অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चला वाचूया, स्वत:ला घडवूया...

चला वाचूया, स्वत:ला घडवूया...

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख.

दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे.

दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. नितळ मन आणि दिलदार स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता म्हणून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे.

शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये दर आठवड्यातील एक तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये वाचन कट्टा तयार करणे यासारखे उपक्रमही यानिमित्ताने हाती घेण्यात येणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने शाळांनी इनोवेटिव्ह फंडामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी साहित्यिकांमार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. वाचन दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तास वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनच जणू या दिनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही करण्यात यावा. तसेच साहित्यिक, मान्यवर व्यक्तींनी वाचनाचे महत्व सांगणारे ट्विट करावे, असे आवाहनही शालेय शिक्षण मंत्री यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच हा दिवस आपण सर्वांनी मिळून ‘नो गॅझेट डे’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तकांचे वाचन या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी, शक्तीशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टीकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाणार आहे. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी आणि भाषाविकास यासाठी आवश्यक आहे. मुळातच वाचन संस्कृती ही व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते. म्हणून शाळा आणि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.

वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करणे, समाज सहभागातून या कट्ट्यासाठी पुस्तके गोळा करुन शाळेत पुस्तकपेढी तयार करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करणे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविणे, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरुप होतील अशी पुस्तके भेट देणे, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून ‘वाचू आनंदे’ या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकांविषयी चर्चासत्रांचे आयोजन करणे, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांवर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक, कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयीची माहिती देणे, पुस्तकांचे वाटप करुन ‘वाचक दिन’ आणि ‘अध्यापन दिन’ साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करुन विविध पुस्तकांवर चर्चासत्रे घडवून आणणे, शाळांनी पुढाकार घेवून ‘पुस्तके तुमच्या भेटीला’ अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, असे विविध उपक्रम आणि याव्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत.

चला तर मग, काव्यवाचन, अभिवाचन, नो गॅझेट डे, वाचन कट्टा, समूह वाचन इत्यादी उपक्रमातून वाचक प्रेरणा दिन अधिकाधिक उत्सफूर्तपणे साजरा होण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊया...

लेखिका - वर्षा फडके,
वरिष्ठ सहायक संचालक.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate