অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रतिजैविकांना चांदीची साथ

प्रतिजैविकांना चांदीची साथ

प्रतिजैविकांना चांदीची साथ

गेली अनेक शतके चांदीच्या जंतूनाशक गुणांची ख्याती परंपरेने सांगितली मात्र सबळ वैज्ञानिक पुरावे हाती आलेले नव्हते. १९ जून २०१३ च्या सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीन मध्ये प्रसिद्ध झालेला एखाद दुसरा अपवाद वगळता फारसे सबळ पुरावे मिळाले नव्हते, किंबहुना – चांदी आणि जंतुनाशक गुण – यांचा काही संबंध नसल्याचे अनेक प्रयोगात आढळल्याचे दिसते. प्रयोगशील विज्ञानात पुन्हा पुन्हा प्रयोग करून तपासणी करण्याची पद्धत असल्यामुळे डॉ. जेम्स कॉलीन यांना तसे करून काही पुरावे सर्वांसमोर आणले.
आज निष्प्रभ ठरलेल्या अनेक प्रतिजैविकांना चांदीचा वापराने पुनर्संजीवनी मिळून आरोग्याचा स्तर उंचावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मानवी जीवन आरोग्यपूर्ण राखणारा एक शोध लागला. डॉ. ऍलेक्झँडर फ्लेमिंग यांना पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला. इतर अनेक शोधांप्रमाणे हा शोधही अपघाताने लागलेला असला तरी भविष्यातले कितीतरी आघात त्यामुळे टळले. युद्ध काळात युद्धभूमीवर जीवाची बाजी लावून लढणार्‍या सैनिकांना कितीतरी संकटांना सामोरे जावे लागते. अनेक सैनिक आणि रसद पुरविणारे घायाळ होतात. बंदुकीच्या गोळ्या, छर्रे, तोफा - बॉम्बगोळ्यांतून उडालेले तुकडे, स्फोटके, दगड, माती यांसारख्या कित्येक गोष्टी त्याच्या शरीरात जातात. त्या शस्त्रक्रिया करून तातडीने शरीरातून बाहेर काढून टाकणे गरजेचे असते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी जंतूलागण होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता दाट असते. पेनिसिलिनच्या शोधामुळे जंतूलागण टाळण्याचा एक उपाय सापडला. सैनिकांचे रुग्णालयात होणारे मृत्यू रोखता आले. युद्ध संपल्यानंतर यावर आणखी संशोधन झाले. नवनवीन औषधे शोधली गेली. त्या संशोधनातून प्रतिजैविक औषधींची एक अभ्यास शाखाच उदयाला आली.

प्रतिजैविक औषधांमध्ये काही विशिष्ठ रसायने असतात. ती रसायने विशिष्ठ प्रकारच्या रोगकारक जीवाणूंना हानीकारक असतात. काही प्रतिजैवकांमध्ये अनेक प्रकारच्या जंतूंना हानीकारक ठरणारी रसायने असतात. प्रतिजैविकांमुळे औषधोपचार अधिक फलदायी झाले, यात वाद नाही. आपल्याला अजून सगळे जीवाणू माहिती झालेले नाहीत त्यामुळे त्या त्या जीवाणूचाच खातमा करेल अशी औषधे सापडलेली नाहीत. क्षय, विषमज्वर इत्यादी रोगांवर नेमकेपणाने लागू पडणारी प्रतिजैविके शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले. काही रोग उदाहरणार्थ जुलाब, हगवण, खोकला हे एकाच प्रकारच्या जंतूंमुळे होतात असे नाही. त्यांना प्रतिजैविक औषधे देताना खूप काळजी घेण्याची गरज होती तेवढी काळजी घेतली गेली नाही. प्रतिजैविकांचे झटपट होणारे परिणाम पाहून उपलब्ध असलेली औषधे वारेमाप वापरली जाऊ लागली. सांगितलेलीच प्रतिजैविक औषधे न घेणे, वेळेवर न घेणे, बरं वाटायला लागलं तरी पूर्ण मात्रेत न घेणे, स्वत:च ठरवून घेणे अशा काही प्रकारांमुळे या औषधींचे काही दिर्घकालीन दुष्परिणाम दिसायला लागले. प्रतिजैवकांचा प्रभाव कमी व्हायला लागला.

प्रत्येक जीवाला मृत्यूचं भय असतं. मृत्यू झाल्यावर जीवाचं अस्तित्व नसणार हे जीवाला आतून समजत असलं पाहिजे. मग, जर भोवतालची परिस्थिती मृत्यूकडे नेण्याची शक्यता असेल तर तिथून पळून जाणं किंवा परिस्थितीचा मुकाबला करून जिवंत राहाण्यासाठी आपल्या शरीरात काही बदल करणं– याची प्रेरणाही नैसर्गिकच असली पाहीजे. अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म जीवातसुद्धा ही प्रेरणा असली पाहिजे. या प्रेरणेतून रोगकारक सूक्ष्मजीवांनी आपल्या शरीरात काही बदल करून घेतले असले पाहिजेत असे म्हणता येईल. त्यांच्या पिढ्या २०-२५ मिनिटात तयार होत असल्याने हे बदल पुढील पिढ्यांमध्ये झपाट्याने उत्क्रांत होत गेले असले पाहिजेत. यात काही बदल सूक्ष्मजीवांच्या पेशीभिंतीतून औषधे आतच येणार नाहीत अशी भिंतीची रचना करणे किंवा आत आली तरी ती विरून जातील किंवा निष्प्रभ ठरतील अशी रसायने रोगकारक जीवाणूंमध्ये बनली असली पाहिजेत.

माणूसही काही हटणारा प्राणी नाही. एक प्रकारचे प्रतिजैविक कमी उपयोगी ठरायला लागले की त्यापेक्षा प्रभावी रसायन शोधण्याचा मागे माणूस लागणार, ते त्याला सापडले की त्याला पुरून उरणारी रचना रोगकारक जंतूंमध्ये होणार. अशा प्रकारे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे डाव-प्रतिडाव सुरू झाले. अजूनही चालू आहेत.
या प्रकारात एक नवीन डाव माणसाच्या बाजूने लागला आहे. या डावात माणसाच्या मदतीला आली आहेचांदी

स्टेनोट्रोफोमोनास माल्टोफिलिआ (स्टेमा) नावाचा एक जीवाणू माणसाच्या पचनसंस्थेत आढळतो. त्याच्यामुळे कोलायटीसचा विकार जडतो. रुग्ण पोटदुखीने हैराण होतो. बरेचदा एखाद्या रोगावर प्रतिजैविकाची उपाययोजना करून झाल्यावर स्टेमा आढळायचा. म्हणजेच त्याच्यावर त्या प्रतिजैविकाची मात्रा चालायची नाही. आधी त्याच्यावर पेनिसिलिनची मात्रा चालायची मात्र हळुहळू तो पेनिसिलिनच्या प्रभावाला पुरून उरला. माणसाने स्टेमावर चालणार्‍या एका दुसर्‍या प्रतिजैविकाचा शोध लावला. त्याचे नाव व्हॅनोमायसीन. बोर्निओच्या जंगलातल्या मातीच्या एका नमुन्यात माणसाला व्हॅनोमायसीन आढळले. व्हॅनोमायसीनपुढे मात्र स्टेमा परास्त झाला. अर्थात माणसाचा हा आनंद फार वर्षं टिकला नाही. स्टेमा पुन्हा उफाळला. व्हॅनोमायसीनलाही ऐकेनासा झाला.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस् राज्यातील बोस्टन विद्यापीठात काम करणार्‍या डॉ. जेम्स कॉलीन आणि त्यांच्या सहकार्यांनी स्टेमावर संशोधन करायला सुरूवात केली. स्टेमाच्या प्रतिजैविकांवर मात करण्याच्या शक्तीचाच शोध घेण्याचा प्रयत्न केला. या शक्तीचा स्रोत सापडला तर ती काबूत ठेवणे किंवा नेस्तनाबूत करणे शक्य होईल. स्टेमाच्या पेशीभिंती मजबूत होत्या आणि बाहेरच्या रेणूंसाठी जा-ये करणारे मार्ग इतके लहान होते की त्यातून व्हॅनोमायसीनचे मोठ्या आकाराचे रेणू आत शिरणेही अशक्य. कोंडाणा किल्ला उदयभानूच्या ताब्यात होता आणि गडाच्या सर्व वाटांवर कडेकोट बंदोबस्त. अशा वेळी शिवाजी राजाला दिलेला शब्द – आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे – तानाजीला आठवला असेल तेव्हा तानाजीची कशी घालमेल झाली असेल? तशी स्थिती डॉ. जेम्स कॉलीनची झालेली. तानाजीकडे यशवंती होती. यशवंती म्हणजे एक घोरपड. दगडाच्या अवघड चढणीवरही सरसरत चढून जात पाय पक्के रोवून उभी राहू शकण्याची ताकद तिच्यात होती. तिच्या शेपटाला दोर बांधून रात्रीच्या अंधारात एका अवघड कड्यावरून तानाजीने यशवंतीला वर चढवले. काही प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतर ती वरच्या भागात जाऊन चिपकून बसू शकली. मग कोणी एक मावळा तिला बांधलेल्या दोराच्या आधाराने वर चढला. यशवंतीच्या शेपटीचा दोर सोडून पक्कया आधाराला बांधला, आणि पराक्रमी मावळ्यांनी किल्ला सर केला वगैरै, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहेच. तर स्टेमामध्ये प्रवेश करण्यासाठी मदत झाली ती एका चांदीच्या अणूची. डॉ. जेम्स कॉलीन यांनी व्हॅनोमायसीन बरोबर काही चांदीचे अणूही स्टेमावर सोडले होते. व्हॅनोमायसीन या प्रतिजैविक रेणूचे रेणूसूत्र आहे C66H75Cl2N9O24. यावरून तुम्ही त्याच्या आकाराची कल्पना करू शकता. प्रतिजैविक रसायनांच्या रेणूच्या मानाने चांदीचा अणू कितीतरी लहान म्हणजे १२६ पिकोमीटर. त्यामुळेतो स्टेमाच्या शरीरावरणातून आत शिरू शकला. असे चांदीचे काही अणू आत शिरून त्यांनी स्टेमाच्या चयापचय क्रियेतही हस्तक्षेप केला. चांदीच्या उत्प्रेरक गुणामुळे स्टेमाच्या शरीरात ऑक्सिजनयुक्त रसायने जास्त प्रमाणात निर्माण झाली. ही रसायने रोगकारक जीवाणूंना हानीकारक असतात. त्यांच्यामुळे स्टेमाचा शक्तीपात होत गेला. व्हॅनोमायसीनला स्टेमात शिरण्याचा अवसर मिळाला आणि त्याने स्टेमावर काबू मिळवला. चांदीच्या कणांनी व्हॅनोमायसीनला पुन्हा आपली ताकद मिळवून दिली. 

  • अशा प्रकारे रोगकारक जीवाणूंची प्रतिजैविकांना निष्प्रभ करण्याची ताकद संपुष्टात आणण्याचा एक मार्ग जैवअभियांत्रिकीच्या वैज्ञानिकांना सापडला आहे – असे डॉ. जेम्स कॉलीन यांनी म्हटले आहे.
  • प्रतिजैविके रोगकारक सूक्ष्मजीवांच्या शरीरात थेट गेल्यामुळेऔषधाची विश्वासार्हता खात्रीपूर्वक वाढेल.
  • या मार्गाने प्रतिजैविकांची ताकद किमान १० ते कमाल १००० पटीने वाढवता येईल असा विश्वास अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
  • वाढलेल्या ताकदीमुळे प्रतिजैविके कमी प्रमाणात लागतील म्हणजे तेवढ्याच औषधात अधिक रुग्णांवर उपचार करता येतील.
  • रुग्णाला लागणार्‍या औषधाच्या खर्चात बचत होईल.
  • तसेच औषधाचे प्रमाण कमी झाल्याने त्याचे अटळ सहपरिणामही कमी होतील आणि ते टाळण्यासाठी कराव्या लागणार्‍या उपयोजनाही कमी करून भागतील, त्यातही बचत होईल.


चांदी मूल्यवान आहे. तिच्या औषधी गुणांची माहिती गेल्या अनेक शतकांपासून माणसाला आहे. चांदीचे जंतूनाशक कार्य नेमके कसे चालते ते डॉ. जेम्स कॉलीन यांच्या चमूच्या प्रयोगांमधून आता स्पष्ट झाले आहे. डॉ. जेम्स कॉलीन म्हणतात की “ही चांदीची बुलेट नाही तर हा चांदीचा चमचा आहे.”

आपल्याकडे भारतात चांदीचा वर्ख खाण्याची पद्धत आहे. मेवामिठाई, पान, सुपारी इ. वरती चांदीचा अतिशय पातळ वर्ख पसरलेला असतो. तो अन्नाबरोबर पोटात जातो. पचन होत असताना चांदीच्या वर्खाचे रुपांतर बारीक बारीक कणांमध्ये होते. ते कण आपल्या पोटातील मारक जीवाणूंना घातक ठरत असणार.
चांदीच्या पेल्यात रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी प्यावे असे उष:पान पद्धतीत म्हटले आहे. चांदीचे भांडे नसेल तर तांब्याच्या भांड्याचा वापर करण्यास सांगितले आहे. हे पाणी निर्जंतुक होते असे मानतात. आपणापैकी कोणी स्वत: किंवा आपल्या सहकार्यांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मदतीने ही गोष्ट तपासून बघितली आहे का?सध्या प्रचलित असलेल्या घरगुती वापराच्या जलशुद्धीकरण यंत्रातही चांदीच्या नॅनोकणांचा वापर केलेला असतो. या यंत्रात पाणी शुद्ध करण्यासाठी ते उकळावे लागत नाही, त्यात कोणती रसायने घालावी लागत नाहीत, त्यात अतिनील किरण सोडावे लागत नाहीत. यंत्रात टाकलेले पाणी चांदीच्या नॅनोकणांचा शिडकावा केलेल्या कोळशाच्या भुकटीवरून सोडले की पुरेसे होते. रशियाच्या मीर अंतराळ यानात तसेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जलशुद्धीकरण याच प्रकारे होते. विश्व आरोग्य संघटनेनेही विकसनशील देशांनी चांदीचे नॅनोकण असलेली जलशुद्धीकरण प्रक्रिया वापरावी अशी शिफारस केली आहे.
निसर्गात नदीच्या निर्मळ पाण्यात ०.३ ते १ अब्जांश भाग इतकी चांदी विरघळलेल्या स्वरूपात असते. पादपप्लवक (फायटोप्लँकटॉन्स) या वनस्पतीत १ ते १० लक्षांश भाग चांदी असते तर कालव (ऑयस्टर) या प्राण्यात ८९ लक्षांश भाग इतके चांदीचे प्रमाण असल्याचे आढळून येते. मानवी शरीरात २ मिलिग्रॅम इतकी चांदी असते. आपल्या आहारातून रोज २० ते ८० मायक्रोग्रॅम चांदीचे सेवन पुरेसे असते.
उकळून गार केलेल्या पाण्यात चांदीचा चमचाठेवला तर प्रति लीटर ३७ ते ४० मायक्रोग्रॅम इतकी चांदी त्यात विरघळते. ती अणुकणांच्या आकारात असल्याने क्रियाशील असते. पाण्यातील रोगकारक जंतूना ती मारक ठरते. काही वैज्ञानिकांच्या मते चांदीच्या अणुंपेक्षा चांदीच्या आयनांची कार्यक्षमता कित्येक पटीने अधिक आहे. चांदीच्या आयनांचे पाण्यातील प्रमाण १५ मायक्रोग्रॅम प्रतिलीटर इतके असले तरी ते पाणी जंतुविरहीत असू शकते. मात्र याच्यापेक्षा कमी प्रमाणात चांदी असेल तर अशा पाण्यात सूक्ष्मजीव मरण्याऐवजी जोमाने वाढतात. चांदीची मात्रा बरीच जास्त झाली तर त्याचे दुष्परिणाम सूक्ष्मजीवांप्रमाणेच वनस्पतींवरही होतात. याबाबत डरहॅम एन सी, येथील ड्यूक विद्यापीठाने संशोधन केले, त्यात त्यांनी चांदीचे नॅनोकण असणारे पाणी एकदाच घातले. पन्नास दिवसांनी मोजून पाहिले असता गवत सरासरीपेक्षा ६६ टक्केच वाढल्याचे आढळले.
युरोपमध्ये दूध नासू नये म्हणून दुधात चांदीचे नाणेटाकायची पद्धत होती. पाश्चरीकरण रूढ झाल्यावर ती पद्धत बंद पडली. अनेक वैद्यकीय सेवासुविधांमध्ये चांदीचा वापर करतात. काही वैद्यकीय औजारे चांदीच्या नायट्रेट किंवा प्रोटेनिएट या क्षाराच्या विरल द्रावणाने विसळून घेतात. रुग्णाला जोडून देण्यात येणार्‍या लघवीच्या पिशव्यांमध्ये जंतूलागण टाळण्यासाठी चांदी वापरतात. पाणी शुद्ध करण्यासाठी पेनच्या आकाराचे एक विजेवर चालणारे उपकरण बाजारात मिळते. त्यात दोन चांदीच्या तारा इलेक्ट्रोड म्हणून वापरतात. पेलाभर पाण्यात ते ठेवून त्यात काही सेकंद वीज खेळवली तर पाण्यात चांदीचे आयन मिसळले जावून पाणी शुद्ध होते.निवडणूकीच्या वेळी मतदान केल्याची खूण म्हणून बोटाला शाई लावतात. त्या शाईत चांदीच्या नायट्रेट या क्षाराचे द्रावण असते. त्वचेमधील प्रथिनांशी त्या क्षाराची रासायनिक क्रिया होवून पक्का काळा रंग तयार होतो. त्वचा काळी करत असल्यामुळे या क्षाराला म्हणजे सिल्वर नायट्रेटला पूर्वी लूनर कॉस्टिक म्हटले जाई. वास्तवात ते कॉस्टिक सोडा तसेच कॉस्टिक पोटॅश सारखे दाहक नाही.माणसाच्या शरीराच्या दर किलोग्रॅम वजनामागे या क्षाराची ५० मिलिग्रॅम मात्रा सह्य मानली जाते. सिल्वर नायट्रेटचे विरल द्रावण जिभेला लागलेले असताना सिगरेट ओढल्यास तिच्या धुराची चव उबग येईल इतकी गोड लागते. सिगरेट फेकून द्यावीशी वाटते. याबाबत प्रयाग केले पाहिजेत.

गेली अनेक शतके चांदीच्या जंतूनाशक गुणांची ख्याती परंपरेने सांगितली मात्र सबळ वैज्ञानिक पुरावे हाती आलेले नव्हते. १९ जून २०१३ च्या सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीन मध्ये प्रसिद्ध झालेला एखाद दुसरा अपवाद वगळता फारसे सबळ पुरावे मिळाले नव्हते, किंबहुना – चांदी आणि जंतुनाशक गुण – यांचा काही संबंध नसल्याचे अनेक प्रयोगात आढळल्याचे दिसते. प्रयोगशील विज्ञानात पुन्हा पुन्हा प्रयोग करून तपासणी करण्याची पद्धत असल्यामुळे डॉ. जेम्स कॉलीन यांना तसे करून काही पुरावे सर्वांसमोर आणले.

आज निष्प्रभ ठरलेल्या अनेक प्रतिजैविकांना चांदीचा वापराने पुनर्संजीवनी मिळून आरोग्याचा स्तर उंचावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

लेखक : विनय र. र.

 

 

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate