অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारताचे स्वत:चे कालमापन

1957 मध्ये भारत सरकारने तीन बदल केले.

एक चलन

रुपये, आणे, पैसे, पै असे चलन प्रचलित होते. त्यात 12 पै 1 पैसा , 4 पैसे 1 आणा , 16 आणे 1 रुपया असा हिशोब असे. त्याऐवजी 100 पैसे 1 रुपया असा सुटसुटीतपणा आणला.

दोन – वजन-मापे :

शेर, मण, रत्तल, गुंज, मासा, तोळा, औंस, पौंड, अशी वजने प्रचलित होती. तर लांबी मोजण्यासाठी इंच, फूट,यार्ड, फर्लांग, मैल इत्यादी तर क्षेत्र मापन एकर, गुंठा, बिघा या मापात मोजायचे. त्याऐवजी वजनासाठी ग्रॅम-किलोग्रॅम, लांबीसाठी मीटर, क्षेत्रासाठी हेक्टर, आकारमानासाठी लिटर अशी मेट्रिक – दशमान पद्धत वापरणे कायद्याने बंधनकारक केले.

हे दोन्ही बदल लोकांमध्ये रुजवण्यासाठी भारत सरकारने बराच प्रचार – प्रसार केला. त्यामानाने तिसर्‍या बदलाकडे कमी लक्ष पुरवले. तो बदल तितकासा रुळला नाही.

तीन – कालमापन –

1952 साली डॉ. मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॅलेंडर समायोजन समिती’ची स्थापना झाली. त्यांनी भारतात तसेच जगात प्रचलित असणार्‍या कालमापन पद्धतींचा अभ्यास करून एक कॅलेंडर सुचवले. त्याला “भारतीय सौर कालदर्शिका”म्हणतात. हे कॅलेंडर 1 एप्रिल 1957 पासून लागू झाल्याचे भारत सरकारने जाहीर केले. या कॅलेंडरमध्ये सूर्य – चंद्र यांची नक्षत्रसापेक्ष स्थाने, ऋतूमान आणि भौगोलिक स्थिती यांचा समन्वय साधलेला आहे.

“भारतीय सौर” कालगणनेनुसार एका वर्षात 12 महिने असून त्यात 365 दिवस असतात. वर्षाची सुरुवात -‘1 चैत्र’उत्तरायणातल्या विषुवदिनापासून होते. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. महिन्यांची नावे मराठी महिन्यांप्रमाणे चैत्र, वैशाख, जेष्ठ अशी आहेत. फक्त मार्गशिर्ष महिन्याचे नाव अग्रहायण असे वेगळे आहे. पहिल्या चैत्र महिन्यात 30 दिवस तर दुसर्‍या - वैशाख – महिन्यापासून सहाव्या – भाद्रपद – महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात 31 दिवस येतात. यावेळी दक्षिणायणातला विषुवदिन असतो. म्हणजे पुन्हा पृथ्वीवर सर्वत्र 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. पुढचे सहा महिने अश्विन ते फाल्गुन प्रत्येकी 30 दिवसांचे असतात.

आज प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे 22 मार्च या दिवशी भारतीय सौर 1 चैत्र येतो.२३ जूनला सूर्य कर्क वृत्तावर दिसत असताना तीन महिने पूर्ण होऊन भारतीय सौर 1 आषाढ येतो. दक्षिणायणातील विषुवदिनाला 23 सप्टेंबरला सहा महिने पूर्ण होऊन भारतीय सौर 1 अश्विन येतो. तर 22 डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असताना नऊ महिने पूर्ण होऊन भारतीय सौर 1 पौष येतो
सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती मंदावते म्हणून त्या काळातले वैशाख ते भाद्रपद हे महिने 31 दिवसांचे. सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती अधिक असते म्हणून त्या काळातले अश्विन ते फाल्गुन हे महिने 30 दिवसांचे. वर्षात एकूण दिवस 365. तारीख बदलणार मध्यरात्री 12 वाजल्यानंतर.

या कालगणनेचे ‘साल’ कोणते घ्यावे याचा विचार करताना साधारणपणे मार्च मध्ये सुरू होणारे – शालिवाहन शक म्हणजेच भारतीय सौर वर्षाचे साल निश्चित करण्यात आले. सध्या इ. स. 2013 म्हणजेच भारतीय सौर 1935.

भारतीय सौर कालगणनेप्रमाणे भारतीय स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट म्हणजेच 24 श्रावण या दिवशी येतो तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी म्हणजेच 6 माघ या दिवशी येतो.22 मार्च 1957 हा भारतीय सौर कालगणना अंमलात आणल्याचा पहिला दिवस भा. सौ. 1 चैत्र 1879. आपण भारतीयांनी ही कालगणना अभिमानाने वापरली पाहिजे.रोजच्या वर्तमानपत्रात ही कालगणना दिलेली असते. आकाशवाणीचे केंद्र सुरू होताना भारतीय सौर दिनांक सांगितला जातो. शासकीय पत्रके, परिपत्रके यामध्येसुद्धा ही कालगणना नोंदलेली असते. भारतीय रिझर्व बँक, भारतीय स्टेट बँक यांच्या कॅलेंडरमध्ये या तारखा छापलेल्या असतात. भारतीय सौर दिनांक असलेला धनादेश विधिमान्य असल्याचे अध्यादेश भारतीय रिझर्व बँकेने पूर्वीपासूनच काढले. महाराष्ट्र शासनाने इ. स. 1983 मध्ये आदेश काढून शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या सर्वसाधारण नोंदवहीत 1 एप्रिल 1957 नंतर जन्मलेल्या सर्वांचे जन्मदिनांक भारतीय सौर कालमापनाप्रमाणे नोंदलेले असावेत असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आज महाराष्ट्रात औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली नगरपालिकांनी भारतीय सौर दिनांकाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.

प्रत्येक भारतीय नागरिकाने “भारतीय सौर” कॅलेंडर रोजच्या व्यवहारात वापरले पाहीजे.जपान, चीन, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये स्वत:ची कॅलेडरे आहेत आणि ती ते देश मन:पूर्वक वापरतात.भारतीय शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकपणे चोख ठरेल अशी भारतीय सौर कालगणना आपल्यासमोर ठेवली. भारतीय शासनाने तिचा अंगिकार केला. आता आपण सर्व भारतीयांनी ती आपल्या दैनंदिन व्यवहारात आणून आपली विज्ञाननिष्ठा आणि आपला देशाभिमान दाखवून द्यावा.

 

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

अंतिम सुधारित : 6/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate