অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंहस्थ अन् फसलेली पंचांग परंपरा

सिंहस्थ अन् फसलेली पंचांग परंपरा

सिंहस्थ हा महाकुंभ असल्याने यात नेहमी काही ना काही वाद अथवा अपघात घडत असतात. कधी ते आखाड्यांमध्ये असतात तर कधी शैव व वैष्णवांमध्ये. पण, गेली अनेक वर्ष सिंहस्थाच्या त‌िथींचा मुद्दा गाजतो अन् पुढच्या सिंहस्थातच तो पुन्हा बाहेर येतो. यामुळे सिंहस्थ खरचं मुहूर्तावर होतो का? की फसलेल्या पंचांग अन् नेमका कशाचा आधार घ्यायचा यातील मतभेदांमुळे सिंहस्थाची परंपरा भरकटत आहे. याविषयावर टाकलेला प्रकाश...

नाशिकमध्ये भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण तो सिंह राशीत येतो अन् तो `अद्या सा गौतमी-गंगा द्वितीया जान्हवी स्मृत' म्हणजे ज्येष्ठ नदी असलेल्या गोदातीरी तो साजरा होत असल्याने सिंहस्थाचे महत्म्य काही वेगळेच आहे. हा सिंहस्थ कसा निश्चित होतो, यावर गेली अनेक वर्ष अनेक वाद आहेत. ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या म्हणा अथवा धर्मशास्त्रदृष्ट्या हा वाद मिटविता आलेला नाही. त्यामुळे अनेकदा मुहूर्त साधता येत नसेल तर त्यात ‘राम’ कसा असेल असाही मुद्दा चर्चीला जातो अन्यथा जे चालले आहे ते साजरे करा अशीही भूमिका घेतली जाते. यंदाचा सिंहस्थ हा द्विखंडी आहे की, पूर्ण सिंहस्थ आहे. यावरून अंतर्गत छुप्यापद्धतीने चर्चा सुरू आहे. खरे तर ही चर्चा मोकळेपणाने खुल्या व्यासपीठावर व्हायला हवी. सध्या सिंहस्थाच्या ज्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्या कोणत्या शास्त्रानुसार आहेत हे पाहणेही गरजेचे आहे. धार्मिक विधी करताना आधुनिक गणितीपद्धतीचा वापर करायला हवा की, प्राचीन सूर्यसिद्धांतानुसार चालायला हवे हाही मुद्दा आहेच. या गोंधळात सिंहस्थाचा मुहूर्तच टळणार असेल तर नेमके काय साध्य केले जाणार आहे हाही मुद्दा आहे.

अवकाशात भ्रमण करणारे ग्रहतारे व त्यांची विशिष्ट युती याचा ज्योतिषशास्त्रीयदृष्टया कुंभमेळयाशी संबंध असल्याचे काही पंचांगकर्त्यांच्या म्हणणे आहे. वेदांमध्ये ‘सूर्याला’ आत्मारुपी अथवा जीवनदायी मानले जाते ‘चंद्राला’ मनाचा राजा मानले आहे. ‘गुरु/बृहस्पती’ ग्रहाला देवांचा गुरु मानले जाते. ‘गुरु’ ग्रहाला बारा राशींमध्ये भ्रमण करण्यासाठी १२ वर्ष लागतात आणि कुंभमेळा देखील गुरु ग्रहाच्या विविध राशींमधील प्रवेशानुसार चार ठिकाणी दर १२ वर्षांनी संपन्न होतो. यावेळी गुरुचा सिंहराशीत प्रवेश होतो व सूर्य आणि चंद्र कर्कराशीत प्रवेश करतात त्यावेळेस नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी तिरी सिंहस्थ कुंभमेळा होतो. म्हणजेच गुरू सिंह राशीत स्थानापन्न झाला की, नाशिकमध्ये सिंहस्थ सुरू होतो. एका राशीत एक वर्ष या नियमानुसार गुरू दर बारा वर्षांनी सिंह राशीत येतो. म्हणून नाशिकमध्ये त्यास सिंहस्थ असे म्हणतात. गुरूचे राशिभ्रमण असे सतत सुरू असते. पण या ग्रहांची गती मात्र बदलती असल्याने गुरू संपूर्ण वर्षभर सिंह राशीत राहतोच असे नाही. तो पुढच्या किंवा मागच्या राशीतही वास्तव्यास जातो आणि पुन्हा सिंह राशीत येतो म्हणजे तीन महिने सिंह राशीतून पुन्हा कर्केत जाऊन पुन्हा सिंहराशीत येतो तर कधी कन्येत जातो. जेव्हा गुरू सिंहेचा नसतो तेव्हा सिंहस्थ पर्व नसते, तेव्हा सिंहस्थ विधी, पर्वकाल बंद असतो, गुरू सिंहेला झाला की विधी सुरू होतो असे दोनदा किंवा तीनदाही होऊ शकते. त्यास `द्विखंडी’(दोखंडी) किंवा `त्रिखंडी’ सिंहस्थ असे म्हणतात. म्हणजेच वर्षातून तीनदा ठराविक काळासाठीच गुरू सिंहेचा असतो म्हणून तीनदा तुकड्या तुकड्यात सिंहस्थ येतो. नाशिकमध्ये १९६८ साली त्रिखंड्या सिंहस्थ झाला होता.

अनादी काळापासून भारतात धर्मशास्त्रसंमत प्राचीन सूर्यसिद्धांतीय गणितानुसारच पंचांगांची निर्मिती होत आहे. मात्र दरम्यानच्या काळात पाश्चात्य गणित पद्धती स्वीकारली गेली. मात्र धार्मिक कार्यांसाठी ती किती योग्य आहे याचा विचार मात्र झालेला नाही. कारण सिंहस्थाचे विधी हे सूर्यसिद्धांतानुसारच व्हावेत असाही आग्रह दरम्यानच्या काळात धरला गेला. कारण प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र हे त्रिस्कंधात्मक मानले गेले आहे. सिद्धांत व होरा हे ३ स्कंध आहेत. त्रिस्कंध ज्योतिषशास्त्रामधील सर्व सिद्धांतांमध्ये सूर्यसिद्धांताचा वापर दिसतो. सूर्यसिद्धांताचे गणित हे जास्त सूक्ष्म मानले गेले आहे. यामुळे अयोग्य वेळी कर्म झाल्याने कर्माचे फळ मिळत नाही, असे म्हणतात. याच कारणास्तव आद्यशंकराचार्य, मध्वाचार्य, थोर दत्तावतारी श्रीवासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी तसेच शृंगेरी शंकराचार्यांनीही कालनिर्णयासाठी प्राचीन गणितावर आधारित पंचांगाचाच पुरस्कार केला आहे. अशा वादातून १९४३ मध्ये नाशिकमध्येही सूर्यसिद्धांतानुसार सिंहस्थ करण्याचा निर्णय राधाकृष्ण शुक्ल, श्रीधर वारे, दामोदर पाराशरे, रघुनाथ फणशे, गोविंद आठवले, मोरेश्वर गर्गे, बालाजी गर्गे, भास्कर घोलप जोशी, लक्ष्मीकांत दीक्षित, वामन दाते या ज्योतिषांनी घेतला होता. मात्र यंदा होत असलेला सिंहस्थासाठी आधुनिक पाश्चात्य गणितावर आधारित पंचांगनुसार गुरूचा सिंहराशी प्रवेश ग्राह्य धरला गेला आहे. त्यानुसार सिंहस्थाला १४ जुलै २0१५ ला रामकुंडावर सकाळी ६.१६ मिनिटांनी प्रारंभ होत आहे. मात्र सूर्यसिद्धांतानुसार गुरूचा सिंहराशीप्रवेश १० जुलै २०१५ या दिवशी रात्री १०.५३ वाजता होत आहे. तर १७ डिसेंबर २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत गुरू कन्या राशीत स्थित असल्यामुळे या कालावधीत सिंहस्थात कोणतेही धार्मिक कार्य करून त्याचा उपयोग होत नसतो. १ फेब्रुवारी २०१६ मध्ये पुन्हा वक्रगतीने गुरूचा सिंहराशी प्रवेश होत असल्याने हा सिंहस्थ द्विखंडात्मक आला आहे. वक्री गुरू असताना गोदावरी स्नानाचे फळ आठपट मिळते असेही स्कंदपुराणात सिंहस्थ माहात्म्यात सांगते. तर सध्याच्या सिंहस्थ तारखा या आधुनिक गणित पद्धतीने असल्याने सिंहस्थाचा प्रारंभ १४ जुलैला होतो व समारोप ११ ऑगस्ट २0१६ ला होते. यात कोठेही खंड नाही. १९४३ मध्ये झालेला निर्णय पुढे पुन्हा का बदलण्यात आला हे शोधणेही गरजेचे असल्याचे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी म्हटले आहे. तर यंदाचा सिंहस्थ द्विखंडी असेल तर ज्या काळात सिंहस्थ नसतो त्या काळात विधी करणाऱ्यांच्या हाती काय लागेल, असाही प्रश्न त्यांनी केला आहे.

१४ जुलै २०१५ ही सिंहस्थाचा प्रारंभ सूर्यसिद्धांतानुसार नसेल तर आधुनिक गणित पद्धतीचा वापर का केला जात आहे. समजा पारंपारिक पद्धतीचाच वापर केला तर फरक काय पडणार आहे. किमान सिद्धांतानुसार विधी होत आहेत याचे समाधान व श्रद्धा तरी कायम राहिल असेही अनेकांना वाटते. तर दुसरीकडे जगभर सध्या आधुनिक गणित पद्धतीचा वापर होत असल्याने तो तसाच केला जात असावा. पण यामुळे सूर्यसिद्धांताचे महत्त्व व परंपरेच्या मुद्द्यांवर प्रश्न निर्माण होतो आहे. नाशिकमधील असंख्य पुरोहित अजूनही सूर्यसिद्धांतानुसारच विधी करतात. एकीकडे विधीसाठी सूर्यसिद्धांताचा आधार घेतला जातो तर दुसरीकडे सिंहस्थाच्या तारखा ठरविताना याचा विचार केला जात नाही.

अर्थात, सर्वसामान्यांना यातले काही कळत नाही अन् त्यांना मुहूर्ताचे काही घेणेदेणे नाही, असे समजून जे चालले आहे ते स्वीकारण्यात अर्थ नसल्याचे मत अनेक पंचागकर्ते करतात. सिंहस्थ आहे म्हणून रामभूमीत पाय ठेवायला मिळेल अन् गोदावरीत आपले पाप धुतले जातील एवढीच भावना भाविकांसाठी असते. पण, मुहूर्त पहायचा अन् मुहूर्तावर विधी करायचे नसतील तर प्राचीन सिद्धांतांना अडगळीत टाकण्याचा हा प्रकार ठरेल का? की, ठोसपणे धर्मशास्त्रावर व प्राचीन सिद्धांतावर बोलण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोणीही येईल अन् म्हणेल ‘धर्मपीठ म्हणून मान्यता मिळालेल्या नाशिकचे पंचाग धार्मिक कृत्यास पूर्णपणे निरूपयोगी आहे.’ यंदाचा सिंहस्थ कोणत्या पद्धतीने साजरा करायचा हे महत्त्वाचे नाही. याविषयावर आता अनेक वाद रंगतील. यातून राजकीय, सामाजिक व धार्मिक ह‌ितही साधले जाईल. पण खरा मुद्दा मागे राहू नये तो म्हणजे, एकाच धर्मातील दोन मतप्रवाह आपली प्राचीन धार्मिक परंपरा टिकविण्यासाठी एकाच हेतूने शाहीस्नान करतील का ? हेही पहायला मिळेलच.

लेखक : रमेश पडवळ

इमेल : rameshpadwal@gmail.com

संपर्क : 8380098107

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate