অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाज

समाज

समाज : समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. या उक्तीनुसार दैनंदिन व्यवहारात समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदांतील स्त्री-पुरूषांचा जनसमुदाय या अर्थी वापरला जातो. अर्थात तो अगदी सैलपणे, ढोबळ व प्रसंगानुरूप बदलणाऱ्या संकुचित व मर्यादित अर्थाने वापरला  जातो. उदा., ‘भारतीय समाज’, ‘आर्य समाज’, ‘हिंदू समाज’ इत्यादी. प्रत्येक  ठिकाणी समाज या शब्दापूर्वी उपसर्ग लावलेल्या विशेषनामानुसार या शब्दाचा अर्थ अभिप्रेत असतो. तो समान असत नाही. देशवाचक, समूह-वाचक, धर्मवाचक वगैरे भिन्न अर्थाने हा शब्द व्यावहारिक भाषेत वापरला जातो; पण या सर्वांहून निराळा असा समाजशास्त्रीय अर्थ या संकल्पनेमागे आहे. त्या दृष्टीने समाज हा एक सहनशील ( सातत्यशील ) व सहकारी   सामाजिक समूह असून, त्यातील सभासदांनी एकमेकांतील आंतर-कियेव्दारे आप्तसंबंधविषयक संघटित आकृतिबंध ( संरचना ) विकसित  केला आहे. एक सामाजिक व्यवस्था या अर्थाने समाज ही संकल्पना समाजशास्त्रात वापरली जाते. समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया कर-णाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरकियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्र्चित स्वरूपाचे सामाजिक  संबंध  निर्माण  झालेले  असतात.

केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे. व्यक्तीहून निराळे असे स्वतंत्र अस्तित्व समाजाला असते. व्यक्ति-व्यक्तींत, व्यक्ति-समूहांत आणि समूह-समूहांत स्थिर स्वरूपी सामाजिक संबंध निर्माण होऊन त्याची एक व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतरच त्याला समाज म्हटले जाते. समाजाला स्वत:ची अशी संरचना असते. त्याला सातत्य असते. भौतिक वस्तूंमधील संबंधांहून सामाजिक संबंध अगदी निराळे असतात. भौतिक वस्तू एकमेकांजवळ असल्या, तरी त्यांना परस्परांची जाणीव नसते; पण दोन मानवी व्यक्ती एकत्र आल्या की, त्या एकमेकांची दखल घेतात. एकमेकांची जाणीव त्यांना असते. परस्परांच्या प्रेरणा, भावना, हेतू , उद्दिष्टे, विचारप्रणाली, मूल्ये इ. आंतरिक घटकांचा प्रभाव परस्परांच्या वर्तनावर पडतो. मानवी समाजाच्या कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी सर्वच क्षेत्रांत सामाजिक संबंध असतात. हे संबंध सहकार्यप्रधान, स्पर्धाशील, संघर्षयुक्त अशा प्रकारचे असू शकतात. ते मित्रत्वपूर्ण असतील किंवा शत्रूत्वपूर्ण देखील असू शकतील. समाज अशा विविध स्वरूपाच्या सामाजिक संबंधांनी  बनलेला असतो.

समाजातील या सामाजिक संबंधांचे वैशिष्टय असे आहे की, ते सुटे-सुटे किंवा पृथक स्वरूपाचे नसतात. ते एकमेकांत गुंतलेले असतात. वस्त्राच्या विणकामात व्यवस्था असते, तशीच परस्परसंबंधांच्या धाग्यांची व्यवस्था समाजात असते, म्हणूनच मॅकायव्हर आणि पेज हे समाजाचे वर्णन, ‘ परस्परसंबंधांचे जाळे ’ असे करतात. समाज सापेक्षत: स्थिर अशा परस्परसंबंधित व परस्परावलंबी सामाजिक घटकांनी मिळून बनलेला असल्यामुळेच ती एक सामाजिक व्यवस्था ठरते. विविध भूमिका, समूह, सामाजिक संकेत, रूढी, परंपरा इ. सांस्कृतिक मूल्ये ही समाजाच्या संरचनेची मूलघटक होत. हे घटक सापेक्षत: स्थिर असतात, पण काळ व परिस्थितीनुसार  त्यांच्यात  बदल  होऊ शकतो.

समाजातील व्यक्तींच्या आंतरकिया या समानश्रद्धा, परंपरा, चालीरीती, रूढी, मूल्ये व वर्तणूक यांवर अवलंबून असतात. त्यांच्या आंतरकियांवर प्रभाव पडणाऱ्या समान ( वर्तन ) पद्धतींनी त्यांच्या समाजाची संस्कृती बनलेली असते. थोडक्यात समाजातील व्यक्तींच्या श्रद्धा, प्रथा, परंपरा, रूढी, मूल्ये व वर्तनप्रकार हे जवळजवळ सारखे असतात. त्यामुळे या समाजास एक वेगळी संस्कृती लाभलेली असते. प्रत्येक समाजाची स्वत:ची अशीही वैशिष्टपूर्ण संस्कृती असते. संस्कृती म्हणजे समग समाजाची एक जीवन-पद्धती किंवा जीवनमार्ग होय. त्या त्या संस्कृतीतील मूल्यव्यवस्थेमुळे प्रत्येक समाजाच्या संस्कृतीला वेगळेपण लाभते. या संस्कृतीमुळेच समाज टिकून राहतो. संस्कृतीशिवाय समाजाची कल्पना करता येत नाही. म्हणूनच समाज आणि संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत.

समाज हा एक व्यापक समूह असतो, म्हणजे तो दुसऱ्या कोणत्याही समूहाचा उपसमूह नसतो. हा विशाल समूह त्या अंतर्गत असलेल्या लहान-मोठय आकाराच्या समूहांनी व उपसमूहांनी मिळून बनलेला असतो. अनेक लहान-मोठय समुदायांचा त्यात अंतर्भाव होतो. प्रत्येक समाज सापेक्षत:  स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर असतो, म्हणजे समाजातील लोकांच्या उदर-निर्वाहविषयक गरजा भागविण्याची व्यवस्था त्या त्या समाजाने केलेली असते. कुटुंब, अर्थ, धर्म, शिक्षण, राज्य या विविध सामाजिक संस्था म्हणजे  समाजाच्या  विविध  गरजा  भागविण्याच्या  यंत्रणाच  होत.

आपले अस्तित्व पिढयन्पिढय टिकवून ठेवण्याची क्षमता समाजात असते. याचाच अर्थ समाज स्वयंसातत्यशील असतो. समाजातील व्यक्ती जन्माला येतात व मरण पावतात; पण समाजव्यवस्था मात्र अखंडपणे टिकून राहते. प्रत्येक जुनी पिढी त्या समाजाची जीवन जगण्याची विशिष्ट रीत जन्माला येणाऱ्या नव्या पिढीला ⇨सामाजीकरणाच्या व शिक्षणाच्या माध्यमातून शिकवीत असते. प्रत्येक व्यक्तीची तपशीलवार माहिती करून घेतली, तर समाजाविषयीची माहिती होत नाही. प्रत्येक समाजातील लोकांत एकतेची भावना असते. आपण एक आहोत, तसेच इतर समाजातील लोकां-हून आपण निराळे आहोत, असे प्रत्येक समाजातील लोकांना वाटत असते. समाजाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्याचे संघटित स्वरूप कायम राहण्यासाठी अशी एकतेची भावना प्रबळ असणे आवश्यक असते.

सदयकालीन जागतिकीकरणाच्या प्रकियेमुळे समाजाच्या सीमारेषा, अस्मिता व अस्तित्वाला अनेक प्रकारचे धक्के बसत आहेत. वैश्र्विकी-करणाच्या या रेट्यामुळे, बलाढय राष्ट्रांचा, व्यापारी व भांडवलशाहीचा अंमल वाढून स्थानिक उत्पादनक्षमता, श्रमशक्ती व संस्कृतीमध्ये मूलगामी परिवर्तन घडून येत आहे. दळणवळणाची साधने व प्रसार माध्यमांमुळे सर्व जग एका बिंदूपाशी येऊन ठेपले आहे. स्थानिक भाषा, संस्कृती व लोकजीवनाच्या निकषानुसार आता समाजाची व्याख्या करणे कठीण झाले आहे. रणजीत गुहा यांसारख्या समाजशास्त्रज्ञांनी ‘सबाल्टर्न स्टडीज’ कोटीकमाचा आराखडा मांडून वंचित, सीमान्त व परिघावरील आदिवासी, गरीब शेतकरी व मजूर यांच्या समाजाचा वेगळा इतिहास असावा, असा विचार मांडला आहे. एकूणच एकविसाव्या शतकात समाज ही संकल्पना प्रवाही राहणार असून तिची सर्वसमावेशक  व्याख्या  करणे  शक्य  होणार  नाही.

 

संदर्भ : 1. Dhanagare, D. N. Themes and Perspectives in Indian Sociology, New Delhi, 1993.

2. Guha, Ranjit, Subaltern Studies, Six Volumes, Delhi, 1989.

3. Singh, Yogendra, Indian Sociology, New Delhi, 1986.

४. बेहरे, सुमन, सामाजिक विचारवंत, नागपूर, २००२.

५. साळुंखे, सर्जेराव, समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, पुणे, २००३.

लेखक - अनुपमा केसकर / किरण केंद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate