बालकांच्या जीवनात शाळा म्हणजे एक नवा अध्याय. नव्या शिक्षणाचा जिज्ञासा पूर्ण करणारा अभ्यास. जीवनाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारा एक परिपूर्ण प्रवास होय. शिक्षणाची महती गावी तेवढी थोडीच. जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी देणाऱ्या शिक्षकांनाही आपण नमनच करायला हवे. कारण विद्यार्थी घडविण्याची त्यांची तळमळ प्राणांतिकच असते.

अशीच अनेक विद्यार्थी शासकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रगल्भ बनविणारी व अष्टपैलू व्यक्तीमत्व प्रदान करणारी, गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा होय. आजच्या काळात शाळांनी शैक्षणिक स्पर्धेत टिकण्यासाठी व इंग्रजी शिक्षणाचे आव्हान पेलण्यासाठी या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु करण्यात आले. सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शाळा सज्ज झाली.
अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धीक विकास होतो, पण मनावरील उपचारही तेवढेच महत्वाचे होते. त्याकरीता शाळेत रोज विद्यार्थी प्राणायामाचे धडे गिरवितात.

विज्ञान सत्यावर आधारलेले असून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन परिपूर्ण व्हावा याकरीता उदाहरणांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम केले जाते. त्यामुळे विद्यार्थी सत्याशी, प्रयोगाशी जुळतात. शाळेत महान पुरुषांनी केलेल्या कार्याचे स्मरण म्हणून त्यांची जयंती, संस्कृतीशी परिचय करुन देणारे सण उत्सव साजरे केले जातात व यातूनही विद्यार्थ्यांना संचालन करण्याची संधी देऊन त्यांच्यातील वक्तृत्व गुणाला चालना देण्यात येते.

विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात राहावा म्हणजे निसर्गातील गुण आत्मसात करता येतील या उद्देशाने पर्यावरण सहल, वनभोजन, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजित केले जातात. ‘ग्रंथ हेच जीवन’ उक्तीप्रमाणे शाळेत ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा, मनातील सुप्त भावना, विचार शब्दांकीत करता यावे याकरीता विविध विषयांवरील लेखनाचा सराव शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांकडून करुन घेतात.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या शालेय आयुष्याची पायाभरणी सर्व बाजूंनी पक्की करण्यासाठी येथील शिक्षक सदैव तत्पर असतात. गावात खाजगी शाळा, कॉन्व्हेंट व माध्यमिक विद्यालय असतांनाही गावकरी आपल्या मुलांना फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करतात हेच या शाळेच्या यशस्वी होण्याचे प्रमाण होय.

हाडाचा शिक्षक हा शिक्षक असतो. करारी बाणा असलेल्या शेतकऱ्याप्रमाणे समोर असलेली जमीन, कोणताही वाफा फुलविणे हे त्याचे नियतीने नेमून दिलेले कर्तव्य असते आणि ज्याला हे जाणवतं त्यालाच कळतं. मळाही फुलतो आहे आणि माळीही !

-जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

माहिती स्त्रोत : महान्युज