অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंहस्थ-गोदावरी माहात्म्य अन् साधू

गोदावरी

गोदावरी सर्व नद्यांमध्ये ही प्राचीन व श्रेष्ठ असून, तिच्या केवळ स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो, असे म्हटले जाते. प्रभू रामचंद्रांनी पंचवटीच्या वास्तव्यात तिच्या तीरावर पितृश्राद्ध घातले. सिंहस्थ पर्वणीत स्नान हे विशेष पुण्यदायक असल्याचे ब्रह्मांड पुराणात म्हटले आहे. सिंहस्थ काळात साधू महंत गोदावरीत स्नान करीत असल्याने त्यांनी वर्षोंवर्ष केलेल्या तपाची ऊर्जा या पाण्यात उतरते अन् म्हणूनच याकाळात गोदावरीत स्नान केल्याने सकारात्मक व आध्यात्म‌िक ऊर्जा आपल्याला मिळते, असे म्हटले जाते. गोदेचा जन्म आणि सिंहस्थाचे अजोड नाते असल्यानेही गोदावरी माहात्म्य अन् साधू ही संकल्पनेचा मिलाफ झाला आहे.

सिंहस्थ काळात गोदावरीतच स्नान का करावे?

नाशिककरांच्या तर घरातच गोदावरीचे पाणी येत असल्याने त्यासाठी रामकुंडावर अथवा कुशावर्तावर जाण्याची गरज का? असा प्रश्न अनेकदा मनात निर्माण होतो. पण, हेच या सिंहस्थाचे शास्त्र आहे. सिंहस्थात गुरू, रवि आणि चंद्र एकाच राशीत असतात. या तिन्ही ग्रहांवरून प्रक्षेपित होणारी ऊर्जा सगळीकडे पोचत असली, तरी काही विशिष्टस्थानी ती अधिक प्रमाणात मिळते, असे म्हटले जाते. ऋषीमुनींनी या शास्त्राचा अभ्यास करून अशी ऊर्जाकेंद्रे तयार केली. या ऊर्जेची मूळस्थाने कपिलधारा व चक्रतीर्थ ही आहेत. मात्र, पेशव्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपराच बदलल्याने भाविक आता त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर अन् नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी जातात. पण, ऋषीमुनींनी अभ्यासातून ही ऊर्जाकेंद्र निर्माण केली अन् पाण्याच्या साहाय्याने ही ऊर्जा आपल्यात जाते हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक पूजाअर्चा करताना पाण्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्याला आपण जलपूजनही म्हणतो. पाण्याच्या आजूबाजूला ज्या भावना व हालचाली असतात तसे पाण्यातील स्पटिकांचे स्वरूप होते. त्यामुळे सिंहस्थ काळात स्नान करण्याने अंगात उत्साहन संचारतो असे म्हटले जाते. पाण्यावर आतापर्यंत झालेल्या संशोधनातूनही पाण्यालाही भावना असतात हे सिद्धही झाले आहे.

सिंहस्थकाळात गोदावरीतील अद्भुत चैतन्याचा परिणाम माणसाच्या मनावर, शरीरावर होतो. यातून मनुष्य प्रगल्भ होतो, असे म्हटले गेले आहे. गुरू ऊर्जा हा सिंहस्थाचा एक घटक असला तरी सिंहस्थाचा मूळ उद्देश गुरूबरोबरच सूर्याशीही निगडित आहे. सूर्य सृष्टीचा जीवनदाता असल्याने त्याच्या शक्तीवरच अन् प्रभावांवरच कुंभमेळ्याचे विज्ञान अधोरेखित झाले आहे. हे विज्ञान पूर्वी धर्मशास्त्राच्या माध्यमातून सांगितले जात असे. म्हणूनच सिंहस्थाला ऊर्जेचे स्त्रोत म्हटले गेले आहे.
`गंगा गोदावरी महाभागे, महापापविनाशिनी’ म्हणजे सर्व पापांचा नाश करणारी गोदावरी मोक्षाचं सुलभ साधन मानलं गेलं आहे. पापसागरात डुंबलेल्यांचा उद्धार करण्यासाठीच भाविक, साधू लाखोंच्या संख्येने उद्धारासाठी सिंहस्थ पर्वणीकाळात गोदातिरावर येतात. म्हणूनच असेही म्हटले जाते की, भागीरथीत साठ हजार वर्षे स्नान करून जेवढे पुण्य मिळत नाही, तेवढे पुण्य सिंहस्थात गंगास्नानाने मिळते. शरीरशुद्धी, मनशुद्धी आणि आत्मशुद्धी हा गंगास्नानाचा खरा उद्देश असला तरी गोदामाहात्म्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे गोदेचे प्रदूषण वाढतच आहे. यामुळे ती ऊर्जा मानसिक स्वरूपात यंदा मिळणार असली तरी तिचे शाश्वत स्वरूप काय असेल याबाबत चिंता वाटते. गोदावरीचे माहात्म्य लक्षात घेऊन तरी गोदास्वच्छतेसाठी आपण प्रत्येकाने आपापल्यापरिने झटले पाहिजे हे नक्की !

साधूंच्या विचारमंथनाचे केंद्र

कुंभमेळ्यात साधू नेमके काय करतात अन् त्यांची कुंभमेळ्यात सहभागी होण्यामागची भूमिका काय असते, कोणत्या उद्देशाने जगभरातील साधू गोदाकाठावर जमतात, अशी अनेक ही कोडी पडतात. साधुंनी कुंभमेळा का सुरू केला ही संकल्पनाही गंमतीशीर आहे. या संकल्पना समजून घेतल्यावर साधूंबद्दल मतपरिवर्तन व्हायलाही मदत होते. असे म्हटले जाते की, इ.स. ५ व्या शतकात भारत प्रदेशावर परकीय आक्रमणे वाढली होती. ही आक्रमणे थोपविण्यासाठी नेहमी धार्मीक कार्यात मग्न असलेल्या साधुंना हातात शस्त्र घ्यावी लागली होती. याकाळात धर्म वाचविण्यासाठी देशभरातील साधू एकत्र आले अन् आखाडे निर्माण झाले. आखाड्यांनी धर्माच्या संरक्षणासाठी जबाबदारी वाटून घेतली. त्याकाळी काहींनी हातात शस्त्र घेऊन सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली तर काहींनी धर्माच्या मार्गावर कसे चालायचे याचे तत्त्वज्ञान घराघरापर्यंत पोचविण्याचा विडा उचलला. दरचार वर्षांनी कुंभमेळ्याच्या निमित्ताने आखाडे विचारमंथनासाठी एकत्र येऊ लागली. यासाठी भारताच्या चार दिशांना त्यांनी चार मठ स्थापन केले. ज्योर्तीमठ, श्रंगारमठ, गोवर्धनमठ, सरधमठ अशी या मठांची नावे आहेत. साधूंसाठीही त्यांनी दशनामी नियम तयार केले आणि त्यातून साधुंच्या दहा विभागांची निर्मिती झाली. सरस्वती, पुरी, बना, त्रिथा, गिरी, पार्वता, भारती, अरण्य, आश्रमवसागर असे हे साधूंचे दहा विभाग आहेत. यातून कुंभमेळ्यांचे स्वरूप अधिक व्यापक होत गेले. प्रत्येक आखाड्यात तत्त्वज्ञान, संख्याशास्त्रज्ञ, अध्यात्म, धर्म अशा शाखांचे गाढे अभ्यासक पूर्वी असायचे. संस्कृती, संस्कार, भक्ती, प्रार्थना, जगण्याच्या पद्धती अन् सेवावृतावर कुंभमेळ्यात चर्चा, विचारविनिमय व अभ्यास करून धर्मकारण आणि समाजकारणावर धोरण ठरविले जात असे. त्याकाळी एक विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले हे साधू आद्यक्रांतीकारकच होते. मात्र, हे स्वरूप काही प्रकरणात उद्देशाअभावी हर‌वल्यासारखे वाटते. अनेक आखाडे शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कामांच्या माध्यमातून समाजासाठी झटण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सिंहस्थातही गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न, धार्मिक स्थळांची स्वच्छता व प्राचीन मंदिरांना वाचविण्यासाठी प्रयत्न होण्याच्यादृष्टीने व्यापक चर्चा अपेक्षित आहे. तरच सिंहस्थ कुंभमेळा मानवाच्या उत्कांतीचा नवा पैलू ठरेल.

लेखक : रमेश पडवळ

इमेल :rameshpadwal@gmail.com

संपर्क: 8380098107

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate