অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दिवाळी

दिवाळी

दिवाळी

हिंदूंचा एक प्रसिद्ध सणं. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दिपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो.

पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आले आहे. यावेळी नवे धान्य तयार झालेले असते, म्हणून हा कृषिविषयक आंनदोत्सवही आहे. दिवाळीच्या पाचही दिवसांचे माहात्म्य सांगणाऱ्‍या अनेक कथा पुराणांत आलेल्या आहेत. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गोवत्सद्वादशी असते. यास वसुबारस असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात. हा दिवसही दिवाळीचाच एक दिवस मानतात.

आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे. यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही’, असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करुन दीप लावतात. यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो. इतर वेळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे अशुभ समजतात.

आश्विन वद्य चतुर्दशीस नकरचतुर्दशी हे नाव आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सुर्योदयापूर्वी परत आला. त्या वेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले. याची स्मृती म्हणून सूर्योत्यापूर्वी स्नान करून दिवे लावतात. व आनंदोत्सव साजरा करतात. सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साहाय्याने नरकासुराला मारले अशीही एक कथा आहे.

आश्विन वद्य आमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतिक आहे. संयमपूर्वक धन संपादन केल, तर तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते.

या रात्रीची केवळ द्यूत खेळावे, असे सांगितले आहे. द्रव्य हे चंचल आहे, हे लक्षात येण्यासाठीच या खेळाची योजना असावी लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता मांगल्य, प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे.

या दिवशी महावीरांचे निर्वाण झाले. म्हणून जैन लोक या दिवशी सर्वत्र दिवे लावून हा दिवस पाळतात. महावीरांचा प्रकाश सर्वत्र पसरावा हा उद्देश त्यामागे असावा.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बालप्रतिपदा हे नाव आहे. या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळिराजाला पाताळात लोटले. या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वामनाने बळीला वर दिला. या दिवशी बलिपूजा करण्याचीही पद्धत आहे. या दिवसापासून विक्रम संवत सूरू होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे.

या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात.

कार्तीक शुद्ध द्वितीयेचे भाऊबीज हे नाव आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्ही तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रुढ झाली.

भारताच्या निरनिराळ्या भागांत दिवाळीसंबंधी भिन्नभिन्न लोकाचार दिसून येतात. वर्षात ओळीने पाच दिवस येणारा हा दिपोत्सव असतो. दिवाळीचा सण विशेष महत्त्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीत घरांवर आकाशदिवे लावतात.

त्यामुळे शिव, विष्णू, यम इ. देव संतुष्ट होऊन संपत्ती देतात, असे पुराणांत सांगितले आहे. निरनिराळी मिष्टान्ने व फराळाचे पदार्थ करून त्यांचा देवांना नैवेद्य दाखवितात व आप्तजन आणि इष्टमित्र यांना फराळासाठी बोलावितात. फटाके, बाण, भुइनळे इ. उडवून सर्वजण या उत्सवाचा आनंद लुटतात.

भिडे, वि. वि.

लाल किल्याची प्रतिकृत

आकाशकंदील

फुलबाज्या उडवतानाफुलबाज्या उडवताना

वसुबारस–- पूजनवसुबारस–- पूजन

मंदिराचे दीपशोभन

भुइनळे उडवताना

 

रंगीबेरंगी रांगोळ्या

लक्ष्मीपूजनाची तयारी
व्यापाऱ्याचे वहीपूजन

कंरज्या करण्यात गढलेल्या महिला

दिवाळीचा फराळ


भाऊबीजेचे औक्षण


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate