অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुंभमेळा : परिचय

नाशिक

त्र्यंबकेश्वर येथे गत कुंभमेळा सन 2003-04 मध्ये संपन्न झाला. आध्यात्मिकतेपोटी मोठया संख्येने भाविक व साधू एकत्रित येण्याचा कुंभ सोहळा भारतात नाशिक- त्र्यंबकेश्वर, प्रयाग (अलाहाबाद), हरिदवार, उज्जैन या ठिकाणी पवित्र नदयाच्या तीरावर दर बारा वर्षांनी संपन्न होतो. प्रयाग व हरिदवार येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभ भरण्याची देखील परंपरा आहे. नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा हा गोदावरी नदीकाठी भरतो. प्रयाग येथे गंगा, यमुना व अदृष्य स्वरुपात असलेल्या सरस्वती या नदयांच्या संगमावर, हरिदवार येथे गंगा तीरी तर उज्जैन येथे क्षिप्रा तीरावर कुंभमेळा संपन्न् होतो. कोणतेही आमंत्रण, बोलावणे, सक्ती व साद नसतांना भाविकांच्या लाखोंच्या संख्येने सहभाग हे कुंभमेळयाचे वैशिष्टय आहे.

नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभ

प्रयाग, हरिदवार आणि उज्जैन येथे एकत्र स्नान करणारे वैष्णव व शैव आखाडे नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे वेगवेगळया ठिकाणी स्नान करतात हे या कुंभमेळयाचे वेगळेपण आहे. दोन्ही पंथाच्या साधूंमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन पेशव्यांनी केलेल्या व्यवस्थेनुसार वैष्णव आखाडे नाशिक येथे तर शैव / संन्यासी, उदासिन, निर्मल आखाडे त्र्यंबकेश्वर येथे स्नान करतात. वनवासा दरम्यान प्रभुरामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या दंडकारण्याचा नाशिक भाग असल्याची मान्यता आहे. त्रयंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पवित्र गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी टेकडयांवर होतो. श्रीसंत निवृत्तीनाथ यांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर येथे आहे.

कुंभमेळा- अर्थ

संस्कृतमध्ये ‘कुंभ’ शब्दाचा अर्थ घडा / घट असा होतो व बऱ्याचदा ‘कलश’ म्हणुन देखील या शब्दाचा वापर होतो. भारतीय ज्योतिष शास्त्रात ‘कुंभ’ नावाची राशी देखील आहे. मेळयाचा अर्थ ‘एकत्रित येणे’ अथवा ‘यात्रा’ असा होतो. ‘कुंभ’ / घट याचा शब्दश: अर्थ घडा / घट असा असा होत असला तरी मुलभुत अर्थ वेगळाच आहे. इतकेच नव्हे तर घट, ‘कुंभ’, ‘कलश’ हिंदु संस्कृतीतील पवित्र कार्यातील एक अविभाज्य घटक आहेत. हाच घट कुंभाचे प्रतिक मानला जातो. कलशस्य मुखेविष्णु : कण्ठे रुद्र समाश्रित: मूलेतय स्थितो ब्रम्हा मध्ये मातृगणा : स्मृत: || कुक्षौ तु सागरा : सर्वे सप्त दीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुवेदो सामवेदोअथर्वण : || अंगैश्च सहित: सर्वे कलशं तु समाश्रिता: |

हिंदू संस्कृतीत घटास विशेष महत्व असून घटाचे मुखात श्री विष्णु, मानेत रुद्र, तळाशी ब्रम्हा, मध्यभागी सर्व देवता व अंतर्भागात सर्व सागर म्हणजेच चार वेद सामावले आहेत असे मानले जाते. संस्कृतमध्ये ‘कुंभ’ शब्दाचा अर्थ मानवी शरीर असा देखील होतो. शरीर रुपी घटात जीवनामृत, आत्मा, पाणी हे सामावलेले आहेत. सागर, नदी, तळे, घट यात पाणी सर्व बाजुंनी कुंभासारखेच बंदिस्त असते. ज्या प्रमाणे आकाशास वारा सर्व पृथ्वीला सुर्य किरणे व्यापून टाकतात त्याच प्रमाणे मानवी शरीर देखील पेशी व ऊतींनी व्यापलेले आहे. मानवी शरीर देखील पाणी, जमीन, आग, आकाश आणि वारा हया पाच तत्वांनी निर्मित आहे. लाखोंच्या संख्येने कुंभमेळयातील स्नान सोहळयात भाविक याच मानवी घटातील शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी सहभागी होतात. ज्ञान व आध्यात्मिकतेचे प्रतिक समजला जाणारा ‘घट’ / ‘घडा’ कुंभाबरोबरच स्वत्वाचा शोध येण्या बरोबरच ज्ञान व आध्यात्मिकतेचे दर्शन (ज्याचे प्रतिक घट / कुंभ समजला जातो) घेण्यासाठी भाविक कुंभमेळयात स्नान करतात.

कुंभमेळयाचा मौलिक / मुलभुत अर्थ

ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोणातुन कुंभमेळा अवकाशात भ्रमण करणारे ग्रहतारे व त्यांची विशिष्ट युती याचा ज्योतिषशास्त्रीयदृष्टया कुंभमेळयाशी संबंध आहे. वेंदा मध्ये ‘सुर्याला’ आत्मारुपी अथवा जिवनदायी मानले जाते ‘चंद्रला’ मनाचा राजा मानले आहे. ‘गुरु/बहस्पती’ ग्रहाला देवांचा गुरु मानले जाते. ‘गुरु’ ग्रहाला बारा राशीमध्ये भ्रमण करण्यासाठी 12 वर्ष लागतात आणि कुंभमेळा देखिल गुरु ग्रहाच्या विविध राशीमधील प्रवेशा नुसार चार ठिकाणी दर 12 वर्षांनी संपन्न होतो.

पद्‍मिनी नायके मेषे कुम्भ राशि गते गुरोः । 
गंगा द्वारे भवेद योगः कुम्भ नामा तथोत्तमाः।। "

ज्यावेळी गुरुचा ‘कुंभ’ राशीत प्रवेश होतो त्यावेळेस हरिव्दार येथे कुंभमेळा संपन्न होतो.

मकरे च दिवा नाथे ह्‍म‍जगें च बृहस्पतौ कुम्भ योगोभवेत्तत्र प्रयागे ह्‌यति दूलर्भ:
" मेष राशि गते जीवे मकरे चन्द्र भास्करौ । 
अमावस्या तदा योगः कुम्भख्यस्तीर्थ नायके ।। "

ज्यावेळी गुरुचा मेष राशीत प्रवेश होतो, व सुर्य आणि चंद्र मकर राशित प्रवेश करतात त्यावेळी अलाहाबाद येथे कुंभमेळा संपन्न होतो.

I" सिंह राशि गते सूर्ये सिंह राशौ बृहस्पतौ । 
गोदावर्या भवेत कुम्भों जायते खलु मुक्‍तिदः ।। "

ज्यावेळी गुरुचा सिंहराशित प्रवेश होतो व सुर्य आणि चंद्र कर्कराशीत प्रवेश करतात त्यावेळेस नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी तिरी सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होतो.

" मेष राशि गते सूर्ये सिंह राशौ बृहस्पतौ । 
उज्जियन्यां भवेत कुम्भः सदामुक्‍ति प्रदायकः ।। "

ज्यावेळी गुरु सिंह राशीत व सुर्य आणि चंद्र मेष राशीत प्रवेश करतात त्यावेळेस उज्जैन येथे क्षिप्रातीरी कुंभमेळा संपन्न होतो.

गुरुचा सिंहराशीत प्रवेश झालेला असतांना त्र्यंबकेश्वर-नाशिक व उज्जैन येथे कुंभमेळा संपन्न होत असल्याने त्यास ‘सिंहस्थ कुंभमेळा’ असे संबोधले जाते.

पौराणिकदृष्टया कुंभमेळा

देव आणि दानवामध्ये ‘अमुल्य रत्न’ आणि अमृत प्राप्त करुन घेण्यासाठी झालेल्या समुद्र मंथनाची कथा पौराणिकदृष्टया कुंभमेळयाशी निगडीत आहे. समुद्र मंथना दरम्यान मंद्राचल पर्वतास ‘रवी’ तर नागराजा वासुकीचा ‘दोर’ म्हणुन उपयोग करण्यात आला. मंद्राचल पर्वत निसटून सागरात बडु नये या साठी स्वत भगवान विष्णुनी ‘कासव रुप’ घेऊन आपल्या पाठीवर पर्वत पेलला.मंथनातुन सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले व हे विष भगवान शिवांनी प्राशन केल्यामुळे त्यांना ‘निलकंठ’ संबोधण्यात येते. समुद्र मंथनातुन यानंतर कामधेनु, उकश्रर्शव नावाचा हत्ती, इत्यादी रत्न प्राप्त झाले. मंथनातुन अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र जयंत याने हेरली व दानवांच्या हाती अमृतकलश लागु नये म्हणून धन्वंतरींच्या हातातुन हा कुंभ घेऊन तो पळाला. ही बाब लक्षात येताच राक्षस गुरु शुक्राचार्यानी राक्षसांना सावध केल्याने राक्षसांनी जयंताचा पाठलाग सुरु केला. देवलोकातील कालगणने प्रमाणे देवांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्ष एवढा मानला जातो. जयंत अमृत कलश दानवांच्या हाती पडु नये म्हणुन बारा दिवस कलश घेऊन पळत होता. या कालावधीत ज्या चार ठिकाणी जयंताने कलश ठेवला ती चार ठिकाणे म्हणजे हरिव्दार, प्रयाग ,नाशिक-त्रयंबकेश्वर व उज्जैन होय. या चार ठिकाणी सुर्य, चंद्र आणि गुरु ग्रहाची विशिष्ट युती होते त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो. अमृत कलश दानवांपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरु बृहस्पिती यांना सूर्यपुत्र शनिदेव, व चंद्राची मदत झाली. स्कंदपुराणामध्ये केवळ अमृत कलश ठेवला म्हणुन नव्हेतर कलशातुन अमृत सांडले म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो असा उल्लेख आहे.

 

माहिती स्त्रोत : सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वर २०१५

 

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate