অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वप्न आणि विज्ञान परस्पर विरोधी आहेत का?

स्वप्न आणि विज्ञान परस्पर विरोधी आहेत का?

ऑगस्ट केक्युले

रसायन शास्त्र शिकलेल्या सगळ्यांना बेन्झीन रिंग माहिती आहे. C6H6 असा रासायनिक फॉर्म्युला असलेल्या या संयुगाची रचना ज्या फ्रेडरिक ऑगस्ट केक्युले नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने दिली त्याने, आपल्या या सिद्धांताच्या रौप्य महोत्सवात स्वत:च हे सांगितले होते की, आपल्याला स्वप्नात ही रचना सुचली. एक साप स्वत:ची शेपूट तोंडात घेतलेला मला स्वप्नात दिसला आणि त्यावरून मी बेन्झीनची रचना तयार केली.

जगप्रसिद्ध भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन हे तर जाहीरपणे सांगत असत की, आपल्याला गणितं चक्क स्वप्नात दिसतात. अनेक गणिती प्रमेये आपल्याला स्वप्नात दिसल्याचा त्यांचा दावा होता. केम्ब्रिज विद्यापीठात गणिताची ३ हजार प्रमेये उलगडणार्‍या या महान भारतीय गणितज्ञाने एका स्वप्नाचे वर्णन तर असे केले की,

श्रीनिवास रामानुजन

`मला एक लाल पडदा दिसला जणू काही रक्ताचा पडदा. मी विस्मित होऊन पाहत होतो तोच एक हात आला आणि त्यावर गणित सोडवू लागला. elliptic integrals ची ती गणिते मी जागा झाल्यावर लिहून काढली.' नमक्कल देवी आपल्याला स्वप्नात गणिते सोडवून देते असे या महान गणितज्ञाचे म्हणणे होते.

प्रख्यात शास्त्रज्ञ आणि आजच्या विज्ञानाचे शिल्पकार अल्बर्ट आइनस्टाइन यांना जेव्हा त्यांच्या

सापेक्षतावादाच्या E = mc2 या फोर्म्युल्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी आपल्याला तो दिसल्याचे सांगितले. trial and error पद्धतीने आपण तो तयार केला नाही तर त्याचे चक्क दर्शन झाले असे त्यांचे म्हणणे होते.


बिटल्सचं आजवरचं सर्वाधिक खपाचं समजलं जाणारं `yesterday' हे गाणं आपण स्वप्नात स्वप्नात तयार केल्याचे पॉल माकार्तानी याने सांगितले होते.

१९३६ साली औषधीशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे जर्मन शास्त्रज्ञ डॉ. ओट्टो लोवी यांनी आपला nervous system चं संदेशवहन रासायनिक पद्धतीने होत असल्याचा सिद्धांत नोबेल मिळण्याच्या सुमारे २७ वर्ष आधी मांडला होता. पण आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या हाती काहीही नव्हते. त्यांनी आपला सिद्धांत १७ वर्षे जणूकाही स्वत:च्या मेंदूच्या अडगळीत टाकून दिला होता. अन अचानक दोन दिवस लागोपाठ त्यांना स्वप्ने पडली आणि त्यांचा सिद्धांत सिद्ध करण्याचा प्रयोग त्यांच्यापुढे जणू

डॉ. ओट्टो लोवी

कोणीतरी करून दाखवला. नंतर त्याचे शास्त्रशुद्ध अध्ययन आणि मांडणी केल्यानंतर १० वर्षांनी त्याला नोबेल पुरस्कार मिळाला.

इलियास होवे याने १८४५ साली शिवणयंत्राचा शोध लावला. त्याने या यंत्राची प्रथम जी कल्पना केली होती ती फसली होती. त्यात सुईच्या दोन्ही बाजूला टोके व मध्ये छिद्र अशी रचना होती. त्याने काम होत नव्हते.

इलियास होवे

एक दिवस त्याला स्वप्न पडले आणि त्यातून त्याला आधुनिक शिवणयंत्र स्फुरले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना स्वप्नातच त्यांच्या हत्येचे संकेत मिळाले होते किंवा Dr. Jekyll and Mr. Hyde, ही प्रसिद्ध कादंबरी रॉबर्ट लुइस स्तिव्हन्सन यांना स्वप्नातच स्फुरली हे तर प्रसिद्धच आहे. अनेक प्रतिभावंत, साहित्यिक, कवी, दार्शनिक, तत्वज्ञ यांनी स्वप्नसंकेतांची पुष्टी केली आहे.


मुळात संपूर्ण विज्ञान हे स्वप्न आणि अज्ञाताचं सुंदर विकसित पुष्प आहे. विज्ञानाचा संबंध बुद्धीशी नंतर येतो. विज्ञानाचा संबंध प्रथम येतो तो स्वप्नांशी आणि अज्ञाताशी. गमतीशीर वाटणारं हे विधान सहज लक्षात येण्यासारखे आहे. मंगळावर पाणी आहे वा नाही हे निश्चित माहित नसतानाच त्याचा शोध घेतला जातो. तशी शक्यता, तसं स्वप्न, तसा आभास प्रथम कोणाला तरी होतो, नंतर त्याचा मागोवा घेतला जातो. फळ खाली पडताना पाहून न्यूटनला प्रश्न पडला, हे फळ खाली का पडतं? त्याचा कार्यकारण भाव त्याला माहीत नव्हता. प्रथम मनात प्रश्न निर्माण झाला मग त्याची कारणमीमांसा करण्यात आली. मुळात हा प्रश्न तरी कुठून मनात आला असेल? किंवा कवीला कविता कशी सुचते? कादंबरीकाराला (दूरदर्शन मालिका लिहिणार्याला नव्हे) कथाभाग आणि पात्रे कुठून सुचतात? कोणत्याही शास्त्रीय शोधाचं, साहित्यकृतीचं, कलाकृतीचं बीज येतं कुठून? आणि कसं? त्यानंतर गोष्टी घडतात, पण अगदी प्रारंभ तर अजून अज्ञातच आहे ना? त्या क्षणाचं मेंदूतील रासायनिक पृथक्करण वगैरे सांगता येईल कदाचित, पण हे रासायनिक बदल का घडतात आणि विशिष्ट मेंदूतच का घडतात याचे गूढ अजून गुलदस्त्यातच आहे. कोण घडवतं मेंदूतील हे रासायनिक बदल?

पदार्थविज्ञान शास्त्रातील सगळ्यात ताजे संशोधन आहे `हिग्स बोसॉन' कणाचे. यावर्षीचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कारही त्यालाच मिळाला. तो सुद्धा प्रथम सिद्धांतरूपातच मांडला गेला, म्हणजेच गृहीत धरला गेला. त्यानंतर १९६४ पासून म्हणजे गेली सुमारे ५ दशके त्यावर संशोधन सुरु आहे. म्हणजेच जे निश्चित माहिती नाही, त्याचा कुणाला तरी- कधी तरी आभास झाला आणि मग ते सिद्ध करण्याचा खटाटोप. या विश्वाचे आदिकारण समजला जाणारा हा `हिग्स बोसॉन' कण अस्तित्वात आला आणि विलीन झाला. time, space, speed, causation यांची कमालीची सूक्ष्मता गाठलेल्या आधुनिक विज्ञानालाही तो कण पकडता आला नाही. हा कण कुठून आला याचेही शास्त्रज्ञांचे उत्तर आहे- अज्ञातातून. असे अनेक प्रयोग आजवर असफल झाले आहेत आणि अनेक सफलही झाले आहेत.

खरी वैज्ञानिकता म्हणजे काय? वैज्ञानिक वृत्ती म्हणजे काय? कोणतीही गोष्ट न नाकारणे हे वैज्ञानिकतेचे सगळ्यात पहिले लक्षण आहे. कितीही असंभाव्य वाटणारी, हास्यास्पद वाटणारी, कपोलकल्पित वाटणारी, तर्कबुद्धीला न पटणारी बाब समोर आली, तसा आभास झाला; तरीही ती सत्य मानून त्याचा शोध घेणे, मागोवा घेणे, त्याचे सगळ्या बाजूंनी विश्लेषण करणे आणि मग निष्कर्ष काढणे याचे नाव वैज्ञानिक वृत्ती. आम्हाला पटत नाही म्हणून एखादी गोष्ट नाकारणे, त्याची टवाळी करणे; हे फावला वेळ घालवण्याचे साधन होऊ शकेल. पण ती वैज्ञानिकता नाही म्हणता येणार.

या जगात स्वप्न एकदा जरी खरं झालं असेल, वा तसा अनुभव आला असेल तरीही तो नेहमी आणि सगळ्यांना येत नाही, म्हणून खोटा ठरू शकत नाही. त्याला शास्त्र म्हणायचे की नाही यावर वाद घालता येईल, पण स्वप्नाचे अस्तित्व वा अधिकृतता त्याने बाधित होत नाही. आणि खरे तर, आजवर जगात एकही स्वप्न सत्य ठरले नसेल तरीही भविष्यात स्वप्न खरे ठरू शकणार नाही असे नाही. एखादी गोष्ट आतापर्यंत झाली नाही म्हणजे ती कधीच होणार नाही, ही सुद्धा घोर अवैज्ञानिकता ठरेल. विज्ञान कधीही दार बंद करीत नाही. विज्ञानाचा दंभ मिरवीत आक्रस्ताळेपणा करण्याएवढे वैज्ञानिक वृत्ती बाळगणे सोपे नाही.

लेखक - श्रीपाद कोठे, नागपूर

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate