Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:42:10.573779 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 06:42:10.579361 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:42:10.609473 GMT+0530

गुन्हाशोधविज्ञान

गुन्ह्याचा अभ्यास करून गुन्हेगाराचा थांगपत्ता लावण्याचे व गुन्हा शाबीत करण्यासाठी पुरावा मिळविण्याचे शास्त्र. समाजकंटकांना व गुन्हेगारांना शोधून त्यांना शासन करण्यासाठी तसेच त्यांच्यापासून निरपराध व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असते.

गुन्हाशोधविज्ञान

गुन्ह्याचा अभ्यास करून गुन्हेगाराचा थांगपत्ता लावण्याचे व गुन्हा शाबीत करण्यासाठी पुरावा मिळविण्याचे शास्त्र. समाजकंटकांना व गुन्हेगारांना शोधून त्यांना शासन करण्यासाठी तसेच त्यांच्यापासून निरपराध व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असते. अलीकडच्या काळात पोलिसांच्या संख्येत आणि त्यांच्या विविध शाखांत झपाट्याने वाढ झाली आहे. तरी पण त्यांना सर्व गुन्हेगार सापडत नाहीत व गुन्हे थांबविता येत नाहीत. पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता त्यांना सर्व आधुनिक शास्त्रीय माहितीची मदत दिली पाहिजे हे पटल्यामुळे सर्व प्रगत देशांत या पद्धतीचा विकास होऊन गुन्हा शोधण्याचे शास्त्र अस्तित्वात आले आहे. भारतातही गुन्ह्याचा तपास करताना आता विज्ञानाची मदत घेण्याची पद्धती रूढ झाली आहे.

खुनीच्या कपड्यावरील रक्ताचे डाग त्याच्या बळीच्या रक्ताने पडले आहेत की ते त्याच्याच किंवा दुसऱ्या कोणाच्या रक्ताचे आहेत ठरविणे, हे या विज्ञानाच्या कामगिरीचे एक उदाहरण म्हणून सांगता येईल. यामध्ये भौतिकी, रसायनशास्त्र, गणित, जीवविज्ञान, अणुकेंद्रीय भौतिकी वगैरे विज्ञानांचा उपयोग करतात. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गुन्हेगार व्यक्तीप्रमाणेच गुन्ह्याशी संबंध असणाऱ्या सर्व वस्तूंच्या पुराव्याकडे जरूर तितके लक्ष दिले, तर गुन्हेगार हुडकण्याचे काम सोपे होते. वस्तुनिष्ठ पुराव्याकरिता गुन्ह्याशी संबंध असलेला दस्तऐवज, सुरा, बंदुक, घरफोडीचे साहित्य, रक्ताने भरलेले कपडे हे जसे उपयोगी पडतात तसेच सुताचे धागे, केस किंवा सूक्ष्मजंतू यांचाही कधीकधी चांगला उपयोग होतो.

गुन्हेगाराने गुन्हा करताना आपण कोणास दिसू नये वा आपल्या हालचालीची चाहूल लागू नये म्हणून कितीही काळजी घेतली, तरी गुन्ह्याच्या जागेवरील सर्व लहानमोठ्या वस्तूंवर त्याच्या उपस्थितीचा व हालचालींचा ठसा उमटलेला असतो. मोठ्या वस्तू त्याचे चटकन लक्ष वेधून घेतात म्हणून गुन्हेगार त्यांचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कित्येक सूक्ष्म वस्तू जागेवरच किंवा गुन्हेगाराच्या अंगावर मूळ अवस्थेत सापडण्याचा संभव असतो व मग त्यांचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून चांगला उपयोग होतो. अशा सूक्ष्म वस्तूंच्या वैज्ञानिक परीक्षणाने, लेखी पुराव्यात कमी पडणारे अनेक दुवे सापडतात.

प्राथमिक तपासणी

तपास करणारे पोलिस अधिकारी गुन्ह्याच्या जागी गेल्यावर प्रथम गुन्ह्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींची निवेदने घेतात. त्यांचा खरेखोटेपणा पडताळून तपासणीची दिशा निश्चित करता येते. दुसऱ्या कोणत्याही माणसास त्या जागी येऊ देत नाहीत, त्यामुळे तेथील वस्तू गुन्हा घडलेल्या वेळच्या स्थितीत सापडू शकतात. पोलीस अधिकारी प्रथम सर्व वस्तूंचे स्थूलमानाने निरीक्षण करतात आणि शक्य असेल तेथे गुन्हा अन्वेषण (शोधून काढण्याच्या) विभागातील कुत्र्यांच्या पथकास गुन्ह्याच्या जागी बोलावितात. या पथकाचा अधिकारी आपल्या कुत्र्यास गुन्हेगाराने हाताळलेल्या सर्व वस्तू हुंगण्यास लावतो. कुत्रा त्या वस्तूंचा वास घेऊन वासाच्या अनुरोधाने गुन्हेगाराचा माग काढीत जातो. त्यानंतर पोलीस अधिकारी बोटाचे अगर हाताचे ठसे आढळल्यास त्यांना धक्का न लावता ठसे असलेल्या वस्तू जमा करतात व तज्ञास दाखवितात. नंतर गुन्ह्याच्या जागेवरील ज्या वस्तूवर हानिकारक परिणाम झालेले असतील अगर ज्यांच्या अवस्थेत काही फरक पडला असेल अशा सर्व वस्तू जमा करतात. गुन्हा घडत असताना कुणाला शारीरिक इजा झाली असेल तर रक्त, लघवी, रेत, मांस अशा वस्तूंनी डागाळलेल्या सर्व वस्तू ताब्यात घेतात. जमिनीवरील व भिंतीवरील भेगा, लाकडी व लोखंडी वस्तूंतील चिरा अशा ठिकाणी सुकलेले रक्त किंवा शारीरिक द्रव पदार्थ सापडण्याचा संभव असतो. गोठलेले रक्त सापडल्यास ते ताबडतोब प्रयोगशाळेत पाठवितात. डागाळलेल्या लहान वस्तू व मोठ्या वस्तूंवरून खरवडून काढलेले द्रव्यही परीक्षणासाठी पाठवितात. मृत वा जखमी व्यक्तीचे रक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने काढून घेऊन, ते गोठू नये किंवा बिघडू नये म्हणून त्यात संरक्षक पदार्थ मिसळून परीक्षेकरिता पाठवितात.

गुन्हा एखाद्या वाहनात घडला असेल, तर तेथील काचेचे तुकडे, बैठकीवरील आवरणे, तळावरील सूक्ष्म कण, रक्त, केस, वगैरे शारीरिक पदार्थ चिकटलेल्या वस्तू गुन्हा शोधण्याच्या कामी उपयोगी पडतात. गुन्हा घडलेली जागा घराबाहेर असेल, तर संबंधित वस्तू जमा करण्याची पद्धत साधारणतः वरीलप्रमाणेच असते. बाहेरील जागेत पायांच्या खुणा, वाहनांच्या धावांच्या खुणा वगैरे प्रकारची अधिक माहिती मिळू शकते. तसेच आजूबाजूच्या झुडपात रक्ताने भिजलेले कपडे, तुटलेले केस अशा वस्तूही सापडण्याचा संभव असतो. पोलीस अधिकारी अशा उपयुक्त वस्तू जमा करताना त्या सर्व तऱ्हांच्या वैज्ञानिक तपासणीसाठी पुरतील इतक्या प्रमाणात पाठवितात. परीक्षणीय पदार्थ दुसऱ्या वस्तूला चिकटलेला असेल तेव्हा तुलनेसाठी त्या दुसऱ्या वस्तूचा स्वतंत्र नमुनाही सोबत पाठवितात. ताब्यात घेतलेली प्रत्येक लहानसहान वस्तू स्वतंत्र वेष्टनात नीट बांधून सुरक्षित ठेवतात आणि वेष्टनावर अनुक्रमांक घालून तिची माहिती पुरवितात. गुन्ह्याच्या जागेवरून वस्तू उचलल्यापासून प्रयोगशाळेत जाऊन नंतर न्यायालयात दाखल होईपर्यंत ती अनधिकृत व्यक्तीच्या हातात जाणार नाही याबद्दल फार काळजी घ्यावी लागते. न्यायदानाच्या कामात उपयोगी पडणारे असे मोलाचे साहाय्य पोलीस अधिकारी व शास्त्रज्ञ यांच्या सहकार्याशिवाय मिळू शकत नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व उपयुक्त वस्तू गोळा करून सुरक्षितपणे प्रयोगशाळेत पाठविणे आणि वैज्ञानिकांनी त्यांचे परीक्षण करून उपयुक्त माहिती मिळविणे अत्यावश्यक असते.

वैद्यकीय तपासणी

जखमी झालेल्या किंवा मृत व्यक्तीपासून वस्तुनिष्ठ पुरावा मिळविण्याकरिता बहुधा वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागतेच. शरीरावर किंवा आतल्या भागाला इजा झालेली असेल, तर त्या सर्व दुखापतींचे निरीक्षण करून त्या कोणत्या शस्त्राने होण्याची शक्यता आहे व त्यामुळे मृत्यू येऊ शकेल किंवा नाही अशा तऱ्हेची बहुमोल माहिती मिळविता येते. जखमी व्यक्तीचे डोक्याचे किंवा गुह्येंद्रियाजवळील (जबरी संभोगाच्या गुन्ह्यात) केस व वर्गीकरणासाठी रक्ताचा पुरेसा नमुनाही वैद्यकीय अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांतर्फे प्रयोगशाळेत पाठवितात. केसांचा नमुना घेताना शक्य तितका त्वचेलगतचा भाग तपासणीसाठी मिळेल अशा रीतीने केस कापतात. याशिवाय जबरी संभोगाच्या गुन्ह्यात योनिभागातून कापसाच्या बोळ्याने शोषून घेतलेला द्रव पदार्थ व त्याचे काचेच्या पट्ट्यांवर अनेक नमुने घेणे फार उपयोगी पडते. विषप्रयोगाच्या गुन्ह्यात प्राण जाण्यापूर्वी पोटातून काढलेला पदार्थ व मरणोत्तर तपासणीच्या वेळी वेगळे काढलेले जठर, आतड्याचा भाग, यकृत, प्लीहा (पांथरी), मूत्रपिंड, मेंदू, मूत्राशयात साठलेले मूत्र व पुरेसे रक्त वगैरे शारीरिक भाग व द्रव प्रयोगशाळेत पाठविल्याशिवाय मृत्यूचे निश्चित कारण शोधून काढणे अशक्यप्राय असते. बंदुकीच्या गोळ्यांनी किंवा स्फोटक पदार्थांनी झालेल्या जखमांचीही वैद्यकीय तपासणी करतात.

इतर बाबी

शरीरात सापडलेली गोळी अगर तिचा भाग आणि गुन्ह्याच्या जागी सापडलेली गोळी अगर तिचा भाग या सर्वांचे तुलनात्मक परीक्षण करतात. नेहमी व्यक्तीचे डागाळलेले व कदाचित फाटलेले कपडे एकमेकांशी संपर्क होणार नाही अशा रीतीने काळजीपूर्वक बांधून प्रयोगशाळेत पाठवितात. कपडे ओलसर असल्यास चांगले वाळवून कोरडे करून कागदात गुंडाळून पाठवितात. आरोपीशी संबंधित असा सर्वांत अधिक उपयुक्त पुरावा म्हणजे त्याचे कपडे होत. दृश्य व सूक्ष्म स्वरूपातील पुरावा सापडण्याजोगे हे सर्वांत महत्त्वाचे साधन असल्याने त्याचे निरीक्षण काळजीपूर्वक करतात. आरोपीचे रक्त हेही एक उपयुक्त साधन असते. आरोपी गुन्हा करताना मादक पदार्थांच्या नशेत होता की नाही तसेच त्याच्या कपड्यावरील रक्ताचे डाग त्याच्याच रक्ताचे असू शकतील की नाही, हे ठरविण्याकरिता रक्ताच्या नमुन्याचा उपयोग होतो. आरोपीच्या अंगावर जखमा आढळल्यास त्यांचीही वैद्यकीय तपासणी करून घेतात, त्यामुळे गुन्ह्याच्या वेळी झटापट झाली असावी की नाही, याचा बोध होऊ शकतो. आवश्यकता वाटल्यास आरोपीच्या घराची झडती घेऊन शस्त्रे किंवा इतर संबंधित वस्तू ताब्यात घेणे फार उपयोगी पडते. आरोपीच्या प्राथमिक निवेदनातील किंवा कबुली जबाबातील विधानांचा खरेखोटेपणा पडताळून पाहण्यासाठी जो जो वस्तुनिष्ठ पुरावा थोड्या प्रमाणातही उपयुक्त वाटेल तो तो सर्व गोळा केल्यास बहुमोल मदत होऊ शकते.

प्रयोगशाळेतील परीक्षण

वैज्ञानिक परीक्षणाची भूमिका व मूलभूत स्वरूप प्रथम जाणून घेतल्याशिवाय प्रायोगिक तपशिलाचा अर्थ नीट समजणे कठीण असते. कोणत्याही गुन्ह्याच्या तपासणीचा खरा हेतू संशयित व्यक्तीचा आणि कधीकधी बळी पडलेल्या व्यक्तीचाही गुन्ह्याशी व त्या दोघांचा परस्परसंबंध प्रस्थापित करणे हा असतो. संशयित व्यक्ती हीच खरोखर गुन्हेगार आहे हे सिद्ध करणे हा केवळ विशेषतः वरवर दिसणारा भाग होय. शरीर व चेहरेपट्टी यांची वैशिष्ट्ये, बोटांचे ठसे यांच्याशिवाय व्यक्तीची ओळख पटण्याचे फारच थोडे मार्ग उपलब्ध आहेत. दात व त्यांची केलेली दुरुस्ती यांचा उपयोग करूनही व्यक्तींचे एकत्व सिद्ध करता येते. गुन्ह्याच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचा उपयोगही सर्वमान्य व रूढ आहे, पण त्यांच्याकडून मिळणारे आरोपी व्यक्तीचे वर्णन बहुधा अचूक आणि विसंबून राहण्याइतके पुरेसे व विश्वसनीय नसते. अलीकडचे गुन्हेगार आपल्या बोटांचे ठसे गुन्ह्याच्या जागी राहू न देण्यात दक्ष असल्याने ठशांच्या पद्धतीचा फारसा फायदा मिळू शकत नाही. म्हणूनच संशयित व्यक्तीचा गुन्ह्याच्या जागेशी किंवा जखमी वा मृत व्यक्तीशी विश्वसनीय संबंध प्रस्थापित करण्याच्या वर दिलेल्या रूढ पद्धतींतील उणिवा भरून काढण्यासाठी वस्तुनिष्ठ पुराव्याची मदत घ्यावी लागते.

वैज्ञानिक परीक्षणाचे मूलभूत स्वरूप दोन अगर अधिक वस्तूंचा सारखेपणा किंवा वेगळेपणा प्रायोगिक पद्धतीने सिद्ध करणे हे होय. कोणत्याही दोन वस्तूंत संपूर्ण साम्य नसते. म्हणूनच एकाच व्यक्तीचे निरनिराळ्या वेळी घेतलेले हस्ताक्षराचे नमुने सर्वार्थाने सारखे दिसत नाहीत, तरीही त्यांच्यातील अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा सारखेपणा दाखवून दिला, तर व्यावहारिक अर्थाने ते अक्षर एकाच व्यक्तीचे आहे असे सिद्ध करता येते. तेव्हा वस्तुनिष्ठ पुराव्याचे वैज्ञानिक परीक्षण व त्यापासून काढले जाणारे निष्कर्ष यांच्या संदर्भात सारखेपणा किंवा वेगळेपणा सिद्ध करणे या गोष्टीकडे व्यावहारिक दृष्टीने व प्रयोगाच्या मर्यादा लक्षात घेऊन पहावे लागते. रसायनशास्त्र, भौतिकी, जीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र या मूलभूत आणि उपयोजित (व्यावहारिक) विज्ञानशाखांतील अनुभवसिद्ध पद्धतींचा अवलंब करून वस्तुनिष्ठ पुराव्याचे परीक्षण आपापल्या क्षेत्रात तज्ञ असे शास्त्रज्ञ व न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत करतात. यांशिवाय वैद्यकशास्त्रातील तज्ञ व्यक्तींचीही जरूर पडेल तेव्हा वर उल्लेख केल्याप्रमाणे मदत घेतली जाते.

वैद्यकीय तज्ञ जिवंत अथवा मृत व्यक्तींची शारीरिक तपासणी करून अनेक महत्त्वाच्या मुद्यांबाबत आपला अभिप्राय देतात. मृत्यूची साधारण वेळ, जखमांचा प्रकार व त्या करण्यासाठी वापरली गेलेली संभाव्य शस्त्रे, हल्ला करण्याची पद्धत वगैरे गोष्टींचा खुलासा त्यांच्याकडून मिळू शकतो. मृत शरीर अगदी ओळखू न येण्याच्या अवस्थेत असले किंवा फक्त हाडांचा सांगाडाच उरलेला असले, तरी मृत व्यक्तीचे लिंग, वय, उंची वगैरे प्राथमिक शारीरिक माहिती ते पुरवितात. जबरी संभोग किंवा गर्भपात झालेला असणे शक्य आहे की नाही याविषयी ते साधार मत देतात. प्रयोगशाळेत आधी वस्तुनिष्ठ पुराव्याची प्राथमिक छाननी केली जाते. यावेळी स्थूल परीक्षण होऊन वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण असे पदार्थ किंवा डाग निराळे काढले जातात व ते सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली जाते.

रासायनिक विभागात साधारणतः रासायनिक विश्लेषणच केले जाते व जरूर पडल्यास इतर विभागांची मदत घेऊन अधिक परीक्षण केले जाते. प्रथम ज्यात रंगीत पदार्थ किंवा स्फटिक निर्माण होतात अशा थोड्या वेळात आटोपणाऱ्या पद्धतींचा उपयोग केला जातो. नंतर सविस्तर व सूक्ष्म विश्लेषणात्मक परीक्षण करण्यात येते. शुद्ध अथवा मिश्रधातू, रंग, मातीचे नमुने यांचे घनरूपात व द्रवरूपात निरनिराळ्या प्रयोगांच्या साहाय्याने विश्लेषण केले जाते. महत्त्वाच्या दस्तऐवजातील कागद व शाई यांच्या परीक्षणासाठी वर्णलेखीय [→ वर्णलेखन] व वर्णपटप्रकाशमितीय [→ वर्णपटविज्ञान; वैश्लेषिक रसायनशास्त्र] पद्धतींचा अवलंब मुख्यत्वेकरून केला जातो. विषप्रयोगाच्या गुन्ह्याशी संबंधित मरणोत्तर तपासणीच्या वेळी शरीरातून बाहेर काढलेले भाग, तसेच मृत्यूच्या आधी किंवा नंतर शरीरातून काढलेले द्रव पदार्थ यांच्यात अकार्बनी (अजैव) किंवा कार्बनी (जैव) विषारी पदार्थ आहेत किंवा नाहीत आणि असल्यास किती प्रमाणात आहेत हे याच विभागात ठरविले जाते. अशा तऱ्हेच्या परीक्षणासाठी सर्रास वापरात असलेल्या आणि रेन्श व स्टास-ओटो यांनी शोधून काढलेल्या पद्धतीने प्राथमिक परीक्षण केल्यावर कागदावर किंवा विशिष्ट शोषक पदार्थाच्या पातळ थरावर वर्णलेखीय प्रयोग केले जातात. आवश्यकता वाटल्यास वर्णपटप्रकाशमितीच्या पद्धतीचाही वापर केला जातो. स्फोटक पदार्थ किंवा स्फोटानंतर त्याचे उरलेले अवशेष यांचेही रासायनिक विश्लेषण याच विभागात केले जाते व त्यांचा स्फोटाशी असलेला कार्यकारणसंबंध दाखविला जातो.

जीवविज्ञान विभागात मानवी, प्राणिजन्य व वनस्पतिजन्य पुराव्याच्या परीक्षणासाठी जीववैज्ञानिक, जीवरसायनशास्त्रीय आणि रक्तरसशास्त्रीय (रक्तातील न गोठणाऱ्या व पेशींविरहित असणाऱ्या द्रव पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) पद्धतींचा उपयोग केला जातो. या विभागातील कामाचा मुख्य भाग म्हणजे परीक्षणासाठी पाठविलेल्या वस्तूंमध्ये किंवा त्यांच्यावरील डागात रक्त, रेत, लाळ, मूत्र वगैरेंचे अस्तित्व पडताळून पाहणे व असल्यास त्यांच्यातील व्यवच्छेदक (वेगळेपणा दाखविणारे) वैशिष्ट्य शोधून काढणे. रंग व स्फटिक यांच्या निर्मितीवर आधारलेल्या बेंझिडीन, फ्लोरेन्स, प्युरानेन, फॉस्फेटेज वगैरे परीक्षण पद्धतींच्या उपयोगाने त्यांचे अस्तित्व प्रथम सिद्ध केले जाते. नंतर ते मानवी आहेत की इतर प्राण्यांचे आहेत हे अतिशय विश्वसनीय व सूक्ष्मप्रमाणदर्शी अशा रक्तरसशास्त्राच्या विविध प्रयोगांनी ठरविले जाते. या द्रव पदार्थाच्या द्वारा माणसांचे वर्गीकरण करण्यासाठी एबीओ (ABO), एमएनएस (MNS), आरएच (Rh) वगैरे अनेक स्वतंत्र वर्गीकरण पद्धती उपलब्ध आहेत. सध्यातरी रक्ताच्या व इतर द्रव पदार्थांच्या डागांचे परीक्षण करण्यासाठी यांपैकी एबीओ ही व्यवस्था सर्वाधिक विश्वसनीय समजली जाते, कारण ती प्रायोगिक दृष्ट्या अधिक यशस्वी ठरली आहे.

केसासारखे नैसर्गिक (उदा., प्राणिज केस) आणि मानवनिर्मित (कृत्रिम) धागे यांचे परीक्षण सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने केले जाते. त्यामुळे ते प्राणिज अथवा मानवनिर्मित आहेत हे ठरविता येते व नंतर समान अथवा विरोधी वैशिष्ट्ये पडताळून पाहिल्यावर एकाच व्यक्तीचे अथवा एकाच द्रव्याचे विणलेले आहेत की नाहीत याचा निर्णय केला जातो. गुह्येंद्रियातून कापसाच्या बोळ्यावर शोषून घेतलेले द्रव पदार्थ किंवा त्यांचे काचेच्या तबकडीवर तयार केलेले नमुने यांची तपासणी करून त्यांच्यात शुक्राणू (पुरुषातील प्रजोत्पादक पेशी) व संभोगजन्य गुप्तरोगांचे सूक्ष्मजंतू यांचे अस्तित्व असल्यास तसे प्रस्थापित केले जाते. कमीअधिक प्रमाणात अन्नविषबाधेस कारणीभूत होणाऱ्या सूक्ष्मजीवांचे अस्तित्व पाहण्यासाठी विविध अन्नपदार्थांचे सूक्ष्मजीवशास्त्रीय विश्लेषण केले जाते. प्राणी व वनस्पती यांचे अवशेष, लाकडाचा भुसा वा कपच्या यांची सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने व रासायनिक पद्धतीने कसून तपासणी केल्यावर त्यांचा वेगळेपणा किंवा सारखेपणा दाखविता येतो.

भौतिकीय व भौतिकी-रसायनशास्त्रीय पद्धतींच्या मदतीने होणारे काम भौतिकी विभागात केले जाते. पुराव्यातील सूक्ष्म प्रमाणात असलेले धातू, कागद, शाई यांचे अवशेष व माती वगैरेंची वर्णपटलेखन पद्धतीने तपासणी होते. गुन्हा घडताना फाटलेले कापड, कागद, तुटलेल्या अगर तोडलेल्या तारा, सळया तसेच इतर हत्यारांनी झालेल्या खुणा यांच्या तुलनात्मक अभ्यासाने त्यांचे उगम सिद्ध केले जातात. धूळ, काचेचे तुकडे, केरकचरा, रद्दी सामानाच्या ढिगाऱ्यातील सरमिसळ झालेले पदार्थ, जळू शकणारे पदार्थ वगैरेंचीही भौतिकीय तपासणी केली जाते. याकरिता जंबुपार (वर्णपटाच्या जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरणांचा उपयोग करणारी) अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य किरणांचा उपयोग करणारी) वर्णपटप्रकाशमिती, ज्योतप्रकाशमिती (ज्वालेच्या प्रकाशातील रंग आणि त्यांची तीव्रता मोजण्याचे तंत्र), विभेदी औष्णिक विश्लेषण, न्यूट्रॉन सक्रियण (न्यूट्रॉनांना उत्तेजित करून केलेले) विश्लेषण, क्ष-किरण विश्लेषण वगैरे अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब केला जातो. चोरीच्या प्रकरणातील धातूंच्या किंवा इतर पट्ट्यांवरील, तसेच दुसऱ्या वस्तूवरील घासून टाकलेले आकडे व खुणा यांच्यावर रासायनिक विक्रिया करून त्यांना पुन्हा ओळखता येण्याजोगे करण्याचे कामही याच विभागात होते.

वर निर्देश केलेल्या आधुनिक शास्त्रीय पद्धतींचे व त्यांत वापरावयाच्या उपकरणांचे वैशिष्ट्य असे आहे की, त्या परीक्षण–विश्लेषणात लागणाऱ्या वस्तू व पदार्थ अगदी सूक्ष्म आकाराचे असले तरी चालते. पूर्वीच्या भौतिक-रासायनिक पद्धतींनीही तेच निष्कर्ष निघत; पण त्या पद्धतीत वस्तू पुरेशा मोठ्या आकाराच्या असाव्या लागत. उदा., माणसाला मारण्यासाठी त्याला जर आर्सेनिक विष दिले गेले असेल तर ते शोधून काढण्याचा प्रश्न. आर्सेनिक हे शरीरावरील केसात लवकर जाते म्हणून या विश्लेषणासाठी शरीरावरील केस वापरणे पूर्वीपासून रूढ आहे. पण पूर्वीच्या रासायनिक पद्धतींत तपासावयाच्या प्रत्येक नमुन्यात हजारो केस असावे लागत. नायट्रिक व सल्फ्यूरिक अम्लांच्या मिश्रणात केस प्रथम मुरवायचे व नंतर ⇨क्षपणाने त्याचे आर्साइनामध्ये रूपांतर करायचे वगैरे अशी ही पद्धत होती. पण अलीकडे वापरात आलेल्या न्यूट्रॉन सक्रियण विश्लेषणात फक्त पन्नास केस पुरतात. शिवाय या विश्लेषणात केसाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत त्यातील आर्सेनिकाचे प्रमाण दाखविणारा ढाळही (बदलाचा दरही) मिळू शकतो. या ढाळावरून मग ते विष एकदाच दिले होते की, त्या बळीच्या मृत्यूपूर्वी काही महिने बऱ्याच वेळा देण्यात येत होते हेही समजू शकते.

अकार्बनी विश्लेषणात द्रव्यमान वर्णपटमिती [→ द्रव्यमान वर्णपटविज्ञान ] आणि न्यूट्रॉनांचे सक्रियण फारच उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. जेव्हा एखादा माणूस खून करण्यासाठी घर फोडून आत शिरतो तेव्हा त्याच्या कपड्यांत किंवा कपड्यांवर तेथील काचांचे किंवा रंगांचे कण चिकटतात. या कणांची घरातील काचा व रंग यांच्याशी या पद्धतींनी तुलना करून संशयिताच्या कपड्यावर सापडलेल्या काचांचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकणार नाही हे पूर्वीचे मत आता चुकीचे ठरले आहे.

न्यायसाहाय्यक वैद्यकात रक्त, लघवी वगैरेंचे विश्लेषण करून त्यांत अमुक एक विष आहे की नाही हे ठरविता येते. बार्बिच्युरेट, अँफेटामीन व मॉर्फीन यांच्या अस्तित्वासाठी लघवीचे स्वयंचलित विश्लेषण करणारी यंत्रे अलीकडेच निघाली आहेत. ही यंत्रे इतके जलद काम करतात की, ती तासात वीस नमुने तपासू शकतात. यांची कार्यशक्ती १०० नमुन्यांपर्यंतही जाऊ शकते.

बंदुका व त्यांची काडतुसे यांचे परीक्षणही त्या विषयातील अनुभवी तज्ञाकडून केले जाते. काडतुसांची सूक्ष्मदर्शकाने तुलनात्मक तपासणी केल्याने व बंदुकीच्या नळीतील अवशेष पदार्थांचे रासायनिक परीक्षण केल्याने एखादी बंदुक नुकतीच वापरली गेली आहे काय व एखादे काडतूस एका विशिष्ट बंदुकीतून उडविण्यात आले असावे काय यावर बहुतेक वेळा निर्णायक मत देता येते. त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या अंगावरील जखमांचे स्वरूप, तिच्या अंगात किंवा गुन्ह्याच्या जागी सापडलेली काडतुसे किंवा त्यांचे अवशेष यांचे परीक्षण करून किती अंतरावरून बंदुकीतील काडतुसे उडविली गेली असावीत याचेही अनुमान व्यक्त करता येते. या वर्णनावरून आधुनिक गुन्ह्यासंबंधी पुरावा उपलब्ध करण्यात विज्ञानाची किती मदत होऊ शकते याची कल्पना करता येईल.

प्रायोगिक परीक्षणाचे महत्त्व

प्रत्यक्ष गुन्हा घडत असतानाचा साक्षीदार नसल्याने किंवा साक्षीदार असूनही न्यायालयामध्ये त्याची साक्ष अपुरी ठरल्याने गुन्हेगार सुटून जाण्याचा संभव असतो. अशा वेळी गुन्हा शाबीत करण्याच्या कामात प्रायोगिक परीक्षणांचा चांगला उपयोग होतो. उदा., विषारी पदार्थ पोटात गेल्याने माणसाचा मृत्यू झाला असल्यास मरणोत्तर वैद्यकीय तपासणीमध्ये त्याच्या पोटातील द्रवात विषारी पदार्थाचे अस्तित्व आढळले, तर त्यावरून मृत्यूचे कारण समजते.

भारतातील प्रयोगशाळा

भारतात १९५६ मध्ये मध्यवर्ती शासनाने कलकत्ता येथे पहिली न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा स्थापन केली व या विज्ञानशाखेच्या वाढीसाठी राष्ट्रीय पातळीवर एका सल्लागार समितीही नेमली. या सल्लागार समितीच्या सूचनेवरून मध्यवर्ती शासनाने या विज्ञानशाखेची स्थापना करून तिची वाढ करण्याची सर्व राज्य सरकारांना शिफारस केली. त्यामुळे आता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, आसाम, ओरिसा, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि जम्मू व काश्मीर या राज्यांत या विज्ञानशाखेची स्थापना झाली असून तेथे प्रयोगशाळाही सुरू झालेल्या आहेत. शिवाय मध्यवर्ती शासनातर्फे कलकत्त्याच्या जोडीला दिल्ली व हैदराबाद येथेही स्वतंत्र प्रयोगशाळा चालविण्यात येतात. महाराष्ट्र राज्याच्या मुंबई येथील प्रयोगशाळेत हे काम अत्याधुनिक पद्धतीने केले जाते. मुंबईच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेची एक प्रादेशिक शाखा नागपूर येथे आहे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:42:10.890325 GMT+0530

T24 2019/10/14 06:42:10.897668 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:42:10.480818 GMT+0530

T612019/10/14 06:42:10.500296 GMT+0530

T622019/10/14 06:42:10.563130 GMT+0530

T632019/10/14 06:42:10.564064 GMT+0530