळ्या वाढतील, कोश करतील, कोशाचे रंग बदलतील, किडे बाहेर येतील.विशिष्ठ झाडावर विशिष्ठ कीडे आढळतील.

2. तुरटीची लाही.

साहित्य – तुरटी, लांब दांडीचा चमचा, रुमाल, धगीचे साधन, काड्यापे.कृती – एक लांब दांडीचा चमचा घ्या. दांडीच्या टोकाला रुमाल गुंडाळा. चमच्याच्या खोलगट आकाराच्या पावपट लहान आकाराचा तुरटीचा तुकडा घ्या. तो चमच्याच्या मध्याभागी ठेवा. चूल, स्टोव्ह, गॅस पैकी कोणतेही एक साधन पेटवा. त्याच्या धगीवर चमच्यातला तुरटीचा खडा तापवा. तो फुगून त्याची लाही होते.तुरटीच्या स्फटिकात पाणी असते. तापवल्यावर त्याची वाफ जोराने बाहेर फेकली जाते. तुरटीच्या तुकड्याचा आकार वाढतो – यालाच तुरटीची लाही म्हणतात.

3. जलशोषक पदार्थ.

साहित्य – तूर डाळ, मीठ, रवा, पोहे, पाणी, फडके.कृती – आपले हात स्वच्छ धुवून फडक्याला पुसून कोरडे करून घ्या. एक मूठ तूर डाळीने भरून घ्या. मुठीच्या अंगठ्याजवळच्या पोकळीतून मुठीत एकदोनदा फुंकर मारा. मूठ सरळ करून उघडा. तूर डाळीचे दाणे दमट होवून एकेकमेकांना चिकटलेले दिसतील. तूर डाळ जलशोषक आहे. त्याचप्रमाणे मीठ, रवा, पोहे इ. घेऊन प्रयोग करून पहा.काही पदार्थ बाष्प शोषून दमट होतात. कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, सिलिका जेल इत्यादी पदार्थ कापडाच्या छोट्या पिशव्यात भरून औषधे कोरडी राखतात.

4. हैड्रोजन वायू.

साहित्य – बाटली, पाणी, ड्रेनेक्स, फुगे, दोरी.कृती – एक उभी लहान तोंडाची बाटली घ्या. बाटलीत एक तृतीयांश उंचीपर्यंत पाणी भरा. बाटलीच्या तोंडावर बरोबर बसेल असा एक फुगा घ्या. कात्रीने ड्रेनेक्सची पुडीच्या कोपर्‍याला काप द्या. ड्रेनेक्सच्या पूडीतून सुमारे दोन ग्रॅम पूड बाटलीतल्या पाण्यात टाका. बाटलीच्या तोंडावर फुगा अडकवा. फुगा फुगला की दोरीने बांधून घ्या. हा फुगा हवेत तरंगतो.ड्रेनेक्समध्ये दाहक सोडा आणि अॅल्युमिनियमचा चुरा असतो. त्याच्या क्रियेने हैड्रोजन वायू तयार होतो. ड्रेनेक्स काळजीपूर्वक हाताळा.

5. उष्णतेने प्रसरण की आकुंचन?

साहित्य – अॅल्युमिनियम फॉईल, उदबत्ती, काड्यापेटी.कृती – एका बाजूने अॅल्युमिनियम आणि दुसर्‍या बाजूने कागद असलेली फॉईल घ्या. बिस्किटाचे पुडे तसेच सिगारेटची पाकीटे यांमध्ये असा कागद असतो. या कागदाच्या १ सेंमी रुंद आणि ५ सेंमी लांब पट्ट्या तयार करा. एक पट्टी चकचकीत भाग बाहेर ठेवून उभ्यात दुमडा. दुसरी पट्टी चकचकीत भाग आत ठेवून उभ्यात दुमडा. दोन्ही पट्ट्या कोनाच्या आकारात टेबलवर ठेवा. एक उदबत्ती पेटवून घ्या. पेटत्या टोकाने पट्ट्यांच्या कोनाकाराच्या मध्यभागी धग द्या.दोन्ही पट्ट्या विरूद्ध प्रकारात वळतात. अॅल्युमिनियम कागदापेक्षा जास्त उष्णता शोषून अधिक प्रसरण पावतो. त्यामुळे पट्ट्यांचा आकार वक्र आणि विरूद्ध दिशांना होतो.

 

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद, पुणे

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate