অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मायक्रोवेव्हची ‘आधुनिक धग’

मायक्रोवेव्हची ‘आधुनिक धग’

सध्याच्या झटपट जमान्याला साजेसं स्वयंपाकाचं साधन म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. तासांच्या ऐवजी काही मिनिटांतच स्वयंपाक होतो. चुलीवर, शेगडीवर स्वयंपाक करायचा म्हणजे लाकूडफाटा, काड्या, कट्याकुटक्या गोळा करून आणण्यापासून सुरूवात. मग त्या चुलीत घालून पेटवायच्या. सुक्या असल्या तर भुसकन पेटून विझणार, ओल्या असल्या तर धूर करत करत कधी तरी पेटणार. त्याची जी काय मिळेल ती धग स्वयंपाकाला वापरायची. धग व्यवस्थित लागावी म्हणून लाकूडफाट्या नीट खालीवर करायच्या. तरी घरच्या स्वयंपाकाला तीन-चार तास लागणारच. त्यापेक्षा सोयीचं इंधन झालं कोळसा. कोळशापेक्षा सोय झाली रॉकेलनं. रॉकेलपेक्षा सोय झाली गॅसनं आणि गॅसपेक्षाही मोठी सोय झाली मायक्रोवेव्ह ओवनमुळे.


तासांच्याऐवजी काही मिनिटांतच स्वयंपाक होतो. आग नाही, धूर नाही, लाकूडफाटा आणायला नको, रॉकेलच्या, गॅसच्या रांगेत थांबायला नको. एक तेवढं हवं म्हणजे घरात वीज हवी. मायक्रोवेव्ह विजेवर चालतो.विजेवर चालणारी अनेक उपकरणे आपल्याला माहिती आहेत. विजेचा वापर करुन काही उपकरणे प्रकाश देतात उदा. दिवा, ट्यूब, सीएफएल. काही उष्णता देतात उदा. ओवन, हिटींग रॉड, गिझर, बॉयलर, शेगडी, इस्त्री इ. काही उपकरणे आवाज देतात उदा. रेडिओ, बेल, म्युझिक सिस्टीम; काही उपकरणे उजेड आणि आवाज देतात – टिव्हीसारखी. पंखा, मिक्सर, हेअर ड्रायर, व्हॅक्युम क्लीनर – हवा हलवतात. मायक्रोवेव्ह ओव्हन घरातल्या सर्व विजेच्या वस्तूंपेक्षा वेगळा असतो कारण तो  मायक्रोवेव्हज (सूक्ष्म लहरी) निर्माण करतो.

आपल्या आसपास कितीतरी प्रकारच्या लहरी असतात. पाण्यावर तरंग उठतात तशा या लहरी आवाजाच्या रूपात आपल्या आसपास असतात. मात्र काही लहरी यापेक्षा वेगळ्या असतात. त्यांना विद्युत चुंबकीय - ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक’ लहरी म्हणतात. त्यातल्या काही लहरी आपल्याला डोळ्यांमुळे दिसतात. त्यांना आपण प्रकाश किंवा उजेड म्हणतो. त्याच्यातही तां-ना-पि-हि-नि-पा-जां अशा हजारो रंगछटा असतात. काही लहरी आपल्याला त्वचेमुळे जाणवतात. त्यांना उष्णतेच्या लहरी म्हणतात. त्या जाणवतात पण दिसत नाहीत. उष्णतेच्या लहरींपेक्षाही सूक्ष्म असणार्‍या लहरी असतात. त्या दिसतही नाहीत आणि जाणवतही नाहीत. त्यांना सूक्ष्मलहरी म्हणतात. आणि या लहरींचा वापर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये करतात.

मायक्रोवेव्ह लहरींच्या तरंगांची लांबी एक मिलिमीटरपासून एक मीटरपर्यंत कितीही असू शकते. त्या प्रचंड वेगानं आंदोलन करत असतात. एका सेकंदात ३0 कोटी ते ३0,000 कोटी वेळा त्यांची आंदोलने होतात. याच मायक्रोवेव्हची निर्मिती मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये केली जाते. साधारणपणे ११०० वॉटचा मायक्रोवेव्ह ओवन घेतला तर त्यात १२२ मिलीमीटर तरंगलांबीच्या आणि सेकंदाला २४५ कोटी आंदोलने करणार्‍या लहरी निर्माण केल्या जातात. या लहरींमुळे पाण्याचे रेणू वेगानं हालचाल करायला लागतात. त्यांचे घर्षण होते आणि उष्णता निर्माण होते. पाण्याच्या रेणूंमधून तयार होणारी उष्णता अन्न शिजवायला उपयोगी पडते.

चूल, शेगडी, भट्टी अशा कोणत्याही प्रकाराने अन्न शिजवता येते. या प्रक्रियेत बाहेरून उष्णता देऊन अन्न शिजवले जाते. अन्नाचा बाहेरचा भाग आधी शिजतो आणि मग आतले आतले भाग शिजत जातात. या प्रकारात एखाद्या शिजलेल्या ठिकाणी जास्त उष्णता मिळाली की,पदार्थाला तपकिरी काळपट रंग येतो. तो भाग खायला कुरकुरीत लागतो. कधी जास्त धग लागली तर तो भाग करपतो आणि खायला करपट-जळकट नकोसा लागतो. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पदार्थ करपण्याची शक्यता कमी असते.

पारंपरिक पद्धतीत अन्न - बाहेरून आत - असं शिजत शिजत जातं. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये शिजवण्यासाठी ठेवलेल्या पदार्थावर मायक्रोवेव्हचा मारा केला जातो. मायक्रोवेव्हमुळे पाण्याचा अंश, मेदाचा अंश तसेच साखरेचा अंश असणारे पदार्थ गरम होतात. पाणी, मेद, साखर यांच्या रेणूवर १२२ मिलिमीटर तरंग लांबीच्या तरंगामुळे मोठय़ा प्रमाणात हालचाल निर्माण होते आणि उष्णता निर्माण होते. पाणी, मेद, साखर यांचे रेणू अन्नपदार्थात जिथे जिथे असतील तिथून एकदमच पदार्थ शिजायला सुरुवात होते. त्यामुळे अन्नपदार्थ थोड्या वेळात सर्व बाजूंनी शिजतो.मायक्रोवेव्हची कार्यक्षमता खूपच चांगली आहे. विजेवर चालणार्‍या ओवनपेक्षा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये कमी वीज खर्च होते. साध्या ओवनच्या तुलनेत एक रूपयामध्ये ६४ पैसे बचत होते.


मायक्रोवेव्हच्या अन्न शिजवण्याच्या गुणधर्माचा शोध अपघातानेच लागला. बरेचसे शोध अपघातानेच लागतात, अर्थात तो अपघात घडत असताना बघणारी एक चौकस व्यक्ती साक्षीदार असते. ती साक्षीदार व्यक्ती तोच अपघात प्रयत्नपूर्वक घडवून आणते तेव्हा त्याला शोध म्हणतात.
स्वयंपाक, शिवणकाम, बागकाम, बालसंगोपन यांमध्ये अनेक अपघात घडताना त्या त्या वेळी साक्षी असलेल्या स्त्रियांनी पाहिले, त्यांचा शोध घेतला आणि नवनवे खाद्यपदार्थ, पेहराव, शेती, औषधे, टॉनिके तयार केली.


डॉ. पर्सी स्पेन्सर या अमेरिकी अभियंत्याकडे मायक्रोवेव्ह ओवनच्या शोधाचे श्रेय जाते. मॅग्नेट्रॉन नावाच्या उपकरणावर डॉ. स्पेन्सर काही प्रयोग करत होते. मॅग्नेट्रॉनची रचना – दाणे नसलेल्या डाळींबाच्या फळासारखे पोकळ तांब्याचे भांडे आणि त्याच्या मध्यभागी ठेवलेला एक लोहचुंबक अशी असते. मॅग्नेट्रॉनला विद्युतभार दिला की त्यातून लहरी बाहेर पडतात. या अदृश्य लहरी हवेत सोडल्या की हवेतील धातूच्या पृष्ठभागावर आपटून परत येतात. या परतलेल्या लहरींचे मापन करून अगदी अंधारातले शत्रूचे विमान ‘बघता’ येते. तर या मॅग्नेट्रॉनला बदलता वीजभार देण्याचे प्रयोग डॉ. स्पेन्सर करत होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की मॅग्नेट्रॉन चालू केल्यावर काही सेकंदात त्यांच्या खिशात ठेवलेले चॉकलेट वितळले होते. मग सहकार्‍यांना बोलावून त्यांनी पुन्हा हाच प्रयोग करून दाखवला. मॅग्नेट्रॉनजवळ मक्याचे दाणे ठेवले तर त्याच्या लाह्या फुटल्या. कोंबडीचे अंडे ठेवले तर ते उकडले गेले.
पुढे दोन वर्षे डॉ. स्पेन्सर यांनी मायक्रोवेव्ह ओवन तयार करण्यासाठी आपला वेळ दिला. त्यातून तयार झालेले यंत्र बोस्टन शहरातल्या एका हॉटेलात अन्न गरम करून देण्यासाठी ठेवले. पुढे १९४७ साली न्यूयॉर्कमधील ग्रँड सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पहिला मायक्रोवेव्ह ओवन वापरला गेला. तो ३१८ किलो वजनाचा, १.५ मीटर उंचीचा आणि फक्त ५००० डॉलर किमतीचा होता ! त्यामुळे रेल्वे प्रवाशांना घाईच्या वेळीसुद्धा काही सेकंदात अन्न गरम करून मिळायला लागले. आज बाजारात मिळणारे मायक्रोवेव्ह ओवन त्यामानाने कितीतरी लहान, हलके आणि स्वस्त आहेत. आपण आपल्या गरजेनुसार पाहून घेऊ शकतो.


मायक्रोवेव्ह कसा घ्याल-कसा वापराल?

·मायक्रोवेव्ह ओव्हन विकत घेण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती दुकानदाराकडून करून घ्यावी. शिवाय विकत घेण्यापूर्वी तो दुकानदाराकडून वापरून घेऊन त्याचे कार्य नीट चालते की नाही, याची खात्री करून घ्यावी. मगच तो विकत घ्यावा. तो वापरण्यासंबंधी सूचनांचे पुस्तक वाचून समजून घ्यावं.

·मायक्रोवेव्ह ओव्हन रिकामा असताना कधीही चालू करू नये, नाही तर तयार झालेल्या मायक्रोवेव्ह आतल्या आत फिरत राहून ओव्हनमधल्या मॅग्नेट्रॉन या भागाचे नुकसान करू शकतात.

·मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न शिजण्याची प्रक्रिया नेहमीच्या कोणत्याही पद्धतीपेक्षा वेगळी आहे हे लक्षात घ्यावं. शिजलेले अन्नपदार्थ त्यामुळेच वेगळ्या स्वरूपाचे दिसू शकतात. त्यांना नेहमीसारखा खरपूसपणा येत नाही. खरपूसपणा आणण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन जास्त वेळ चालू ठेवू नये. त्याच्यामुळे खरपूसपणा येत नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे कागद असतात ते वापरावे लागतात.

·मायक्रोवेव्ह ओव्हनचे दार उघडे असताना तो कधीही चालू करू नये. सुरक्षिततेच्या दृष्टीने दार बंद केल्यावरच तो चालू होईल अशी रचना उत्पादकांनी केलेली असते. दार उघडे असताना तो चालू होत असेल तर तो बिघडला आहे असे समजावे.

·बिघडलेला मायक्रोवेव्ह ओव्हन घरी दुरुस्त करण्याचा मोह टाळावा. त्यातील विशेषत: मायक्रोवेव्ह तयार करणारा मॅग्नेट्रॉन हाताळताना फुटला तर त्यातून बेरिलियम या विषारी धातूच्या वाफा शरीरात जाऊ शकतात.

·         मायक्रोवेव्ह ओव्हनच्या दाराला काच लावलेली असते तशीच एक धातूची जाळीही लावलेली असते. या जाळीमुळे आतला प्रकाश बाहेर जाऊ शकतो पण मायक्रोवेव्ह बाहेर जाऊ शकत नाहीत. ती जाळी नेहमी शाबूत असली पाहीजे.

·मायक्रोवेव्ह ओव्हनच्या आतल्या बाजूला लावलेला पांढरा एनॅमलचा थरही अखंडच असायला हवा. तसा नसेल तर मायक्रोवेव्ह ओव्हन वापरणे धोकादायक ठरू शकते.

·मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्नपदार्थ शिजवण्यासाठी वेगळ्या प्रकारची भांडी असतात. विशिष्ट प्रकारचे प्लॅस्टिक, काच किंवा चिनीमातीची भांडीच वापरली पाहीजेत. अशीच भांडी मायक्रोवेव्हना आरपार जाऊ देतात आणि मगच आतले पदार्थ शिजतात.

·धातूची भांडी मायक्रोवेव्हना आरपार जाऊ देत नाहीत. ते परावर्तीत होतात आणि आतल्या आत फिरत राहतात. त्यांच्या लहरी अनुनादीत (रेझोनेट) होऊन स्फोटापर्यंत वेळ येऊ शकते. तसेच धातूला टोक आलेले असल्यास त्या टोकाशा विजेच्या ठिणग्या तयार होऊन आग लागण्याची शक्यता वाढते.

·मायक्रोवेव्ह ओव्हन चालू असताना शक्यतो दूरूनच लक्ष ठेवावे. विशेषत: डोळ्यांना जपावे. डोळ्यांमधील प्रथिनांवर मायक्रोवेव्हची क्रिया अंडे शिजल्याप्रमाणे होऊन नेत्रभिंग अपारदर्शक होऊ शकते. शरीराच्या इतर भागात मायक्रोवेव्हमुळे उष्णता निर्माण झाली तरी तेथे रक्तवाहिन्या असल्यामुळे ती दुसरीकडे वाहून नेली जाऊन घातक परिणाम टाळला जातो.

·मायक्रोवेव्ह ओव्हनमधील अन्नाची चव थोडी वेगळी लागते कारण शिजण्याची प्रक्रिया वेगळी आहे. मात्र येथे शिजलेल्या अन्नातील पोषक घटक अधिक प्रमाणात टिकलेले आढळतात. त्याची तीन कारणे आहेत. एक – पाण्याचा कमी वापर, दोन – शिजण्याचे तापमान कमी आणि तीन – शिजण्यासाठी लागणारा अत्यल्प वेळ. बरेचसे पोषक घटक आणि जीवनसत्वे मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अधिक प्रमाणात टिकत असली तरी क जीवनसत्व टिकण्याचे प्रमाण नेहमीच्या पद्धतीच्या ५५% इतकेच आहे.

·कधी कधी आतून अतिशय गुळगुळीत असणारे चिनी मातीचे भांडे वापरून द्रव पदार्थ गरम करताना तापमार १०० अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊनही उकळी फुटत नाही मात्र भांडे बाहेर काढून त्यात चमचा ठेवताच द्रव उसळून उकळी घेतो.

·अल्युमिनीयमच्या फॉईलमध्ये अन्न गरम करताना फॉईलला टोके येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर टोकाच्या जागी ठिणग्या पडून फॉईल जळू शकते.

कोणतेही नवीन साधन वापरताना त्याची माहीती संपूर्णपणे करून घेणे आवश्यक असतेच. सुरूवातीला सवय नसल्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. वापर करूनच त्या सोडविता येतात. लहान मूल चालायला शिकताना धडपडतं पण चालायची धास्ती घेत नाही. भ्यायचं कशाला? काळजी घ्यायची.

लेखक - विनय र. र.

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

लिंक : http://mavipapunevibhag.blogspot.in/

अंतिम सुधारित : 4/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate