অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुंभमेळा : कुंभ पर्व चक्र

चार कुंभपर्व

जगभरातुन लाखोंच्या संख्येने भाविक व साधू कोणतेही आमंत्रण,बोलावणे इत्यादी नसतांना पवित्रा नदयांकाठी एकत्र येवून संपन्न होणारा ज्ञान व आध्यामिकतेचा सोहळा म्हणजे कुंभमेळा. संस्कृत भाषेत ‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ ‘घट’ किंवा कलश असा होतो. भारतीय ज्योतिषशास्त्रात कुंभ नावाची राशि देखिल आहे.ग्रहता-यांच्या विशिष्ट युतीवेळी भारतात चार ठिकाणी कुंभमेळा संपन्न्‍ होतो. कुंभमेळा दरम्यान पवित्रा नदयांमध्ये स्नान केल्याने मोक्ष्‍ प्राप्ती होते, या श्रध्देने लाखो भाविक स्नान करतात.

कुंभपर्व हे हरिव्दार पासुन सुरु होते असा नारदपुराण, शिवपुराण व ब्रम्हपुराणात उल्लेख आहे. हरिव्दार नंतर प्रयाग, नाशिक-त्र्यंबकेश्वर, उज्जैन अशा प्रमाणे हे चक्र पुर्ण होते. या ठिकाणी दर बारा वर्षानी कुंभमेळा संपन्न होतो तर हरिव्दार व प्रयाग येथे दर सहा वर्षांनी ‘अर्ध कुंभ’ संपन्न होतो.

कुंभपर्व हरिव्दार

हरिव्दार हे भारतातील पवित्र शहरांपैकी एक मानले जाते.हरिव्दारला धार्मिक दृष्टया महत्वाचे स्थान असुन हे शहर हिंदुंसाठी महत्वाचे यात्रा स्थळ आहे.हरिव्दार शहर हिमालय रांगामध्ये शिवालीक टेकडयांच्या पायथ्याशी उत्तराखंड राज्यात वसलेले आहे.पौराणिक ग्रंथामध्ये हरिव्दारचा उल्लेख ‘मोक्षव्दार’ म्हणुन देखिल केलेला आहे बृहस्पितीचा कुंभरशीत व सुर्य व चंद्रचा अनुक्रमे मेष व धनू राशि प्रवेश झाल्यावर हरिव्दार येथे कुंभमेळा भरतो.

हरिव्दार येथे मागील कुंभमेळा मकरसक्रांती 14 जानेवारी 2010 ते शकपोर्णिमा 28 एप्रिल 2010 या कालावधीत संपन्न झाला.हरिव्दार येथे आगामी कुंभमेळा सन 2022 मध्ये संपन्न होईल.

कुंभपर्व अलाहबाद

बृहस्पतीचा वृषभराशित व सुर्य आणि चंद्राचा मकर राशीत प्रवेश होतांना प्रयाग येथे गंगा,यमुना व अदृष्य सरस्वतीच्या संगमावर कुंभमेळा संपन्न्‍ होतो.साधू आणि भाविकांची संख्या विचारात घेता प्रयाग येथे सर्वात मोठा कुंभमेळा भरतो.

कुंभपर्व नाशिक-त्रयंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे शहर सहयाद्री पर्वतरांगांमधील ब्रम्हगिरी टेकडयांच्या पायथ्याशी नाशिक पासून 30 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. पवित्र गोदावरी नदी ब्रम्हगिरी टेकडयावरून उगम पावते.

गौतम ऋषिंच्या तपामुळे गोदावरी नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली असे मानले जाते. नाशिकला असलेल्या विविध मंदिरांमुळे ‘दक्षिणकाशी’ असे देखील संबोधण्यात येते.

वनवासा दरम्यान प्रभुरामचंद्रांचे या ठिकाणी वास्तव्य होते. ही दोन्ही शहरे हिंदूंना धार्मिकदृष्टया पवित्र आहेत. बृहस्पतिचा सिंह राशीत आणि सुर्य आणि चद्राचा कर्क राशीत प्रवेश होतो त्यावेळेस गोदावरीतीरी नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होतो.

कुंभपर्व उज्जैन

उज्जैनला अवंतिका, अवंतिकापुरी असेही संबोधले जाते. हे शहर मध्यप्रदेशात क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेले आहे. उज्जैन येथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर देखील आहे. भारतातील पवित्र शहरांमध्ये उज्जैनचा समावेश होते आणि बृहस्पति सुर्य राशीत असतांना व चंद्र आणि सुर्य मेष राशीत असतांना उज्जैन येथे कुंभमेळा संपन्न होतो.

गोदावरी दर्शन

महान ऋषि गौतम यांचे त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्य होते.

गोदावरीच्या पवित्र पाण्यात स्नान करता यावे म्हणून ब्राम्हणांनी गौतम ऋषिना गंगा पृथ्वीवर आणण्याची विनंती केली परंतू त्यांनी त्यास नकार दिला. आपल्या दैनंदिन उपयोगासाठी गौतम ऋषि भात पिकवित असलेल्या शेतात देवी पार्वतीने एके दिवशी गाय पाठविली. भात पिकाचे नुकसान होतांना पाहून गौतम ऋषिंनी सदर गायीला हकलेले व काठीने मारले. यामुळे गायीचा मृत्यु झाला. गौहत्येमुळे पातकातून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषिंनी भगवान महादेवाची तपश्चर्या सुरु केली. गौतम ऋषिंच्या तपशचर्येने प्रसन्न होऊन भगवान महादेवाने आपल्या जटेतून गंगेला मुक्त केले व ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरीचा उगम झाला. गोदावरीला दक्षिण भारतातील पवित्र नदी मानली जाते व “दक्षिण गंगा” असे देखील संबोधले जाते.

कृते लक्षव्दयातीते मान्धातरि शके सति ।कूर्मे चैवावतारे च सिंहस्थे च बृहस्पतौ ।।
माघे ममासे सिते पक्षे दशम्यां सौम्यवासरे ।माध्यान्हे तु समायाता गौतमी पुण्यपावनी ।।(स्कंदपुराण)

कृत युगाच्या समाप्ती नंतर राजा मांधाताच्या काळात भगवान विष्णुच्या कुर्म अवतारादरम्यान बृहस्पति सिंह राशीत असतांना गोदावरी नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली, असा स्कंद पुराणात उल्लेख आहे.

गा ज्ञान ददाति सा गोदा । गौ गौतमधनो: जीवदानं सा गोदा ।।

म्हणजेच, गोदावरी ज्ञानदायीनी असून गौतम ऋषिंना गौहत्येच्या पातकापासून मुक्त करणारी आहे.

तीर्थनि नदयश्च तथा समुद्रा ।क्षेत्राण्यरण्यानि तयाश्रमाश्च ।।
वसन्नि सर्वाणिच वर्षमेरुं ।गोदावरी सिंहगते सुरेज्ये ।। (स्कंदपुराण)

म्हणजेच, जो पावेतो बृहस्पती सिंह राशीत राहतात (एक वर्ष) तो पावेतो सर्व नदया, सागर, तिर्थ, ऋषि, महर्षि इत्यादी गोदावरी नदीच्या तीरावर वास्तव्य करतात.

कुंभमेळा प्रसंगी करण्यात येणारे धार्मिक विधी

भौतिक जगतात असणारे जात, पंथ, प्रांत, इत्यादी भेद बाजूला सारुन लाखोंच्या संख्येने कुंभमेळयादरम्यान भाविक एकत्र येतात. कुंभमेळयाची सामान्य जनांच्या मनावर एक संमोहन घातले आहे. पवित्र गोदावरी नदीत स्नान केल्याने पुर्व कर्मापासून मुक्ति होऊन जन्म मृत्युच्या फेऱ्यातून सुटका होते अशी भाविकांमध्ये श्रध्दा आहे. कुंभमेळयाप्रसंगी धार्मिक चर्चा, सत्संग, भजन, अन्नदान धार्मिक प्रवचने, इत्यादी प्रकारच्या उपक्रमांची रेलचेल असते.

 

माहिती स्त्रोत : सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वर २०१५

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate