অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प

प्रकल्प म्हणजे काय ?

विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

प्रकल्पाची उद्दिष्टे

1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.

प्रकल्पकार्य लेखन कसे कराल?

प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे –
( विद्यार्थ्यांसाठी )
1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
2. प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
3. प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.
4. प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.
5. प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
6. प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
7. प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
8. आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
( शिक्षकांसाठी )
9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
10. मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा. शालेय प्रकल्पांसाठी यादी 1. माहिती संकलन –
थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, थोर समाजसेविका इत्यादी.
2. संग्रह –
म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह, शंख-शिंपले संग्रह, तिकिटे संग्रह, जुनी नाणी संग्रह इत्यादी.
3. प्रदर्शन –
चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञानप्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.

4. तक्ते
शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.5. आदर्श
आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव, आदर्श शहर, आदर्श राष्ट्र इत्यादी.

स्त्रोत: शिक्षक मंच

अंतिम सुधारित : 4/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate