অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बुद्धिमत्तेचे प्रकार

आपल्याकडे बरेच जणांना वाटते की एकतर आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे किंवा इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे ज्याचा त्या मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदा. आपल्याला आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्या मुलाने डॉक्टर अथवा काँप्युटर इंजिनीयर व्हावे म्हणून प्रयत्न करतो आणि जर आपल्याला आपले मूल इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्याच्यावर अभ्यासाचे अवाजवी दडपण आणतो, त्याला वेगवेगळी टॉनिके पाजतो. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो.

पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे.

बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची असते, असं नाही. तिचे वेगवेगळे प्रकार असतात. आणि आपली किंवा आपल्या मुलांची क्षमता समजून घेण्यासाठी हे प्रकार माहीत असणं, गरजेचं आहे.

व्यवसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता आवश्यक आहे अशी आपल्या सर्वांची समज असते. बऱ्याच प्रमाणात हे खरे आहे. किमान सरासर बुद्धिमत्तेची गरज तर बहुतांश कामांसाठी असतेच. परंतु काय सर्वच प्रकारच्या कामांसाठी एकाच प्रकारची बुद्धिमत्ता आहे? आणि जर एखाद्याचा बुद्ध्यांक उच्च असेल तर तो सर्व प्रकारच्या कामात निश्चित यशस्वी होऊ शकेल का? अनेक वर्षांच आत दाखवून दिले आहे की बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसून कमीत कमी सात निरनिराळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. ही मल्टीपल इंटेलिजन्सची संकल्पना सर्वप्रथम होवार्ड गार्डनर या मनोवैज्ञानिकाने दिली. गार्डनरची दिलेल्या सात बुद्धिमत्ता खालील प्रमाणे आहेत.

लिंग्विस्टिक (भाषिक) बुद्धिमत्ता

ज्या व्यक्तींचे भाषेवर उत्तम प्रभुत्व असते त्यांची लिंग्विस्टिक बुद्धिमत्ता चांगली असते. या लोकांना शब्दांमधे आपले विचार मांडणे छान जमते व लिहिण्यात वाचण्यात हे प्रभावी असतात. शालेय यशासाठी साहजिकच ही वर्बल बुद्धिमत्ता आवश्यक असते.

लॉजिकल (तार्किक) बुद्धिमत्ता

ही देखील शालेय यशासाठी महत्त्वपूर्ण असते. या लोकांची तर्कशक्ती उत्तम असते. त्यामुळे समस्या निर्मुलनात हे लोक हुशार असतात. ज्या लोकांचे गणित चांगले असते त्यांची ही बुद्धिमत्ता चांगली असते. शास्त्रीय क्षेत्रांमधे काम करणाऱ्यांची ही बुद्धिमत्ता चांगली असावी लागते.

विझ्युअल (अवकाशीय / दृष्य)  बुद्धिमत्ता

नजरेतून दिसणाऱ्या गोष्टीतून पटकन शिकण्याची क्षमता विझ्युअल बुद्धिमत्ता चांगली असणाऱ्यांकडे असते. चार्टस मॅप कोडी यासारख्या गोष्टींमधून चटकन त्यांच्या लक्षात माहिती येते.

वैयक्तिक बुद्धिमत्ता

याला म्हणतात पर्सनल इंटेलिजन्स. सोप्या शब्दात सांगायचे तर स्वत:च्या भावना वेदना इमोशन्स या गोष्टींना लोक सेन्सिटिव्ह असतात. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यापूर्वी त्या गोष्टीचे आपल्याला काय महत्त्व आहे. त्याने आपल्याला कसा उपयोग होणार आहे. ज्ञानात कशा प्रकारची भर पडणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ते प्रयत्न करतात. असे केल्यामुळे तयंच्या लक्षातही चांगले राहते.

आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता

इतरांशी उत्तम संवाद साधण्याची कला असणाऱ्या लोकांचे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स चांगले असते. इतर लोकांबरोबर संपर्क जोडून एकत्रितपणे काम करण्यात या लोकांना रस असतो व यांच्या संवाद कला उत्तम असतात व इतरांच्या मनातील जाणून घेण्यात त्याच्या इच्छा अपेक्षा काय असतील हे ओळखण्यात हुशार असतात. सेल्समन माकेर्टिंगमधे काम करणाऱ्या लोकांसाठी आवश्यक अशी ही बुद्धिमत्ता आहे.

कायनेस्थेटिक (शारीरिक) बुद्धिमत्ता

याला शारिरीक बुद्धिमताही म्हणतात. आपल्या वातावणाबरोबर कसा संपर्क साधावा हे या लोकांना छान येते. हाताने एखादी गोष्ट करून हे लोक पटकन शिकतात.तसंच खेळ नाट्य नृत्य या गोष्टींमधे ते निपूण असतात. थोडक्यात म्हणजे आपल्या मानसिक क्षमतांचा उपयोग करून शरीराच्या हालचाली कशा प्रकारचे कण्ट्रोल कराव्यात ही कला यांच्यात असते.

सांगीतिक बुद्धिमत्ता

ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले सतत ताल धरतात, गुणगुणतात. त्यांना इतरांना न ऐकू येणारे नाद आपल्या आजूबाजूच्या वातावरणात ऐकू येत असतात उदा. पाणी ठिबकणे, पाखरांचे कूजन. ही मुले उत्तम श्रोता असतात.

आपल्यामधे कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता अधिक आहे यावरून आपण कोणत्या कामात यशस्वी होऊ शकतो याचा आढावा आपल्याला घेता येतो. तर यापैकी तुम्ही कोणत्या क्षेत्रात हुषार आहात ते पाहून आपल्यामधे कोणती बुद्धिमत्ता अधिक जम धरून आहे हे पाहा. आपल्यामधे या सर्व बुद्धिमत्तांचे मिक्स्चर असते. थोड्याफार प्रमाणात आपल्यामधे या निरनिराळ्या बुद्धिमत्ता असतात. आणि आपल्यामधे असणाऱ्या या कॉम्बिनेशनचा आढावा जर आपण घेतला तर आपण कोणते काम अशा प्रकारे करू शकू, याचा आपल्याला अचूक अंदाज येऊ शकतो.

 

 

माहिती संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate