অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भेसळयुक्‍त दूध

भेसळयुक्‍त दूध - बनावट दूध

विज्ञान आणि तत्वज्ञान हे सत्याचा अंतिम शोध घेत असतात. विज्ञान तत्त्वाची पडताळणी प्रयोगातून करते तर विज्ञानाच्या नव्या नव्या प्रयोगांमधून नवे तत्त्वज्ञान उदयाला येते. चार्वाकाचा - प्रत्यक्ष प्रमाण -  मानणारा विचार या भूमीत टिकला असता तर ग्रीकांच्याही आधी भारत विज्ञानात पुढे गेला असता. विज्ञान म्हणजे बुद्धीप्रमाण्यवाद, विज्ञान म्हणजे विवेकवाद. विज्ञानानं विवेकाशी फारकत घेतली म्हणजे काय होते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे  बनावट दूध.

रसायनशास्त्रात अत्युच्च दर्जाचं संशोधन करणार्‍या विद्यावाचस्पती डॉ. प्रसाद फुंडे यांना जैव-इंधनाबाबत संशोधन करताना 4 ऑगस्ट 2009 या दिवशी एक शोध लागला. सोडियम लॉरेल इथाईल सल्फेट आणि सॉर्बिटॉल यांचं मिश्रण ते हातानं ढवळत होते. हाताला लागलेलं रसायन पाण्याने धुतांना ते पाणी दुधासारखं दिसत असल्याचं त्यांना आढळलं. त्याला कोणताही वास नव्हता. ते त्यांनी पुन्हा करून बघितलं. त्यात स्निग्धतेसाठी पामोलिन तेल मिसळलं. त्या ‘बनावट दूधा’चा चहा करून त्यांनी मित्राला पाजला, त्याला ते लक्षातही आले नाही.

विज्ञानात अनेक शोध अपघाताने लागले. पेनिसिलिनच्या शोधानं मानवी समाजाचं आरोग्यच पालटलं. पुढचं पाऊल टाकलं गेलं – जीवन समृद्ध आणि सुखी करण्यासाठी! आईनस्टाईनच्या सर्वमान्य समीकरणाचं उदाहरण घेतलं तर त्या समीकरणाचा उपयोग करून अतिसंहारक अणुबॉँब करण्यासाठी दुसर्‍या बुद्धीमान शास्त्रज्ञांनी केला, त्या बाँबचा वापर वाईट कारणासाठी करण्यात आला याबद्दल आईनस्टाईनला दोष देता येणार नाही.

प्रसाद फुंडे याने आपल्या शोधावर आणखी संशोधन केले. त्यात गोडीसाठी सॉर्बिटॉलचे प्रमाण नक्की केले, दाटपणासाठी युरीया, शॅम्पूतील घटक, ओशटपणासाठी पामोलिन तेल तर दुधातील मेदेतर घन पदार्थांसाठी सोडीयम लॉरेल इथाईल सल्फेट यांचे मिश्रण केले. या मिश्रणाचे केवळ 35 मिलीलिटर द्रावण वापरून एक लिटर बनावट दूध तयार करता येते. त्याचा खर्च खर्‍या दुधाच्या उत्पादन खर्चाच्या पावपट येतो. प्रसाद फुंडे याने हा ‘फॉर्म्युला’ समीर मेहता नावाच्या माणसाला विकला. मेहताने पाच-पाचशे लिटरची बॅरल खरेदी करून बनावट दूधाचे कॉन्संट्रेट तयार करून ते विकायला सुरूवात केली. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यातून प्रतिनिधी नेमून डेअर्‍यांना लाखो लिटर ‘दूध’ अल्प दरात पुरविले. दरम्यानच्या काळात दुष्काळामुळे चारा कमी पडू लागला आणि म्हणून दूध उत्पादनही घटले होते. डेअर्‍यांना होत असलेल्या दूध पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला होता. समीर मेहता आणि कंपूने बनवलेल्या बनावट दूधरुपी ‘कामधेनू’मुळे डेअरी चालकांनाही कोट्यावधी रुपयांचा धंदा करता आला.

सातारा येथील अन्न व औषध प्रशासकीय अधिकारी संपतराव देशमुख यांना एक निनावी फोन आला आणि त्यांनी लगोलग हालचाली करून बनावट दूधाचा स्रोत शोधून कारवाई केली. चाळीसहून अधिक लोकांना अटक केली. याबद्दल संबंधित अधिकार्‍यांचे आभार. मात्र त्यांचे कौतुक करावेसे वाटत नाही, निनावी फोन येण्यापूर्वी त्यांना दुधातली भेसळ ओळखता आली का नाही? कारण त्याची यंत्रणा कार्यरत नव्हती. आता अन्न व औषध प्रशासनाला या बनावट दूधाचा ‘फॉर्म्युला’ माहीती झाला आहे. मात्र ते तो उघड करायला तयार नाहीत. त्यांचे म्हणणे असे की त्यामुळे काही लोक - बनावट दूध – बनवायला लागतील. वास्तवात ‘फॉर्म्युला’ जाहीर केला तर – बनावट दूध ओळखण्याच्या सहज आणि सोप्या असणार्‍या कसोट्या लोक शोधून काढतील. ‘चोर्‍या कशा होतात’ हे उघड झाले तर समजा चोरांचे प्रशिक्षण होईल पण सामान्यांनाही ‘सावधपणा’ बाळगता येईल आणि आपले नुकसान टाळता येईल.

दुधामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन घालणे याला भेसळच म्हटले जाते. दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रामुख्याने त्यातील स्निग्धांश आणि घनता एवढ्याच गोष्टी तपासल्या जातात. बनावट दूधही या कसोट्यांना खरे उतरते.बनावट दुधात असणार्‍या रसायनांचा विपरीत परिणाम शरीरातील जवळजवळ सर्वच भागांवर होतो. दूध वापरण्याचे प्रमाण आणि त्यातल्या घातक रसायनांची मात्रा यांचा विचार करता त्याचा दुष्परिणाम लगेच न होता - दुधातील वीष अंगात थोडे थोडे भिनून कालांतराने परिणाम दाखवते म्हणजे ते एक “स्लो पॉयझन”च म्हणावे लागेल.दातांवरील सफेद आवरण, यकृत, मुत्रपिंड, हृदय, रक्‍तवाहिन्या, मज्जासंस्था यांच्यावर दुष्परिणाम होतात आणि ते कालांतराने दिसायला लागतात. आपण लहान मुलांनी दूध प्यावे असा आग्रह धरतो आणि दुधाने शरीर बळकट होईल अशा मोठ्या विश्वासाने त्यांना दूध पाजतो. दूध पिणारी मुले आणि दूध पाजणारे मोठे या सर्वांचीच फसगत बनावट दुधामुळे होत आहे. या फसवणूकीत सहकारी दूध योजनेतले मोठमोठे सहकार सम्राटच सामान्य माणसाचा विश्वासघात कसा करू शकतात? याचे कोडे पडते.

ऑगस्द 2009च्या घटनेमध्ये अनेक लोकांना अटक झाल्यानंतर पुणे शहराच्या दूध पुरवठ्यात 40% इतकी घट झाली होती. यावरून भेसळीचे किती दूध पुणे शहरात येत होते याचा आडाखा बांधता येईल. त्या वेळेला आम्ही आरोग्य सेनेतर्फे जाहीर निदर्शने केली पण त्याला लोकांचा प्रतिसाद अल्प मिळाला. पुण्याप्रमाणेच अन्य 10-12 जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन बनावट दुधाचा विषय लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्‍नही केला. काही पत्रकारांनाही याचे गांभीर्य लक्षात आले नाही. त्यांनी - आमच्या जिल्ह्यात अशी काही समस्या नाही आणि तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची वेळ वाया घालवताय – असेही बोलून दाखवले. योगायोगाने दोनच दिवसात त्या जिल्ह्यातले बनावट दुधाचे रॅकेट उघडकीला आले आणि त्या पत्रकारांना त्याची दखल घ्यावी लागली. पण उघड झालेला हा प्रकार एकंदर प्रकाराचा फारच छोटा भाग होता. आज अनेक राज्यात बनावट दूध बनवले जाते, एकंदर दुधापैकी 60 ते 70 टक्के दूध बनावट असल्याचा अंदाज आहे.

पुढे आरोग्य सेनेने अन्य चार संघटनांना घेऊन उच्च न्यायालयात बनावट दूध प्रकरणी एक खटला दाखल केला. त्याचा निकाल सप्टेंबर 2013ला लागला. या प्रकरणी 42 डेअर्‍या दोषी असल्याचे आढळले मात्र न्यायालयाने त्यांची नावे जाहीर केली नाहीत. मात्र पुढील निवाडा दिला. संबंधित डेअर्‍यांच्या संचालकांवर गुन्हेगारी खटले दाखल करावेत, धाड घालून पूर्ण तयारीनिशी दुधाची तपासणी करणारी भरारी पथके निर्माण करावीत, अन्न व औषध प्राधिकारी यांना बरीच कामे करावी लागत असल्याने दूध-तपासणी साठी स्वतंत्र प्राधिकारी नेमावेत अशा सूचना न्यायमूर्ती चंद्रचूड यांना आपल्या निवाड्यात केल्या. गुन्हेगारांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूदही करता येईल मात्र तितकी सक्षम तपास यंत्रणा आज अस्तित्वात नाही, असे त्यांनी म्हंटले.

 

घरी आणलेले दूध भेसळयुक्त आहे का शुद्ध आहे हे तपासणारी एखादी – लिटमस टेस्ट – कोणी विकसित करेल का?

 

दूधातली भेसळ ओळखणारी काही किटस् असतील का? जगात अशी किटस् नाहीत कारण मुळात भेसळच होत नाही. चीनमध्ये असा एक प्रसंग घडला की मेलॅनीन या एक प्रकारचे प्लॅस्टिक बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या रसायनाचा वापर दुधाच्या भुकटीत करण्यात आला. त्यामुळे मुत्रपिंडे निकामी होतात. हा प्रकार उघडकीला आल्यावर संबंधित गुन्हेगारांना फाशाची शिक्षा ठोठवण्यात आली. आपल्याकडे दुधात भेसळ आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकारमान्य प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली तरच तिचे निष्कर्ष न्यायालये ग्राह्य धरतात. या प्रयोगशाळा दूधाची तपासणी करण्यासाठी दुधाच्या सीलबंद पिशवीचीच मागणी करतात. असे मागणे हा एक प्रकारे ग्राहकांवर अन्यायच आहे. कारण, पिशवी फोडून दूध बाहेर काढल्यावर ग्राहकांना त्यातल्या भेसळीचा संशय येणार पण पिशवी फोडलेली असल्यामुळे सरकारी प्रयोगशाळा तो नमुना तपासणीसाठी स्वीकारणार नाहीत आणि खासगी प्रयोगशाळांकडून करून घेतलेली तपासणी न्यायालये ग्राह्य धरणार नाहीत – अशा लाल फितीच्या कारभारात भेसळ करणार्‍यांना मोकळे रान मिळणार आणि सामान्य ग्राहक भेसळीचा बळी ठरणार.

आपल्या घरी आणलेल्या दूधाचा वास पहा, चव पहा – ते विचित्र वाटतात का? दुधावर साय येत नसेल, दुघाचे पनीर होत नसेल, दूधाचा थेंब कागदावर सहज पसरत नसेल तर ते दूध भेसळयुक्त आहे, हे नक्की.

 

लेखक : डॉ. अभिजित वैद्य

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

 

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate