অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

..आणि डेराबर्डी निवासी शाळेला मिळाले आयएसओ मानांकन

..आणि डेराबर्डी निवासी शाळेला मिळाले आयएसओ मानांकन

आर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही. अशा मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनामार्फत प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील डेराबर्डी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निवासी शाळा सुरु करण्यात आली आहे. या शाळेला दि. 4 नोव्हेंबर, 2017 रोजी आय.एस.ओ. मानांकन मिळाले आहे. याविषयी थोडक्यात..

चाळीसगाव तालुक्यातील डेराबर्डी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जून, 2011 मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी निवासी शाळा सुरु करण्यात आली. या शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे हे यशदा, पुणे येथे 31 जुलै, 2017 रोजी आय.एस.ओ. मानांकन संदर्भात मार्गदर्शन ‍कार्यशाळेत उपस्थित होते. येथूनच शाळेला आय.एस.ओ. मानांकन मिळविण्यासाठीचे कार्य सुरु झाले. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना आय.एस.ओ. मानांकनाबाबत समजावून सांगितले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आय.एस.ओ. मानांकनाकरीता कार्यवाहीस सुरूवात केली.

सर्वप्रथम शाळेची इमारत खाजगी असूनही तिची स्वच्छता करुन रंगरंगोटी करण्यात आली. इमारतीच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या. सर्व खोल्यांमध्ये रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य बनवले. त्यामुळे अध्यापनात जिवंतपणा आला. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला. अध्ययनात आवड निर्माण झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही वाढ झाली.

सर्व शिक्षकांचा उपक्रम ठरलेला. वेळेचे बंधन असल्याने सर्व उपक्रम एकाचवेळी सुरु केल्यास ते वेळेत पूर्ण होणार नव्हते. म्हणून मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी क्लब, गणिती कोडे, ‍विज्ञान कोडे, क्षेत्रभेट, सहल, प्रश्नमंजूषा, नोबेल जाणूया असे उपक्रम प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे ठरविण्यात आले. गणित, विज्ञान या विषयातील संकल्पना स्पष्ट होऊन अध्ययनात विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यास मदत झाली. विद्यार्थी प्रत्येक विषयाचे ज्ञानरचनावादी दृष्टीकोनातून गुणवत्तापूर्व शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांचे शारिरीक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांना पौष्टीक व पुरेसा आहार मिळाला पाहिजे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांसह इतर शिक्षक जागरूक असतात. प्रत्येक कर्मचारी भोजनाची चव घेत असल्यामुळे जेवणाचा दर्जा उत्तम राहतो. यासाठी शाळेत विद्यार्थी भोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अभिप्रायानुसार मेनूमध्ये बदल करण्यात येतो. प्रत्येक विद्यार्थ्याची महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. योग्यवेळी तपासणी झाल्याने कोणतीही आरोग्य समस्या निर्माण होत नाही. इमारतीमध्ये स्वच्छता ठेवण्यात येते. त्यासाठी प्रत्येक वर्गात कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. सर्व खर्च लोकसहभागातून करावयाचा असल्याने यासाठी लागणारा सर्व खर्च शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला.

या निवासी शाळेकरीता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तम गुणांनी उत्तीर्ण असलेले शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. शाळेत अनेक प्रकारचे सांस्कृ‍तिक कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात. स्वतंत्र संगणक कक्ष, अभ्यास कक्ष, ग्रंथालय, मनोरंजनासाठी एलसीडीची व्यवस्था करण्यात आली आहे. आय.एस.ओ. मानांकनासाठी सूचनापेटी, तक्रार पेटी, प्रथमोपचार पेटी, दिशादर्शक फलक, शिक्षक, कर्मचारी यांना ओळखपत्र, बोलका व्हरांडा, कपाटातील दप्तराची मांडणी, रजिस्टर, जुने रेकॉर्ड यांची योग्य मांडणी, संगणकाची सोय, कार्यालयाची सजावट, संदेश फलक, प्रयोगशाळा साहित्यांची मांडणी, अग्नीशमन यंत्र, पाण्याची व्यवस्था, पोषक आहाराची सोय, ‍ खिडक्यांना पडदे, ‍भिंतीवरील सुविचार, किचन शेड, थंब मशिन अशा सर्व घटकांनी सुसज्ज अशी ही निवासी शाळा आहे.

निवासी शाळा मुलांची असून इयत्ता 6 वी ते 10 पर्यंतचे सेमी चे वर्ग आहेत. या निवासी शाळेत शासन नियमानुसार सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शाळेची इमारत खाजगी भाडेतत्वावर असल्याने शासनाने दर्शविलेल्या इमारत क्षमतेनुसार 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यानुसार सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात 94 विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा व निवास व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. सोयी सुविधा अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय क्रमिक पुस्तके, वह्या, शैक्षणिक साहित्य, तेल, साबण, टूथपेस्ट, आंथरुण-पांघरुण, सतरंजी, चादर, बेडशीट, शालेय गणवेश, बुट, मोजे, भोजन व्यवस्था, नाश्ता हे सर्व शासनाने ठरवून दिलेल्या अटी-शर्ती प्रमाणे पुरविण्यात येतात.

यामुळेच या शाळेला 4 नोव्हेंबर, 2017 रोजी आय.एस.ओ. मानांकन मिळाले आहे. सामाजिक न्याय विभाग, जळगावचे सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड यांनी यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने शाळेचा विकास व गुणवत्ता वाढण्यास मदत झाल्याचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांनी सांगितले.

लेखक -राजेश सोनार,

प्रभारी माहिती सहायक, उप माहिती कार्यालय, चाळीसगाव, जि. जळगाव

माहिती स्रोत  : महान्यूज

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate