অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फ्रीड्रिख व्हिल्हेल्म गेओर्ख कोलरॉउश

फ्रीड्रिख व्हिल्हेल्म गेओर्ख कोलरॉउश

जन्म : १४ ऑक्टोबर १८४०

मृत्यू : १७ जानेवारी १९१०

जर्मन भौतिकीविज्ञ. चुंबकत्व व विद्युत् शास्त्रात विशेष कार्य. त्यांचा जन्म रिन्टेल्न येथे झाला आणि शिक्षण एर्लांगेन व गॉटिंगेन येथील विद्यापीठांत झाले. त्यांनी प्रथमतः फ्रँकफर्ट (१८६४) व गॉटिंगेन (१८६६) या विद्यापीठांत व त्यानंतर फ्रँकफर्ट (१८७०), डार्मस्टाट (१८७१), वुर्ट्‌सबर्ग (१८७५) व स्ट्रासबर्ग (१८८८) येथील तांत्रिक विद्यालयांत प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे १८९५ साली बर्लिन येथील भौतिकी-तांत्रिक संस्थेत व १९०० मध्ये बर्लिन विद्यापीठात प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.

विद्युत् विश्लेष्याच्या (ज्यातून विद्युत् प्रवाह वाहताना विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन तयार होतात अशा माध्यमाच्या) संवाहकतेसंबंधीचे कोलरॉउश यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. विद्युत्  विश्लेष्यांच्या विरलतेनुसार त्यांच्या संवाहकतेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून त्यांनी आयनांच्या स्थलांतराचा महत्त्वाचा नियम प्रस्थापित केला. चुंबकीय व विद्युत् राशी मोजणारी बरीच उपकरणे त्यांनी तयार केली. त्यांत द्विसूत्री (दोन तंतूंनी लोंबकळता ठेवलेला चुंबक असलेला) चुंबकत्वमापक, व्होल्टमापक व स्विच चलरोधक (जरूरीप्रमाणे रोध बदलता येणारा रोधक) ही उपकरणे उल्लेखनीय आहेत. प्रायोगिक भौतिकी शिकविण्याच्या पद्धतींत त्यांनी बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. Leitfaden der Praktischen Physik  या त्यांच्या ग्रंथाच्या १९५४ पर्यंत वीस आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या.

त्यांची इंग्लंडमधील रॉयल सोसायटीच्या सभासदात्त्वावर १८९५ साली निवड झाली. ते मारबर्ग येथे मृत्यू पावले.

लेखक : व.ग.भदे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate