অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यावरण आणि धरणे

 

पृथ्वीवरील सुरवातीच्या काळातले वातावरण असे होते - या वातावरणात, मिथेन, सल्फरडायऑक्साईडआणि पाण्याची वाफ असे घटक होते. आणि हे वातावरण कोणत्याहीप्रकारे जीवसृष्टीला पोषक नव्हते. यानंतर कधीतरी अमिनो असिडस आणि प्रोटीन यांच्या साखळ्या बनू लागल्या, आणि सेंद्रिय रेणुंनी आपले पुनरुत्पादन करण्याची क्षमता प्राप्त करून घेतली, मात्र तरी ते सजीव नव्हते.

प्रथिने सेंद्रीय रेणूंच्या साखळ्यांवर जीवनाचा ठसा उमटल्यावर प्रथमत: उत्पन्न झालेल्या सायनोबॅक्टेरिया किंवा नील-हरित शैवाल या एकपेशीय जीवाने वातावरणातील कर्बद्वीप्राणील वायूपासून प्रकाश संश्लेषणाद्वारे कार्बन स्थिरीकरण करून प्राणवायू मुक्त करण्यास सुरवात केली. त्याद्वारे पॄथ्वीवरील वातावरणात आमूलाग्र बदल होत जाऊन ते जीवसृष्टीस पोषक बनत गेले.
एकपेशीय प्राण्यांनी आता समूहाने रहाण्यास सुरवात केली.
त्यामुळे कामाचे विभाजन करणे सोपे झाले.
तळाच्या एकपेशीयांनी स्थान बदलण्याचे काम स्वीकारले.
सर्वात वरच्यांनी अन्न पकडायचे काम स्वीकारले, तर मधल्यांनी अन्न पचविणे उत्सर्जन करणे ही कामे वाटून घेतली. त्यातून बहुपेशीय प्राणी विकसित होत गेले.
जलचरांमागून उभयचर अस्तित्वात आले. ते पाण्याबाहेर येऊ लागले.
त्यातून सरपटणारे प्राणी, अर्थात साप सरडे, आणि मग मोठाले खवलेकरी, किंवा डायनासॉरस निर्माण झाले.

या खवलेकऱ्यांच्या युगात, अंदाजे 6.5 कोटी वर्षांपूर्वी, एक मोठा अशनी किंवा धूमकेतू पृथ्वीवर आदळून सर्व महाकाय खवलेकरी नामशेष झाले.
नंतरच्या उत्क्रांतीत सस्तन प्राण्यांच्या शाखेत आधी वनमानव उपजला.
म्हणजे चार पायांवर चालणारे मर्कट वनमानव होऊन दोन पायांवर उभे झाले
आणि हळू हळू त्यातून आजचा शहाणा माणूस निर्माण झाला.

अर्थातच, बुद्धीने जरी मानव सर्वश्रेष्ठ असला तरी इतर प्राण्यांच्या तुलनेत शारीरिक पातळीवर तो दुर्बलच राहिला. स्वत:चा बचाव आणि स्वत:च्या गरजा भागविणे यासाठी त्याने निसर्गावर आक्रमण करायला सुरवात केली.
स्वत:च्या स्वार्थासाठी त्याने प्राणी आणि वनस्पती यांना वेठीला धरायलाही सुरवात केली.
वाढत्या गरजा आणि वाढत्या लोकसंख्येबरोबरच हे आक्रमण वाढत जाऊन शेवटी निसर्गाचा समतोलच बिघडून गेला.

भारताच्या दख्खनच्या पठारावर पाऊस केवळ 3/4 महिनेच पडतो. तो हि अपुरा आणि बेभरवशाचा.
त्यामुळेच पाण्याचा भरवशाचा आणि सततचा पुरवठा व्हावा यासाठी धरणं बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली.

धरणांची दोन प्रकारात विभागणी करता येईल.

1) मोठी आणि खोल धरणं

2) मोठी आणि उथळ, पसरट धरणं.

धरण बांधण्याचा निसर्गावर आणि पर्यावरणावर आघात होतोच.
पण सारेच आघात विपरीतच असतात असं सरसकट समजून चालणार नाही.
मोठी आणि उथळ धरणं एका परीने पाणथळ जागा निर्माण करून निसर्ग वाढीला हातभारच लावतात.
अनेक प्राणी आणि पक्षांसाठी तिथे अधिवास निर्माण होतात.
खोल धरणांचा असा थेट फायदा होत नसला तरी,
त्यांच्या अस्तित्वामुळे भोवताली खूप मोठी जंगलवाढ होऊ शकते,
आणि पाण्यावर अवलंबून असणारा शाश्वत अधिवास निर्माण होऊ शकतो.

मोठ्या आणि खोल धरणांची वैशिष्ठ्ये अशी असतात
1) पाणी साठ्याला खूप खोली असते.
2) तळातील पाण्याच्या थरात प्राणवायूची कमतरता असते.
3) निरनिराळ्या रुतूंप्रमाणे पाणी पातळीत फार मोठा फरक होतो.

4) पाणवठ्यावर जगणाऱ्या पक्षांना उभं रहाण्यासाठी आणि उपजीविकेसाठी पुरेशी रुंद जागा काठाला उपलब्ध होत नाही.
5) काठावरील खूप उताराच्या जमिनीवर पोषक द्रव्यांचा अभाव असल्याने झाडे वाढत नाहीत, त्यामुळे सुरक्षितता घरटी बांधणे यासाठी साधने उपलब्ध होत नाहीत.
6) काठावरील खूप उताराच्या जमिनीवर पोषक द्रव्यांचा अभाव असल्याने झाडे झुडुपे सहाय्यकारी जीवसॄष्टी आणि त्याद्वारे खाद्य उपलब्ध होत नाही.
7) जलचर आणि जलपक्षी यांना थेटपणे सहाय्यकारी होत नाही.

मोठ्या आणि उथळ/ पसरट धरणांची वैशिष्ठ्ये अशी असतात
1) पाणी साठ्याला फार खोली नसते.
2) तळातील पाण्यापर्यंत प्राणवायू विरघळतो.

3) निरनिराळ्या ऋतूंत पाणी पातळीत फार मोठा फरक होत नाही
4) पाणवठ्यावर जगणार्‍या पक्षांना उभं रहाण्यासाठी आणि उपजीविकेसाठी भरपूर रुंद जागा काठाला उपलब्ध असते.
5) काठावरील कमी उताराच्या जमिनीवर पोषक द्रव्यांचा साठा होत असल्याने झाडे झुडुपे वाढतात, त्यामुळे सुरक्षितता घरटी बांधणे यासाठी साधने उपलब्ध होतात.

6) काठावरील कमी उताराच्या जमिनीवर पोषक द्रव्यांचा साठा असल्याने झाडे झुडुपे सहाय्यकारी जीवसॄष्टी अस्तित्वात येते त्याद्वारे खाद्य उपलब्ध होते.
7) स्थानिक आणि स्थलांतरित जलचर आणि जलपक्षी यांना उत्तम अधिवास उपलब्ध होतो.
पुढील गोष्टींची काळजी घेतल्यास
सर्व धरणे कृत्रिम जलाशय
हे प्राणीमात्रांना निसर्गाला
सहाय्यकारी ठरू शकतात.

· सरोवराकाठून रस्ता बांधण्याच्या मागणीस अथवा मोहास बळी पडू नये
· झाडझाडोरा कापत सरकती शेती करण्याच्या प्रथेस आळा घालावा
· अनधिकॄत झाडतोड अथवा कोळसा खाणी यांवर सक्त नियंत्रण हवे.
· लाकडे वनोपज वस्तू यांच्या तस्करीस आळा घातला पाहिजे
· जलाशयाभोवतीच्या जंगलास वणवा लागणार नाही याची काळजी घ्यावी
· मानवी शिकाऱ्यांना बंदी घालावी.

· नैसर्गिक शिकाऱ्यांनाही मार्ग उपलब्ध होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
· पाण्यात कारखान्यांचे टाकाऊ पदार्थ, मळी, इत्यादी सोडू देऊ नये.
· परिसरात रासायनिक शेती करू नये.
· परिसरात रासायनिक कारखानदारी उभारली जाऊ नये.

 

लेखक : दीपक मोडक

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate