অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करून पहा साधे सोपे प्रयोग - 3

करून पहा साधे सोपे प्रयोग - 3

1. खार्‍या पाण्याचे गोडे पाणी.
साहित्य – खारे पाणी, परात, जड भांडे, प्लॅस्टिकचा कागद, दोरी, काचेची गोटी.कृती – एक परात घ्या. परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवा. परातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणी किंवा समुद्राचे, खाडीचे पाणी) भरा. आतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवा. परातीवर दोरीच्या सहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधा. कागदावर एक काचेची गोटी ठेवा. गोटी मध्यभागी जाऊन थांबेल आणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईल. हे उपकरण दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा. पाणी तापेल, त्याची वाफ होईल, प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या रुपात सांद्रिभूत होईल. कागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईल. जड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंब पडेल.पाण्याचीच वाफ होते, त्यातल्या क्षाराची होत नाही.

2. सूर्यफुलातल्या बियांची रचना.
साहित्य – सूर्यफूल, खडू.कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूल घ्या. त्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढा. एक खडू हातात घ्या. सर्वात मधली बी शोधून काढा. त्या बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूने जोडा. दुसर्‍या बीला लागून असलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीत बसेल. अशा पद्धतीने सर्वात कडेच्या बी पर्यंत पोचेल असा चक्राकार कंस काढा. आता दुसरी सर्वात आतली आणि खडूची खूण नसलेली बी शोधा. तिच्यापासून सुरू होणारा आधीच्या कंसाच्या दिशेत वळणारा दुसरा कंस काढा. असे एकाच दिशेने जाणारे सर्व कंस काढा. मग विरुद्ध दिशेने जाणारे कंस काढा.५५    कंस एका दिशेचे तर ८९ कंस विरूद्ध दिशेचे येतात. या संख्या फिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या आहेत.

3. रम्य गुणोत्तर
साहित्य – एक हात, पट्टी.कृती – आपल्याला हाताची लांबी मोजायची आहे. कोपरापासून मनगटापर्यंतची लांबी मोजा. नोंदवून ठेवा. (क). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा. नोदवून ठेवा. (ह). मनगटापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा, नोदवून ठेवा. (ब).  ह आणि क यांचे गुणोत्तर काढा. तसेच क आणि ब यांचे गुणोत्तर काढा. दोन्हीचे उत्तर सुमारे १.६१८ येते.या गुणोत्तराला रम्य गुणोत्तर म्हणतात. एका सरळ रेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा यांचे गुणोत्तर, लहान खंड आणि मोठा खंड यांच्या गुणोत्तर इतके असेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतात. आपला हात रम्य गुणोत्तरात असतो.

४.  बसल्या बसल्या वीज.
साहित्य – प्लॅस्टिकची खुर्ची, कृत्रीम धाग्याचे कापड, एक व्यक्ती.कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवा. एक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉन, टेरिलिन, पॉलिइस्टर यांपैकी – कापडाचा मोठा तुकडा घ्या. सदरा, साडी काहीही चालेल. त्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घाला. कपडा व्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्या दिसतील. हा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्ट दिसतील. कधी कधी ठिणग्यांचा झटका बसतो, सावधपणे प्रयेग करा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्या हालचालीने स्थिरविद्युत निर्माण होते. तिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होते. दोन्ही विरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.

५. अंगात वीज.
साहित्य – तुम्ही स्वत:कृती – तुमचा एक हात - डावखोर्‍यांनी उजवा आणि उजखोर्‍यांनी डावा – सरळ जमिनी समांतर ताणा. तो हात कोपर्‍यात दुमडा. दुसर्‍या हाताच्या मधल्या बोटाने कोपर्‍याच्या हाडाच्या टोकावर हलका झटका द्या. तुम्हाला विजेचा झटका बसलेला जाणवेल. यावरून तुमच्या अंगात वीज आहे हे सिद्ध होईल.
हाताच्या कोपर्‍याच्या हाडांजवळील - अलनर नस त्वचेच्या बरीच जवळ असते. नसांचे कार्य विजेच्या सूक्ष्म प्रवाहावर अवलंबून असते. आपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर रक्तात सोडीयम जास्त असतो. त्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभार निर्माण होतो.

6. सूर्यावरचे डाग घरात पहा
साहित्य – आरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास.कृती – एका ए4 आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका आरशावर चिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आरसा भितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा. कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेत. कवडशात ढगही हालताना दिसतील. आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतो, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याची प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.

7. संत्र्याची आतषबाजी

साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी, संत्रीकृती – संत्र्याची साल सोला. आतल्या फोडी खाऊ शकता. एक मेणबत्ती काड्यापेटीने पेटवा. तिची ज्योत स्थिर राहू द्या. संत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोट यांच्या पकडीत धरा. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबा. सालीतून उडालेले शितोंडे प्रखर उजेड पाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असते. दाबल्यावर त्याचे तुषार उडतात. मेणबत्तीच्या ज्योतिमुळे पेटतात व संपून विझतात.

8. मऊ काजू करा टणक

साहित्य – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते, फ्रिजकृती – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते वगैरे तेलबिया खायला मजा येत नाही. ते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत पसरून ठेवा. ती बशी फ्रिजच्या आत ठेवा. काही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.पाणी आत शिरल्याने सुकामेवा मऊ होतो. फ्रिजमध्ये हवा गार आणि कोरडी असते. कोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातला दमटपणा बाहेर फेकला जातो.

9.  आम्लतादर्शक पट्टी

साहित्य – साधा वहीचा कागद, सदाफुलीची फुले, कात्री, लिंबू, सोडा.कृती – साधा – गुळगुळीत नसलेला – वहीचा कागद घ्या. कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद. सदाफुलीच्या फुलाच्या पाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत करा. कागद ओलसर झाला तरी चालेल. कागद कडक होईपर्यंत वाळवा. यातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाका. कोणता रंग येतो? अशाच दुसर्‍या तुकड्यावर ओलसर करून सोड्याची चिमूट टाका. कोणता रंग येतो पहा. दोन रंग वेगळे आले की आपली आम्लतादर्शक पट्टी तयार झाली. न झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवा. कात्रीने कागदाच्या अर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.

10. हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.

साहित्य – मीठ, खाण्याचा सोडा, छोटा खलबत्ता, चमचा, आम्लतादर्शक पट्टी, अमोनिया.कृती – छोट्या खलबत्त्यात एक चमचा कोरडे मीठ घाला, तसेच चमचाभर खाण्याचा सोडा घाला. बत्त्याने हे मिश्रण खलत रहा. आंबूस वास येईल. त्यावेळी ओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा तिचा रंग बदलेल. अमोनियाच्या द्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्या. तो खलाजवळ आणल्यास त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेला दिसेल.मीठ आणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला की त्यातून हैड्रोजन क्लोराईड वायू मुक्त होतो व खलात धुण्याचा सोडा तयार होतो. अमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजन क्लोराईड वायू बरोबर संयोग पावून नवसागर धूर स्वरूपात तयार होतो.

११. सात वीत का आठ वीत?
साहित्य – अनेक व्यक्ती, फूटपट्टी, भिंत, पेन्सिलकृती – एका भिंतीवर पट्टी आणि पेन्सिलीच्या सहाय्याने उंची मोजण्यासाठी उपयोगी पडतील अशा खुणा करा. एका व्यक्तिला तेथे उभे करून तिची उंची मोजा. त्याच व्यक्तिला फूटपट्टीवर हात ठेवून तो ताणयला सांगा. करंगळीच्या टोकापासून ते अंगठ्याच्या टोकापर्यंतचे अंतर मोजा. ते एक वीत झाले. त्यावरून ती व्यक्ती तिच्या किती वीत उंच आहे ते पहा. सात वीत का आठ वीत?वय वाढते तसे उंची किती वीत हे प्रमाण कसे बदलते ते तपासा.

12. मुद्दाम उमलवलेले फूल
साहित्य – दोन कळ्या, तुमची फुंकरकृती – एकाच झाडाच्या दोन सारख्या आकाराच्या टपोर्‍या न उमललेल्या कळ्या निवडा. त्यापैकी एक कळी खुडून हातात घ्या. झाडावरची कळी निसर्गात वार्‍याच्या मदतीने उमलते तशी तुमच्या हातातली कळी फुंकरीने हळुहळू उमलवा. फुंकरून उमलवलेला कळी आणि निसर्गात उमललेली कळी यांच्या आकारात काही फरक दिसतो का ते पहा. पाकळ्यांच्या रचनेत काही फरक पडतो का ते पहा. फुलाच्या टिकावूपणात काही फरक पडतो का ते पहा.उमलवलेल्या फुलापेक्षा उमललेलं फूल अधिक मोठं, टवटवीत दिसतं आणि दीर्घ काळ टिकतं.

13. आपोआप उमलणारे कागदी फूल
साहित्य - वृत्तपत्राचा कागद, ब्लेड अगर कात्री, नाणे, ताटली, पाणीकृती – एक वृत्तपत्राचा कागद घ्या. कात्री वापरून तुमच्या पंजाएवढे कागदाचे वर्तुळ कापून घ्या. कागदाच्या मध्यभागी नाणे ठेवा. नाण्यापासून निघणार्‍या समान अंतरावरच्या सहा त्रिज्यांना ब्लेडने काप द्या. नाणे काढून घ्या. या सहा पाकळ्या आत दुमडून कळीचा आकार द्या. एका ताटलीत चार थेंब पाणी घ्या. कळी केलेला कागद त्यावर उभा ठेवा. कागद ओला होत जाईल तसतश्या पाकळ्या उमलताना दिसतील.कागदाचे वाकवलेले तंतू पाण्यामुळे लांबतात त्यामुळे पाकळी उमलताना दिसते.

14. फुग्यात हवा किती?
साहित्य – फुगा, दोरी, पट्टीकृती – एक गोलाकार फुगा घ्या. तो पूर्ण फुगवा. त्याचे तोंड दोरीने बांधा. उन्हात एका सपाट पृष्ठभागावर फुगा काळजीपूर्वक ठेवा. त्याच्या सावलीच्या परिघाच्या कडेकडेने दोरीचे वर्तुळ पटकन् तयार करा. वर्तुळ पूर्ण झाल्यावर तेवढा दोरा काढून घ्या. दोर्‍याची लांबी मोजा. परिघाच्या लांबीवरून (२ x पाय  x त्रिज्या) गणित करून फुग्याची त्रिज्या मिळवा. त्रिज्येवरून गोलाकार फुग्याचे घनफळ काढा.(4/3 X पाय  X त्रिज्या3.). हेच फुग्यातल्या हवेचे आकारमान.

15. भिंतीवर सप्तरंग
साहित्य – पसरट पातेले किंवा परात, पाणी, छोटा आरसाकृती – घराबाहेर उन्हात एक पसरट पातेले किंवा परात ठेवा. त्याच्या आत एक छोटा आरसा ठेवा. आरशातून परावर्तित झालेल्या उन्हाचा कवडसा घरात भिंतावर पडेल अशा पद्धतीने आरशाची जागा पक्की करा. पसरट पातेल्यात हळुहळू पाणी घालून पातेले पाण्याने पूर्ण भरा. घरात पडलेला कवडसा इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी झालेला दिसेल.
सूर्यप्रकाश अनेक रंगछटांचा बनलेला असतो. पाण्यात शिरताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात बदलते. आरशावरून परावर्तीत झाल्यानंतर पुन्हा पाण्याबाहेर पडताना प्रत्येक रंगछटेच्या किरणाची दिशा वेगवेगळ्या प्रमाणात  आणखी थोडी बदलते. त्यामुळे रंगछटा अलग झालेल्या दिसतात.

16. झाडाची उंची मोजणे प्रकार 1
साहित्य – झाड, मोबाईल, एक व्यक्ती, मोजपट्टी.कृती – एक व्यक्ती निवडा. तिची उंची मोजा (उ). ज्या झाडाची उंची मोजायची आहे त्याच्याशेजीरी तिला उभे करा. फोटो काढता येणारा मोबाईल घ्या. फोटोच्या चौकटीत ते झाड आणि ती व्यक्ती पूर्ण मावेल असा फोटो घ्या. व्यक्तीची फोटोतली उंची मोजा (फ१). या उंचीने व्यक्तीच्या उंचीला भागून (उ/फ१) येणारी पट (प) काढा. फोटोतील झाडाची उंची मोजा (फ२). या उंचीला पटीने गुणा (फ२ गुणिले प). झाडाची उंची मिळेल.  फोटोत सर्व वस्तूंच्या प्रतिमा एकाच पटीत बदलतात.

17. झाडाची उंची मोजणे प्रकार 2

साहित्य – १ मीटर लांबीची पट्टी, मोजपट्टी किंवा टेप, झाड.कृती – हा प्रयोग लख्ख ऊन असेल तेव्हा करावा. सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्ताच्या आधीच्या लगत केल्यास अधिक अचूक उत्तर मिळेल. १ मीटर लांबाची पट्टी उन्हात झाडाशेजारी उभी ठेवा. पट्टीची सावली मोजा, झाडाची सावली मोजा. झाडाच्या सावलीला पट्टीच्या सावलीने भागा. भागाकाराचे उत्तर म्हणजे झाडाच्या सावलीइतके येईल.दोन उभ्या वस्तू आणि त्यांच्या सावल्या या दोन एकरूप त्रिकोणांच्या बाजू असल्यामुळे त्यांच्या लांबीचे गुणोत्तर समान असते.

18. झाडाची उंची मोजणे प्रकार 3
साहित्य – दोन सारख्या लांबीच्या पट्ट्या, गोंद, झाड.कृती – हा प्रयोग एका दिवसात विशिष्ठ दोन वेळाच करता येतो. दोन सारख्या लांबीच्या पट्ट्या घ्या. त्या एका टोकाशी एकमेकींना काटकोनात राहातील अशा प्रकारे गोंदाने पक्क्या चिकटवा. ज्या झाडाची उंची मोजायची आहे त्याच्या शेजारी उन्हात हा काटकोनी जोड उभा ठेवा. आडवी पट्टी सूर्याच्या विरूद्ध बाजूला ठेवा. उभ्या पट्टीच्या टोकाची सावली आडव्या पट्टीच्या टोकावर पडली की झाडाच्या सावलीची लांबी मोजा. ती झाडाच्या उंची एवढीच असते.सूर्य ४५ अंशावर आला की समद्‍विभूज काटकोन बनतो, त्यात उभी बाजू आडव्या बाजूइतकी असते.

19. झाडाची उंची मोजणे प्रकार 4

साहित्य – झाड, गॅसचा भरलेला फुगा, लांब दोरा, स्केच पेन, मोजपट्टी.कृती – हा प्रयोग वारा पडलेला असेल तेव्हा करता येतो. एक गॅसचा भरलेला फुगा घ्या. त्याच्या टोकाला भरपूर लांबी असलेला दोरा जोडा. झाडाखाली उभे राहून गॅसचा फुगा हळुहळू उभा सोडा. तो झाडाच्या शेंड्यापर्यंत पोचू द्या. फुग्याला जोडलेल्या उभ्या दोर्‍याचा जो भाग जमिनीला टेकला असेल त्यावर स्केच पेनने खूण करा. फुगा हळुहळू खाली घ्या. त्या खुणेपासून फुग्याच्या शेंड्यापर्यंतचे अंतर पट्टीने मोजा. ते झाडाच्या उंचीएवढे असते.गॅसचा फुगा हवेच्या उद्धरणशक्तीमुळे वारा नसेल तर सरळ वर जातो.

20. झाडाची उंची मोजणे प्रकार 5

साहित्य – एक छोटी काठी, विजेरी किंवा टॉर्च, दोरी, कोनमापक, मोजपट्टी, टॅन कोष्टक.कृती – हा प्रयोग अंधारात करावा. एका काठीच्या टोकाला दोराच्या सहाय्याने एक विजेरी किंवा टॉर्च पक्का बांधा. झाडापासून दहा मीटर अंतरावर एक खूण करा. या खुणेवर विजेरी बांधलेल्या काठीचे दुसरे टोक ठेवा. विजेरीचा झोत झाडाच्या शेंड्यावर पडेल अशा प्रकारे काठी तिरपी ठेवा. काठीने जमिनीशी केलेला कोन मोजा. त्या कोनाच्या टॅनची किंमत टॅन कोष्टकात पहा. या किंमताला दहाने गुणल्यावर झाडाची उंची समजेल.एखाद्या कोनाची टॅन म्हणजे काटकोन त्रिकोणातील त्या कोनासमोरची बाजू (येथे झाडाची उंची) भागिले लगतची बाजू (येथे झाडापासूनचे अंतर, १० मीटर) यांचे गुणोत्तर.

21. दोन डोळे किती शेजारी?
साहित्य – प्लॅस्टिकची पट्टी, स्केचपेन, चिकटपट्टी.कृती – या प्रयोगासाठी एक मदतनीस लागेल. एक चांगली पारदर्शक प्लॅस्टिकची पट्टी घ्या. तिचा मध्यभाग मदतनीस व्यक्तिच्या नाकावर ठेवा. एक चिकटपट्टीच्या कपाळ आणि प्लॅस्टिकपट्टी यांना मिळून चिकटवा. त्या व्यक्तिला स्थिर बसायला तसेच लांबवर बघायला सांगा. नजर हलता कामा नये. एक स्केच पेन घेऊन त्या व्यक्तिच्या डोळ्याच्या बाहुल्या पट्टीतून दिसतील तेथे स्केचपेनने ठिपके द्या. दोन ठिपक्यांमधले अंतर मोजा.दूर अंतरावर बघत असताना दोन डोळ्यांमध्ये सुमारे सहा सेंटीमीटर अंतर असते.

22. तहानलेला कावळा.

साहित्य – तांब्या, पाणी, गोट्या किंवा खडे.कृती – तहानलेला कावळा ही गोष्ट प्रयोग करून तपासायची आहे. एका तांब्यात तळाशी गोष्टीतल्या इतके पाणी घ्या. त्यात एक गोटी किंवा कावळ्याच्या चोचीत मावेल इतक्या आकाराचा खडा टाका. पाण्याची पातळी थोडी वाढेल. असे एक एक करत आणखी खडे किंवा गोट्या टाका. पाण्याची पातळी पूर्ण वर येण्यासाठी लागणार्‍या गोट्या किंवा खड्यांची संख्या, खेपा, वेळ यांची आकडेवारी तपासून पहा. तहानलेला कावळा ही गोष्ट सिद्ध होण्यासाठी आधीची पाण्याची पातळी किती असावी तेही तपासा.दगडावर दगड टाकले की दगडांमध्ये किती तरी मोकळी जागा राहाते त्यात पाणी भरल्याशिवाय ते वर येऊ शकत नाही.

23. खडू फुंकरा बाटलीत.
साहित्य – लहान तोंडाची बाटली, खडूचा तुकडा.कृती – एक लहान तोंडाची बाटली घ्या. टेबलवार आडवी ठेवा. बाटलीच्या तोंडापेक्षा लहान आकाराचा खडूचा तुकडा घ्या. तो बाटलीच्या तोंडात ठेवा. फुंकर मारून तो तुकडा बाटलीत ढकलायचा आहे. विविध प्रकारे फुंकर मारून खडूचा तुकडा बाटलीत ढकलायचा प्रयत्न करा. कितीतरी प्रयत्न केले तरी तुकडा बाहेर फेकला जातो.फुंकर मारताना बाटलीत कोंडल्या गेलेल्या हवेचा दाब वाढतो आणि ती जोराने बाहेर येते, येताना खडूचा तुकडा बाहेर ढकलते.

33. मध्याकडेच जाणार.
साहित्य – पाणी, पाण्याचा मग, वाटी, प्लॅस्टिकचे झाकणकृती – एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या. ते उलटे धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा. झाकण कडेकडे सरकते. आता एका वाटीत पाणी घेऊन मगमध्ये थोडे थोडे टाका. पाण्याची पातळी मगच्या कडेच्या वर जाईल तसे कडेला गेलेले झाकण मध्याकडे सरकताना दिसेल.
मगच्या पातळीच्या वर असलेल्या पाण्यातील कणांची ओढ त्यांना एकमेकांजवळ आणते, त्याबरोबर झाकणही मध्याकडे ढकलले जाते. 

34. ऐकण्याचा नकाशा काढा.

साहित्य – एक व्यक्ती, फोन, मोबाईल, कापूस, रुमाल, कागद, पेन.कृती – एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. एका कागदावर खोलीचा नकाशा काढा. नकाशात व्यक्तीचे स्थान दाखवा. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. व्यक्तीने दाखवलेल्या दिशेला रेघ ओढा टोकाला (१) अंक लिहा तसेच प्रत्यक्ष मोबाईलच्या जागी नकाशात (1) लिहा. असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा. प्रत्यक्ष जागा आणि दाखवलेली जागा यातला फरक पहा. दुसरा कान बंद करून हाच प्रयोग करा. ऐकण्याचा नकाशा मिळेल.
आपल्याला नेमकी दिशा लक्षात येण्यासाठी दोन्ही कानांमध्ये ऐकू येणार्‍या आवाजात फरक असतो.

35. भिंगरीवरचे रंग.

साहित्य – भिंगरी, वेगवेगळ्या रंगांचे कागद, कात्री, गोंद.कृती –एक भिंगरी घ्या. भिंगरीच्या आकारात मावतील अशा वर्तुळाकारात प्रत्येक रंगाचा कागद कापून घ्या, प्रत्येक वर्तुळाकार कागदाच्या समान सहा पाकळ्या करा. सहा रंगांच्या प्रत्येकी एक अशा सहा पाकळ्या भिंगरीच्या वरच्या बाजूला गोंदाने डकवा. भिंगरी वेगात फिरवा. सहा रंगांची मिळून दिसणारी रंगछटा पहा.
अनेक रंगांच्या एकत्रिकरणाने मिळणारी रंगछटा सहात नसलेल्या छटेच्या पूरक रंगाची असते.

36. गूळ नाही साखर नाही पाणी मात्र गोड.

साहित्य – पाणी, तुरट आवळा, पेला.कृती – एका पेल्यात पाणी घ्या. एक घोट पाणी प्या. पाण्याची चव लक्षात ठेवा. पाण्यात गूळ, साखर किंवा अन्य कोणताही गोड पदार्थ घालू नका. तुरट आवळ्याचा एक तुकडा चावून चावून खा. आता एक घोट पाणी तोंडात घ्या. पाणी गोड लागेल.
आवळ्याच्या तुरट चवीमुळे जीभेवरच्या चव ग्रंथी काही प्रमाणात बधीर होतात. त्या वेळी पाण्यांच्या रेणूंचा स्पर्श झाला की मेंदूत त्याचा अर्थ गोड असा लावला जातो.

37. स्वेटर गरम करतो गार राखतो.

साहित्य – तुम्ही, स्वेटर, बर्फ, घड्याळ.कृती – एक स्वेटर घ्या. अंगात घाला. घड्याळात वेळ बघा. तुमच्या शरीराला हळुहळू उबदार वाटू लागेल. काही वेळाने घाम आल्याचे जाणवेल. पुन्हा घड्याळात बघा. किती वेळ लागला त्याची नोंद घ्या. स्वेटर अंगातून काढा. बर्फाचा एक घट्ट गोळा करून घ्या. बर्फाला स्वेटर घाला. तुम्हाला घाम फुटायला लागला तितका वेळ तो ठेवा. मग स्वेटर काढा. गरम होऊन बर्फ वितळला का तपासा.स्वेटर उष्णतारोधक पदार्थाचा बनवलेला असतो. उष्णतेचे वहन होण्यात त्याचा अडथळा येतो.

38. कडेकडेच जाणार.

साहित्य – पाणी, पाण्याचा मग, प्लॅस्टिकचे झाकणकृती – एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या. ते उलटे धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा. झाकण कडेकडे सरकते. कितीही वेळा करून खात्री करून घ्या. पाण्याच्या मग ऐवजी त्यापेक्षा मोठ्या तोंडाचे भांडे घेऊन काय फरक पडतो, ते पहा.
पाण्याच्या कणांमध्ये एकमेकांशी असलेल्या ओढीच्या जोरापेक्षा पाण्याच्या कणांना मगच्या कणांशी ओढीचा जोर जास्त असतो. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाची ओढ झाकणाला कडेकडे ढकलते.

39. मिठातून उजेड .

साहित्य – जाड मीठ, पाणी, काचेचा पेला.कृती – हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा. एक काचेचा पेला घ्या. त्यात पाणी भरा. हातात मीठाचे खडे घ्या. पूर्ण अंधार करा. मिठाचा एक खडा पाण्यात टाका. खडा विरघळत जाईल तसतसा अतिशय मंद हिरवट उजेड पडलेला दिसेल.निसर्गत: मिठाचे स्फटिक बनत असताना त्यात कुठे कुठे आयनांची रचना अपुरी राहीलेली असते. मीठ विरघळताना तेथे अडकलेले मुक्त आयन पाण्याच्या संपर्कात येतात. आयनांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड रुपात ऊर्जा बाहेर पडते.

40. काळवंडणारा रंग.

साहित्य – रंगीत छपाई असलेला कागद, विविध रंगांचे जिलेटीनचे कागद..कृती – एक रंगीत छपाई असलेला कागद घ्या. त्यातल्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा नीट बघून घ्या. कोणत्या तरी एका रंगाचा जिलेटीनच्या कागदाचा तुकडा घ्या. तो तुमच्या डोळ्यांसमोर धरा. रंगीत छपाई असलेल्या कागदावरचे रंग बघा. कोणता रंग काळा किंवा गडद करडा दिसतो ते बघा. तो रंग आणि जिलेटीनचा रंग यांना पूरक रंग म्हणतातहिरवी शाई लाल रंग शोषून घेते आणि बाकी सगळे रंग परावर्तित करते त्याचा परिणाम म्हणून तो भाग हिरवा दिसतो. लाल जिलेटीन हिरवा प्रकाश शोषून घेतो त्यामुळे हिरवा भाग अप्रकाशित किंवा काळा दिसतो.

41. एका कानाने ध्वनीवेध.

साहित्य – फोन, मोबाईल, कापूस, रुमाल.कृती – एका व्यक्तिला एका खोलीत फोन शेजारी बसवा. एक मोबाईल घेऊन फोनवरून तो डायल करायला सांगा. तो आवाज लक्षात ठेवायला सांगा. बसलेल्या व्यक्तीच्या एका कानात कापसाचा बोळा बसवा तसेच रुमाल बांधून तिचे डोळे झाका. मोबाईलला रिंग केल्यावर जिथून आवाज येतो तिकडे बोटाने दाखवायला सांगा. असे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून करा. एका कानाने ऐकून नेमकी दिशा सांगायला कठीण जाते.आपल्या दोन्ही कानांमध्ये ऐकू येणार्‍या आवाजात फरक पडतो त्यामुळे आपल्याला नेमकी दिशा लक्षात येते.

42. गरम फुंकर गार फुंकर.

साहित्य – स्वत:.कृती – एका हाताची मागची बाजू तोंडासमोर न्या. गाल फुगवा. ओठात छोटीशी फट ठेवून हातावर फुंकर मारा. फुंकरीमुळे गार वाटते. आता ओठाची फट थोडी मोठी करून फुंकर मारा. फुंकरीचा गारवा कमी होईल. तोंड जास्तीत जास्त उघडे ठेवून हाss असा आवाज करत फुंकर मारा. ही गरम फुंकर.फुंकर मारताना तोंडातली जास्त दाबाची हवा वेगाने बाहेर येताना थंड होते. तोंड पूर्ण उघडून मारलेल्या फुंकरीचे तापमान शरीराच्या आतल्या भागाइतके असते.

43. गरम फुंकर बसवते झाकण पक्के.

साहित्य – स्टीलचा पेला, प्लॅस्टिकचे झाकण.कृती – एक स्टीलचा पेला घ्या. पेल्याच्या तोंडापेक्षा मोठ्या आकाराचे प्लॅस्टिकचे हलके झाकण घ्या. डाव्या हातात पेला उलटा धरा. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा. बोट काढा. झाकण खाली पडते. आता पेल्यात गरम फुंकर पटकन पेला उलटा धरा. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा. बोट काढा. झाकण पेल्याला चिकटून राहाते.गरम फुंकरीमुळे पेल्यातील हवा विरळ होते, झाकण लावून गार झाल्यावर तिचा दाब कमी होतो. बाहेरच्या हवेच्या दाबामुळे झाकण पक्के बसते.

 

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद, पुणे

अंतिम सुधारित : 9/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate