অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंहस्थ-शाहीस्नानाची अनोखी परंपरा

सिंहस्थ-शाहीस्नानाची अनोखी परंपरा

सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानाला महत्त्व आहे. जगभरातून या ‌शाहीस्नानाच्या तिथींना भाविक शहरात येतात. या त‌िथी फक्त साधूमहंतांसाठी अथवा आखाड्यांसाठी नसतात. तर भाविकांना एका अनोख्या संगमाच्या क्षणाला गोदामाईत स्नान करून पुण्य पदरात पाडून घेण्याचा हा अनोखा सोहळा असतो. हा सोहळा एका विशिष्ट पद्धतीने चालविण्याची परंपरा आहे. शाहीस्नानाच्या याच अनोख्या परंपरेविषयी...

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान साधुंच्या आखाड्यांकडून पर्व आणि तिथीविशेषला केल्या जाणाऱ्या स्नानाला शाहीस्नान म्हटले जाते. शाही हा शब्द ऊर्दू आहे. हा शब्द नेमका कोठून आला याबाबत अधिक माहिती मिळत नाही. मात्र, मुस्लिम सत्तेतही कुंभमेळा आपले महत्त्व टिकवून होता. याकाळात कुंभमेळ्याला आलेल्या भव्यतेतून हा शब्द आला असावा असे म्हणता येईल. साधूसंत राजेशाही पद्धतीने घोडे, उंट, हत्ती व सजविलेल्या रथातून स्नानासाठी कुंभमेळ्यात येत असल्याने त्याला शाहीस्नान म्हटले जाऊ लागले असावे. शाहीस्नान हा सोहळा अनोखाच नाही तर दुर्मीळही असतो. कारण हा क्षण नाशिककरांना बारावर्षातून एकदाच अनुभवता येतो. म्हणून या सोहळ्याची परंपरा अनुभवनं हा एक उत्सव ठरतो. याकाळात गोदापात्र अन् अख्ख शहर साधूंनी गजबजलेलं असतं. एवढ्या मोठ्या गर्दीला कोणीही सूचना देणारे अथवा निमंत्रण देणारं नसतं तरीही प्रत्येकजण आपले काम नियोजनानुसार करीत असतो. शहरही साधूसंतांच्या स्वागताला अन् हा सोहळा अनुभवायला या गर्दीत सहभागी झालेला असतो. शाहीस्नानाचा क्षण अनुभवताना शाहीमार्गावर जयघोष, कसरती, शस्त्रअस्त्राच्या कवायती अन् अनोख्या मिरवणुका पहायला मिळतात. पण हा सोहळा नेमका कसा पार पडतो... कोणता आखाडा पहिले स्नान करतो हे पाहणेही मजेशीर असते.

नाशिकमधील आखाडे हे वैष्णवपंथीय आहेत. यात दिंगबर आखाडा, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाड्यांचा समावेश असतो. या आखाड्यांचे १८ उपआखाडे आहेत व या सर्वांचे ६५० खालसे आहेत. हे सर्व आखाडे चार संप्रदायाचे आहेत. या चार संप्रदायांचा मिळून एक श्री चतु: संप्रदाय आखाडाही आहे. प्रत्येक आखाड्याचे सारथ्य आचार्य व महंत करत असतात. तर यासर्वांचे सारथ्य आखाडा परिषदेचे अध्यक्ष करतात. १४ जुलै २०१५ ला रामकुंडावर सकाळी ६.१६ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर १९ ऑगस्ट २०१५ ला साधुग्राम येथे ध्वजारोहण होईल. त्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता असेल ती श्रावण कृष्ण पंचमीला म्हणजेच २९ ऑगस्ट २०१५ ला होणाऱ्या प्रथम शाहीस्नानची. त्यानंतर श्रावण अमावस्येला म्हणजे १३ सप्टेंबर २०१५ रोजी द्वितीय

शाहीस्नान होईल व भाद्रपद शुक्ल पंचमीला म्हणजे १८ सप्टेंबर २0१५ ला तृतीय शाहीस्नान होईल. अन् श्रावण शुद्ध अष्टमी ११ ऑगस्ट २०१६ ला ध्वजावतरण होऊन सिंहस्थ पर्व संपेल. यादरम्यान होणाऱ्या तिन्ही शाहीस्नानाचे क्रम परंपरेनुसार ठरलेले आहेत. पहिल्या शाहीस्नानाला निर्वाणी आखाडा व त्याचे उपआखाडे व खालसे पहिल्यांदा स्नान करतात. त्यांच्यामागे दिंगबर आखाडे व त्यांचे खालसे असतात. तर सर्वात शेवटी निर्मोही आखाडा व त्यांचे खालसे असतात. खाकी आखाडा निर्वाणी अंतर्गत येत असल्याने त्यांना पहिल्या शाहीस्नानाला पहिला मान दिला जातो. यावेळी प्रत्येक आखाडा आपल्या इष्टदेवतेला स्नान व पूजाअर्चा करून झाली की आपल्या साधूंना शाहीस्नानासाठी पाठवितो. प्रत्येक आखाडा स्नान झाला की मागील आखाड्याला स्नानाची संधी देतो.

दुसऱ्या शाहीस्नानात पहिल्या शाहीस्नानादरम्यान सर्वात शेवटी असलेल्या निर्मोही आखाडा पहिले स्नान करतो. त्यानंतर दिंगबर व त्यानंतर सर्वात शेवट निर्वाणी आखाडा स्नान करतो. दुसऱ्या शाहीस्नानात निर्वाणी शेवटी स्नान करतो तर निर्मोही पहिल्यांदा. तर तिसऱ्या शाही स्नानात पुन्हा निर्वाणी पहिल्यांदा दिंगबर कायम मध्यभागी व निर्मोही पुन्हा सर्वात शेवटी अशा पद्धतीने सिंहस्थाच्या शाही मिरवणुकीत सहभागी होतात व स्नान करतात. पहिल्या व दुसऱ्या शाहीस्नानाच्या वेळी आखाडे शाहीस्नान केल्यानंतर लगेच परतीच्या मार्गावर निघतात. मात्र तिसऱ्या शाहीस्नानाच्यावेळी आखाड्यांचे आचार्य व महंत मात्र तेथेच थांबतात. म्हणजेच निर्वाणी आखाड्याचे आचार्य महंत शाहीस्नानाला जातात व तेथेच थांबतात. रामकुंडावर गर्दी होऊ नये म्हणून आखाड्यातील साधू परतीच्या मार्गावर निघतात. असेच त्यानंतर शाही स्नानाला आलेला दिंगबर व निर्मोही आखाडा करतो. असे म्हटले जाते की, तिन्ही आखाडे प्रथम तिसऱ्या आखाड्यात एकत्र येतात. त्यांचा संगम रामकुंडावर होतो. तिन्ही आखाड्यांचे महंत एकमेकांना भेटल्यानंतर पहिल्यांदा शेवटी आलेल्या निर्मोहीचे महंत परतीच्या मार्गावर निघतात. त्यानंतर दिंगबर व त्यानंतर निर्वाणीचे महंत रामकुंडावरून परतीच्या मार्गाच्या मिरवणुकीत सहभागी होतात. ही परंपरा गेली अडीचशे वर्षांपासून सुरू आहे. त्यापूर्वी शाहीस्नान ही परंपरा नव्हती. स्नान व्हायचे मात्र त्याला शाहीस्नान आखाड्यांच्या वर्चस्व अन् महत्त्वावरून म्हटले जाऊ लागले. आपल्या आखाड्याचा दबदबा दाखविण्यासाठी आखाडे आपली श्रीमंती मिरवणुकांमधून दाखवू लागले व मानाचा संघर्षातून ही परंपरा निर्माण झाल्याचेही म्हटले जाते.

हा सोहळा फक्त शाहीस्नानापुरता नसतो तर या तिन्ही आखाड्यांचे महंत व साधू एकत्रित येऊन विचारविनिमयही करतात. भविष्यातील आव्हाने, धर्मशास्त्रावर त्यांची चर्चा होते. सर्व महंत एकत्रि‌त भोजनाचा आस्वादही घेतात. अनेक वादविवादांवर या काळात निर्णय होतात. जे प्रश्न सुटत नाहीत त्यावर धर्मपीठावर निर्णय घेण्याबातचही चर्चा होते. अनेकदा आखाडा परिषद व इतर महंतांच्या नेमणुकांबाबतही चर्चा होते. सिंहस्थाचे तेरा महिने त्यांच्यातील संवाद एकमेकांना समृद्ध करतो. त्यांच्या संगमात भाविकही पुण्य घेतात, असे म्हटले जाते.

लेखक : रमेश पडवळ

इमेल : rameshpadwal@gmail.com

संपर्क : 8380098107

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate