অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्यूरियम

कृत्रिम रीत्या तयार केलेले मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Cm. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ९६; अणुभार २४७; समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याचा प्रकार) २३८–२५०; अ‍ॅक्टिनाइड श्रेणीतील (मूलद्रव्यांच्या कोष्टकरूपाने केलेल्या मांडणीतील म्हणजे आवर्त सारणीतील मूलद्रव्य क्र. ८९ ते १०३ यांमधील मूलद्रव्यांच्या श्रेणीतील) अ‍ॅक्टिनियमानंतरचे सातवे युरेनियमोत्तर श्रेणीतील (नैसर्गिक रीत्या न सापडणाऱ्या, अणुकेंद्रकीय भडिमाराने तयार होणाऱ्या आणि क्र. ९२ पुढच्या मूलद्रव्यांच्या श्रेणीतील) चौथे मूलद्रव्य; वि. गु. सु. १३; संयुजा[संयोग पावण्याची शक्ती दाखविणारा अंक,  संयुजा] ३. रंग रुपेरी; किरणोत्सर्गी (किरण बाहेर फेकण्याचा गुणधर्म असणारे); हवेत लवकर काळवंडते; वितळबिंदू १,३४०० से.; विद्युत् विन्यास (अणूमधील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, ३२, २५, ९, २.

इतिहास

१९४४ साली जी. टी. सीबॉर्ग व त्यांचे सहकारी यांनी प्लुटोनियम (२३९) वर हीलियम आयनांचा (विद्युत् भारित अणूंचा) भडिमार केल्यास क्यूरियम (२४२) बनते, असे दाखविले. एल्. बी. बेर्नर व आय्. पर्लमन यांनी अमेरिसियम (२४१) या मूलद्रव्यावर बराच वेळ न्यूट्रॉनांचा भडिमार करून हाताळण्याइतपत प्रमाणात हा समस्थानिक १९४७ साली प्रथमच मिळविला. क्यूरियम (२४२) हे आल्फा किरण बाहेर टाकते, त्याचा अर्धायुकाल (किरणोत्सर्गी द्रव्याची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) १६२.५ दिवस आहे. २३८ ते २५० या अणुभारांच्या मर्यादेत या मूलद्रव्याचे तेरा समस्थानिक आहेत. त्यांपैकी क्यूरियम (२४४) हा २४४ अणुभाराचा समस्थानिक सर्वांत स्थिर आहे (अर्धायुकाल सु. १९ वर्षे) व क्यूरियमाच्या रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी हाच समस्थानिक उपयोगी पडला आहे.

प्राप्ती

क्यूरियम ट्रायफ्ल्युओराइडाचे बेरियमाच्या बाष्पाबरोबर १,२७५० से. ला  क्षपण  करून धातुरूप क्यूरियम (२४४) मूलद्रव्य मिळविता येते.

गुणधर्म: ह्या मूलद्रव्याचे नायट्रेट, सल्फेट, परक्लोरेट व सल्फाइड अम्लीय विद्रावात विरघळतात, पण फ्ल्युओराइड व ऑक्झॅलेट विरघळत नाहीत. Cm2O3 ह्या पांढऱ्या ऑक्साइडापासूनCmO2 हे ऑक्साइड बनविता येते, ते काळे असते.CmCl3,CmF3,CmF4 ही संयुगे अभ्यासिली गेली आहेत. विद्रावात ह्या मूलद्रव्याची ऑक्सिडीकरण अवस्था[मूलद्रव्यातून इलेक्ट्रॉन निघून जाण्याची क्रिया,  ऑक्सिडीभवन] तीन आहे. त्याचे सामान्य रासायनिक गुणधर्म अ‍ॅक्टिनाइड श्रेणीतील इतर मूलद्रव्यांसारखेच आहेत.

लेखक : अ.ना.ठाकूर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate